अमरत्व भाग ७

 अमरत्व  भाग 7

लेखिका: नियती जगताप



पार्थ आणि अरूण गाडीत बसायला गेले तर गाडीमध्ये कोणीच न्हवतं. नित्या आणि साध्वी दोघीही गायब झाल्या होत्या. अरूण आणि पार्थ दोघंही त्या दोघांनी शोधू लागले तेव्हा पार्थ ला मामाचा फोन आला. तो लॉकेट सोबत घेऊन स्मशानभूमीत पोहोचला होता. अघोरीला नित्या साध्वीला घेऊन गेल्याचं कळलं होतं त्यामुळे त्याने वेळ वाया न घालवता दोघांना स्मशानभूमीत बोलवलं होतं. पण त्याचवेळी देवीला अर्पण केलेली आणि  कामाख्या देवीच्या सिद्ध कुंकवामध्ये भिजवून वाळवलेली एक ओढणी देऊन अघोरीने मामाला कुठेतरी पाठवून दिलं होतं. ती ओढणी, ओढणी अंगावर घेणार्या माणसाचं अस्तित्व वाईट शक्तींपासून लपवून ठेवत असे. दोघेही पाच मिनिटांनी पोहोचले. अघोरीने त्यांना लवकरात लवकर हात पाय धुवून बोलवलं. त्यांच्याही माथ्यावर देवीचं कुंकू लावलं. अघोरीने त्यांना सांगितलं की ती चेटकीण अमर होण्यासाठी सैतानाला पुजत होती, तिचे सर्व विधी जिवंत असतानाच पुर्ण झाले आहेत आता तिला फक्त एक नरबळी देऊन तिच्या रक्ताच्या दहा थेंबांमध्ये या बाटलीतलं द्रावण मिसळून प्यायचं आहे. असं म्हणून त्यांनी नित्या च्या त्या लॉकेट कडे बोट दाखवलं. आता सगळ्यांच्या लक्षात आलं की नित्या नेहमी काय शोधत असे. सध्या चेटकीणीने नित्याच्या शरीरात प्रवेश केला होता त्यामुळे नित्या हे सगळे विधी करणार होती आणि जर या वेळी ती चेटकीण यशस्वी झाली तर नित्याचं शरीर कायमचं तिचं होणार होतं. आज पण सोमवती अमावस्या होती त्यामुळे अपुर्ण काम ती चेटकीण आजच पुर्ण करणार होती. अघोरीने देवीच्या कुंकवाने एक मोठं रिंगण आखलं. अघोरी, त्यापुढे होम आणि त्यापुढे अरूण आणि पार्थ बसले होते. काहीही झालं तरी रिंगणातुन बाहेर पडायचं नाही ती चेटकीण पुन्हा भास निर्माण करेल आणि कोणी रिंगणाबाहेर पडलं तर ती त्याला वश करून पुजा भंग करण्याचा धोका होता. अघोरीने पार्थला सांगून ठेवलं की एक वेळ अशी येईल जेव्हा चेटकीणीचा नित्याच्या शरीरावर अगदी थोड्या वेळासाठी ताबा राहणार नाही, ती अगदी स्तब्ध होईल त्यावेळी नित्याला भानावर आणलं तर ती चेटकीण पुन्हा तिच्या शरीराचा ताबा पुन्हा मिळवू शकणार नाही. याची जबाबदारी पार्थ कडे देऊन अघोरीने पुजा सुरू केली. अघोरीने काही मंत्र म्हणत हातात मुठभर काळे उडीद घेऊन ते होमामध्ये टाकले आणि होम आपोआप प्रज्वलीत झाला. 


इकडे नित्या त्या चेटकीणीच्या घरात त्याच खोलीमध्ये होती ज्या खोलीत ती चेटकीण विधी करत असे. नित्या सुद्धा त्या चेटकीणीसारखी तयार होउन होमापुढे बसली होती. तिच्या उजव्या हाताला एक मोठा कोयता ठेवला होता आणि समोर साध्वी बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर झोपली होती. 


अघोरी एक एक मंत्र म्हणत होमामध्ये संमिधा टाकत होता आणि इकडे नित्याचे हातपाय बांधले जात होते. नित्या पूर्ण शक्ती पणाला लावून अघोरीवर पलटवार करत होती. त्यामुळे तिकडे अघोरीला पण अंगावर निखारा पडल्यासारखं भाजत होतं. त्याच्या अंगावर जखमा होत होत्या. आता अघोरीने देवीचं कुंकू हातात घेतलं,ते कुंकू तोंडाजवळ धरून कामाख्या बीजमंत्र म्हणून ते होमामध्ये टाकलं. तसं तिकडे नित्या तडफडू लागली, डोळे चोळू लागली. हीच ती वेळ होती. देवीच्या ओढणीने अंग झाकून एका कोपर्यामध्ये लपून बसलेल्या मामाने साध्वी ला उचललं आणि पळतच जवळचं देऊळ गाठलं. तिथेपण साध्वीला मांडीवर घेऊन ती ओढणी त्याने स्वतःभोवती गुंडाळून घेतली. साध्वी त्या ओढणीमध्ये लपून गेली. इकडे नित्या ने डोळे उघडले आणि साध्वी समोर न्हवती. ती चवताळली आणि कोयता उचलून स्वतःवर वार करणार तेवढ्यात तिकडे अघोरीने पुन्हा होमामध्ये मंत्र म्हणून संमिधा टाकली. तो कोयता नित्या च्या हातून गळून पडला. इकडे अघोरी जोरात बोलला, "तुला जे हवय ते माझ्याकडं आहे, इकडं ये आणि तुझं ते द्रावण घेऊन जा". एवढं ऐकताच नित्या उठली आणि क्षणात अघोरीच्या समोर पण रिंगणाबाहेर प्रकट झाली. नित्या ला अघोरीने होमाजवळ ठेवलेली ती द्रावणाची बाटली दिसली, चवताळून ती घेण्यासाठी नित्या पुढं आली पण विजेचा झटका बसून मागे फेकली गेली. तिला ते रिंगण पार करता येत न्हवतं. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला, आकाशात काळे ढग गोळा झाले. सगळीकडे पालापाचोळा उडू लागला पण रिंगण आखलेलं कुंकू उडतही न्हवतं ना ही रिंगणाच्या आतमध्ये वादळ जाणवत होतं. अघोरी अजूनही होमामध्ये संमिधा टाकतच होता की अचानक मामा पळत पळत तिथे आला आणि जोरात रडू लागला. " मी साध्वीला वाचवू शकलो नाही, या चेटकीणने तिला मारून टाकलं." आतापर्यंत पार्थ सगळी परिस्थिती खूप धीराने हाताळत होता पण हे ऐकताच त्याचं अवसान गळून पडलं. अघोरीने सांगूनही तो शोकाकुल होऊन रिंगणाबाहेर आला, मामाला विचारू लागला असं कसं झालं? त्याला थांबवायला अरूणही त्याच्या मागे आला, त्याने रिंगणाबाहेर एकच पाउल ठेवलं, एक पाय अजूनही रिंगणात होता. 


नित्या जोरजोरात हसू लागली, काही वेळापुर्वी तिथं उभा असलेला मामा गायब झाला. अघोरीच्या चेहर्यावर पण आता तणाव दिसत होता, पार्थ ला वश करून चेटकीण सगळ्यांना इजा पोहोचवेल, त्यातल्या त्यात अरूणला तरी वाचवावे म्हणून अघोरीने हातातली  संमिधा अभिमंत्रित करून अरूण च्या अंगावर टाकली पण ती संमिधा जळून खाली पडली. नित्या एकदम शांत झाली. पार्थ ने जोरात तिला हाक मारली. नित्या शुद्धीवर आली आणि घाबरून पार्थ कडे बघू लागली. कोणाला काही कळायच्या आत जोरजोरात गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. पार्थ घाबरून पाठीमागे वळला, अरूण चा चेहरा काळा ठिक्कर पडला होता आणि डोळे रक्तासारखे लाल झाले होते, तोंडातून लालभडक लाळ गळत होती.  तो जोरजोरात हसायला लागला, त्याने पार्थ चा गळा पकडला आणि  जवळच्या एका झाडाकडं पार्थ ला भिरकावलं. पार्थ खाली पडला, त्याने उठायचा प्रयत्न केला पण त्याला उठता येईना. नित्या त्याला उठवायला गेली पण चेटकीणीने आपल्या शक्ती ने तिला स्वतःकडे ओढून घेतलं. अमर झाल्यावर तिला नित्याच्या शरीरात रहायचं होतं. एका हातात नित्याचा हात घट्ट पकडून आता तो तिला फरफटत अघोरीच्या जवळ घेऊन आला. त्याने अघोरी ला लाथ मारून खाली पाडलं. अघोरी तरीही मंत्र पुटपुटत होता. अरूण ने त्याला पून्हा लाथेने दूर उडवून लावलं. आता त्या चेटकीणीला रोखायला कोणीही न्हवतं. अरूण, पुरूष आणि बाई, अश्या दुहेरी आवाजात जोरजोरात हसत होता. आनंदाने तो ओरडला, "या द्रावणासाठी एवढी वर्ष मला वाट बघावी लागली पण आता मला अमर होण्यापासून  कोणीही अडवू शकणार नाही".


अरूण आणि पार्थ ची अशी हालत बघून नित्या ला काय करावं काहीच सुचत न्हवतं. तिचं लक्ष अघोरीकडे गेलं. तो इशार्यानेच त्या चेटकीणीला होमाच्या पवित्र अग्नीने जाळायला सांगत होता. पण चेटकीणीला जाळायचे म्हणजे अरूण चा बळी द्यावा लागणार होता.  लहानपणीच आईला गमावल्यावर नित्या ला आता तिच्या वडीलांनी गमवायचं न्हवतं. नित्या ला काही सुचत न्हवतं आणि ती जोरात ओरडली " देssवीssआईss वाssचssवs". अचानक अरूण च्या अंगावर विज कडाडली आणि त्या धक्क्याने अरूण ने नित्या चा हात सोडला. नित्या आणि अरूण होमापासून थोडे लांब होते पण ती बाटली होमाजवळच ठेवलेली होती. हात सुटताच नित्या ने पळत जाऊन ती बाटली उचलली. अरूण ने बघितलं तर नित्या ने बाटलीचं झाकणं उघडून ती होमावर धरली होती. अरूण भेसूर आवाजात ओरडला. नित्याने आता चेटकीणीला धमकी दिली "माझ्या वडिलांना सोड नाहीतर ही बाटली या होमामध्ये टाकून देईल".


चेटकीणकडे दुसरा पर्याय न्हवता, अरूण च्या शरीरातून लगेच काळा धूर बाहेर आला. त्या धुरातून चेटकीणीचा चेहरा तयार झाला आणि ती "मला माझी वस्तू हवी" ओरडली. अरूण ने जाऊन पार्थ ला उठवलं, आता अघोरी पण सावरला होता आणि होमाजवळ येत होता. नित्या ने सगळ्यांकडे पाहीलं आणि म्हणाली " हे द्रावण हवंय ना तुला मग घे" आणि तीने होमावर धरलेली बाटली सोडून दिली. तो धूर मोठमोठ्याने ओरडत बाटली पकडण्यासाठी होमाजवळ आला. अघोरीने त्याचवेळी कामाख्या बीजमंत्र म्हणत होमात संमिधा टाकायला सुरवात केली. होमात संमिधा टाकताच होमातला पवित्र अग्नी उसळला, त्या अग्नीने त्या बाटलीसकट चेटकीणीच्या आत्म्याला, त्या काळ्या धुराला पण स्वतःमध्ये सामवून घेतलं. आता होमामधला अग्नी एखाद्या चितेप्रमाणे पेटला होता आणि    त्यामधून चेटकीणीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. बीजमंत्र पूर्ण होताच तो अग्नी विझला. अघोरीने जवळच वाहणार्या नदीमध्ये त्या राखेचे आणि होमपात्राचे विसर्जन केले.  


एवढा वेळ भरून आलेलं आभाळ आता स्वच्छ, निरभ्र झालं.अघोरी ने मामा ला गावदेवीच्या मंदिरात बोलवून घेतलं. मामा साध्वीला घेऊन आला. त्याने अघोरीला ती ओढणी परत केली. सर्वांनी अघोरीचे आभार मानले पण अघोरी नुसताच हसला. गावदेवीचं दर्शन घेऊन अघोरी पुन्हा आसामला तर अरूण, नित्या, पार्थ आणि साध्वी मुंबईला निघून गेले. 


या वर्षीही नित्या अरूण, पार्थ आणि साध्वी ला घेऊन गावदेवीच्या जत्रेला आली. गावदेवीची मनोभावे ओटी भरली आणि साध्वीने नित्या ला हळूच विचारलं  "मम्मा, मी देवीआई ची सर्वात जास्त लाडकी आहे ना? तु जशी बघते तशीच ती पण माझ्याकडे बघतीये, बघ". नित्या ने हो म्हटलं आणि कृतार्थ नजरेने देवीआईकडे बघितलं. आजही ते डोळे तितकेच बोलके आणि आश्वासक वाटत होते.


**** समाप्त ****


धन्यवाद 

*** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****

सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post