मी सरू आत्मकथा मराठी [ शब्दचाफा ] I am Saru Autobiography Marathi [ Shabdachafa ]






 मी सरू

लेखिका- सपना इंद्रावार



  काहीही म्हणा पण आत्याचं हे चुकलंच.. मी आधीच म्हटलं होतं की नको हा कुरड्यांचा घाट.. आणि आता माझ्या मागे लावून दिलं .. आणि वर माझ्यावर केवढ्याने ओरडल्या...अरे हो.. मी सांगायला च विसरले !!! मी सरू उर्फ शरयू.. शरयू दयानंद माने..


     दयानंद..दयानंद म्हणजे आमचे हे हो.. कसं वाटतंय नाही नाव हे..मला पण बाई नाही आवडत..ते सी आय डी त ल्या 'कुछ तो गडबड हैं दया' असं वाटतं.. पण काय करावं आत्याबाईंनी ठेवयलं.. त्यांच्या आजे सासऱ्यांचं नाव आहे म्हणे .. त्याची एक वेगळीच कहाणी आहे..ती पुन्हा कधीतरी.. तर मी काय सांगत होते...माझ्या लग्नाला झालीत दीड वर्ष... आमच्या आत्या.. आत्या म्हणजे माझ्या सासूबाई हो... 


     माझा सासूबाई माझ्या आत्या पण आहेत.. त्याचं काय न.. कुसुम म्हणजे माझ्या आत्या.. त्यांच्या आई लहानपणीच वारल्यात.. मग आजोबांनी दुसरं लग्न केलं.. वरकरणी नव्या आई छान राहत.. पण सारी कोरडी माया.. माझे पप्पा म्हणजे आत्यांचे लांबचे मावसभाऊ.. फक्त नात्याने लांबचे.. मनाने मात्र खूप जवळचे.. पाठचे.. जणू  सख्खे भाऊ.. त्यांचा भारी जीव कुसुम आत्यांवर.. एकतर पप्पांना बहीण नाही.. आणि आत्या अशी आई असून पोरकी..


      पुढे माझ्या पप्पांना नोकरी लागल्यानंतर ते तालुक्याला राहायला गेले.. माझी आई म्हणजे आत्यांची बालमैत्रिणच.. म्हणजे माझ्या आई बाबांच्या लग्नात आत्याचं पण मोठा हात होता हे मला आईनेच सांगितलं.. पप्पाच्या लग्नाच्या चारेक वर्षा आधी कुसुम आत्यांचे लग्न झाले आणि त्या येवली सोडून गेल्या.. येवली म्हणजे माझ्या आत्याचं आणि माझं पण माहेर हो...



     मग त्या फारशा गावाला आल्याच नाही.. एक तर त्यांच्या आईने आणि भावंडानी त्यांना कधी आपलं मानलंच  नाही.. आणि आजोबांच्या जाण्याने तर दुसरं कारणही उरलं नाही गावाला परतायला.. पण पप्पानी मात्र आत्याचं माहेरपण पूर्ण केलं.. एक आपुलकीचा जिव्हाळ्याचा झरा कायम ओला राहिला या दोन भावंडात..  


     पुढे मामजींच्या नोकरीत सतत च्या बदल्यांमुळे त्यांचं फारसं येणं होत नव्हतं.. तरीही वर्ष दोन वर्षे आड त्या यायच्याच.. मला फार लाड लाड करायच्या.. आत्या ना दोन मुले आणि धाकटी मृदुला.. मोठे दादा सिल्वास ला राहतात गुजरातमध्ये.. मधला गोलू सॉरी आमचे दयानंदराव आत्या मामाजी सोबत इथे कोल्हापूरला.. आणि मृदू ताईंचं आणि आमचं लग्न एकाच महिन्यातलं.. 


     लहानपणी कधीतरी मला लाडाने सुनबाई म्हणणाऱ्या कुसुम आत्यांनी जेंव्हा मला खरीखुरी सून बनवून घ्यायचं ठरवलं तेंव्हा पप्पा नाही म्हणू शकले नाही.. .  माझं मत पण घेतलं बरं का.. आता दयानंदराव एक नाव सोडलं तर नाव ठेवण्यासारखं काही नाही त्यांच्यात.. मग मी पण तयार झाले आणि इथे आले मिसेस शरयू दयानंद माने म्हणून.. 



      तशा आत्या खूप प्रेमळ.. माझी आई करणार नाही इतकं लाड करतात माझे.. म्हणून तर मी माहेरी पण जात नसते फारशी... आणि गेले तरी आम्ही दोघी सोबतच जातो.. घरी कुणी पाहुणे आले की त्यांना विश्वासच वाटत नाही की आम्ही सासू सून आहोत ते.. 


     ते बरीक सारे बरोबर आहे.. पण केवढ्या ने ओरडल्या माझ्यावर त्या..आता ते पहिल्यांदा च ओरडल्या असं.. नाही तर आई आणि पप्पा पण माझ्याशी मोठ्याने बोलत नाही.. जाऊ देत मला तर भारी राग आलाय .. मी नाही बोलणार आत्यांशी..


      किती सारे गहू घातलेत काल त्यांनी भिजायला.. आता याचा चीक काढा.. मग रंगीत फुलं आणि कुरडया वळा.. बापरे!! तरी मी आधीच म्हणत होते की पूजे साठी घरी बनवू बाकी तयार आणू.. तर ऐकतील कसल्या.. साऱ्या गावाला वाटायला हव्या न.. मोठेपणा नुसता.. 

आता काही म्हणताही येत नाही.. हात दुखायला लागलेत..  काय तरी वास तो गव्हाचा.. शी बाई!! हेच जर आई ने सांगितले असते तर केलेच नसते मी.. पण म्हणतात न कितीही गोड असली तरी सासू ती सासूच..


     आज सकाळी मी गोलूला चिडलेच.. तेव्हा कुठं समजलं आत्याचं रागावण्याचं कारण.. ही माणसं पण न.. अगदी आतल्या गाठीचे असतात.. विचारे पर्यंत काही सांगणार नाही.. त्यांचं काय झालं न.. आमच्या मृदू ताई नाही का... त्यांचा म्हणे महिना चुकला.. गोड बातमी होती.. किती आनंदाची गोष्ट... पण त्यांच्या सासूबाई नि माहेरी सांगायला मज्जाव केला.. का तर म्हणे चोर ओटी भरे पर्यंत कुणालाच सांगायचे नाही.. अगदी जन्मदात्या आईला पण..


     आणि भरीस डॉक्टरांनी त्यांना सक्तीची बेडरेस्ट सांगूनही त्यांच्याकडून इतकी काम करून घेतली की शेवटी त्या चक्कर येऊन पडल्या.. आणि जे नको व्हायला होतं तेच झालं.. गर्भपात झाला त्यांचा.. मला तर बाई हे ऐकूनच कसं तरी झालं की त्या तासभर तरी तशाच टेरेस वर उन्हात पडून होत्या म्हणे.. 


     एक तर मृदू ताई फारशा फोन करत नाही.. आणि त्याही अशाच आपल्या भावासारख्या..जीव जायला होईल पण पोटातलं ओठांत येणार नाही..कसं कळावं की आपलं माणूस संकटात, दुःखात आहे ते.. 


      बिचाऱ्या मृदुताई.. अगदी नावासारख्याच आहेत.. नाजूकशा.. कसं सोसलं असेल त्यांनी... आणि आत्याला तरी किती वाईट वाटलं असेल हे कळल्यानंतर.. ते तरी बरं.. की अचानक मोठे दादा मृदुताईकडे जाऊ नये आणि त्यांनी स्वतःच्याच डोळ्यांनी ते सारं पाहू नये म्हणून निदान कळलं तरी.. 


     मृदुताई कडले जावई गेले महिनाभर दुबईला जाऊन आहेत कामानिमित्त.. जे काही झालं ते त्यांच्या माघारी.. भला माणूस.. ताईं त्यांना अगदी जीव का प्राण.. आता ते परतल्यावर च जे काही बोलणं होईल ते होईल.. दादांनी परस्पर ताईंना सिल्वासला घेऊन गेलेत म्हणून मला यातलं काही कळलं नाही.. आणि आत्या बिचाऱ्या या तणावात असतानाच माझ्या कुठल्याशा बोलण्यावर चिडल्या.. 


     ज्याचा एवढा राग धरून मी त्यांच्याशी अबोला धरला..आज तर माझी मलाच लाज वाटत आहे.. मला इतकं प्रेम करणाऱ्या , माया लावणाऱ्या माझ्या सासूबाई त्यांच्या पोटच्या गोळ्या सोबत असं काही झाल्यावर किती वेदना झाल्या असतील त्यांना..


      आज शांताआक्का आमच्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी अजून आल्या नाही म्हणून मीच सकाळी सकाळी  लवकर आवरून किचनमध्ये आले.. माझ्या मागोमाग आत्या पण आल्या.. किती उतरला त्यांचा चेहरा.. अगदी आजारी वाटत आहेत.. काय बरं बोलू.. कशी सुरुवात करू..??

"आत्या कुरडयासाठी चीक शिजवायला घेऊ का??" त्या काहीच बोलल्या नाही.. कधीचा नास्ता बनवून तयार आहे.. मामाजीना देऊन झाला.. हे पण नास्ता करून ऑफिसमध्ये गेलेत.. मला भूक लागली आहे पण अजून आत्याने काहीच खाल्लं नाही मग मी कशी खाऊ..?


     शी बाई!!! ह्या मृदुताई च्या सासूला की नाही माझ्या सारखी सून पाहिजे.. अशी सरळ केली असती न सुतासारखी.. इतकी घळाघळा बोलणारी ,हसणारी आत्या माझी.. कशा उदास झालाय.. त्या नेहमी म्हणत "सरे" लाडात असल्या की त्या मला सरे म्हणत... "सरे माणसानं अर्धी भाकर कमी खावी पण पोटभर बोलावं कसं" आणि गेली दोन दिवस न जेऊन राहिल्या न बोलून राहिल्या... डोळे तरी बघा कसे सुजलेत.. किती रडल्या असाव्यात..


     मला तर कळेना झालंय की काय बोलू नि कसं बोलू..

मी आपली गुपचूप कुरडया ची तयारी करू लागले.. इतक्यात आत्या आल्या मागून.. गॅस बंद करून म्हणाल्या "शांताआक्का येणार आहे सोबतीला घेऊन.. करतील कुरडया.. जा तू बिमार पडलीस तर काय तुझी आई येणार आहे निस्तरायला??" तसं त्यांनी आवाज वाढवायचा प्रयत्न खूप केला.. पण जे स्वभावातच नाही ते जमणार होय?? त्यांचा आवाज तर भिजल्या मातीसारखा मऊ झालेला..


     मला उगा भरून आलं.. मी नजर चोरत वळले.. दारापर्यंत जाते न जाते तर आवाज आला "सरे..." 


मी थांबले..."खाऊन घे पोरी .. मला माहित आहे तुझ्याने भूक सहन होत नाही.. " 

मी पळतच आले नि मिठीच मारली आत्याला.. दोघींनी रडून घेतलं पोटभर.. मग सोबतच नास्ता पण केला तोही पोटभर..


* समाप्त*

© सौ.सपना रवि


    कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.

सदर कथा सपना इंद्रावार यांची असून त्यांनी ती स्वखुशीने शब्दचाफा ब्लाॅगवर प्रकाशित करण्यासाठी दिली आहे. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे असून त्यावर शब्दचाफा ब्लाॅगचा काहीही अधिकार नाही. आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो. शेअर करा पण लेखिकेच्या नावासकट.



Post a Comment (0)
Previous Post Next Post