तुम अगर साथ हो ... भाग एकोणतीस

 तुम अगर साथ हो ... भाग एकोणतीस 


टेबलवर अचानक शांतता पसरली. वेड लागल्यासारखे सगळे एकमेकांकडे टकमक पाहत राहिले. 


"नवरा... यू मीन..." वैदेहीने विचारले.


"येस आय मीन... आमची मागच्या महिन्यात एंगेजमेंट झाली आहे. हंसिका, हीच ती गूड न्यूज जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते."


"रैना माझी ओळख तर करून दिलीस पण यांची ओळख?" गगनने आठवण करून दिली.


"ओह, आय एम सॉरी. ही वैदेही, ही मिहीका, हा हर्षल....." ती ओळख करून देत असताना गगन प्रत्येकाला हाय, हॅलो म्हणत शेकहॅण्ड करत होता. गगन सगळ्यांचे चेहरे वाचत होता. हर्षलचा पडलेला चेहरा, वैदेहीची असूयेने भरलेली नजर, हंसिकाचा आणि इतर मित्रांचा आनंद सगळं तो टिपत होता. 


"रैना काही प्रॉब्लेम आहे का? सगळ्यांचे चेहरे असे का दिसत आहेत?" गगनने विचारले. 


"हो यातील काही लोकांचा भ्रमनिरास झालाय त्यामुळे." 


"भ्रमनिरास आणि तो का?"


"अरे एंगेजमेंटच्या आधी आपण जेव्हा बोलायचो तेव्हा कुणी चिडवू नये म्हणून मी तुझा नंबर भूमीच्या नावाने सेव केला होता. या गृपमधील एका व्यक्तीने, मला माहीत आहे कोण ती, आपल्या चॅटचा स्क्रीनशॉट घेऊन मला सोडून गृपमध्ये इतरांना सर्क्युलेट केला आणि असं सांगितलं की मी लेस्बिअन आहे. माझं कोणत्याही मुलाशी अफेयर नाही, मुली माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत याचा या लोकांनी असा अर्थ लावला की मला मुलांमध्ये इंटरेस्ट नाही तर मुलींमध्ये इंटरेस्ट आहे. आत्ता मी जेव्हा तुझी ओळख करून दिली तेव्हा यांचा अंदाज चुकला म्हणून यांचा भ्रमनिरास झाला असावा." 


गगन रागाने लालबुंद झाला. 

"हे तुझे मित्र मैत्रिणी ज्यांना भेटायला तू जीव टाकत होतीस. तुझ्या तोंडून या सगळ्यांबद्दल इतकं ऐकलं होतं की मलाही तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं. सॉरी गाईज पण मी आता तुम्हाला भेटून आनंद झाला असं म्हणू शकत नाही. चल रैना जाऊया इथून."


"तुम्ही आम्हाला दोष देऊ शकत नाही. यात आमची काहीच चूक नाही. जे पुरावे आहेत, आमच्या समोर जे चित्र उभं केलं गेेलं त्यानुसार आम्ही वागलो." अनिकेत रागाने म्हणाला.


"तुम्ही रैनाला काही वर्षांपासून ओळखता. त्यावरुन तरी विचार करायचा. तिची मानहानी व्हावी म्हणून कुणी मुद्दाम असं केलं असेल असं का नाही वाटलं तुम्हाला? पुराव्यांची भाषा कोर्टात चालते. जर त्याच भाषेत बोलायचे झाले तर जोपर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निरपराध असल्याचे मानले जाते. मग तुम्हा लोकांना कुणी अधिकार दिला ती तशी असल्याचे घोषित करण्याचा?" 


"आम्ही कुठे काय घोषित केलंय?" मिहीकाने तोंड उघडले.


"खरंच मिहीका? मी आल्यापासून नोटीस करतेय आपल्यात एक प्रकारचा तणाव आहे. कुणीही माझ्यासोबत मोकळेपणाने बोलत नाही आहे. तुम्ही आपापसात खाणाखुणा करत होतात. असे वागताय जणू मी या गृपचा हिस्सा नाही, कुणी परकी आहे. सांगा मला, तुम्ही सगळे असे वागत नव्हता?" बोलता बोलता रैनाचा आवाज भरून आला. डोळ्यात पाणी साचले. 


"चल रैना निघूया." गगन उठून उभा राहिला. सगळे सुन्न झाले होते. रैना उठून त्याच्या बरोबर चालायला लागली. चार पावलं गेल्यावर तिला काहीतरी आठवले. गगनला थांबायला सांगून ती परत गृपजवळ आली. 


"तुम्हा लोकांना माहीत आहे हे सगळं कुणी घडवून आणले?" तिने मोबाइल काढून तिचे आणि गगनचे चॅट उघडले. स्क्रीनशॉटमधील चॅट आणि तिच्या मोबाईलमधील त्या दिवसाचे चॅट सगळ्यांना दिसेल असे तिने धरले. 


"माझ्या चॅट विंडोमधील तारीख पहा. काही आठवतंय? नाही? थांबा मीच सांगते. प्रिपरेशन लिव होती पण एकमेकांना मिस करत होतो म्हणून त्यादिवशी आपण सगळे इथेच भेटलो होतो. अनिकेतकडून माझ्या ड्रेस वर कॉफी सांडली ती साफ करायला म्हणून मी, हंसिका आणि वैदेही वॉशरूममध्ये गेलो. तिथे हे स्क्रीनशॉट घेतले गेले कारण त्यानंतर थोड्या वेळाने मी केलेले मेसेज या फोटोत नाहीत. तर सांगा हे कुणी तरी असेल?" रैना क्षणभर थांबली. हंसिका आणि वैदेहीकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या.


"रैना मी असं काही करेन असं तुला वाटतं? असं करून मला काय मिळेल? मी तुझी शत्रू थोडीच आहे. हंसिकाने केलं असेल हे. कारण तुम्ही एकत्र असता तेव्हा सगळेच नेहमी तुझी आणि तिची तुलना करत असतात. कदाचित आऊट ऑफ जेलसी तिने असं केलं असेल." वैदेहीच्या डोळ्यात पाणी आले. आता संशयाची सुई हंसिकाकडे वळली.


"अरेच्चा अजून एक गोष्ट तर सांगायची राहिलीच. जेव्हा आम्ही ड्रेस साफ करत होतो तेव्हा हंसिकाच तो पाण्याने धुवत होती. म्हणजे पूर्णवेळ ती माझ्या नजरेसमोर होती. याउलट वैदेही काही वेळासाठी टॉयलेटमध्ये गेली होती. मला काही म्हणायचे नाही. अंदाज लावण्यात तुम्ही सगळे पटाईत आहातच." त्यांना तशाच सुन्न अवस्थेत सोडून रैना गगनचा हात धरून निघून गेली.


क्रमशः 


लोभ असावा 

3 Comments

  1. फ्रेंड्स असेच असतात मी पण काही गोष्टी अनुभवल्या आहेत.....रैना अगदी करेक्ट बोलली फ्रेंड्स ला... अशी मैत्री मैत्री नसतेच ज्यात विश्वासच नसतो.....आपल्या वाईट काळात कोणी नसतं सोबत

    ReplyDelete
    Replies
    1. भाग 29 नंतर कथा संपली का?

      Delete
  2. खूप सुंदर आहे कथा....शेवट आहे का की अजून भाग आहेत..कारण उत्सुकता अजूनही संपलेली नाही

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post