पेचप्रसंग आयुष्याचा भाग दोन


पेचप्रसंग आयुष्याचा भाग दोन


भाग एक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 👇

https://www.shabdchapha.com/2022/07/blog-post_8.html

भाग दोन :

लेखिका - अपर्णा कुलकर्णी
मीरा आणि शशांकची मधुचंद्राची रात्र होती, शशांक रूममध्ये आला त्यावेळी मीरा खिडकीत उभी होती. शशांक तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला तू मला होकार दिलास आणि बघता बघता आपले लग्न झाले यावर  विश्वास बसत नाही माझा. आपल्या दोघांच्याही आयुष्यात खूप वाईट घटना घडल्या कदाचित म्हणूनच आपण एकत्र आलो आहोत. पण मी तुला कधीही अंतर देणार नाही, काहीही कमी पडू देणार नाही तुला, कार्तिकीला आणि तुझ्या आईलाही खूप सुखात ठेवेन.  मीरा त्याचे सगळे बोलणे शांतपणे ऐकत होती, शशांकने जरा पुढे जाऊन मीराचा हात हातात घेतला, मीराने मान लगेच खाली घातली आणि कावरी बावरी झाली. तिची ती अवस्था पाहून शशांकने तिचा हात सोडला आणि म्हणाला की आताच काही दिवसापूर्वी केदार गेला आणि त्यात हे दुसरे नवीन बंधन. तुला वेळ लागेल याची मला पूर्ण कल्पना आहे. तुला हवा तितका वेळ तू घे माझी हरकत नाही.

दिवस जात होते बघता बघता सहा महिने होऊन गेले. मीरा आणि शशांकचा संसार सुखात चालू होता. शशांक चांगल्या स्वभावाचा होता, समंजस होता, कसल्याही गोष्टीत कधीही हरकत घेत नसे, काहीही करताना मीराच्या मनाचा विचार आधी करत असे, रोज कार्तिकिला आणि मीराच्या आईला आठवणीने वेळ देत असे. कार्तिकी पण त्याला खूप लागून होती. सगळ्या गोष्टी छान चालू होत्या नकळत मीरा ही गुंतत होती शशांकमध्ये.

एकदा दोघेही बाहेर सामान आणायला गेले असताना, दोघांना रिक्षा मिळत नव्हती, हातात सामान पण होते आणि अचानक पाऊस सुरू झाला एखादा आडोसा मिळेपर्यंत खूप भिजले होते दोघेही. एका आडोशाला शशांकने सामान ठेवले आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले दोघे, विजा कडाडल्या तशी मीरा दचकली आणि तिने घट्ट हात पकडला शशांकचा. दोघांची नजरानजर झाली मीरा तिचा हात सोडवून घेऊ लागली पण शशांकने तो घट्ट पकडुन ठेवला. मीरालाही ते कुठेतरी आवडले होते. 

दोघे कसेबसे घरी आले, त्या दोघांना भिजलेले पाहून आई म्हणाली, " जा दोघेही कपडे बदलून घ्या मी चहा करते." मीरा चिंब भिजलेली होती, आधी केस मोकळे सोडून टॉवेलने कोरडे करावेत म्हणून ती आरशासमोर उभी होती, भिजलेल्या साडीत तिचे कमालीचे सौंदर्य शशांकला तिच्याकडे आकर्षित करत होते. शशांक तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि तिच्या मानेवरून हात फिरवू लागला. मीरा खूप मोहरली, कपडे बदलण्यासाठी बाथरूमकडे वळली तसे शशांकने तिचा हात पकडुन तिला थांबवले आणि तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला मीरा लाजून लाल झाली होती, तो अजून जवळ गेला आणि तिच्या ओल्याचिंब ओठांवर त्याचे ओठ स्थिरावले. दोघेही एकमेकांच्या ओल्या मिठीत हरवून गेले. त्यांचा संसार सुखात चालू होता. कार्तिकी मोठी होत होती, शशांकचा व्यवसाय उत्तम चालू होता, सगळे अगदी व्यवस्थित चालू होते. आपल्या आयुष्यात इतके भयंकर काहीतरी घडले होते याची जाणीव कधीच शशांकने होऊ दिली नव्हती. पण कार्तिकी बऱ्याच प्रमाणात केदार वर गेली होती. तिचं दिसणं, हसणं इतकेच काय तर बरेच गुण ही केदारशी मिळते जुळते होते. खाण्या पिण्याच्या सवयी, झोपण्याची सवय हे सगळेच केदारचे होते. कार्तिकीला पाहून मीराला खूप आठवण येत असे केदारची. 


कार्तिकी आता वर्षांची झाली होती. एकदा कार्तिकी बाहेर खेळत होती, तिची आजी मंदिरात गेली होती आणि कार्तिकी आणि मीरा दोघीच घरी होत्या. शशांक येण्याची वेळ झाली होती, कार्तिकी अंगणात रांगत इकडून तिकडे फिरत होती, तेवढ्यात फोन वाजला आणि मीरा आत गेली. फोनवर बोलून बाहेर येऊन पहाते तर तिला कार्तिकी कुठेच दिसेना. तिने इकडे तिकडे शेजारी सगळीकडे शोधले पण तिला कार्तिकी कुठे दिसेचना. ती घाबरली तेवढ्यात शशांक तिथे आला आणि मीराने सगळे त्याला सांगितले. शशांक म्हणाला, "अग तिला बाहेर सोडून तू गेलीस च का पण ??" 

मीरा म्हणाली, "अरे आपली कार्तिकी रांगते फक्त जाऊन जाऊन कुठे जाईल म्हणून मी गेले आणि दोनच मिनिटे फोनवर बोलले असेन मी आईला यायला उशीर होणार आहे हे सांगायला तिने फोन केला होता. तेच बोलून मी बाहेर आले पण मला कार्तिकी कुठेच दिसत नाही आता". शशांक पुन्हा सगळीकडे पाहून आला पण कार्तिकी काही सापडेना. आता मीराचा धीर सुटत होता. तेवढ्यात एका गृहस्थाच्या कडेवर मीराला कार्तिकी दिसली तिने धावत जाऊन कार्तिकीला आपल्या कुशीत घेतले. शशांक तिथे आला, तो गृहस्थ म्हणाला तुमच्या मुलीला शेजारच्या मुलाने खेळायला नेले होते, मुले खेळण्यात दंग होती आणि तुमची मुलगी रांगत होती रस्त्यावरून एक गाडी वेगात येत होती म्हणून मी हिला उचलून घेतले आणि त्या मुलाला विचारले ही कुठे रहाते त्याने मला समोरचे घर दाखवले मी तुम्हालाच शोधत होतो. तुम्हीच तिच्या आई ना ?? मीरा इतका वेळ तिच्या कार्तिकीलाच बिलगून होती. त्या गृहस्थाचे बोलणे झाल्यावर तिने त्याच्याकडे पाहिले आणि ती त्याच्याकडे पहातच राहिली. कार्तिकीसुद्धा हातानेच त्याच्याकडे जाण्यासाठी खुणावत होती. त्या गृहस्थाने मीराकडे पहिले आणि तो तिच्याकडे पहातच राहिला. मीराच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहायला लागल्या आणि त्या गृहस्थाच्यासुध्दा. त्यांच्याकडे पाहून शशांकला समजले काय झालं आहे ते. शशांक सगळ्यांना घेऊन घरात आला आणि त्याने त्या गृहस्थाला बसायला सांगितले आणि पाणी दिले. तो गृहस्थ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून केदार होता. कार्तिकी त्याच्याकडे सतत हात करत होती आणि केदारने सुद्धा तिला पटकन उचलून घेतले. तितक्यात मीराची आई तिथे आली आणि केदारला पाहून मटकन खाली बसली. सगळेच शांत होते, कोणाला काय बोलावे काहीच कळत नव्हते. शशांकने बोलायला सुरुवात केली म्हणाला, " केदार तुम्ही इथे असे कसे ??" 

केदार म्हणाला "तुम्ही मला कसे ओळखले ??

" मीरा सोबत माझे लग्न झाले त्यावेळी तिने तुमचा फोटो आणला होता तो मी पहिला होता आणि कार्तिकी सुद्धा बरीच तुमच्यावर गेली आहे आणि ज्या पद्धतीने ती तुमच्याकडे हात करून येण्याचा प्रयत्न करत होती, त्यावरून कोणीही सहज सांगू शकेल की तुम्हीच केदार आहात ते".

पुन्हा सगळे गप्प झाले. काय बोलावे ते समजेना परत शशांकनेच बोलायला सुरुवात केली, "केदार तुमचा अपघात झाला होता आणि त्यात तुम्ही गेलात असे समजले होते आणि आज तुम्ही .... "

केदार म्हणाला "हो खरं आहे तुम्ही म्हणताय ते, त्या दिवशी मी बाप झालो हे मला समजले आणि मी घरी येण्यासाठी निघालो. माझ्या गाडीतून येत असताना रस्त्यात मला एक व्यक्ती भेटला त्यालाही इकडेच यायचे होते. म्हणून मग मी त्याला लिफ्ट दिली आणि मला कंपनी मिळाली. दोघेही छान गप्पा मारत येत होतो, मी खूपच आनंदी होतो. आता थोड्याच वेळात माझ्या मुलीला मी बघणार या आनंदात मला पारावर उरला नव्हता पण नियतीच्या वेगळेच काहीतरी मंजूर होते. आम्ही रस्त्याने येत असताना समोरून भरघाव वेगाने ट्रक आला आणि मला काय करावे ते सुचेना, मी साईडला गाडी घेऊन थांबण्याचा निर्णय घेतला पण त्या ट्रकची धडक माझ्या गाडीला लागली आणि शेजारच्या दरीत गाडी कोसळली . मी लिफ्ट दिलेला माणूस दरीत गेला पण ट्रकच्या धक्क्याने मी गाडीतून बाहेर फेकला गेलो आणि जवळपासच्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ज्या व्यक्तीला मी लिफ्ट दिली तो दरीत गेल्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला पण मी मात्र जिवंतच होतो. पण झालेला अपघात भयानक होता, खूप मार लागला होता मला त्यामुळे मी कोमात गेलो होतो. काही दिवसांपूर्वी मी शुध्दीवर आलो तेंव्हा सगळा प्रकार मला समजला. मी शुद्धीवर आलो तसा लगेच घरी गेलो तर तिथल्या शेजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही इकडे राहायला आलात. त्यामुळे मी इकडे तुम्हाला शोधायला आलो. पण आता हे सगळे पाहून वाटते की त्या व्यक्ती ऐवजी मीच मेलो असतो तर फार बरे झाले असते. सगळे माझे असूनही आज काहीच माझे मला वाटत नाही". मीराकडे बघून केदार म्हणाला. मीराच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते, नियतीने आपली इतकी क्रूर चेष्टा का करावी हा प्रश्न तिला पडला होता. खूप कठीण प्रसंग समोर उभा राहिला होता आणि त्यात तीन जीव अडकले होते. पहिली मीरा, दुसरा केदार तर तिसरा शशांक.

मीराने केदारच्या अपघाताची बातमी आल्यानंतर काय काय घडले ते सगळे केदारला सांगितले. कोणत्या परिस्थितीत तिने हा निर्णय घेतला याची कल्पना आली केदारला. तो म्हणाला "मीरा तू लग्न केले म्हणून मी तुझ्यावर रागवलोच नाही, तुझी अवस्था काय झाली असेल याचा अंदाज करू शकतो मी. तुझ्या जागी मी असतो तर कदाचित मी पण हेच केले असते. पण मी पुन्हा इकडे यायला नको होते, नियतीने मला जिवंत ठेवायलाच नको होते मीरा. का खेळ खेळते आहे नियती". 

"असे बोलू नको केदार, तू जरी अपघातात गेला होतास तरीही कार्तिकीच्या रूपाने तू सतत माझ्या मनात जिवंत होतास. कार्तिकी तुझ्यावरच गेली आहे, अगदी रंग, रूप, स्वभाव, सवई सगळे सगळे तुझ्या सारखेच आहे. आणि तिच्यात मी तुलाच बघत आले आहे. त्यामुळे तू अस बोलू नकोस. आपल्या प्रेमाची निशाणी मी जपत होते ती तुझ्या आठवणींच्या शिदोरीमुळे. शशांक सोबत मी लग्न जरी लवकर केले असले तरी मला त्यांचा पती म्हणून स्वीकार करायला बराच वेळ गेला केदार". "मीरा आता या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही. तू पुढे पाऊल टाकले आहेस ते मागे घेऊ नकोस, मी तुझ्या साठी मेलेला होतो आणि मेलेलाच राहुदे. शशांक खूप चांगला मुलगा आहे तुझ्यावर आणि आपल्या मुलींवर खूप मनापासून प्रेम करतो. जे घडायचे होते ते घडून गेले आहे. मी मेलेला समजलो होतो तो तसाच राहुदे."

 तर शशांकसुद्धा मीरा आणि केदरच्या आयुष्यातून निघून जायला तयार होता. केदार असता तर आपण दोघांनी कधीच लग्न केले नसते. पण आता ते आले आहेत तर तू त्यांच्याकडे परत जाण्याचा निर्णय घेऊ शकतेस. 

मीरा जास्तच गोंधळली दोघांच्या बोलण्याने. कोणाला धरावे आणि कोणाला सोडावे हे समजेना. पण शेवटी केदारने तिचा प्रश्न सोडवला आणि मी निघून जात आहे, कोणीही मला शोधण्याचा प्रयत्न करू नये अशी चिठ्ठी सोडून सगळ्यांच्या आयुष्यातून तो कायमचा निघून गेला.

लेखिका : अपर्णा कुलकर्णी

सदर कथा लेखिका अपर्णा कुलकर्णी यांची असून कथेचे संपुर्ण हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत. ही कथा लेखिकेच्या पूर्वपरवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करण्यात येत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post