बकुळाच्या जीवनावर आधारित कथा Stories based on the life of Bakula in Marathi

 



" आई, हा घे तुझा मोगऱ्याचा गजरा. भारी दिसतो तुला" नेहमीप्रमाणे शारदाताईंच्या केसांत गजरा माळत बकुळा म्हणाली आणि कामाला निघून गेली." ताई ही कोण आहे हो? किती लाघवी आणि मायाळू आहे" वृद्धाश्रमात नवीनच भरती झालेल्या विजयाताई शारदाताईंना म्हणाल्या." अहो, ही बकुळा आपल्या वृद्धाश्रमात जेवण बनवायचं काम करते. हाताला भारी चव आहे. पण नुसत्या मायेनेचं एवढ पोट भरते की मन तृप्त होते. "शारदाताई मोकळ्यापणाने बोलत होत्या. बोलता बोलता त्यांचा स्वर जड झाला." पण, काय दैव आहे बघा पोरीचं. लेक झाली नि नवरा कामासाठी मुंबईला गेला तो कायमचाच. 

बकुळाच्या जीवनावर आधारित कथा Stories based on the life of Bakula in Marathi

आईची माया आणि बापाचं कर्तव्य हिच पार पाडते." बकुळा. अगदीच फुललेली, सावळा वर्ण पण नाकी डोळी रुबाबदार, मध्यम उंचीची. आनंदाचा झराच जणू. साऱ्यांच्या मदतीला तत्पर, पण अशिक्षित. परिस्थिती अभावी शिक्षणाशी संबंध आलाच नाही. उपवर झाली आणि माधवबरोबर लग्न झाले. माधव शिकलेला होता पण वडिलांची शेवटची इच्छा म्हणून बकुळाशी लग्न केल. वडिलांची निवड त्याची आवड कधी बनली कळलेच नाही. दिड-दोन वर्षांच्या सुखी संसाराच्या वेलीवर कळी उमळली. रेश्मा झाली आणि माधवला मुंबईत चांगली नोकरी मिळाली. अगदी दहा दिवसांच्या लेकीचा आणि ओल्या बाळंतिणीचा निरोप घेऊन तो मुंबईला निघून गेला. 

बकुळाची कथा मराठी मध्ये

आज रेश्मा तीन वर्षांची झाली पण तो परतला नाही. वर्षभर निदान त्याच्या चिट्ठ्या यायच्या पण नंतर त्याही बंद झाल्या. बकुळाने धीर सोडला नाही. आजही ती त्याच्या वाटेवर डोळे लावून बसली होती. या तीन वर्षाच्या कालावधीत तिला खूप प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. माहेरच्यांनी लग्न लावून दिले आणि हात वर केले. सासरे वारले होते. सासू दिर यांचाही आधार नव्हता. वर्षभर माधवने पैसे पाठवले नंतर तेही बंद केले. लोक काहीबाही बोलू लागले. पोरगी झाली म्हणून नवरा टाकून गेला, हिच्यातच खोट असणार म्हणून येत नाही, तिकडे शहरात दुसरी बायको केली असणार असे एक ना अनेक वावटळं उठू लागली. एकटी बाई म्हणजे वासनांध नजरांची शिकारच. तिला याही अनुभवातून जावे लागले. पण डळमळून चालणार नव्हतं. ती एकटी नव्हती तिची लेक जोडीला होता. ती खंबीर होती म्हणून पुन्हा उभी राहिली. वृद्धाश्रमात जेवण बनविण्याच काम करू लागली.आज या घटनेला तीन वर्षे झाली होती. बकुळा ही नव्याने जगू लागली होती. 


तोच अचानक एक दिवस कार येऊन तिच्या अंगणात थांबली. सुटबुट घातलेला, गॉगल लावलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर माधवच होता." बकुळा आहे का?" दार वाजवत तो म्हणाला.बकुळा बाहेर आली. प्रथम दर्शनी तो तिला अनोळखी वाटला पण आवाज मात्र ओळखीचा. त्याने डोळ्यांवरून गॉगल काढला नजरानजर झाली."हो तोच माधवच आहे हा. सातजन्माचं वचन देऊन मधेच सोडूनी जाणारा" बकुळा स्वगत झाली. तिला भानावर आणत माधव म्हणाला," कशी आहेस? या कागदावर अंगठा पाहिजे तुझा"कोणत्याही उत्तराची अपेक्षा न धरता त्याने कागद समोर धरला. काही न बोलता तिने अंगठा लावला." लेकीला बघणार नाहीत का?" नजरेला नजर देत बकुळा म्हणाली. तशी त्याची नजर खाली गेली." घाईत आहे खूप महत्त्वाचं काम आहे" अस म्हणत तो निघूनही गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे कितीतरी वेळ ती तशीच बघत होती. 


पोटच्या लेकीलाही न पाहणारा बाप आणि संसारात अर्धवट सोडून जाणारा नवरा तिच्यासाठी कायमचा मेला त्या क्षणी. ती ची खंबीरता वाढली. लेकीचं उज्वल भविष्य घडविण्याचा तिचा निर्धार पक्का झाला.वर्षभराने तो पुन्हा आला आता मात्र बरोबर दुसरी बायको होती. तिने अंगठा लावलेला कागद त्याने तिच्या पुढ्यात धरला. घटस्फोट आणि मालकी हक्क सोडण्याचा कागद होता तो. मोठ्या कष्टाने जपलेलं घर तिने कायमचं सोडल. आताही ती खंबीरच होती. तिने वृद्धाश्रमाशी वाट धरली. एव्हाना ही बातमी वाऱ्यासारखी वृद्धाश्रमात पसरली. तिला बघताच शारदाताई धावत आल्या नि बकुळाला जवळ ओढले," पोरी कधी एकदा तुम्हांला डोळ्यांत बघते अस झाल होत. नकोनको ते विचार येत होते मनात. दोघींना डोळ्यांत बघितल आणि निश्वास टाकला"" नाही आई, मी का संपवू माझ आयुष्य? आम्हांला सोडून जाणारा ताठ मानेने जगतो मग आम्ही का मरायचं. मी खंबीर आहे माझ्या लेकीला वाढविण्यासाठी. अशा बापाची सावली पण नको लेकीवर." खूप खंबीरपणे ती बोलत होती.


भराभर वर्षे सरली. अशिक्षित बकुळाने शिक्षणाचे महत्त्व त्याच दिवशी ओळखले ज्या दिवशी नवऱ्याला अंगठा दिला. रेश्माला शिक्षणाच्या बाबतीत काहीच कमी पडू दिले नाही. रेश्मा पण मेहनती होती. पदवीनंतर बी.एड् करून शिक्षिका बनली. अगदी कमी कालावधीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार घेतांना तो आपल्या आईला देण्याची विनंती तिने मान्यवरांना केली. हातात पुरस्कार घेतांना ती खंबीर माय पहिल्यांदाच मनमोकळं रडली. लेकीबद्दलचा अभिमान डोळ्यांतून अश्रू बनून ओघळला. " आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे. वादळात राहून आईने आम्हां दोघीचं अस्तित्व जपल. आई खंबीर होती म्हणून मला भविष्य लाभलं. दुःखाचं रखरखत ऊन पाठीवर सोसून माझी सावली झाली. माझ्या प्राणप्रिय आईचा मला सार्थ अभिमान आहे"रेश्माचे शब्द साऱ्यांच्या हृदयाला भिडले. जणू तिचे ते शब्द भर सभेत बकुळाचा सत्कार करत होते. आयुष्यभर केलेल्या कष्टाचा दरवळ आज तिच्या जीवनात पसरला.

©® आर्या पाटील

मी, श्री/सौ. आर्या पाटील ...असून सदर लेख/ कथा माझे स्वलिखित असून माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखकाकडे /लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

तुम्हाला ही कथा ही आवडेल 

👇

दोघे

Post a Comment (0)
Previous Post Next Post