हरीमामा

 

          हरीमामा   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ अर्चना पिसू


                   काही व्यक्ती आपल्या आयुष्यात सदैव एक दीपस्तंभ बनून राहतात.माझ्या सुदैवाने माझं लग्न नात्यातच ठरलं म्हणून  सासरच्या अनेकांशी माझी आधीचीच ओळख होती. माझं लग्न ठरलं तेच मुळी माझ्या मामेसासऱ्यांच्या आणि माझ्या आजोबांच्या पुढाकाराने ! त्यामुळे हरीमामा अर्थात माझे मामेसासरे त्यांची ओळख लग्नाआधीपासून होतीच. त्यांचा तो भारदस्त आवाज, प्रेमळपणे केलेली चौकशी, गडगडाटी हास्य आणि मुख्य म्हणजे आमच्या शाळेच्या संस्थेचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांचा वचक होताच . आता तर ते सासरे  म्हटल्यावर एक धाकयुक्त आदरही  होता.

         हरीमामा ह्यांच्या बरोबर माझेही मामाच झाले सासरे नाहीच. त्यांच्याशी गट्टी जमायचं आणखी एक कारण म्हणजे त्यांच सगळं आयुष्य शाळेच्या व्यवस्थापनात गेलं आणि मी पण शाळेत शिक्षिका मग काय गप्पांच्या विषयाला अंत नाहीच कधी!  मागच्या वर्षी मामा काळाच्या पडद्याआड गेले पण असंख्य आठवणी  सोडून गेले.                 

       विशेषत:  गौरी-गणपतीची चाहूल लागल्यापासून हरिमामांची आठवण तीव्रतेने येत होती. गौरी- गणपती पूर्वी 15 दिवस आधी त्यांचा रिमाइंडर फोन असायचा .अर्चू, महालक्ष्मीचे लक्षात आहे ना !या मग सगळे ! *या* शब्दा पूर्वी *लवकर* हा शब्द सायलेंट असायचा. माझ्या घरी गौरीपूजन दुपारी ,आणि मामांकडे संध्याकाळी त्यामुळे आम्ही लग्न झाल्यापासून संध्याकाळी मामांकडे जेवायला जात असू. 

          गौरी पूजनाच्या दिवशी दुपारी चार वाजता मामांचा पहिला फोन यायचा ,"पप्या, संध्याकाळी या लवकर! मग हे म्हणत, हो मामा सहापर्यंत येतोच  .तसा तिकडून दरडावून दम दिला जायचा," सहा का बरं पाच वाजता या सगळे ,काय ?मग हे नरमाईने म्हणायचे ,"बर पाच पर्यंत येतो .पण कितीही घाई केली तरी घरातून निघायला साडेपाच वाजायचे आणि तोपर्यंत मामांची एक वॉर्निंग बेल  येऊन जायची. तिकडून मामा आम्हाला घरी बोलावण्याची घाई करत असताना बॅकग्राउंडला मामींची लटकी नाराजी ऐकू यायची ,"आहो येऊ द्या त्यांच्या वेळेवर !त्यांनाही घरचं सगळं करून यायचं असतं !इतकी घाई करू नका! आणि येतात ते वेळेत दरवर्षी !""पण हे मामीचं स्वगतच व्हायचं .कारण तोपर्यंत मामांनी आमच्या कडून लवकर येण्याचं कबूल करून घेतलेलं असायचं. 

          मामांकडे पोहोचलो की पहाडी आवाजात स्वागत व्हायचं ,हां या , छोकरी कुठे? आमचा छोकरा कुठे ?'" असं म्हणत प्रत्येकाची हजेरी घेतली जायची  उशीर झाल्याबद्दल ची अपराधीपणाची  माझ्या मनातील भावना मामांच्या त्या दिलखुलास स्वागतानं पळून जायची. 

          मामांची बैठक कुंकवाच्या हस्तमुद्रानी सजलेली असायची. दिवसभर उत्साहाने काम करणाऱ्या ,आपुलकीने स्वागत करणाऱ्या ,अत्यंत रुचकर स्वयंपाक करणाऱ्या मामीच्या हाताचे कुंकवाचे ठसे आपली खास ओळख करून देत असत .आम्ही आलेलो पाहताच मामा त्यांची मुलगी मंजू नातू अमेय , व अजिंक्यला बोलवत ते दोघे असतील तर मंजू ताईंना तातडीचे बोलावण्यात येई . मधल्या खोलीत ज्येष्ठा-कनिष्ठा सजून बसलेल्या, मध्यभागी भारदस्त अशी गणपतीची मूर्ती .त्याशेजारी ठसठशीत अशा आपलं अस्तित्व दाखवणारी बैलजोडी आणि आजूबाजूला झिळमिळ्यांनी केलेली सजावट ,ज्येष्ठा-कनिष्ठा यांचे प्रसन्न पितळी मुखवटे ,त्यांच्या डोक्यावर दुर्वांची जुडी, आघाडा ,पडवळ, फुले यांची शिस्तबद्ध रचना .चापून-चोपून नेसवलेल्या साड्या, ठराविक अलंकार आणि त्यावर भरगच्च फुलांचे हार, गौरीच्या समोर त्यांची बाळे त्यासमोर मोजक्या पण कल्पकतेने ठेवलेल्या शोभेच्या वस्तू ,याच्या दोन्ही बाजूने छान शी रांगोळीची नक्षी हे सगळं न्याहाळत असतानाच मामी घरातून नैवेद्याची पानं घेऊन येत. हिरव्या टवटवीत केळीच्या पानांवर नैवेद्य वाढलेलाअसे. ते रंगीबिरंगी पदार्थ  पाहून जठराग्नी प्रदीप्त होत असे. तोपर्यंत बैठकीतून मामा फर्मान सोडत ,"मंडळी ,मोहिते कडे फोन करायला सांगा मन्या ला. अमेय जा रे ,बोलव त्यांना." त्यांच्या बोलण्याचा प्रतिध्वनी जणू मोहितेंकडे जायचा आणि दुसर्‍या मिनिटाला मोहिते वहिनी दारात उभ्या असायच्या. त्यांच्याबरोबर त्यांची छोटी नातही कौतुकाने आरतीला यायची .सगळ्यांच्या साक्षीने आरती होत होती.मग पानं वाढायची लगबग सुरू होत असे .आतापर्यंत सोवळ्यात असलेल्या स्वयंपाकघरात आता कुठे आम्हाला शिरकाव असायचा .त्यामुळे आम्ही सगळेच जमेल ते चिमुकलं काम करत असू. मंजू ताई वाढायला सरसावत. बैठकीत पुरुष मंडळी- मधल्या घरात आम्ही बायका बसत असू. मामी आठवणीने प्रतिवर्षी चे सोपस्कार मनापासून करत- जेवणापूर्वी तीर्थ देणे, दक्षिणा देणे ,हळदी कुंकू लावून नमस्कार करणं ,ताटलीत वेगळे फराळाचं वाढणं एक न् दोन, कितीतरी छोट्या-मोठ्या गोष्टी त्या कशा लक्षात ठेवत, कोण जाणे! अर्थात ,तरीही मामांचे आदेश येतच असायचे बैठकीतून! आम्ही पहिला घास घेतला की मोठ्याने सांगायचो ,"मामा बसलो बर का जेवायला" मामा तेवढ्याच उत्साहाने म्हणत ,सावकाश जेवा, पोटभर जेवा आमच्या कडे ! 

        खरंतर घरची जेवणं होऊन जेमतेम चार-पाच तास झालेले असायचे काहीच खायची इच्छा नसायची ,पण एकदा ताटावर बसलो की,मन भरून जेवण जात असे.कदाचित वाढणाऱ्या त्यांच्या मनातले भाव,आग्रह करणाऱ्या मामांचे प्रेमळ शब्द ,आणि सात्विक, श्रद्धायुक्त ,सुग्रास अन्न यामुळे आमच्या पोटापेक्षा मनच तृप्त होत असेल म्हणून पोटात आपोआप जागा व्हायची. मामींच्या हातची  भरगच्च पुरण असलेली गरम पोळी पोटात मावायची. 25 वर्षापासून ठरलेले सगळे पदार्थ आपली खानदानी चव लेवून पानात बसत.पदार्थ तयार करणाऱ्या मामींच वय वाढलं शरीर थकलं पण उत्साह मात्र कायम आहे. आणि तशीच पदार्थांची चवही .अगदी तीच !हे मीच नाही तर त्या दिवशी जेवणारा प्रत्येक जण म्हणायचा! कोणाच्या पानातला पदार्थ संपला याकडे बारीक लक्ष असायचं मामांच लगेच, "मंडळी ,जावईबापू साठी भजे आणा,मिलू दादाला पोळी वाढ गरम,अमू, भाजी घेतली न कारल्याची? अशी चौकशी करून आग्रह करीत. आग्रहच्यावेळी त्यांच्या भारदस्त आवाजाला करारीपणा पेक्षाही प्रचंड स्नेहाचा मुलामा असायचा. म्हणून त्यांचा आग्रह कधीच मोडवला गेला नाही आणि हो त्या आग्रहाने कधी पोट दुखावलं नाही. जेवणाने तृप्त झाल्यावर कितीही उशीर झाला तरी पाय निघायचा नाही. आम्ही गप्पात रंगलो की मामा वेळेचं भान करुन द्यायचे.मंडळी, झाली का तुमची जेवणं? तिला जाऊ द्या आता !तिकडे बाबी वाट पाहत असेल.आम्ही सुद्धा गप्पांच पान चघळत निघत असू. "सांभाळून जा, पोहोचल्यावर फोन करा"- हा निरोप अर्थात मामांचा!एव्हड  आठवणीने सांगूनही आम्ही पोचपावती दिली नाही तर मात्र ती तिसाव्या मिनिटाला फोन, काय रे पोहोचला का घरी ?" 

          यावर्षी मात्र फोनची एकही रिंग वाजणार नाही.काळाने तो फोन कायमचा स्विच ऑफ केलाय या विचारांनी मन भरून येत होतं .  गेल्या 24 वर्षांपासून ची ही परंपरा या वर्षी खंडित होणार या विचाराने मन खंतावल होतं .राहून राहून वाटत होतं ज्या मामी अनेक वर्षांपासून हे सगळं नेटानं करत आहेत त्यांना किती अवघड होईल हे सगळं पचवणं !तसं तर प्रत्येक सणाला नव्हे क्षणाला  मामांची आठवण येणारच! पण हा तीन दिवसांचा सण, मामींना हे तीन दिवस खूप कठीण जातील, या विचारानेच एक विचार मनात पक्का केला आणि घरात कोणाला काहीच न विचारता मी मंजू ताईंशी  मनातलं बोलले !त्यांनी मामीचा संभाव्य नकार सांगितला .पण म्हटलं बघू परत वाट त्यांच्या होकाराची! नाहीतर किमान गौरी पूजनाच्या संध्याकाळी आपणच मामींना भेटायला जाऊ !पण मनातून वाटत होतं मामींनी निदान हे तीन दिवस तरी इथे यायला हवं. आशेचा दुवा मनात ठेवून आदल्यादिवशी तडक त्यांना फोन केला ,"मामी माझ्याशी कट्टी घेतली का तुम्ही ?त इकडे  यायचं नाही हो ?असं काहीतरी बोलले, काय बोलले माहीत नाही! पण चक्क तिकडून "बर बघते" असा होकाराचा  हिरवा कंदील मिळाला आणि मला खूप समाधान वाटलं .मामी येईपर्यंत थोडी धाकधूक वाटत होती पण हे कार घेऊनच घ्यायला गेले दाराशी गाडी आली म्हटल्यावर मामींना नाही म्हणवले गेले नाही. मामींना घर सोडताना नक्कीच जड गेले असणार! पण माझ्या हट्टापायी त्या आल्या .त्या एकट्या नुसत्या आल्या नाही तर बरोबर गौरी बद्दलची श्रद्धा आणि सणाचा उत्साह घेऊन आल्या. म्हणूनच गौरी घरात आणताना मामी सुद्धा घरातल्या सगळ्यांबरोबर सामील झाल्या होत्या.मागच्या सगळ्या आठवणी मनात ठेवून त्या वर्तमानातला आनंद टिपत होत्या. आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं . आपल्याकडे त्याआल्या याच समाधान वेगळं होतं पण त्याहीपेक्षा जास्त आता त्या एकट्या नसणार याबद्दल जास्त बरं वाटत होतं! रिवाजाप्रमाणे गौरी घरात आणल्या  ,मुखवटे मखरात बसवले आणि वैदेही सहज म्हणाली ,"आई यावेळी मुखवटे खूप आनंदी वाटत आहेत, नाही का ?आणि मलाही तसंच वाटत होतं दोन्ही गौरी खूप प्रसन्नतेने तृप्तीने आणि विशेषतः कौतुकाने पहात आहेत असं वाटलं !कदाचित घरातल्या प्रत्येकाच्या मनातली प्रसन्नता आज मामींनी आणि गौरींनी ल्याली होती. आतून कुठूनसा आवाज आला , अर्चू , आमच्या मंडळींना बोलावून घेतलंस हे फार बरं केलंस!'

          😊सौ अर्चना पिसू 

Post a Comment (0)
Previous Post Next Post