पेचप्रसंग आयुष्याचा भाग एक

 पेचप्रसंग आयुष्याचा :

लेखिका - अपर्णा कुलकर्णी



मीरा रस्त्यावरून सैरावैरा धावत होती. भर दुपारची वेळ, सगळा रस्ता गाड्यांनी भरला होता, इकडून तिकडून गाड्या भरधाव वेगाने वाहत होत्या, त्यात कोणीतरी मीराला हाका मारून थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तिच्यावर कोणत्याही गोष्टीचा कसलाही परिणाम होत नव्हता. जणू काही तिला काहीच ऐकू येत नव्हते. तेवढ्यात एक गाडी मीराला धडकली आणि ती कोसळली. 

रात्र झाली होती पण मीरा अजून शुध्दीवर आली नव्हती. घरातील सगळे लोक काळजी करत होते. मीराला काही झालं तर शशांक स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हता. त्याच्याच गाडीला धडकून तर पडली होती मीरा आणि त्याच्याच घरात त्याच्या रूममध्ये बेशुद्ध होती अजून. शशांक मीराच्या मागे धावणाऱ्या त्या बाईकडे गेला आणि त्यांची माफी मागून म्हणाला "ही अशी रस्त्याने धावत का सुटली होती ?? इतक्या गाड्यांचे हॉर्नचे आवाजही तिला ऐकायला येत नव्हते का ?? तुमच्या हाका तिच्यापर्यंत पोहचल्या नाहीत का ??"

 त्या बाई म्हणाल्या "मी मीराची आई आहे. खरंतर दोन दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यात तो गेला तिच्या पदरात दोन महिन्यांची मुलगी टाकून. तिला हा धक्का सहन झाला नाही. तेंव्हा पासून ती बेशुद्धच होती, आज दुपारी शुध्दीवर आली तशी पुन्हा ती मरायला निघाली. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नाला तीन वर्ष झाली होती त्यांच्या. आणि तीन वर्षानंतर मुलगी झाली, तिला बघायलाच तिचा नवरा इकडे येत होता पण रस्त्यात अपघात झाला आणि जागच्या जागीच गेला तो. मला खरंतर तो जावई नसून मुलासारखाच होता. दोघांचा एकमेकांवर खूपच जीव होता. हा धक्का माझी पोर सहन नाही करू शकली आणि तिची जगण्याची इच्छा मेली. तिचं आयुष्य व्यापून टाकलं होतं तिच्या नवऱ्याभोवती तिने. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होत त्यामुळे मी तिच्या मागे धावत होते तुमची काहीच चूक नव्हती त्यात". 

हे ऐकून शशांकला खूप वाईट वाटलं. इतक्या तरुण वयात हे असं काहीतरी समोर यावं याची कल्पनाच करवत नव्हती त्याला. पण मीराच्या वाट्याला ते आलं होत. बऱ्याच वेळाने जवळपास पहाटे मीरा शुध्दीवर आली. पाणी मागत होती ती. तिच्या जवळ शशांक बसला होता. तिच्या आवाजाने तो जागा झाला आणि तिला पाणी देण्यासाठी उठला. त्याला पाहून मीरा बिचकली. "कोण आहात तुम्ही ?? मी कुठे आहे आणि मी इथे कशी आले ?? "असे एकावर एक प्रश्न विचारू लागली. 

शशांकने तिला सगळं काही सांगितले. ते ऐकून ती जरा शांत झाली. "माझी आई कुठे आहे आणि माझी मुलगी ??" 

 "आता आठवतंय का तुम्हाला आई आहे आणि तुम्हीही एका मुलीच्या आई आहात ते ?? मगाशी आत्महत्या करताना रस्त्यावरून धावताना हे सगळं नाही आठवलं का ??" शशांक म्हणाला. मीरा खाली मान घालून गप्प राहिली. पाण्याचा ग्लास पुढे करत शशांक म्हणाला हे पाणी घ्या. तिने पाणी घेतलं आणि मग शशांक तिला म्हणाला "तुमच्या आई इथेच शेजारच्या रूममध्ये आराम करत आहेत. खरंतर त्याच इथे थांबणार होत्या पण त्या शरीराने खूप थकल्या होत्या आणि मनाने हरलेल्या दिसल्या शिवाय तुमच्या बाळाला सुद्धा त्यांची गरज होती. त्या तुमच्या शेजाऱ्याकडे मुलीला सोडून तुमच्या मागे धावत होत्या म्हणून मी तिथून तुमच्या मुलीला घेऊन आलो आणि तुमच्या आईकडे दिले आहे. दोघीही आराम करत आहेत शेजारच्या खोलीत".

"बरं ते सगळं जाऊद्या. तुम्हाला आता कसं वाटतंय. तब्येत बरी आहे ना आता ??" मीराने मानेनेच होकार दिला. शशांकच्या डोळ्यात बघून बोलण्याची हिम्मत नाही केली तिने. "तुम्ही आता आराम करा. उद्या बोलू आपण", असे म्हणून शशांक तिथेच तिच्या खोलीतल्या खुर्चीवर बसून राहिला. "मी ठीक आहे आता तुम्ही जाऊन झोपलात तरी चालेल". मीरा म्हणाली. "नाही नको पुन्हा तुम्ही उठून रस्त्यावर धावत जाणार नाही याची खात्री कोण देईल ?? आणि पुन्हा रिस्क नकोच. त्यापेक्षा मी थांबतो इथेच तुम्ही करा आराम."

मीरा सकाळी उठल्यावर तिची आई तिला खूप बोलली. मीराच्या मुलीला समोर धरून म्हणाली "अग मरायचा विचार करण्याआधी माझा नाहीच पण तुझ्या नवऱ्याच्या शेवटच्या निशाणीचा तरी विचार तू करायला नको होतास का तू?? काय करायचं या जीवाने?? तिची या सगळ्यात काय चूक ?? ही घे तुझी मुलगी आणि इथून पुढे मरायच असेल तर आधी हिला मार आणि मग तू ही मर".

 तोंडाला पदर लावून तिची आई जाऊ लागली पण मिराने तिचा हात पकडुन तिला थांबवले आणि तिची माफी मागत म्हणाली "पुन्हा मी असं नाही करणार आई. चुकले मी, माफ कर मला. पण मी तरी काय करू ग, मला अजूनही खर वाटत नाही की माझा केदार मला सोडून गेलाय कायमचा. आणि जेंव्हा ही जाणीव खरी वाटते तेंव्हा जगण्याची इच्छाच राहत नाही मनात. मी कशी जगू त्याच्याशिवाय ?? कल्पनाही सहन नाही होत आई मी काय करू, काय करू ??" त्यांचं हे बोलणं ऐकून शशांक गहिवरला काही वेळ. मीराचं अस हंबरडा फोडून रडणं त्याला बघवत नव्हतं. शेवटी तो म्हणाला "प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही चुकीचं घडत असतं, काहीतरी टेन्शन असत, प्रॉब्लेम्स असतातच पण म्हणून कोणी जगणं सोडून देत नाही आणि कोणी आपल्या आयुष्यातून निघून गेलं म्हणून त्याच्या मागे कोणी जात नाही. जे लोक आपल्या आयुष्यात असतात, ज्या जबाबदाऱ्या असतात त्यांच्यासाठी का होईना जगणं क्रमप्राप्त असतं. हे बोलणं खूप सोपं असतं मिस्टर शशांक पण ज्याच जळत ना त्यालाच ते कळत. मला काय वाटत याची कल्पनाही करू शकणार नाहीत तुम्ही कदाचित. करू शकतो आणि मीच करू शकतो मिस मीरा. मला चांगलंच कळतय की तुम्हाला काय वाटते, तुम्ही कोणत्या परिस्थितीततून जात आहात. कसं काय ?? मीराने विचारलं, मी माझ्या अत्यंत प्रिय असणाऱ्या माझ्या बायकोला गमावून बसलोय अगदी दोन महिन्यांपूर्वी. फरक इतकाच आहे की आम्हाला मुल नव्हत आणि तुमच्या पदरात मुलगी आहे पण आपल्या जवळची व्यक्ती गमावण्याची वेदना काय असते हे चांगलंच ठाऊक आहे मला." हे ऐकून मीराला खूप वाईट वाटले आणि माफी मागितली तिने शशांकची. इट्स ओके म्हणत शशांक तिथून निघून गेला.

मीरा तिच्या आईला आणि मुलीला घेऊन तिथून निघाली होती. "मिस्टर शशांक आम्ही निघतो आता, तुम्ही आमची खूप मदत केलीत त्यासाठी तुमची मनापासून आभारी आहे. कळत नकळत मी तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा". मीरा म्हणाली. शशांकने मान डोलावली आणि म्हणाला "आता पुन्हा आत्महत्येच विचारही मनात आणू नका आणि कसलीही मदत लागली तर मला सांगा मी हजर असेन."

मीरा घरी आली खरी पण आता काय करायचे कसे जगायचे आणि जगण्यासाठी लागणारा पैसा कसा मिळवायचा असे अनेक प्रश्न तिच्या पुढे हा म्हणून उभे होते. तिच्या आईला तिने बोलून दाखवले तेंव्हा आईने शशांकची मदत घेण्याचा सल्ला तिला दिला आणि दोन दिवसांनी मीरा शशांककडे आली. शशांक तिला पाहून आनंदित झाला तिला घरात घेतले आणि म्हणाला बोलला, "मिस मीरा काय मदत करू मी तुमची ??" मीरा म्हणाली "तुम्हाला कसे समजले मी इथे मदतीसाठी आले ते ?? "

शशांक हसून म्हणाला "कंपनी चालवतो मी. अनुभव आहे मला आणि तसही तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या मनाचे भाव दिसून येतात". हे ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून शशांक म्हणाला "मी तुमच्या जुन्या आठवणी ना उजाळा दिलेला दिसतोय हो ना ?? "

मीराने मान डोलावली आणि शशांक काय झालं असेल ते समजून गेला. "मला माफ करा सहज बोलून गेलो मी".

" ठीक आहे मिस्टर शशांक. मला खरंतर नोकरी हवी होती. तुम्ही म्हणाला होता काही मदत लागली तर सांगा आणि आईने तुमचे नाव सुचवले होते त्यामुळे मी इकडे आले."

"माझ्या कंपनीत तुम्हाला मी देऊ शकेन नोकरी अर्थात तुमची हरकत नसेल तर. मला एका पर्सनल असिस्टंटची गरज आहे जर तुम्हाला चालणार असेल तर उद्या पासूनच तुम्ही जॉईन करू शकता."

"पण मला कामाचा तसा काही अनुभव नाही आणि तुम्हीही तो विचारला नाही."

" मला गरज नाही वाटली त्याची मिस मीरा. पहिली गोष्ट तर तुम्ही का नोकरी करताय हे मला चांगलंच माहित आहे आणि जी पोस्ट मी तुम्हाला देत आहे त्यासाठी अनुभव फारसा महत्त्वाचा नाही. तसही मी सतत तुमच्या सोबत असेन त्यामुळे काहीही अडचण आली तर मी असेनच. मग काय प्रश्न आहे ??" 

मीराचा आज पहिला दिवस होता. तिने तिच्या मुलीला आईजवळ सोडले आणि ती ऑफिसमध्ये आली. बघता बघता एक महिना उलटून गेला आणि चांगली रुळली ती ऑफिसमध्ये. सगळे काम शिकवून त्यात पारंगत केले शशांकने तिला. दिवस जात होते, हळूहळू तिची मुलगी सहा महिन्यांची झाली त्या दरम्यान तिच्या मुलीचे कार्तिकी असे नाव ठेवले तिने. घराची आर्थिक बाजू ती व्यवस्थित सांभाळत होती. ऑफिसमधे ही शशांक आणि ती बरेच मोकळेपणाने काम करत होते. आता त्यांच्यात अवघडलेपणा नव्हता.

एकदा ऑफिस सुटल्यावर शशांक तिला कॉफीशॉप मध्ये घेऊन गेला आणि सरळ लग्नाची मागणी घातली त्याने मीराला. मीरा काहीच बोलत नव्हती. "काय झालं मीरा बोल ना मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. हे बघ मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं आहे. या चार पाच महिन्यात आपला रोजचा सहवास, सततच माझ्या आसपास असणे, तुझ वागणं बोलणं या सगळ्यांच्या प्रेमात पडलो आहे मी. मला कल्पना आहे तुझ्या आयुष्यात काय झालं आहे त्याची आणि तुझ्या कार्तिकीचीही. मला तिला माझे नाव द्यायला आवडेल. मी तुझी अवस्था पाहून तुझ्यावर दयेपोटी हे बोलतो असे नाही मला मनापासून तू आवडातेस म्हणून मी हे बोलतोय. कधी ना कधी तू लग्नाचा विचार करशीलच. एकट्याने आयुष्य काढणे सोपे नाही आणि समाज ही जगू देत नाही. त्यामुळे मला वाटतं तू शांतपने विचार करून उत्तर द्यावेस. मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय".

मीराने तिच्या आईला सगळे सांगितले तेंव्हा तिच्या आईला खूपच आनंद झाला आणि त्यांची काळजीच मिटली. मीरा जरा अस्वस्थच होती, ती म्हणाली "अग केदारला जाऊन काहीच दिवस झाले त्यात मी लगेच पुन्हा लग्न बंधनात अडकणे मला बरे वाटत नाही. मला जरा वेळ हवा आहे आई". 

आईने तिची समजुत काढली म्हणाली "मीरा तू जर थांबलीच तर पुन्हा तुला दुसरा मुलगा मिळेल पण शशांक सारखा समंजस आणि कार्तिकीला आपलंसं करणारा भेटेलच असे नाही."

कुठे ना कुठे मीराला ते पटलं आणि तिने होकार दिला लग्नासाठी. अगदी साध्या पद्धतीने लग्न केले दोघांनी पण सगळे विधी व्यवस्थित पार पडले. मीराच्या आईची सगळी काळजीच मिटली. सगळे कार्यक्रम पूर्ण झाल्यावर त्या जायला निघाल्या पण शशांकने त्यांना जाऊ दिले नाही. तुम्ही आता इथेच राहायचे असे म्हणून त्यांना तिथेच ठेवून घेतले. मीरा सुद्धा खूप सुखावली या निर्णयाने. 

क्रमशः 

भाग दोन 👇

https://www.shabdchapha.com/2022/07/blog-post_87.html

.लेखिका : अपर्णा कुलकर्णी

वरील कथा अपर्णा कुलकर्णी यांची असून कथेचे संपुर्ण हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. सदर कथा लेखिकेच्या पूर्वपरवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करण्यात येत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post