आरतीचा_मान
लेखिका - बीना बाचल
आज सकाळपासूनच ती उत्साहात होती. उठल्या उठल्या सगळी कामं हातावेगळी करायचा तिचा आजचा उरक विलक्षण होता. " चला ,आज व्रताचे एकवीस मंगळवार पूर्ण झाले. कधी एकदा छान मोदकांचा नैवेद्य बनवते आणि मंदिरात जाते असं झालंय" ती मनाशीच बोलत होती जणू.
तिनं शुचिर्भूत होऊन स्वयंपाक वगरे उरकला आणि मोदक करायला घेतले. एक एक पाकळी नीट दुमडत मोदक बनवले.सगळं मनासारखं झालं ,मग आरती चं ताट, खास बागेतली जास्वंद ,दुर्वा, मोदक घेऊन तबकावर छान रेशमी रुमाल झाकला आणि ती दर्शनाला निघाली.
मंदिरात ठराविक वेळेत पोहोचलो नाही तर केवढी तरी गर्दी होते आणि नशिबाने वेळेत पोहोचले आरतीच्या वेळी तर गाभाऱ्यात असणाऱ्या भक्ताला आरतीचा मान मिळतो हेही पक्के डोक्यात होते तिच्या , मग उगाच घाई घाईत दर्शन नको, शिवाय आजचा खास नैवेद्य ही नीट दाखवता यायचा नाही मग...अशी सगळी गणितं मनात मांडत ती रिक्षात बसली.
" इच्छापूर्ती गणपती" तिनं रिक्षावाल्याला सांगितलं आणि ती पुन्हा विचारात गुंगली," देवा, तू खरंच सुखात ठेवलं आहेस रे, पण थोडं अजून मोठं घर, नवऱ्याला अजून थोडी बढती, मुलाला शहरातलं सर्वात नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश, थोडे अजून दागिने........तिची यादी थांबेना!!" एकवीस मोदकांच्या' बदल्यात' बरंच काही मागतोय की आपण हेही तिच्या ध्यानी नाही आलं.
झालं मंदिर जवळ आलं तसं तिने पैसे हातात काढून घेतले आणि रिक्षेवल्याला देऊ केले, " ताई,सुट्टे नाहीत माझ्याकडे "असं त्याने म्हणताच तिचा पारा चढला." तुम्ही ना नुसते लुटा आम्हांला "असं म्हणत तिनं त्याला तणतणत पैसे दिले.
पुढे जात तिनं चपला काढण्यासाठी नेहमीचा हार फुलांचा स्टॉल शोधला. आता इतक्या महागड्या चपला तो सांभाळणार म्हणून मग उपकार केल्यासारखे तिनं त्याच्याकडून हार, फुलं घेतली. त्या परडीतल्या हार फुलांकडे तिनं असं काही पाहिलं की तुम्ही म्हणजे केवळ माझ्या चपला संभाळण्यासाठीची मोजलेली 'किंमत' आहात!! असो, पुढे दहा वीस लोकांची रांग लागली होती, नेमकी ती उभी होती तिथे भयंकर ऊन येत होतं, तिची पुन्हा चिडचिड झाली," शी, काय मेलं सर्वांना आजच दर्शनाला यायचं होतं! आणि काय एवढं मागायचं असतं येऊन कोण जाणे!किती ऊन लागतंय बाप रे!" घाम पुसत ती पुटपुटत होती. आता आत आरती साठी तयारी सुरू झाली होती, हिचा जीव वरखाली व्हायला लागला. देवा लवकर पुढच्याना दर्शन दे बाबा,म्हणजे मग नेमकी आरती साठी तुझ्या पुढ्यात मी येईन आणि मला आरती करायचा मान मिळेल, केवढी व्रत वैकल्य करते ,एकदा तरी ती कामी येऊ देत देवा, नेहमी मी आस लावून तुझ्या दारात अगदी आरती च्या वेळी येते , त्यासाठी कितीवेळा आटापिटा केला पण एकदाही मला तो मान मिळाला नाहीये.आज तरी मिळू देत देवा"
तिची ही हळू आवाजात बडबड चालू होती तोवर एक रिक्षा अगदी तिच्या पुढ्यात च येऊन थांबली.तिनं वैतागून च तिकडे पाहिलं तर त्यातून एक तरुणी आणि तिच्या सोबत एक वृद्धा उतरली. तिला त्या तरुणी चा आणि रिक्षा वाल्याचा संवाद ऐकू येत होता," असू देत दादा, सुट्टे नसले तरी, आजींसाठी तुम्ही थेट इथे पर्यंत रिक्षा आणलीत शिवाय सोसायटी मध्ये ही बराच वेळ थांबलात, उलट मीच तुमचे आभार मानते" म्हणत तिनं त्या रिक्षावाल्याला पैसे दिले आणि ती रांगेत येऊन थांबली.
ती तरुणी रांगेत येताच मान वर करून डोकावत होती की ,जर पुढच्या लोकांनी आजींसाठी आपल्याला पुढे जाऊ दिले तर बरं होईल, आजींना जास्त वेळ उभं राहता येत नाही, त्यांच्या कित्येक दिवसांच्या आग्रहाखातर त्यांना इथवर आणलं आहे आता थोडक्यासाठी गोंधळ नको.
ती तरुणी थोडी पुढे जाऊ बघत होती तो हिनं तिला अडवलं," अहो बाई,पुढे कुठे जाताय ,आम्ही काय वेडे म्हणून रांगेत उभे आहोत काय! गुपचूप रांगेत थांबा आणि आजींना उभं राहवत नाही तर इथे आणलेत तरी कशाला, घरूनच नमस्कार करायचा ना, पोहोचतो देवाला कुठूनही!"
ती तरुणी हिच्या बोलण्यानं वरमली आणि आजींचा हात धरून तशीच उभी राहिली.
थोड्या वेळातच रांग पुढे सरकली आणि ही ,ती तरुणी ,आजी सगळेच अगदी गाभाऱ्यापर्यंत पोहोचले.
हिला पक्की खात्री होती की आज आरती आपल्याच हस्ते होणार अगदी नक्कीच!! मनातून ती खुश झाली. तिनं पुजाऱ्याला हातातलं तबक दाखवलं दुरूनच की," मोदक नैवेद्य आणलाय ,शिवाय हार फुलं ही आहेत वगरे" पुजाऱ्याने तिला पाहताच हात दाखवला.
" ताई, तुमचा नैवेद्य वगरे आहे तो शांतपणे दाखवा, आधी आरतीची वेळ झालीये उगाच घाई होईल तुम्हाला, त्या मागच्या आजींना नुसतेच दर्शन घ्यायचे दिसतेय ,त्यांना पुढे घ्या, तुम्ही थांबा त्यांच्या मागे" पूजारी असे म्हणताच हिची नुसतीच चरफड झाली ,बरं नाही देखील म्हणता येईना, तिनं आजी आणि त्या तरुणीला वाट करून दिली आणि दुसऱ्या पुजाऱ्याने गाभाऱ्यातली घंटा वाजवायला एकच गाठ पडली!! झालं आरतीचं ताट हिच्या समोर असताना देखील ते त्या तरुणीच्या आणि आजींच्या हाती गेले आणि त्या दोघीनी मनोभावे आरती केली.
आरती झाल्यावर हिनं शांतपणे नैवेद्य दाखवला, हात जोडले पण तिचं लक्ष एकदा ही त्या 'इच्छापूर्ती' कडे केंद्रित झालं च नाही; केवळ ' मला आरती करता आली नाही' ही सल तेवढी मनात राहिली.दर्शन घेऊन बाहेर आली तो बाहेर झाडाच्या पारावर ती तरुणी आणि आजी बसल्या होत्या, त्या आजी तोंड भरून आशिर्वाद देत त्या तरुणीला म्हणत होत्या, "मुली,आज तुझ्यामुळे दर्शन ही झालं आणि आरती करायचा मान ही मिळाला ग, फार समाधान वाटलं. सुखी राहा ग मुली ,माझ्या म्हातारीचे आशिर्वाद आहेत तुला"
हिला तो सुखसंवाद ऐकून उगाच राग आला, तिनं त्या दोघींना ओलांडून बाकी सर्वांना मोदक वाटले.
"माझ्या व्रतात काय कमी पडतं कोण जाणे, नेहमी माझा आरतीचा मान हुकतो,पुढच्या वेळी अजून कडक व्रत करते आता, आणि एकवीस काय चांगले एकशे एक मोदक आणते पुढल्या वेळी, आरती चा मान मिळायला च हवा"
ती भरभर पावलं उचलत चपला ठेवल्या त्या दिशेने निघाली.
आणि गाभाऱ्यात ," आता कोणत्या पद्धतीनं हिच्या डोक्यात प्रकाश पाडावा" अशा विचारात खुद्द 'इच्छापूर्ती'च पडले!!!
सौ बीना समीर बाचल
सदर कथा लेखिका बीना बाचल यांची असून कथेचे संपुर्ण हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत. या कथेवर आमचा कोणताही हक्क नाही. ही कथा लेखिकेच्या पूर्वपरवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करण्यात आली आहे.