तुम अगर साथ हो... भाग दोन
बॅक स्टेजला स्पर्धकांना त्यांच्या नंबरनुसार अरेंज करायचे काम चालू होते. काही क्षणात कार्यक्रम चालू होणार होता. काही स्पर्धक आयत्या वेळेस कॅटवॉकचा सराव करत होते. घोषणा झाली आणि स्पर्धकांनी कॅटवॉक करत स्टेजवर प्रवेश करायला सुरुवात केली. विंग मधून गाण्याचा दणदणाट, प्रेक्षकांचे उत्साहवर्धक आरोळ्या, सूत्र संचालकांचे नेमक्या आणि मजेशीर शब्दातील संचालन ऐकू येत होते. आपल्या आवडलेल्या स्पर्धकाला चिअर अप करताना आरोळ्या वाढत होत्या तर क्वचित एखाद्याच्या वाट्याला ओsss नो sss अशी नापसंती येत होती. हा सगळा गोंधळ ऐकून रैनाच्या पोटात गोळा येऊ लागला. तिला असेच पळून जावेसे वाटू लागले. जणू तिच्या मनातील विचार वाचल्याप्रमाणे मिहीकाने तिचा हात घट्ट धरून डोळे मोठे केले.
"गप्प उभं राहायचं. कसली नाटकं नकोयत."
काही क्षणात रैनाचे नाव पुकारले गेले. स्वतःला सावरून ती ट्रेनरने शिकवल्याप्रमाणे कॅट वॉक करत स्टेजवर दाखल झाली. जणू नेहमीचं असल्याप्रमाणे दिमाखात पावलं टाकत तिने एक फेरी पूर्ण केली. आतापर्यंत वाटत असलेल्या भीतीचा तिच्या चेहऱ्यावर मागमूस ही नव्हता. पूर्ण आत्मविश्वास तिच्या चालीत भरला होता. प्रेक्षकांमध्ये पसंती दर्शक आरोळ्या घुमत होत्या. तिच्या मागोमाग मिहीका होतीच. त्यांचा ग्रूप जोर जोरात ओरडत चिअर अप करत होता. त्यांच्या दिशेने हात हलवत रैनाने वॉक पूर्ण केला आणि ठरवून दिलेल्या स्पॉटवर जाऊन उभी राहिली. हर्षल पापणी न लवता रैनाला पाहत होता. ते पाहून हंसिका आणि कार्तिकने सगळ्या ग्रुपला खाणाखुणा केल्या.
"काय, काय झालं? असं का बघताय माझ्याकडे?" चोरी पकडल्याने गोरंमोरं होऊन हर्षलने विचारले.
"कुठे काय, आम्ही तर काहीच बघत नाही आहोत." हसू दाबत हंसिका म्हणाली.
हर्षल वर्मा, कानपूरच्या एका बड्या उद्योगपतीचा मुलगा. वडिलांचा पादत्राणांचा मोठा कारखाना होता. काळानुरूप व्यवसायाच्या पद्धतीत बदल करत गेल्याने त्यांचा पिढीजात सुरू असलेला व्यवसाय आजही तेजीत चालू होता. बाजारात मोठी पत होती. फक्त देशीच नाही तर विदेशी बाजारपेठेत ही त्यांच्या मालाला उत्तम मागणी होती. विशेष म्हणजे परदेशी ब्रँडच्या रेट्यात ही ठामपणे पाय रोवून ते मार्केटमध्ये उभे होते.
हर्षल सुखविलास वर्मांचा दुसरा मुलगा. पहिला राजेश वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून चालत होता. पिढीजात व्यवसायात त्याला रूची आणि गती होती. व्यवसायाचे बाळकडू मिळाल्याने शिक्षण पूर्ण करण्याआधीच त्याने व्यवसायात पाऊल टाकले होते.
हर्षलला मात्र या क्षेत्राची फारशी आवड नव्हती. त्याने दुसऱ्या क्षेत्रात आपले नाव करण्याचे ठरवले होते. त्या दृष्टीने तयारी म्हणून तो दहावी नंतर लगेच महाराष्ट्रातील नामंकित कॉलेजला प्रवेश मिळवला होता. बारावीला उत्तम गुण मिळवून आता या नावाजलेल्या कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याच्या घरीही त्याला पाठिंबाच होता. एक मुलगा पारंपरिक व्यवसाय सांभाळायला सक्षम असताना दुसऱ्याला त्याची वाट निर्माण करायला हरकत नव्हती. उलट कुटुंबाला एका नवीन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार होती.
गोरा वर्ण, आनुवंशिक असलेली उंच शरीरयष्टी, व्यायामाने कमावलेलं शरीर, वागण्या बोलण्यातून जाणवणारा घरंदाजपणा आणि श्रीमंती. त्यात अभ्यासात हुशार असणे म्हणजे दुधात साखरच. अशा या हर्षलभोवती गोंडा घोळणाऱ्या मुलींची संख्या कमी नव्हती. पण त्याच्या मनाचा ठाव घेतला होता सुंदर आणि सात्विक रैनाने. जरी त्याने बोलून नाही दाखवले तरीही त्याच्या वागण्यातून ते जाणवायचे. रैना मात्र यापासून अनभिज्ञ होती. ती हर्षलला इतर मित्रांसारखंच वागवयाची. थोडक्यात काय तर साध्या तरी सगळं फक्त एकतर्फी होतं.
रॅम्पवॉक झाल्यावर थोड्या वेळाने निकाल घोषित होणार होता. तोपर्यंत सगळी मंडळी पोटपूजा करायला कॅन्टीनच्या दिशेने वळली.
"गायीज, मी काही तरी लाईट खाईन आज, सकाळी नाश्ता खूप हेवी झालाय." स्वतःच्या शरीराकडे पाहत हंसिका म्हणाली. कुणाला काय हवं विचारणारी मिहीका थांबली.
"खोटं बोलू नकोस. आंटीचा मेसेज आला होता मला, तू काहीच न खाता घराबाहेर पडलीस म्हणून."
सगळे हंसिकाकडे पाहायला लागले.
"यार... ते... कितीही कमी खाल्लं तरी वजन वाढतच चाललं आहे म्हणून मी डाएट करतेय." शेवटी हंसिकाने सांगून टाकले.
"मुळात तुला कुणी सांगितलं की तू जाड आहेस म्हणून? तू आमचा छानसा, गोडुला, चब्बी छब्बी ससा आहेस." झुबेर तिचे गाल खेचत हसत म्हणाला आणि हंसिकाचा स्फोट झाला.
"बघ तू पण म्हणालास ना आत्ता, चब्बी ससा. तू तर सोड, सगळेच म्हणतात. भले तोंडावर म्हणत नसतील पण पाठीमागे कुजबुजत असतात. मम्माच तर वेगळंच फॅड. म्हणे अशी जाडजूड राहिलीस तर कोण लग्न करेल तुझ्याबरोबर? अरे कुणी पसंत करावं म्हणून मी पोट मारायचं का? आणि लग्न म्हणजेच सगळं काही आहे का आयुष्यात? इतके चांगले मार्क मिळवते, छान चित्रं काढते, पुढे जाऊन चांगलं भविष्य बनवेन हे इतकं पुरेसे नाही का? रोज सकाळी उठलं की वजन काट्यावर उभं राहा आणि रात्री झोपताना वजन करूनच झोपा. एखादा किलो जरी इकडं तिकडं झालं की लागल्या मातोश्री ओरडायला. म्हणून मी ठरवलंय, जेवायचंच नाही. " बोलता बोलता हंसिका मुसमुसायला लागली.
तिला रडताना पाहून मुलं कानकोंडी झाली. सतत हसणाऱ्या, हसवणाऱ्या या गोड मुलीला असं काही सहन करावं लागत असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. एखाद्याला वजनावरून, जाडीवरून चिडवणे हा खरंच अमानुषपणा आहे. मुळात कुणी स्वखुशीने, ठरवून जाडजूड होत नाही. लोकांच्या सततच्या खिजवण्याला कंटाळून व्यक्ती टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. हंसिकाही आता त्याच स्टेजला पोहोचली होती. म्हणून तिने जेवण सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. आता झुबेरला त्याच्या मस्करीचा पश्र्चाताप होऊ लागला.
"ए, आय एम सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तर तुझी मस्करी करत होतो." केविलवाण्या नजरेने हंसिकाकडे पाहत तो गयावया करू लागला. त्याला नजरेनेच धीर देत रैनाने हंसिकाचा हात हातात घेतला.
"हे बघ राणी, झुबेर तुझी चेष्टा करत होता. तुझ्या मम्माला वाटतं तसं तू खूप जास्त जाड नाहीस. उलट कर्वी असल्याने खूपच सुंदर दिसतेस. फक्त आईला किंवा इतर कुणाला आवडावं म्हणून शरीराचे हाल करून घेऊ नकोस. त्याच्याने फायदा नाही तर तोटाच जास्त होईल. हां आता तुला जर वजन कमी करण्याची इच्छा असेल तर त्याचे कितीतरी चांगले आणि योग्य मार्ग आहेत. ते अजमावून बघू आपण. पण हे उपाशी राहणं चुकीचं आहे. सगळ्यांच्या वतीने मी सांगितलं आहे याउपर तुझी मर्जी." टेबलावर शांतता पसरली होती. हंसिका विचार करत होती.
"मिहिका, माझ्यासाठी मिसळ पाव आणि दोन पाव एक्स्ट्रा सांगशील." डोळ्यांच्या कोपऱ्यातून हंसिकाकडे पाहत रैना म्हणाली.
"ए आम्हाला सगळ्यांना पण तेच सांग." सगळे परत गलका करायला लागले. मिहीका ऑर्डर द्यायला काऊंटरकडे जात होती तेवढ्यात, "मला पण सेम." मागून हंसिकाचा आवाज आला.
छोटंसं वादळ शमलं होतं. हर्षलने कुणाच्या नकळत रैनाकडे पाहून घेतलं. त्याच्या नजरेत तिच्याबद्दल अभिमान झळकत होता.
क्रमशः
लेखिका - सविता किरनाळे
ही कथा आम्ही लेखिकेच्या लिखीत परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथा, कथेचा कोणताही भाग इतर वेबसाइट्स, यूट्यूब चॅनेलवर नावासकट किंवा निनावी वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खात्री बाळगावी.
खुप छान आहे कथा... आवडली...
ReplyDeleteदुसरा भाग पण मस्त लिहिला आहे पुढच्या भागाची आतुरतेने बघत आहे. 👍
Delete