सहप्रवासी
लेखिका - सविता किरनाळे
दिल्लीला जाणारी सीएसटीएम वरून निघणारी ट्रेन सुटायच्या बेतात होती. शेवटच्या क्षणाला चढणारे धावपळ करत होते. आधीच चढलेले सीट वर बसून त्यांची पळापळ एन्जॉय करत होते. काही प्रवासी सामान लावण्यात गुंतले होते. फर्स्ट क्लासचा त्या कूपेमधला प्रवासी काहीशा उत्सुकतेने सहप्रवाशाची वाट पाहत होता.
ट्रेन सुटली आणि कूपेचा दरवाजा लोटून एक सुटकेस आत ठेवण्यात आली. मागोमाग त्या हाताची मालकीण आत आली. सीटखाली सुटकेस सरकवून खांद्यावरची सॅक बाजूला ठेवत ती स्वतःच्या सीटवर बसली. सॅकमधून पाण्याची बाटली काढून काही घोट घेतले. ती पाणी पित असतानाच तिचा फोन वाजला. त्यावरील नाव पाहून तिच्या कपाळाला आठ्या पडल्या. आवाज बंद करून तिने तो पालथा ठेवून दिला. तीन चार वेळा हा प्रकार झाल्यावर मात्र ती वैतागली. पुन्हा एकदा फोन वाजला तेव्हा मात्र चिडून नावही न बघता तिने कॉल रिसिव्ह केला.
"तुला सांगितलं ना, काही दिवस कॉल करू नको म्हणून. मला वेळ हवाय. उगाच प्रेशराइज करू नकोस."
पलीकडून आलेली प्रतिक्रिया ऐकून मात्र ती दचकली. कानापासून मोबाइल बाजूला घेत त्यावरील नाव पाहिले. जीभ चावून परत कानाला लावला. यावेळेस तिच्या आवाजात मार्दव होते.
"अगं मम्मा काही नाही झालंय. काल रात्री आमचा थोडासा वाद झाला."
"........."
"नाही ग, कोण चूक कोण बरोबर हा प्रश्न नाहीच मुळी. माझी टूर असली की याची नाटकं सुरू. दर वेळी असंच. अजून लग्न झालं ही नाही तर हे असं आणि मग पुढे जाऊन काय होईल?"
" ........"
"तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की नोकरी करणाऱ्या पुरुषांचे जॉब कमिटमेंट असू शकतात तर नोकरी करणाऱ्या बाईचे असू शकत नाहीत? इतकाही कॉमन सेन्स असू नये का?"
"........"
"हां, यावेळेस पंधरा दिवसांसाठी जायचं आहे. मला उलट बरंच वाटतंय. तेवढाच दोघांनाही विचार करायला वेळ मिळेल ना. बरं जाऊ दे, ठेवते मी आता फोन. पोहोचल्यावर कॉल करेन तुला."
बोलून झाल्यावर तिने मोठा श्वास घेतला आणि इकडे तिकडे पाहिले. आत्ता कुठे तिला सहप्रवाशाची जाणीव झाली. तो कुठलेसे मासिक वाचत असल्याचा बहाणा करत होता. पण कान मात्र बहुतेक या संभाषणाकडेच असावेत. बोलण्याच्या नादात आपण थोडं जास्तच वाहवत गेलो असे वाटून ती थोडी गोरीमोरी झाली. पण लगेच तो विचार उडवून लावून तिने इअर पॉड्स कानात घातले. बहुतेक त्याला वाचायच्या नाटकाचा कंटाळा आला असावा. मासिक बाजूला टाकून त्याने हसऱ्या नजरेने तिच्याकडे पाहिले.
सावळी, तकतकीत कांतीची, सुंदर फिचर्स असणारी आकर्षक व्यक्तिमत्वाची जीन्स आणि टॉपमधील मुलगी त्याच्या समोर बसली होती. त्याची नजर आपल्यावर आहे हे जाणवून तिने वर पाहिले. त्याचे स्मित पाहून तिने किंचीतशी स्माइल देऊन तिने पुन्हा स्थितप्रज्ञतेचा मुखवटा धारण केला. तिची प्रतिक्रिया पाहून तो ही पुढे बोलायच्या फंदात न पडता सरळ आपल्या जागेवर आडवा झाला आणि काही मिनिटांत गाढ झोपी गेला.
कसल्या तरी आवाजाने त्याचे डोळे उघडले. पाहिले तर ती तरुणी सीटखाली ठेवलेली सुटकेस बाहेर काढायचा प्रयत्न करत होती. पण बहुतेक सुटकेसचे चाक कशात तरी अडकले असावे म्हणून ती बाहेर निघत नव्हती.
तो उठून बसलेला पाहून काहीशा असहाय्य नजरेने तिने त्याच्याकडे पाहिले.
"मे आय?" हलक्या आवाजात त्याने विचारले. काही न बोलता ती बाजूला झाली. कारण मदत तर हवीच होती. थोडी खटपट करून त्याने सुटकेस बाहेर काढली. यावेळी मात्र तिने हसून थँक्यू म्हटलं. उत्तरादाखल त्याने फक्त स्मित केले.
"हाय, मी रागिणी. दिल्लीला चाललेय. तू पण दिल्लीला जातोय की मध्ये कुठे उतरणार?"
"तिकीट तर दिल्लीपर्यंतचे काढलंय पण पाहू कुठपर्यंत जाता येईल." किंचीत हसत तो म्हणाला.
"म्हणजे? मला काही समजलं नाही. एक्झॅक्टली काय करतोस तू?" ती गोंधळली होती.
"जाऊ दे, ते महत्त्वाचं नाही. तू कामानिमित्त जातेय का?"
"हो, मी सी ए आहे एका फर्ममध्ये. एका क्लाएंटकडे जातेय." तिने एका नामांकित फर्मचे नाव सांगितले. हळूहळू गप्पा रंगत गेल्या. मध्येच त्याने तिला कॉफी प्यायची का विचारले.
"इथे कुठे कॉफी मिळेल आता?" तिने प्रश्न केला.
"तुला माहीत नाही का, या ट्रेनला डायनिंग कार जोडली आहे आणि मागच्या आठवड्यापासून त्यात अनेक नवीन पदार्थ ऍड केले आहेत. मिळणारा प्रतिसाद पाहून ठरवतील पुढे चालू ठेवायचं की नाही."
"अय्या हो? चल मग पाहून तर येऊ कसा चाललाय प्रयोग." मोबाईल खिशात सरकवत ती उठली.
डायनिंग कारमध्ये खिडक्यांजवळ फॉल्डेबल टेबल्स होती. काहीजण गप्पा मारत खानपान करत होते. एक भले मोठे शीख कुटुंब गप्पात मग्न होते. त्यातील वृद्धापकाळाकडे झुकलेली एक स्त्री मात्र एकटीच हातात कप घेऊन नुसती खिडकीबाहेर पाहत बसली होती. तिच्या बरोबर कुणी बोलतानाही दिसत नव्हते. त्याच्या नजरेने तिला हेरले.
"ऐक ना, तू बसते का तिकडे. मी आलोच." रिकाम्या जागेकडे बोट दाखवत तो म्हणाला आणि त्या स्त्री समोर जाऊन बसला.
त्याने तिला काही विचारले असावे. मान हलवत तिने उत्तर दिले. रागिणी कॉफीची ऑर्डर देऊन कुतूहलाने त्या दोघांकडे पाहू लागली. काही मिनिटांत दोघे ओळख असल्यासारखे बोलू लागले. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील ताणाच्या रेषा लुप्त होऊ लागल्या. मध्येच एकदा ती स्त्री हसली सुद्धा. रागिणीला आश्चर्य वाटले. काही वेळापूर्वी खिन्न, दुःखी दिसणारी बाई आता कशी सामान्य होतेय...
दोघांचे बोलणे संपायची रागिणी वाट पाहत होती पण ते काय संपायचे नाव घेत नव्हते. अर्ध्या तासाने कंटाळून रागिणी उठली आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली.
"ओ, सॉरी फॉर कीपिंग यू वेटींग. मला अजून जरा वेळ लागेल." भानावर आल्याप्रमाणे तो म्हणाला.
"हरकत नाही, मी जाते. टेक युवर टाईम," म्हणत रागिणी कूपेमध्ये परतली.
बऱ्याच वेळाने तो परतला. ती त्याला काही विचारणार तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला. नाव पाहून तिने कॉल कट केला. दोनदा असेच झाल्यावर "हा मेहुल तर मला ना जगू देईल न मरू देईल" म्हणत तिने फोन सरळ स्विच ऑफ करून टाकला.
"काय झाले रागिणी, काही प्रॉब्लेम आहे का?" तिच्यासमोर बसत हळुवार आवाजात त्याने विचारले.
भरल्या डोळ्यांनी तिने वर पाहिले. उत्तर न देता ती तशीच बसून राहिली.
"इट्स ओके. सांगितलंच पाहिजे असं नाही. पण तुला त्रास होतोय हे जाणवतंय. कधी कधी काय होतं माहितीय का, बऱ्याच गोष्टी आपण मनात दडपून ठेवतो. होणारा त्रास लपवतो. जखमेवर फक्त आवरण घातलं जातं. आतमध्ये ती तशीच ठसठसत राहते. यातून साध्य तर काही होत नाही उलट आतल्या आत घुसमट होत राहते. म्हणून शक्यतो मनात न ठेवता समोरच्याला बोलून दाखवावं. मन मोकळं होतं, गैरसमज असतील तर दूर होतील. कदाचित काही मार्ग ही मिळतील." बोलून तो शांत बसून राहिला.
"मेहुल, माझा मित्र आणि आता होणारा नवरा... खूप वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. लग्नाचा विचार मनात आल्यावर जोडीदार म्हणून क्षणात डोळ्यासमोर एकमेकांचे चित्र उभे राहिले. सगळं ठीक चालू आहे पण...." ती बांध फुटल्याप्रमाणे धडाधड बोलत सुटली. किती तरी वेळ बोलतच राहिली. बोलून झाल्यावर भानावर येऊन तिने त्याच्याकडे पाहिले. गालावर हात ठेवून तो लक्ष देऊन तिचे बोलणे ऐकत होता.
"पण तरीही तुझं त्याच्यावर प्रेम आहे, हो ना?" त्याने विचारले.
"हो, ही इज परफेक्ट फॉर मी. आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकत नाही."
"मग रागिणी, आल्यापासून एकदाही त्याच्याशी बोलली नाहीस. रागात घराबाहेर पडलीस. त्याची काय अवस्था झाली असेल. त्याला कॉल कर आणि जे वाटतं ते बोलून टाक. हवं तर ओरड, शिव्या दे पण नात्याला साचू देऊ नको, प्रवाही राहू दे. मगच ते स्वच्छ राहील."
रागिणी त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला जाणवलं, याच्याशी बोलून तिला आतून मोकळं झाल्यासारखं वाटतय. एकदम हलकं फुलकं वाटत होतं. समोर बसलेल्या अगदी नाव ही माहीत नसलेल्या या आकर्षक मुलाने तिला तिच्या नकारात्मकतेच्या कोषातून बाहेर काढले होते. फोन स्विच ऑन करून तिने मेहुलला कॉल केला. तिला प्रायव्हसी मिळावी म्हणून समजूतदारपणे तो उठून बाहेर गेला.
थोड्या वेळाने रागिणी पॅसेजमध्ये आली तर तो सुद्धा फोन वर कुणाशी तरी बोलत होता. तिला पाहून "हो नक्की येईन, पोहचेन उद्यापर्यंत, तोपर्यंत काळजी घ्या" म्हणत त्याने कॉल संपवला. दोघे परत त्यांच्या जागेवर आले. त्याने आपल्या सामानाची बांधाबांध सुरू केली.
"मग, झालं का सोर्ट आऊट?" बॅग भरत त्याने विचारले.
"हो... मेहुलला माझी काळजी वाटत होती. शिवाय आई ही त्याचा फोन घेत नव्हती... आम्ही बोललो. त्याला पटलंय माझं म्हणणं आणि मला ही त्याची काळजी कळतेय रे. चार दिवसांनी तो दिल्लीला येणार आहे. थोडा वेळ घालवू एकत्र. अजून काही गोष्टी क्लिअर होतील. काळजीपोटी आलेला पझेसिव्हनेस आहे तो. मला वाटलं त्याला आवडत नाही मी जॉब केलेलं, पुढे गेलेलं... पण आता सगळं ठीक आहे. ...
"हो... तू उतरणार आहेस? काय झाले?"
"अगं कुणाला तरी माझी गरज आहे वाटतं. जाऊन पाहिलं पाहिजे. नवा प्रवासी, नवा प्रवास सुरू आता. अशी बघू नको, कामच आहे माझं ते."
"म्हणजे? समजेल असं बोल काहीतरी. नक्की काय काम आहे तुझं?"
"तुला कसं वाटलं माझ्याशी बोलून?"
"एकदम मोकळं... ए ती मघाशी भेटलेली बाई, तिला तू ओळखतोस का?"
"नाही ग, आयुष्यात पहिल्यांदाच भेटलो तिला."
"हो का, मग गप्पा तर अगदी वर्षानुवर्षे ओळखत असल्यासारखं मारत होतास."
"रागिणी, कधी कधी माणसाला व्यक्त व्हायला ओळख पाळखची गरज नसते. ती बाई कुटुंबासोबत असूनही अगदी लोनली फील करत होती. लहान वयात लग्न होऊन भल्या मोठ्या कुटुंबात आली आणि संसाराचा गाडा ओढताना स्वतःला विसरून गेली. आता उतारवयात त्याचं भान आलं पण मुलं, नातवंडं यांच्यामध्ये ही फिट होत नाहीये. कुटुंब जोडताना, सांधून ठेवताना बरोबरीचे मैत्र कधीच मागे पडले. जेव्हा त्यांनी पुढाकार घेतला तेव्हा हिने माघार घेतली. आता हीची गरज आहे तर त्यांचा नकार...एवढं मोठ कुटूंब पण मनातील बोलायला एक व्यक्ती नाही. सगळे एकमेकांमध्ये रमलेले."
रागिणीला तिचा उदास चेहरा आठवला. काय काय आठवत असेल तिला...
"मी तिला फक्त एक प्रश्न विचारला. विषय मिळत गेला, गप्पा वाढत गेल्या. तू पाहिलंस ना, किती खूष झाली ती. माणूस एक समाजप्रिय प्राणी आहे. कितीही पैसे मिळवा, सुख सांगायला जवळची व्यक्ती नसेल तर काय फायदा ना? मग लोक डिप्रेशन मध्ये जायला लागतात. क्षणिक समाधान मिळवण्यासाठी धडपड करायला लागतात. जाऊ दे तू काय, ती काय दोघी सारख्याच."
"काहीही काय, मी आणि ती. तुलना कसली करतोय?" रागिणीच्या चेहऱ्यावर राग दाटून आला.
"रागिणी, जग कितीही जवळ आलंय म्हटलं ना तरी लोक एकमेकांपासून दूर होत चालले आहेत. सुख दुःख व्यक्त करायलाही कुणी नाही आपल्याला. रादर वुई आर नॉट कंफर्टेबल विथ पीपल अराऊंड अस. मला जेव्हा अशी माणूस नावाची आतल्या आत कुढत चाललेली बेटं दिसतात तेव्हा मी त्यांच्या जवळ जातो. त्यांच्या भावनांना ट्रिगर करतो. त्यांना बोलायला, व्यक्त व्हायला प्रोत्साहन देतो. यातूनच ते सावरत जातात. एकटेपण शेअर करायला लागतात. साचलेल्या पाण्याला एकदा बांध फोडून दिला तर पुढचा मार्ग ते स्वतःच शोधते, जसं तू शोधलास. हेच माझं काम आहे. मी अशा लोकांचा सहप्रवासी होतो. त्यांच्यासोबत त्यांना हवं तिथं जातो आणि फक्त ऐकायचं काम करतो." बुटाची लेस बांधत तो बोलत होता. पाकिटातून बिझनेस कार्ड काढून तिला देत त्याने समारोप केला.
रागिणी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होती. तिचा हा प्रवास एकदम वेगळा होता. तिने भावनावेगाने त्याला मिठी मारली. आश्चर्यचकित होऊन त्याने फक्त तिच्या पाठीवरून थोपटले. बॅग उचलून तो आलेल्या स्टेशनवर उतरून निघूनही गेला. तिने हातातील कार्डकडे पाहिले, त्यावर फक्त एक नंबर होता आणि खाली ओळ होती, 'जेव्हा एकटं वाटेल तेव्हा फक्त एक कॉल करून बघ, मी हजर असेन.'
रागिणीने अगदी जपून ते कार्ड ठेवून दिले. गरजेच्या वेळी ती नक्की या सहप्रवाशाला हाक मारणार होती.
समाप्त