तुम अगर साथ हो... भाग चार
रैनाचे गाव तिथून अजूनही तासभराच्या अंतरावर होते. ती एकटीच हायवेवर हातात छत्री, साडी वगैरे सांभाळत उभी होती.
तिने बाबांना कॉल करायला फोन हातात घेतला. पण तो हातातून निसटून खाली साचलेल्या डबक्यात पडला आणि बंद पडला. अंधार गडद होत चालला होता. पावसाचे शिंतोडे उडून साडी भिजली होती. केस ओले झाले होते. आईवर वैतागलेल्या रैनाला काय करावे सुचत नव्हते. शेवटी देवावर हवाला ठेवून तिने समोरून येणाऱ्या कारला हात केला. ती कार थांबली नाही. अशा चार पाच कार गेल्या पण एकही थांबली नाही.
अंधार वाढत चालला होता. रैनाची काळजी वाढत चालली. पण एखाद्या ट्रक वगैरेला थांबवायची तिची हिंमत होत नव्हती. एका कारला तिने हात दाखवला आणि ती कार ब्रेक लावत समोर येवून थांबली. एक सुस्वरूप तरुण ती चालवत होता. एक तरुण मुलगी अशा अंधाऱ्या रात्री एकटी हायवेवर उभी असलेली पाहून त्याने कार थांबवली होती.
रैना थोडी बिचकतच कारजवळ गेली.
“हाय, मला लिफ्ट हवी होती. ॲक्चुअली मी त्या बसने आले होते. पण ती बिघडली म्हणून इथे अशी ...”
बसकडे बोट दाखवत रैना बोलत होती. पण त्या तरुणाचे कुठे तिच्या बोलण्याकडे लक्ष होते. तो तर तिचे अर्ध ओले सौंदर्य भुरळ घातल्यासारखा टिपत होता. तिला ते जाणवताच ती बोलता बोलता थबकली.
आपण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता वेड्यासारखे तिच्याकडे पाहतोय आणि कहर म्हणजे तिला ते समजलंय हे लक्षात येताच तो गोरामोरा झाला.
“माफ करा मला. तुम्हाला कुठे जायचे आहे?”
रैनाने आपल्या गावाचे नाव सांगितले.
“ओह, ॲक्चुअली मला त्याच्या अलिकडेच थांबायचे आहे. आय मीन माझे गाव तुमच्या गावाच्या आधी येते. पण तुम्ही बसा आत, मी माझ्या गावी पोहोचताच कुणाला तर तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवायला सांगतो.
“नको, उगाच तुम्हाला त्रास नको. मी थांबते इथे. बघू एखादी बस जात असेल तर.” तिला त्याचे न्याहाळणे खटकले होते. कपड्यांवरून मुलगा चांगल्या घरचा वाटत असला तरी आजकाल कोणावरही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या बरोबर जाण्यात ती कां कू करू लागली. त्याला ते जाणवले असावे.
“अहो मिस जरा आकाशाकडे नजर टाका. परत पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. उगीच कशाला रिस्क घेताय. विश्वास ठेवा माझ्यावर, अहो मी चांगल्या घरातील मुलगा आहे, मलाही एक बहीण आहे.”
त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून रैना कारमध्ये बसली. तसं ही तिच्या समोर दुसरा कुठला पर्याय नव्हता. खरंच कुठल्याही क्षणी पावसाला सुरूवात होईल अशी लक्षणं दिसत होती.
'याने काही भलतं सलतं वागायचा प्रयत्न केला ना की मी सरळ नाकावर ठोसा ठेवून देईन... नखं वाढवली असती तर बरं झालं असतं निदान बोचकरता तर आलं असतं.'
अनेक विचार आणि शक्यता तिच्या मनात फेर धरून नाचत होत्या. त्यांचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटत असावे. कारण अधून मधून तिच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर स्मित होते.
भिजल्यामुळे कारमध्ये चालू असलेल्या एसीमुळे रैनाला थंडी वाजत होती. ती कुडकुडत होती. त्याच्या ते लक्षात आले.
“थंडी वाजतेय का?"
"हो, प्लीज तुम्ही एसी बंद करू शकता का?"
"सॉरी पण एसी बंद नाही करू शकत. कारण बाहेर थंड हवा आहे. आतल्या आपल्या श्वासोच्छवासाने समोरच्या काचेवर माॅइश्चर साठेल, मग समोरचे दिसणार नाही काही.
तुम्ही एक काम करा, माझ्या सीटला मागे अडकवलेला कोट घाला. मग नाही वाजणार थंडी.”
रैना त्याच्या सीटच्या बैकरेस्टला टांगलेला कोट काढायला त्याच्या बाजूला झुकली. पण कोट निघत नव्हता. ती प्रयत्न करत होती. तो डोके सरळ ठेवून पुढे बघून गाडी चालवत होता. परंतु तिच्या निकट येण्याने त्याला तिच्या शरीराचा मादक गंध जाणवत होता.
ती त्याच्यावर झुकून कोट काढायची खटपट करत होती, इकडे याच्या कानाच्या पाळ्या लाल होत होत्या. शेवटी निघाला एकदाच तो कोट... तिने तो अंगात घातला.
जेमतेम दोन मिनीटभराचा खेळ तो पण...
त्याने श्वास सोडला आणि मग त्याच्या लक्षात आले, की आपण तो रोखून धरला होता.
तिला त्याच्या या मनोव्यापाराची काहीच कल्पना नव्हती. ती शांतपणे समोरचा रस्ता पाहत बसली होती.
रैनाने मधूनच एखादा कटाक्ष टाकून त्याचे निरीक्षण केले होते. सावळा वर्ण, धारदार नाक, मोठे काळे डोळे, तरतरीत जिवणी, दाढी, मिशा नसल्याने गुळगुळीत किंचीत भरीव गाल. त्याने घातलेल्या क्रीम रंगाच्या शर्टमधून रुंद खांदे जाणवत होते. उंचीही चांगली असावी. कोट ही घालतो म्हणजे चांगली नोकरी करत असावा. 'छानच दिसतोय, आवडण्यासारखा.' हा विचार मनी येताच दचकलीच ती.
तिचे दचकणे त्याच्या नजरेतून सुटले नाही.
“काय झाले?”
आता काय सांगावे अशा पेचात पडली ती पण लगेच सावरून घेवून उत्तर दिले,
“अम्म , मी असा विचार करत होते, की मला तुमचे साधे नावही माहीत नाही. आणि मी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या कारमध्ये बसले.”
तिने तोंडाला येईल ते सांगून टाकले.
'हुश्श, सुचले बाबा काहीतरी.' मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटून घेतली तिने.
“नाव तर तुम्ही ही सांगितले नाही तुमचे. असो, मी गगन मोहिते. डॉक्टर आहे मी, स्वतःचे एक छोटे क्लिनिक आहे. काही हॉस्पिटल्समध्ये विसिट करतो. दुपारी आईने काही काम आहे, येऊन भेटून जा म्हणून कॉल केला म्हणून गावी निघालो आहे.”
त्याने ओळख करून दिली.
त्याचे बोलणे ऐकून रैना हसतच सुटली.
तो विचित्र नजरेने आपल्याकडे पाहतोय हे लक्षात येताच ती क्षणभर थांबली.
“मी रैना देशमुख, युनिव्हर्सल कॉलेजमध्ये बीईचे लास्ट सेमिस्टर चालू आहे माझं. मला यासाठी हसू आलं, की मला पण दुपारी आईने अगदी हेच सांगून घरी बोलावले आहे.”
आता तर तो ही हसायला लागला.
दोघांमधील वातावरण थोडं मोकळं झाले. ते गप्पा मारू लागले.
"ओ, बी ई करत आहात का तुम्ही? तुमच्या तालुक्यातच इतके सारे इंजिनिअरिंग कॉलेज असताना तुम्ही इतक्या लांब का ऍडमिशन घेतली?"
"ॲक्च्युअली युनिव्हर्सल कॉलेज राज्यातील बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस पैकी एक आहे. मला मेरिटवर ऍडमिशन मिळालं तिथे. बरंच लांब आहे पण मी तिथेच हॉस्टेलवर राहते म्हणून काही वाटत नाही."
"मेरिटवर! छानच की. हॉस्टेलवर राहताना घरची आठवण येत नाही का?"
"येते अधूनमधून. पण आपण का इथे आलो आहोत याची आठवण झाली की वाईट वाटत नाही."
अनेक विषयांवर बोलता बोलता अहो जाहो वरून अरे तुरे वर कधी आले ते त्यांनाच समजले नाही.
गगनचे गाव आल्यावर त्याने रैनाला घरी येण्याची विनंती केली.
“चल, फ्रेश होवून चहा वगैरे घे मग मी तुला पोहचवण्याची व्यवस्था करतो. बघ किती भिजली आहेस तू. तासभराचा तर प्रश्न आहे.”
"नको रे, उशीर होईल. घरी आई बाबा वाट पाहत असतील. तू सोड मला इथे. मी बघते काही वाहन मिळते का गावी जायला." त्याला अजून त्रास द्यावा असे तिला वाटत नव्हते.
"पाऊस जरी थांबला असला तरी मला नाही वाटत तुला इतक्यात कुठले वाहन मिळेल म्हणून. किती वेळ वाट बघशील अशा अनोळखी जागी? शिवाय तू भिजली आहेस. भूकही लागली असेलच. कपडे बदलून खाऊन पिऊन घे. मी पप्पांना सांगतो कुणाकरवी तुला सोडायला."
तो म्हणत होता ते सगळं खरंच होतं. भूक पण लागली होती म्हणून थोडा विचार करून रैनाने होकार दिला.
क्रमशः
लेखिका - सविता किरनाळे
सुंदर कथा आहे पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे।
ReplyDeleteKhup sundar next plz
ReplyDeleteछान कथा
ReplyDelete