दोघे

 'दोघे'


लेखक - सचिन देशपांडे जयवंत आजींच्या घरची बेल वाजली, सकाळी आठच्या सुमारास. आणि रोलिंग चेअरवर बसून हलकेसे झोके घेत... चहा पिता पिता 'तलत' ऐकणार्‍या आजींची, तंद्री भंगली. जरा नाखुषीनेच उठत, आजींनी अर्धवट दरवाजा उघडला. दारात जोग आजोबा उभे होते. अनपेक्षीत कोणी असं दारात दिसल्यावर, जो बेसिक गोंधळ उडायचा तो उडलाच आजींचा. गाऊनचं वरचं बटण लावलंय ना, केसांना चाप बांधलाय ना, कपाळावर टिकली आहे ना वगैरे गोष्टी... अर्ध्याहून कमी मिनिटांत चेक करत, आजींनी पुर्ण दरवाजा उघडला. "अरेच्चा जोग तुम्ही?... एवढ्या सकाळी सकाळी?... काही प्राॅब्लेम तर नाही ना?" हे तीन प्रश्न सेफ्टी डोअरच्या दोन कड्या, नी लॅच काढता काढता आजींनी विचारले. सेफ्टी डोअर संपुर्ण उघल्यावर, पुर्ण दिसले होते जोग आजोबा त्यांना... आणि त्या बावचळल्याच. अंगात बंडी घातलेले जोग आजोबा, फक्त पंचा गुंडाळून दारात उभे होते. आजींच्या चेहर्‍यावरचं हे अवघडलेलं प्रश्नचिन्ह ओळखत,  जोग आजोबा म्हणाले... "जयवंत बाई जरा घोळच झाला अहो... आंघोळीहून बाहेर आलो... बंडी चढवली नी बेल वाजली तेवढ्यात... केर गोळा करणारा आला होता... त्याला केराची बादली दिली... नी जरा जिन्यावरुन झाडू मार सांगायला बाहेर आलो... तोच वार्‍याने दरवाजा धडाम्मकन लागला हो... एक चावी शेजारी कांबळींकडे असते, तर ते तिथे मालवणात अडकलेले... आणिक एक चावी लेकीकडे असते... पण ती गोरेगावात रहायला... बरं तिला कळवायचं तर फोन हातात नाही, अन् तिचा नंबर डोक्यात नाही... कुठे जावं कळेना... बाकीच्या घरांतुन तरणी लोकं रहातात, मुलं - बाळं असलेली... त्यांनी दरवाजा उघडला असता - नसता... म्हणून मग आलो इथेच... आपण समवयस्क आणि समदुःखीही". 


जयवंत आजींनी कपाळावर हात मारत, जरासं चुकचुकत... आत घेतलं जोग आजोबांना. "तुमचा चहा तरी झालाय का जोग?" आजींनी विचारलं. "नाही हो... उदबत्ती दाखवल्या शिवाय चहा घेत नाही ना मी... माझ्या घरी". ह्या पाॅझ नंतर आलेल्या 'माझ्या घरी' चा अर्थ... 'दुसर्‍यांच्या घरी अशी काही अट नाही' असा होतो, हे कळलं आजींना. त्या हसूनच बोलल्या... "तुम्ही बसा जोग... चहा आणते तुमच्यासाठी". असं म्हणतच आजी आत गेल्या. जोग आजोबांनी दोन - तीन वेळा बसायचा प्रयत्न केला... पण त्यांचाच पंचा काही त्यांना तसं करु देईना... मग उभ्यानेच ते ऐकू लागले 'तलत'.  फुंकर मारत आपण पीस उडवत बसतो ना हवेत, तसं 'तलत' गाण्याचं कडवं उडवत होता... हळुवार. 'दिल में रख लेना इसे हाथोंसे ये छूटे ना कही.. गीत नाजुक है मेरा शीशे से भी टुटे ना कही'. जोग आजोबांनी मस्त मान उडवली, नी उजवा हात उंचावत तलतला कंपनी दिली... 'गुनगुनाऊंगा वोही गीत मै तेरे लिये'. 'तेरे लिये' म्हणता म्हणता ते वळायला... आणि जयवंत आजी चहाचा कप घेऊन पुढ्यात यायला, एकच गाठ पडली. सलज्ज हसल्या त्या, नी जोग आजोबांना नुतनच दिसली त्यांच्यात.


घसा खाकरत, कल्पनेचं उधळलेलं वारु आवरत... आजोबांनी कप घेतला आजींच्या हातातून. "अहो हे काय तुम्ही बसला नाहीत?". आजींनी विचारलेल्या प्रश्नावर, उत्तरादाखल आजोबांचा हात पंचावर गेला... आजींना कळून चुकला प्राॅब्लेम. गालातल्या गालात हसतच त्या म्हणाल्या... "थांबा... आमच्या ह्यांचा एखादा लेंगा देते तुम्हाला". आजोबा म्हणाले "अहो नको... हा एवढा चहा संपवून जातो मी". आजींनी विचारलं "कुठे जाणार?... बाहेर सगळं बंद आहे... तुम्ही तर मास्कही लावला नाहीयेत... नुसत्या पंचावर बसले तर, जास्त शेकायचे नी लाल व्हायचे उगिच". खळखळून हसल्या त्या दोन्ही हात तोंडावर धरत... आणि प्रसंग डोळ्यांसमोर येऊन, चहाचा घोट घशातच अडकलेले आजोबा कसेनुसे हसले. आजी आत गेल्या लेंगा आणायला, नी आजोबांनी कप ठेवला टिपाॅयवर. एव्हाना 'तलत' ने 'तस्विर बनाता हूं.. तस्विर नही बनती' ची चौकट सजवायला घेतली होती. लेंगा आजोबांच्या हातात देत, आजी कप ठेवायला आत गेल्या. दोन - चार मिनिटं जरा आतच वेळ काढून, बाहेर आल्या त्या. आजोबा छानपैकी लेंग्यात सोफ्यावर बसले होते... 'तलत' ला दाद देत. आजी जाऊन रोलिंग चेअरवर बसल्या. 'तलत' च्या 'हमसे आया ना गया.. तुमसे बुलाया ना गया' ने, पुन्हा हलकेसे झोके द्यायला सुरुवात केली होती चेअरला. मस्त तासभर उलटला समग्र तलत ऐकण्यात.. आणि जे ऐकलं त्यावर, भरभरुन बोलण्यात. आजी बोलल्या आजोबांना "मी मस्त कांदे पोहे करते आपल्याला". आजोबांच्या "नको अहो नको" ला न जुमानता, त्या उठल्याच. आजोबा म्हणाले "तुम्ही लोक सोडे घालून जसे करता पोहे, तसे जर केलेत तर चालतील". जयवंत आजींनी डोळे विस्फारुन बघितलं, जोग आजोबांकडे... "जोग तुम्ही हे असलं काही खाता?". आजोबा विचारानेच तोंडात जमू बघणारी लाळ, वेळीच गिळत म्हणाले... "आय जस्ट लव्ह सी फूड... सहा महिने बोटीवर असायचो अहो... मेलो नसतो का समुद्राशी दुश्मनी घेऊन". जयवंत आजींच्या अंगात अचानकच, उत्साह संचारल्यासारखं झालं. बर्‍याच महिन्यांनी सोडे येणार होते, आज बाटलीतून बाहेर. "आत्ता करते पोहे सोडे घालून... आणि मग जेवायला मस्त भुजणं करते कोळंबीचं आणि कांदे करंदी... मसाला खिचडी बरोबर धमाल येईल खायला". आजींनी नाश्त्याजोडीनेच जेवणाचा खास 'कायस्थ प्रभू' मेन्यूही फिक्स करुन टाकला. आणि हा असा बेत, नी आजींचं मन... कसं बरं मोडणार होते जोग आजोबा. काही वेळातच हजर झालेले पोहे बाकी, फर्मासच झाले होते. 


"तुम्हाला रमी खेळता येते?" जोग आजोबांनी विचारलं, जयवंत आजींना... आणि त्यांना जाणवलं, आपण जरा आगाऊपणाच केला. आजींनी एकदम पुढे येत आजोबांकडे, टाळीसाठी हात मागितला... आणि जोरात टाळी मारत म्हणाल्या... "हे आणि मी दिवसभर खेळायचो रमी... आठवड्यातून दोनदा तरी... पैसे लाऊन बरं का... आणि जो जिंकेल, तो रविवारी हाॅटेलींगचा खर्च करायचा... पण दोन वर्षांपुर्वी हे गेले... नी पत्ते बंद झाले माझे... असा अर्ध्यावर 'डाव' मोडल्यावर, एकट्याने 'डाव' लावण्यासाठीही कधी धरले नाहीत मी पत्ते हातात... ह्यांचा एक रमी ग्रुपही होता... प्रत्येक शनिवारी एकाकडे जमून रात्रभर खेळायचे हे लोक... तीन महिन्यांतून एक शनिवार आमचाही यायचा... मग मी ही बसायचे ह्या सगळ्यांसोबत". असं म्हणत आजींनी आणिक एक टाळी मागितली आजोबांकडे. तासभर मस्त डाव रंगला मग रमीचा... आजीच प्लसमध्ये होत्या. "चला आता स्वैपाकाला लागते" म्हणत आजींनी आवरते घेतले पत्ते. "चला मी तुम्हाला चिराचीरीत मदत करतो... फक्त बघाच मी किती फाईन चाॅप करतो कांदा ते... ही ठणठणीत असतांना मी कायम मदत करीत असे हिला... आणि शेवटी शेवटी जेव्हा दोनेक वर्ष, अंथरुणावरच होती ही... तेव्हा तर एकहाती सगळा स्वैपाक करत असे मी... अगदी साग्रसंगीत... अंगारीकेला उकडीचे मोदकही बरं का... पण तीन वर्षांपुर्वी ही गेली, नी तेव्हापासून मोस्टली डाळ भातच खातोय... एकट्यासाठी काही करावसंही वाटत नाही... आज पोह्यांनी खरंच चव आली जिभेला". आजी उठत म्हणाल्या... "ट्रेलरच झालाय बघून... पिक्चर तर पुढे आहे". आडवा हात मारत जेवले जोग आजोबा, आज बर्‍याच दिवसांनी. जयवंत आजींनीही बर्‍याच दिवसांनी बनवलेलं इतकं काही, आपल्या व्यतिरीक्त कोणी खाणारं आलंय घरी म्हणून. आपापले जोडीदार गेल्यावर, एकट्याने दिवस ढकलणं चालू होतं दोघांचं. जोग आजोबांची गोरेगावची मुलगी, दोनेक महिन्यातून येत असे एकदा. तर जयवंत आजींची दोन्ही मुलं दोनेक वर्षांतून एकदा, दोघेही फाॅरेनला असल्यामुळे. एका जागी साचलेल्या ह्या अथांग एकटेपणाचा, भरती - ओहोटी न येणारा समुद्र झाला होता... या लाॅकडाऊन मुळे. ह्याच तीन खोल्यांतून मुलांना वाढवतांना कमी पडलेली ही जागा, आता अवाढव्य भासत... खायला येत असे. सत्तरी ओलांडलेले हे दोन जिव, जिवावर आल्यासारखे जिवंत होते बस्स. पण आजचा दिवस निर्विवादपणे छान गेलेला. दोघांच्याही सुटलेल्या सवयींच्या शस्त्रांना, आज बर्‍याच दिवसांनी धार काढली गेली होती. 


बडीशोप खातांंना अचानक लागलेल्या ठसक्यामुळे, जोग आजोबांनी घाईतच रुमाल काढला बंडीच्या खिशातून... आणि चाव्यांचा गुच्छ पडला खाली जमिनीवर.  "हात्तीच्या मारी... साॅरी... म्हणजे पाहिलात माझा वेंधळेपणा... किल्ल्या बंडीच्या खिशात आणि मी आपला बेघर समजत स्वतःला, बाहेर वेळ काढतोय... येस्स... आत्ता आठवलं... याच जुडग्यात कपाटाचीही किल्ली आहे... मी पलंगावरचं पडलेलं चेकबुक, कपाटात ठेवलं ड्राॅवरमध्ये... कपाट बंद करत, किल्ली बंडीच्या खिशात ठेवली मी... आणि विसरलो... श्श्या... पण माझ्यामुळे तुम्हाला ऊगिच त्रा....". जोग आजोबांना तिथेच तोडून, जयवंत आजी बोलल्या... "इतकं एक्सप्लेनेशन द्यायची खरंच गरज नाही अहो... सकाळी चहा पित असतांनाच, मला आवाज आला होता चाव्यांचा, तुमच्या खिशातून... पण मी तुम्हाला काही जाणवू दिलं नाही... असा अभावानेच मिळणारा 'दुकटेपणा', सोडायचा नव्हता मला... आतल्याआत गुदमरायला होतं हो, ह्या छाताडावर बसलेल्या 'एकाकीपणा' ने... आणि आज मला तो, माझ्या छातीवरुन उतरवायचाच होता". आता दोघांच्याही डोळ्यांतून, पाणी तरळत होतं. जोग आजोबांनी हात जोडले जयवंत आजींना... आणि दार उघडून ते म्हणाले "येतो". आजींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना विचारलं "कधी?". 'दोघे' ही खळखळून हसले होते, टाळ्या देत एकमेकांना. दोघांच्याही मनातून एकाचवेळी 'तलत' गात होता...'ऐ मेरे दिल कहीं और चल


ग़म की दुनिया से दिल भर गया


ढूँढ ले अब कोई घर नया


ऐ मेरे दिल कहीं और चल'
---सचिन श. देशपांडेया कथेचे लेखक श्री. सचिन देशपांडे असून कथेचे संपुर्ण हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत. वरील कथा लेखकाच्या पूर्वपरवानगीने शब्दाचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत. कथेवर आमचा कोणताही हक्क नाही. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post