सहकुटुंब सहपरिवार वर कथा Stories on family members in Marathi [ शब्दचाफा]


सहकुटुंब सहपरिवार वर कथा Stories on family members in Marathi [ शब्दचाफा]

शौर्य आणि प्रियांकाचे लग्न झाले. देशमुख कुटुंबियांनी ऐन फेब्रुवारीत दिवाळीच साजरी केली जणू. अगदी राजेशाही थाटात लग्न केलं अनिलरावांनी आपल्या धाकट्या चिरंजीवाच. मित्राची मुलगीच सून म्हणून घरात आणली. रमाताईही खूप खुश होत्या. तिसरी सूनही पहिल्या दोघींसारखी अतिशय सुंदर आणि गुणसंपन्न होती. सारा आनंदीआनंद होता.


पंचक्रोशीत या एकत्रित राहणाऱ्या कुटुंबाची किर्ती पसरली होती. संस्कारांचे बाळकडू प्यायलेली त्यांची तीन मुलं आणि सुना अगदीच गुण्यागोविंदाने राहत होत्या. सात पिढ्या बसून राज करतील एवढी संपत्ती होती. पण पाय मात्र जमिनीवरच होते. एक मराठी उद्योजक म्हणून अनिलरावांनी उद्योग क्षेत्रात रोवलेला झेंडा तिन्ही मुलांनी अटकेपार पोचवला होता. मुलगी नव्हती पण तिन्ही सुना मुलीपेक्षा कमी नव्हत्या. एकमेकींशी बहिणीप्रमाणे वागणाऱ्या त्या सासू-सासर्‍यांना आई वडिलांची माया देत होत्या. समाजसेवा ही अनिल रावांच्या रक्तातच होती. आपल्या वडिलांचा वारसा जपत एका अनाथाश्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती.

सगळ्यात थोरल्या मुलाला एक मुलगा होता तर मधल्याने मुलीच्या रुपात घराला लक्ष्मी दिली. नातवंडांच्या सहवासात घराचे आधारस्तंभ असलेले ते दोघे पती-पत्नी सुखात जगत होते. फक्त चाहूल होती ती धाकट्याच्या गोकुळाची. लग्नालाही दोन वर्षे झाली होती.

नाश्त्याच्या टेबलावर मोठी जाऊ चिडवत म्हणाली, "शौर्य आणि प्रियांका आता तुम्हीही घ्या मनावर. पुन्हा एकदा आईपण अनुभवायचं आहे मला"


सहकुटुंब सहपरिवार वर उत्तम कथा 

तशी दोघं भलतीच लाजली. आपला नाश्ता आवरत कामाला निघून गेली. सारेजण नव्या पाहुण्याच्या आगमनाची आशा लावून होते. पण इकडे प्रियांकाच्या मनात वेगळंच होतं. शौर्यला याची माहिती तिने लग्नापूर्वीच दिली होती. आपले सर्वस्व असणाऱ्या आपल्या कुटुंबाला आपली इच्छा सांगायची हीच वेळ होती. दोघांनी मनाशी पक्क ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावर आपलं मनोगत व्यक्त केलं.

शौर्य म्हणाला," आई बाबा आम्ही आपल्या अनाथआश्रमातून मुल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला आहे."

सारे एकमेकांकडे बघत होते. अनिलराव उठले आणि शौर्यला समजावत म्हणाले, "शौर्य तुझ्या मनाचा मोठेपणा बघून आज चांगलं वाटलं पण तुझा निर्णय मला पटला नाही. अनाथआश्रम आपलंच आहे. त्यातील सगळीच मुले आपली आहेत. पण आपल्या देशमुख घराण्याला रक्ताचा वारस हवा."

तशी प्रियांका उठली, "बाबा मला माफ करा पण कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीने जपलेलं नातं जगाला जगण्याची रीत सांगून जातं. हा निर्णय सर्वस्वी माझा आहे."

तसा अनिलरावांनी आवाज वाढवला,
"शौर्य, सुनबाईंना समजव. आम्हाला, या घराला रक्ताचा वारस हवा आहे."

"शौर्य माझाही निर्णय झालाय. मी अनाथाश्रमातील मुलालाच दत्तक घेणार बाकी तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे."
प्रियांका स्पष्टपणे म्हणाली.

तिला अडवत रमाताई म्हणाल्या," प्रियांका अनाथाश्रमातील मुलाला आपण सांभाळूच. खूप स्तुत्य आहे तुझा हा निर्णय. पण मातृत्वाची अनुभूती घेण्यासाठी तुला आई व्हाव लागेल. आईपण अनुभवावं लागेल. जेव्हा आपल्याला बाळ होते तेव्हाच खऱ्या आनंदाचा सोहळा आपण अनुभवतो. बाईपण जगतो."

"आई माफ करा पण मातृत्व अनुभवणे फक्त स्वतःचं मूल झाल्यावरच शक्य आहे का? अनाथ लेकराची आई झाले तर ते मातृत्व नसेल का ?"

"प्रियांका हे मला माहित नाही. माझा निर्णय हा शेवटचा असेल आणि तुम्हाला पटत नसेल तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील." अनिलराव परखडपणे म्हणाले.

थोरल्याने अनिलरावांना समजवण्याचा प्रयत्न केला मधल्याने शौर्यची समजूत काढली पण सारे व्यर्थ होते. या सुखी संसाराला नजर लागली कुणाची तरी. शेवटी त्या दोघांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला.

शौर्य हात जोडत म्हणाला, "आई बाबा मला माफ करा. लग्न करताना मी प्रियंकाला वचन दिले होते. तुमच्याशिवाय आमचा संसार शून्य असेल. पण तरीही आम्हाला बाहेर पडावेच लागेल. बाबा, तुम्ही म्हणताना जी गोष्ट मनाला पटली ती नक्की करावी. कोणाची पर्वा न करता. पण तुमची पर्वा आम्हाला नेहमीच असेल. तुम्ही फक्त हाक द्या आम्ही दोघेही तुमच्या सावलीत असू."

अनिल रावांनी तोंड वळवले पण हृदय मात्र आर्त होऊन दोघांना पाहत होते. करारी असले तरी हळवे होते ते. रमाताईंनी डोळ्याला पदर लावला. दोघा भावांनी आणि वहिनींनी समजूत काढली. पण त्यांचा निर्णय झाला होता अनिलरावांसारखीच प्रियांकाही करारी होती. पण तिचेही मन हळवे होते. आपल्या अनोख्या मातृत्वासाठी आपण शौर्यची या घराबरोबरची नाळ तोडत आहोत या जाणिवेने ती हळहळली. या साऱ्यात पिळवटून निघालेल्या शौर्यच्या डोळ्यात पाणी आले. पण बायकोच्या मागे तो ठाम उभा राहिला. वडिलांकडूनच घेतले होते ना सहजीवनाचे संस्कार.

शेवटी सारे सोपस्कार करून त्या दोघांनी तीन वर्षांच्या वीणाला दत्तक घेतले. वीणाच्या रूपाने प्रियांकाच्या मातृत्वाला बहर आला. पण रमाताईंच मातृत्व मात्र हिरमुसल. एवढ्या मोठ्या वाड्यात कोणालाच अन्न गोड लागेना सुखाचं फुलपाखरू देशमुखांच अंगण सोडून कायमचा उडून गेलं जणू. अनिलरावही खचले होते. लाडका लेक आणि मुलीची माया देणारी सून त्यांना हवी होती. पण रक्ताचा वारस साऱ्या नात्यांच्या आड येत होता.

शौर्य आणि प्रियांका आपल्या लाडक्या लेकीच्या संगोपनात गुंग होते. पण साऱ्यांच्या सहवासात, प्रेमात एका अनाथ लेकराला वाढवायच स्वप्न मात्र अपूर्ण राहिल होत.

एक वर्षाचा कालावधी लोटला. एक दिवस अचानक अनिलरावांची मोठी बहीण आजारी असल्याची बातमी आली. सारेजण तिच्या घरी पोहोचले. अनिलरावांपेक्षा पंधरा वर्षांनी मोठी असलेली बहीण अंथरुणाला खिळली होती. तिला काही सांगायचे होते.
"अरे अनिल का काढलस पोराला घराबाहेर? आपल्या वडिलांचा वारसा चालवला त्याने. तुलाही याच अनाथआश्रमातून आणले होते बाबांनी. आईचा दुसऱ्या मुलाचा हट्ट तुला दत्तक घेऊन पूर्ण केला होता त्यांनी."

बहिणीचे शब्द अनिलरावांच्या काळजाला लागले. निधड्या छातीचा उद्योजक आता कोसळला.

"आपणही अनाथ होतो. पण त्याची पुसटशी कल्पनाही आईबाबांनी, ताईने येऊ दिली नव्हती. आपला स्वीकार करून उज्ज्वल भविष्याच दान दिल त्यांनी. मग आपल्या लेकाने, सुनेने तेच पुण्यकर्म केले तर काय गुन्हा केला?" अनिलरावांना रडू कोसळले.

सरळ शौर्यचं घर गाठल. लेकाची आणि सुनेची माफी मागतांना तो उद्योजक लहानमुलाप्रमाणे रडला. आपल्या नातीला उचलून घेतांना काळीज गलबलून गेलं. रक्ताच्या वारसाचा हट्ट सोडून सहकुंटुब सहपरिवार पुन्हा एकदा एकत्र आले.

- आर्या पाटील
मी, सौ.आर्या पाटील असून सदर  कथा माझे स्वलिखित असून माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्कलेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

तुम्हाला ही कथा सुध्दा वाचायला आवडेल.
👇
Post a Comment (0)
Previous Post Next Post