अमरत्व संपूर्ण

  अमरत्व भाग एक 

✍️ नियती जगताप 

*** सदर कथा हि काॅपी राईट आहे तरी लेखकाच्या नावासहीत रीपोष्ट करू शकता. ****

*** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****

आज अमावस्या. आजची रात्र तिच्यासाठी खूप महत्वाची होती. गेली बारा वर्षे न चुकता ती दर अमावस्येला हा विधी मन लावून करत होती. आज शेवटचा विधी होता. सैतानाला लहान मुलाचा बळी देऊन आज ती सैतानाकडून अमरत्वाचं वरदान घेणार होती. तिच्या घरातली एक रूम तिने खास या कामासाठीच राखून ठेवली होती. ती एका छोट्या शहरात राहतं होती, तिच्या शेजारच्यांना तिच्या काळी जादू करण्याबद्दल माहिती होती पण थोतांड समजून त्यांनी कधी लक्ष दिलं न्हवतं. आज सकाळीच जाऊन तिने विधीचं सगळं सामान आणून ठेवलं.दुपारी ती शेजारच्या शहरात गेली आणि संध्याकाळी परत आली. जाताना एकटी होती पण येताना सोबत एक लहान मुलगा होता. त्याला खाऊ आणि खेळण्यांचं आमिष देऊन सोबत घेऊन आली होती. रात्री नऊ वाजता विधी सुरू करून रात्री बरोबर बारा वाजता तिला त्या लहान मुलाचा बळी द्यायचा होता. या सगळ्याची तिळमात्र ही कल्पना  नसलेला तो मुलगा मस्तपैकी खेळत होता. खेळता खेळता तो खिडकीतून बाहेर बघत उभा राहिला. तिने त्याला खिडकी जवळ जायचं नाही म्हणून हटकलं तसा तो लगेच बाजूला झाला आणि ती परत तिच्या कामाला लागली. पण तिच्या शेजार्याने त्या लहान मुलाला पाहीलं, अघोरी  विद्येविषयी त्याला थोडीफार माहिती होती त्यामुळे त्याला लक्षात आलं हा काहीतरी नरबळी चा प्रकार आहे. त्याने तिथल्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित माणसाला याची कल्पना दिली. त्यांनी आज रात्रीच जवळपासच्या लोकांना घेऊन तिला तिथून हाकलून लावायची योजना आखली. 

ती काळी साडी घालून तयार झाली. लांबसडक केस मोकळे सोडले. बिब्याचा काळा मळवट भरला, काळ्या बांगड्या घातल्या डोळ्यात भरपूर काजळ भरलं. सामान्य दिसणारी बाई आता एकदम भयानक दिसू लागली. तिचं असं रूप बघून आता तो लहान मुलगा पण खूप घाबरला, रडायला लागला. तिने त्याचे हात पाय तोंड बांधले आणि त्याला विधी करण्याच्या रूम मध्ये बसवलं. रात्रीचे नऊ वाजले, तिने होम पेटवला आणि तिचा विधी सुरू झाला.समोर सैतानाचा पुतळा ठेऊन ती अघोरी मंत्र म्हणत एक एक वस्तूची होमामध्ये आहुती देत होती. शेजारी बसवलेला मुलगा भितीने केव्हाच बेशुद्ध पडला होता. बारा ला पाच दहा मिनिटे कमी होती, तिने शेवटची आहुती होमामध्ये टाकली आणि जवळच्या चाकूने स्वतःचा हात कापला. रक्ताची धार होमात दोन मिनिटं पडू दिली आणि मग स्वतःच्या रक्ताने सैतानाच्या पुतळ्याचे पाय पुर्ण भिजवले. रूम मधले दिवे थोड्या वेळासाठी चालू बंद झाले आणि परत चालू झाले. तिच्या चेहर्यावर एक आसुरी हसू पसरलं. होमामधून एक छोटासा शिंपला बाहेर पडला. त्या खोलीत खूप घाण वास यायला लागला. त्या शिंपल्यात दोन तीन थेंब एक हिरवं चिकट द्रावण होतं. तिने ते द्रावण एका बाटलीत भरले आणि तो शिंपला परत होमामध्ये टाकून दिला. आता तिला फक्त नरबळी देऊन त्याच्या दहा थेंब रक्तात ते द्रावण मिसळून प्यायचे होते. आणि ती आणि तिचं शरीर अमर होणार होतं.

तिचे हे विधी चालू असताना बरेच लोकं तिच्या घराबाहेर तिचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. इकडे तिने ते द्रावण बाटलीत भरलं आणि तिकडे जमलेली लोकं तो दरवाजा तोडून ती विधी करत असलेल्या रूम मध्ये आले. अचानक झालेल्या प्रकाराने ती दचकली. आपल्या लक्षाच्या एवढ्या जवळ येऊन तिला आता कोणतीही जोखीम पत्कारायची न्हवती. बरच रक्त गेल्याने ती थोडी अशक्त पण झाली होती. अशा परिस्थितीत जमलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना पळवून लावनं तिच्यासाठी नेहमीसारखं सोपं न्हवतं. तिने पटकन ती द्रावणाची बाटली उचलली आणि आपल्या शक्तीने दरवाज्यात उभ्या लोकांना थोड्या वेळासाठी बांधलं. तीने तिथून पळ काढला. त्या मुलाला तिथे अश्या अवस्थेत बघून सगळे जमलेले लोकं खूप चिडले. ती चेटकीण आहे आणि तीला मारून टाकावं लागेल हा त्यांचा ठाम निर्णय झाला. आज तिचा सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून लोकं हातात काठ्या घेऊन तिच्या मागं धावत होते आणि जास्त रहदारी नसलेल्या रस्त्यावरून ती जशी वाट फुटेल तशी धावत होती. 

धावत धावत ती एका हॉस्पिटलच्या गेट जवळ पोहोचली. एक कार ऐक्सिडेन्ट ची केस नुकतीच आली होती त्यामुळे तिथं थोडी गर्दी होती. डाॅक्टर आणि नर्सेस ची धावपळ सुरू होती आणि स्टेचरवर तीन माणसं, नवरा बायको आणि त्यांची दहा- बारा वर्षांची मुलगी, बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मुलीला जास्त लागलं न्हवतं पण नवरा बायको बर्यापैकी जखमी झाले होते त्यामुळे मुलीच्या स्टेचरजवळ गर्दी न्हवती. तीने आजूबाजूला पाहिलं आणि ती लगेच मुलीजवळ गेली. मुलीच्या गळ्यात एक माॅडर्न टाईपचं लॉकेट होतं. एका काळ्या जाड दोर्यात थोड्या थोड्या अंतरावर लाकडाचे छोटे मणी आणि मधोमध काचेची रंगीत पाण्याने अर्धी भरलेली एक  छोटीशी बाटली. तिने लगेच त्या बाटलीतलं पाणी ओतून त्यात तिच्याजवळ असलेलं हिरवं द्रावण भरलं. आणि ती चेहर्यावर पुन्हा आसूरी हसू घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडली. तिला शोधणार्या लोकांची तिच्यावर परत नजर पडली. ते पुन्हा तिला मारायला तिच्या मागे पळाले. ती पुन्हा जीव वाचवायला पळू लागली पण मागे बघत पळत असताना एका भरधाव येणार्या ट्रक ला धडकली आणि जागीच मरण पावली. पण मरताना सुद्धा तीचे डोळे हॉस्पिटलच्या दिशेकडेच बघत होते. 

**** क्रमशः ****

भाग दोन

भाग तीन

लेखिका: नियती जगताप


वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post