समाधान

 समाधान (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

सायली कुलकर्णी 

"रुची ऑफीसमधून येताना आठवणीने माझी औषधे घेऊन ये."
"हो आई. किती वेळा आठवण करता? नक्की घेऊन येईन. नका काळजी करू." रूची भराभर पोळ्या लाटता लाटता आपल्या सासुबाईंना, अनिता काकूंना जेवायला वाढत होती.


"अगं रविवारी थोडा वेळही काढ. पलीकडच्या कॉलनीतल्या साठे काकूंना आणि त्यांच्या सुनेला जेवायला बोलावू. नवीन सून आली त्यांच्या घरी! आपला अनेक वर्षांचा घरोबा आहे, न बोलावणे बरे दिसत नाही."


"आई अहो, रविवार एकच दिवस मिळतो, आराम करायला. त्या दिवशी नका काही काढत जाऊ." रुची वैतागून म्हणाली.
"बरं बाई..फार तर रविवारी रात्री बोलावं. तुम्ही दिवसभर करा आराम. नाहीतरी सगळे काम तुलाच करायचे आहे. मला कुठे काही धड करता येते? अनिता काकूंची बडबड सुरूच होती.


"आज खूपच उशीर झाला. अजून यशचा, मिलिंदचा डबा भरायचा आहे. मी जेवूनच जाईन आता ऑफीसमध्ये. आज लेटमार्क पडला तरी हरकत नाही, कधीतरी चालायचेच." रुची स्वतःशीच बोलत होती."


"अगं, एकटीच काय बडबडतेस? मला अजून एक पोळी वाढ." सासुबाईंच्या बोलण्याने रूचीची तंद्री मोडली.


इतक्यात यश आला. "आई माझा डबा तयार आहे का?"


"आहे. पण बाळा आज तुझा डबा तू भरून घे प्लीज. सोबत तुझ्या बाबांचाही डबा भर." रुची आपल्या मुलाला म्हणाली आणि तिने सासुबाईंना गरम पोळी वाढली.


तशा सासुबाई तिला ओरडल्या, "अगं ही असली कामं पुरुषांनी करायची का? तू दे ना भरून डबा."


"अगं आजी चिल..मी भरतो डबे. त्यात काय एवढं? आज -काल पुरुषांनाही स्वयंपाकघरातील काम यायला हवीतच आणि तू पाहतेस रोज आई  गडबडीत असते, घरची सारी कामे आवरून ऑफिसला जाते. तेव्हा तू म्हणत नाहीस? ऑफिसला जाणे हे फक्त पुरुषाचे काम असते म्हणून?"


"यश.. आजीला उलट उत्तर देण्यापेक्षा काम कर आणि कॉलेजला पळ. आई, हल्ली काम वाढल्यापासून रुचीची धावपळ होतेच नाहीतरी. घरचं टेन्शन, ऑफिसचं टेन्शन, सारं सांभाळताना कसरत होते तिची. सारी कामे एकटीने करण्यापेक्षा एखाद्या मावशी ठेऊ आपण. तेवढीच रुचीला मदत होईल." मिलिंद स्वयंपाकघरात येत म्हणाला.


"नको.. घरचा स्वयंपाक घरच्या बाईनेच करावा. तिच्या हातची चव उतरते त्यात. शिवाय त्या मावशीला भरमसाठ पगार द्यावा लागेल तो वेगळाच. बरं..झालं माझं जेवण. रुची ताट तेवढं उचलून सिंकमध्ये ठेव बाई. चालायला त्रास होतो आजकाल. गुडघे दुखतात ना माझे." अनिता काकू ताटावरून उठत म्हणाल्या. तशी रुची आणखीनच वैतागली.


"आई तू जेवून घे. मी उचलतो आजीचे ताट." असे म्हणून यश ताट उचलून कॉलेजला पळाला देखील. पाठोपाठ मिलिंदही ऑफिसला गेला, तर 'आज यायला उशीर होईल' म्हणून रुचीने ऑफिसमध्ये फोन लावला आणि ताट वाढून तिने रेडिओ सुरू केला. गाणी ऐकत ती पोटभर जेवून आवरायला पळाली.


"आज ऑफिसमध्ये यायला चक्क दोन तास उशीर?" रुचीला पाहताच तिची मैत्रीण अनुजा म्हणाली.


"हो. गं. रोजचीच धावपळ. झाला थोडा उशीर. त्यातच सासुबाईंच गाणं. मी फोन केला होता आपल्या टीम मॅनेजरला." रुची आपल्या डेस्कवर बसत म्हणाली. तिच्या टेबलवर आधीच कुणीतरी कामाच्या फाईल्स आणून ठेवल्या होत्या.


"अनु खरंतर मला मुलगी हवी होती. मुली कशा छान असतात, गोड -गोड पऱ्या असतात. आईच्या मैत्रिणी होतात मोठेपणी आणि मनातलं सारं बोलताही येत म्हणे मुलीशी! शिवाय आईला कामात मदत करू लागतात.
पण मला मुलगा झाला आणि मी उदास झाले. बहुतेक मी अशी पहिलीच आई असेन, जी मुलगा झाल्यावर नाराज झाली!
पण यशने आज मला धक्काच दिला! घरकामात  मदत केली त्याने. शिवाय माझी बाजू घेऊन आपल्या आजीशी वादही घातला. मनोमन सुखावले गं मी. आपली बाजू मांडणारं आहे कोणीतरी म्हणून. पण कोणाला बोलून दाखवले नाही इतकेच."


"अगं या वयात चिडचिड होतेच तशी. चाळीशी पार केली आपण. सकाळी थोडा वेळ काढून मेडिटेशन, योगा करत जा. मन शांत होतं. असो..पण तुझ्या घरी बोलायला निदान सासुबाई तरी आहेत. माझ्या घरी मी, माझा नवरा आणि मुलगा. आमच्या तिघांची तोंड तिन्ही दिशेला! घरी कोणी वाट पाहणार असलं ना की त्या ओढीने घर गाठावं वाटतं आपल्याला.


घरी एखाद्या मावशी ठेव वर कामाला. तेवढीच मदत होईल तुला." अनु रुचीला डोळा मारत म्हणाली.


"ठेवीन तर..त्याचे पैसे मात्र तू द्यायचेस. चला मॅडम कामाला लागते. आजच टार्गेट पूर्ण करायचं आहे. नाहीतर खरडपट्टी काढणाऱ्या बॉस सासुबाई आहेतच." असे म्हणत रूची आपल्या कामाला लागली.


संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी रूचीचे काम संपले नव्हते. ऑफिसखाली बराच वेळ तिची वाट पाहणारा यश वैतागून शेवटी वर आला.


"आई अजून किती वेळ? वाट बघून कंटाळलो मी तुझी." यशला इथे पाहून रूचीला धक्काच बसला.


"तू इथे कसा काय?" रुची आश्चर्याने म्हणाली.


"आलो तुला न्यायला. तुला नको असेल तर जातो परत." यश नाटकीपणाने म्हणाला.


"थांब थोडा वेळ. निघूच आपण लगेच." रुची हातातले काम भरभर आटपत म्हणाली.


रुचीचे काम होईपर्यंत यश साऱ्या ऑफिसभर फिरून आला. अधून -मधून रुची त्याला न्याहाळत होती. 'यश अगदी मिलिंदवर गेला आहे. वागणं, बोलणं, सारं काही तसचं.'
तिचे काम संपले तसे अर्ध्या एक तासात दोघेही बाहेर पडले.


"आई कॉफी घेऊयात का? तू बस इथे. मी घेऊन येतो कॉफी." तिने काही म्हणायच्या आधीच यशने एका कॉफी शॉपच्या बाहेर गाडी थांबवली आणि पाच एक मिनिटात तो आतून कॉफी घेऊन बाहेर आला.


"यश, आज आईसाठी इतके सारे करतो आहेस? काही मनातलं गुपित सांगायचं आहे की काय?" रुची त्याला चिडवत म्हणाली.


"काहीतरीच काय आई? तसल्या गोष्टीसाठी माझ्याकडे आत्ता वेळ नाही. त्याच झालं असं..अगं परवा बाबा आत्याला म्हणत होते, रुचीची जरा जास्तच चिडचिड होते हल्ली. त्यातच तिचं ऑफिसचं कामही वाढलं आहे आणि आई सारखी तिला बोलत राहते काही ना काही. मग ती हिरमुसते, चिडचिड करत राहते. चाळीशीनंतर होतं म्हणे असं. स्त्रीला मानसिक आधारही हवाच या काळात.
आम्हाला अजून एक मुलगी असती, तर बरे झाले असते." यश आपल्या बाबांची नक्कल करत म्हणाला.


हे ऐकून रूची यशला हळूच एक धपाटा घालून म्हणाली, "तू कशाला ऐकायला गेला होतास हे?"


"अगं मी मुद्दाम ऐकायला गेलो नव्हतो काही. ते आत्या आली होती घरी, रक्षाबंधनासाठी आणि तुला घरी यायला नेमका उशीर झाला, तेव्हाची गोष्ट आहे ही.


तेव्हापासून मी ठरवलं. तुला काही ना काही मदत करत राहायचं. मनात आलं तर थोडाफार स्वयंपाकही शिकेन तुझ्याकडून. रोज तुझी किती धावपळ होते, पाहतो ना मी आणि हल्ली मुलंही करतात घरातली कामं. जॉबसाठी एकटं राहायची वेळ आली की नडत नाही फारसं.
खरं म्हणजे, आजी तिची स्वतःची कामं करू शकते. पण करत तर काहीच नाही. नुसती तुला बोलत राहते. मग म्हंटल तिला समजावण्यापेक्षा आपणच काहीतरी करावं.


मी काय म्हणतो, बाबांनाही घरातली थोडी फार कामं करायला सांग आता. पण आता रोज तुला ऑफीसमधून घरी न्यायला मी येणार आहे हा. ते काम बाबांकडे नको."


रूचीला मनातून आपल्या मुलाचं फार कौतुक वाटलं. पण तिने चेहऱ्यावर मात्र तसं काही दाखवलं नाही.
"किती शहाणा माझा मुलगा! निघूया चल आता नाहीतर उशीर होईल." रुची यशला जवळ घेत म्हणाली. ती यशला कौतुकाने न्याहाळत राहिली बराचवेळ.
'किती लहान होतं माझं बाळ, खोड्या करणारं. आता अचानक मोठं झालं. मधली सारी वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली की काय चटकन्? आठवतही नाही फारसं काही.'


" आई खरंच तुला असं वाटतं का? तुम्हाला अजून एक मुलगी हवी होती म्हणून?" यश निरागसपणे रूचीकडे पाहत म्हणाला.


"चल... चावट कुठला. उठ आणि चल लवकर. नाहीतरी आजी ओरडेल मला. बरीच कामं बाकी आहेत घरात." रुची यशचा कान पिळत म्हणाली.


"यश मी 'आई 'म्हणून किती भाग्यवान आहे, तुला कसं सांगू? इतका समजूतदार मुलगा देवाने माझ्या पोटी दिला. मला एक मुलगी हवी होती असं नेहमी वाटायचं. पण देवाने इतका गोड मुलगा पदरात टाकला..किती आभार मानू मी त्याचे?
अनुला म्हंटल मी मगाशीच. मुलगी आईची मैत्रीण होते मोठेपणी. पण मुलगाही आईचा मित्र होऊ शकतो, हे मला तुझ्या वागण्यातून कळाले बाळा. आयुष्यभर असाच राहा. 


पण आधी तुझा अभ्यास महत्त्वाचा. ते झालं की मग बाकीचं आणि महत्वाचं म्हणजे आजीला उलट बोलायचं नाही. कळालं का? 


ती आहे म्हणूनच आपण सारे एकत्र आहोत. तुझ्या लहानपणी तिनेच तर तुला सांभाळलं म्हणून आम्ही नोकऱ्या करू शकलो."


"हो गं आई. आता आभार प्रदर्शनचा कार्यक्रम झाला असेल तर निघायचं का? बाबा आणि आजी  'डिनरसाठी 'पुढच्या चौकातल्या हॉटेलमध्ये येऊन थांबलेही असतील. आजीचा वाढदिवस आहे आज. विसरलीस ना तू, नेहमीसारखीच? आणि आजीची औषध घेऊ नकोस. मी ऑनलाईन मागवली आहेत ती." यश गडबडीने उठून म्हणाला.
आता हा रुचीसाठी आणखी एक धक्का होता.

प्रेम, धोका, पश्र्चाताप आणि पदरात पडलेले मातृत्व

नक्की वाचावी अशी एक अनोखी कथा 👇



यशच्या गाडीवर मागे बसत रुची स्वतःशीच म्हणाली, 'किती छान वाटतं आहे आज, अगदी
हलकं- हलकं. काहीतरी गवसल्याचा आनंद आहे हा. आज मी खूप आनंदी आहे. आपली हक्काची माणसे सोबत असली की मग कशाची फिकीर करायची? कधी आपली मुलं आपल्यापेक्षाही मोठी वाटतात, जेव्हा आपण त्यांना 'कळायला' लागतो ना तेव्हा.'


यशने पुढच्या चौकात गाडी थांबवली. मिलिंद आणि अनिता काकू या दोघांची वाट पाहत होते. 


"किती उशीर रुची? कधीची वाट पाहतो आहे आम्ही."


"सॉरी आई..आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." रुची आपल्या सासुबाईंना मिठी मारत म्हणाली.


तशा सासुबाई बावरल्या आणि हसत हसत म्हणाल्या, "इतक्या वर्षातल्या या शुभेच्छा अगदी निराळ्याच आहेत बरं!"


तसा यश आपल्या आईकडे मिश्कीलपणे पाहत म्हणाला, "असुदे गं आजी, आज ती खूप खुश आहे..खूपच!" तशी रुची आपल्या सासुबाईंकडे पाहून समाधानाने हसली, अगदी मनापासून.

समाप्त.

सायली कुलकर्णी

वेगळ्या धाटणीची गूढ कथा 👇



1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post