तुम अगर साथ हो... भाग तीन

 तुम अगर साथ हो... भाग तीन 




बऱ्याच दिवसांपासून गावातच राहणारी रैनाची एक लांबची आत्या तिच्यासाठी एका स्थळाकडे पाठपुरावा करत होती. नातं जरी लांबचे असले तरी एका गावात राहत असल्याने शिवाय रैनाची आई पद्मा आणि वडील दिनकर यांच्या माणसं धरून ठेवणाऱ्या स्वभावामुळे आत्या शुभांगी आणि तिचे पती सुनील यांचे रैनाच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. सुनीलरावांच्या एक जवळच्या मित्राचा मुलगा लग्नाच्या वयाचा होता. आपली गोड भाची रैनासाठी त्यांनी मित्राकडे शब्द टाकला होता. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. शुभांगीने नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला.


"अहो, नका इतकी धडपड करू यासाठी. मान्य आहे तुमचे मित्र चांगले आहेत, घरची परिस्थिती चांगली आहे. पण इतके दिवस मागे लागूनही ती मंडळी रिस्पॉन्स देत नाहीत म्हणजे त्यांच्या मनात नसावे. आणि मला तर वाटतं हे चांगलंच आहे. म्हणजे बघा जर उद्या उठून या बड्या लोकांचे नखरे झेलायची वेळ आली दादा वहिनीवर तर केवढ्यात पडेल ते. माझी मैत्रीण सुमाने असंच एका मोठ्या घरात आपली मुलगी दिली आणि आता बसलीय रडत."


"का गं, काय झालं?"


"अहो आधी तर ते लोक म्हणाले आम्हाला मुलगी देखणी हवी फक्त. आम्हाला पैसा अडका, सोनंनाणं कमी नाही म्हणून फक्त मुलगी आणि नारळ द्या. तरीही सुमाने नीटनेटक लग्न करून दिले, जमेल तितकं सोनं घातलं. चार महिन्यांत लेकीला हुंडा, देण्याघेण्यावरून सासुरवास सुरू झाला. प्रकरण अगदी मारहाणीपर्यंत पोहोचलं तेव्हा तिने पोरीला कायमसाठी माहेरी आणलं. आता ती म्हणते नाकापेक्षा मोती जड असलं ठिकाण बघू नये मुलींसाठी. भलेही थोडा वेळ लागेल पण आपल्या तोलाचा जावई शोधावा. हे असलं काहीबाही कानावर आलं की भीती वाटते हो." शुभांगीने समारोप केला. सुनील विचारात पडले. दरम्यान रैनाच्या आईचे इकडून तिकडून लेकीसाठी वरसंशोधन चालूच होते. 


सुनीलने त्या स्थळाची आशा सोडली असतानाच आज अचानक मित्राचा फोन आला. उद्या ते लोक मुलगी बघायला येणार होते. इतक्या शॉर्ट नोटीसवर येत असल्याबद्दल मित्राने माफी मागितली. उद्याचा एकच दिवस मिळत असल्याने नाईलाज असल्याचेही सांगितले. त्याचे बोलणे ऐकून सुनीलराव भांबावून गेले. कारण रैनाला तडकाफडकी बोलावून घेणे त्यांना पटत नव्हते. त्यांनी दिनकर रावांना कॉल केला. थोडंसं चाचरतच त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली.


"दाजी, मला नाही वाटत रैनाला इतक्या लवकर येणं शक्य होईल म्हणून. गोचीच झाली आहे आपली." 


"न यायला काय झालं, येईल ती. आता दुपारची बस जरी मिळाली तरी संध्याकाळपर्यंत आरामात पोहोचून जाईल. या म्हणून सांगा त्यांना. आपली मुलीची बाजू, थोडं तरी ऍडजस्ट करावं लागेल ना." बाजूला उभ्या राहून बोलणं ऐकणारी पद्मा म्हणाली. सुनीलरावांनी हे बोलणे ऐकले होते. तसा निरोप मुलाकडे पोचला. 


इकडे रैनाची आई तिला फोन करत होती. पण रैना फोन उचलत नव्हती. तिला पर्समध्ये ठेवलेल्या फोनची रिंग ऐकायला येत नव्हती. इकडे पद्माचा पारा चढत होता.


"उचलायचा नसेल तर ही कार्टी फोन बाळगते कशाला कुणास ठाऊक. काही तातडीचे काम असेल तर कसा निरोप पोचवायचा?" पद्माची बडबड चालू होती.


"अगं लेक्चर चालू असेल म्हणून नसेल उचलत. पाच मिनिटांनी करून बघ. नाहीतर मिस कॉल पाहून ती स्वतः करेल ना कॉल." दिनकर समजुतीच्या स्वरात म्हणाले.


"कसलं डोंबलाचे लेक्चर? कसलं तरी फेस्टिवल चालू आहे म्हणाली ना काल! तुमचं लक्ष कुठं असतं हो बोलताना. काल कॉलवर तर मारे खोदून खोदून विचारत होतात आणि इतक्यात विसरलात? जाऊ द्या, मी मेली कुणाशी वाद घालत बसलेय. परत एकदा लावून बघते फोन." 


प्रकरण आपल्यावर शेकत असलेलं पाहून दिनकर गुपचूप तिथून उठून व्हरांड्यात आले. पद्मा पुन्हा पुन्हा फोन लावतच होती. 


रैनाने कॅन्टीनचे बिल द्यायला पाकीट काढताना मोबाइलही पर्समधून बाहेर काढला. सहजच स्क्रीनकडे नजर टाकली तर ती उडालीच. 'आईचे पंधरा मिस कॉल!' अचानक अशी काय एमर्जन्सी आली हे तिला समजेना. 'आई, बाबा ठीक तर असतील ना?' तिच्या मनात विचार आला.


"हे मी दोन मिनिटात येते, एक कॉल करून." असं सांगून ती उठून बाहेर आली.


"हां आई बोल, काय झालं. सगळं ठीक तर आहे ना?" धडधडत्या हृदयाने तिने फोन लावला.


"हो... म्हणजे... बाळा आज तुझी खूप आठवण येतेय. उभ्या उभ्या येऊन भेटून जाशील का? प्लिज, नाही म्हणू नको. आता निघालीस तरी संध्याकाळपर्यंत पोहोचून जाशील. हवं तर उद्या लगेचच परत जा." रैनाचा हळवा स्वर ऐकून पद्माने बोलण्याचा रोख बदलला. बघायला पाहुणे येणार आहेत हे समजले असते तर रैना आली नसती याची तिला जाणीव झाली होती. 


"अगं पण रोजच तर आपण व्हिडिओ कॉल वर बोलतो ना? असं कसं येता येईल मला?" रैनाला काही सुचेनासे झाले. 


"हो पण त्या व्हिडिओ कॉलवर तुला कुशीत घेता येतं का? स्पर्श करून गालावर हात फिरवता येतो? नाही ना, एका रात्रीचा तर प्रश्न आहे. शिवाय कसल्या त्या फेस्टिवलमुळे काही शिकवत पण नाही आहेत म्हणालीस ना. ये तू, मी तुझ्या आवडीचे गुलाबजाम बनवायला घेते आहे." पुढे काही न ऐकता पद्माने फोन ठेवून दिला. बाहेरून ऐकणारे दिनकरराव अवाक् झाले होते.


चरफडत रैनाने मिळेल त्या बसने गावी जाण्याचा निर्णय घेतला. ती नसती गेली तर पद्माने पुन्हा पुन्हा तोच विचार करून स्वतःला त्रास करून घेतला असता. पुढचे नियोजन कसे करावे या विचारात ती उभी असताना ग्रुप तिथे आला.


"काय झाले रैना, कुणाचा कॉल होता? सगळं ठीक आहे ना?" अनिकेतने तिच्या चेहऱ्यावरील वैतागलेले भाव ओळखले होते.


"हो, सगळं ठीक आहे रे. पण मला अर्जंट गावी जावं लागेल. आईचा फोन होता. नीट काही सांगितलं नाही पण लगेच ये म्हणाली."


"ओह, होप सगळं वेल असेल. तू जा आणि भेटून ये. कशाची गरज असेल तर लगेच कळवशील, काय? चल मी सोडते हॉस्टेलवर म्हणजे लगेचच निघता येईल तुला." स्कूटरची चावी हातात घेत हंसिका म्हणाली. 


हंसिकाने रैनाला हॉस्टेलसमोर सोडले. रूमवर येताच घड्याळाकडे बघत तिने बॅग भरायला घेतली. आता साडी काढून ड्रेस घालत बसलं तर उशीर होईल म्हणून तिने साडी नेसूनच जायचे ठरवले. दोन दिवसांचे कपडे, गरजेच्या वस्तू छोट्या बॅगमध्ये भरुन ती रेक्टर मॅडमच्या केबिनमध्ये गेली. आईचा फोन आल्याने अर्जंट गावी जावं लागत असल्याचे त्यांना सांगितले. मॅडमने तसा अर्ज भरून घेऊन परवानगी दिली. पन्नाशीच्या मॅडम हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींबद्दल कडक होत्या. नियम हे पाळण्यासाठी बनवलेले असतात असं त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या कडक निगराणीतून कोणतीही मुलगी सुटत नसे. जरी नियमावर बोट ठेवून वागत असल्या तरी प्रसंगी घरापासून दूर राहणाऱ्या मुलींवर मायेची पाखर ही घालायच्या. म्हणूनच मुलींना त्यांच्या छायेत सुरक्षित वाटायचे. आताही रैना बाहेर पडताना त्यांनी तिला थांबवले. 


“रैना, छत्री घे गं आभाळ भरून आलंय.” 


"मॅम आता छत्री आणायला गेले तर बस चुकेल माझी. निघते मी अशीच."


"अगं थांब, ही घे माझी छत्री घेऊन जा. आल्यावर परत कर." आपली छत्री देत त्या म्हणाल्या. 

त्यांचे आभार मानून तिने छत्री घेतली.


धावतपळत रैना बसस्टँडवर आली. तिच्या गावी जाणारी बस लागलेलीच होती. 


“साडेतीन वाजले आहेत आता, म्हणजे साडेपाच सहापर्यंत पोहोचेन मी घरी.” हातातील घड्याळ बघत ती स्वतःशी म्हणाली.


बस तशी फारशी भरली नव्हती. बायका तर चार पाचच असाव्यात, पुर्ण बसमध्ये.


रैना खिडकीजवळ सरकून बसली. थोड्या वेळाने बस सुरू झाल्यावर तिने कानात इअरफोन सरकवले. डोळे मिटून ती शांतपणे सोनू निगमचा निर्मळ आवाज कानात साठवू लागली.



हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी

छाँव है कभी कभी है धूप ज़िंदगी

हर पल यहाँ जी भर जियो

जो है समाँ कल हो न हो.....


एक तास असाच गेला. भरून आलेले ढग बेभानपणे कोसळू लागले. जणू त्या जलधारांना धरणीमातेच्या कुशीची अनावर ओढ लागली असावी.


आताशा पाच वाजले होते पण अंधार दाटला होता. खिडकी उघडून बाहेर पाहणाऱ्या रैनाच्या मनात भीतीने घर वसवायला सुरू केले होते. हळूहळू पाऊस ओसरायला लागला.


रैनाला थोडे बरे वाटू लागले. पण हे वाटणे क्षणभंगुर ठरले.


कुठलेसे गाव आल्यावर बस जी थांबली ती सुरू होण्याचे नावच घेईना. ड्रायवरने बराच प्रयत्न करून शेवटी बस चालू होणार नसल्याचे सांगून टाकले.


जे काही मोजके प्रवासी होते ते पटापट खाली उतरले. काही जणांना त्या गावात आपले कुणी नातेवाईक असल्याचे आठवले. तर काही येणाऱ्या ट्रक वगैरे वाहनातून लिफ्ट घेवून निघून गेले. कुणी सौजन्य म्हणून ही तिला सोबत चलण्याबद्दल विचारले नव्हते. 


"मॅडम तुम्ही ही एखादे येणारे वाहन पकडून घरी जा. नाहीतर फोन करून कुणाला तरी बोलावून घ्या. आम्ही थांबलो असतो पण आम्हाला डेपोत जाऊन रिपोर्ट द्यावा लागतो म्हणून निघायला हवं." उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून चालक, वाहक जोडगोळीही निघून गेली. 


क्रमशः 


लेखिका - सविता किरनाळे 


ही कथा आम्ही लेखिकेच्या लिखीत परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथा, कथेचा कोणताही भाग इतर वेबसाइट्स, यूट्यूब चॅनेलवर नावासकट किंवा निनावी वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खात्री बाळगावी. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post