आज फिर आपकी कमी सी है

 

'आज फिर आप की कमी सी है'


लेखक - सचिन देशपांडेबंद पाकीट पडलं होतं त्याच्या लेटर बाॅक्समध्ये. त्याने ते जिन्यावरुन चढता चढताच फाडलं. एक तिकीट निघालं त्यात, रविंद्र नाट्य मंदिरचं. फक्त दिनांक नी वेळ लिहिला होता त्यावर, पण कुठला कार्यक्रम वगैरे काही नाही. "आता आॅगस्ट मध्ये कुणाला हूक्की आली बाबा, आपल्याला एप्रिल फूल करायची?" स्वतःशीच बोलत तो घरात शिरला. सडाफटींग लोक जे जे करतात, ते ते करायला सुरुवात केली त्याने. चहा करुन प्यायला, केर काढला, देवासमोर दिवा लावला, मुगडाळीच्या खिचडीसाठी कुकर लावला, सकाळी भिजत घातलेले कपडे धुतले, स्वतःनेच स्वतःला वाढून घेऊन जेवला, एक छोटी गोल्डफ्लेक शिलगावली, आणि आॅफिसमधून घेऊन आलेली कुठलीशी फाईल चाळू लागला तो. चाळता चाळताच फाईल कधी हातातून गळून पडली, त्याचं त्यालाच कळलं नाही. हेच त्याचं रोजचं रुटीन असे, आॅफिसातून ८ - ९ च्या दरम्यान घरी परतल्यानंतरचं. मग पुन्हा सकाळच्या ६ चा गजर. चहा पिणे, रात्रीची दोन - चार भांडी घासणे, आंघोळ - पांघोळ आटोपून... न रेंगाळता पुन्हा आॅफिस.  

तर... हा आठवडाही असाच, 'मागील पानावरुन' सारखाच चालला होता. आणि अचानक त्याला आठवण झाली त्या तिकिटाची. त्याने ते त्याच्या टेबलावरच्या, कित्येक वर्षांपासून रिकाम्याच असलेल्या फ्लाॅवर पाॅटमध्ये खुपसून ठेवलं होतं. ताजी फुलं आणून... ती खोवून ठेवण्याएवढी रसिकता, राहीली कुठे होती त्याच्यात आताशा. 'रविंद्र नाट्य मंदिर... शनिवार दिनांक १०/०८/२०१९... रात्रौ ०८:०० वाजता'... एवढाच तपशिल असलेल्या तिकीटाचं, त्याला पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं. पण त्याने ठरवलेलं, जाऊन बघायचंच. "बघुया तरी कोण एवढं थट्टा करायच्या मूडमध्ये आहे ते". शुक्रवारची रात्र त्याने याच विचारात, बर्‍यापैकी जागून काढली. शनिवारी सुट्टी असल्याने तो निवांत होता. आंघोळ वगैरे आटपेपर्यंत, बारा वाजून गेले होते. अजून ८ तास कसे काढावे ह्या विवंचनेत असतांनाच, त्याला मोबाईलवर एक मेसेज आला... 'रविंद्र नाट्य मंदिर... शनिवार दिनांक १०/०८/२०१९... रात्रौ ०८:०० वाजता'. बस्स... पूढे काहीच नाही. अर्थातच अननोन नंबर होता... जो त्याने लगोलग ट्रायही केला, पण अनरिचेबल येत होता तो आता. "आईच्या गावात, काय चाल्लय काय हे?... कोण एवढं डेस्परेट झालंय म्हणायचं माझ्यासाठी?"... असं स्वतःशीच बोलून, तो एकटाच हसायला लागला. बर्‍याच वर्षांनी तो असं, मनापासून हसला होता. 

बरोब्बर पावणेआठला तो रविंद्रच्या गेटपाशी होता. "आता हे एवढंच लिहिलेलं तिकिट दाखवल्यावर, आपल्याला कोणी हाकललं नाही म्हणजे मिळवली"... असा विचार त्याच्या मनात चालू असतांनाच, एक माणूस त्याच्याकडे आला. "सर, तुमची खुर्ची रिझर्व्ड आहे... प्लीज तुम्ही या माझ्याबरोबर". हा अजून एक धक्का होता त्याच्यासाठी. तो त्या इसमाच्या मागोमाग आत गेला, नी त्याला लाॅबीमध्ये एक मोठ्ठालं होर्डिंग दिसलं... 'दो प्याली चाय' आणि पुढे लिहिलं होतं...

'बैठे चाय की प्याली लेकर,


पुराने किस्से गरम करने...


चाय थंडी होती गई,


और आँखे नम'.

वळणदार अक्षरात त्याखाली नाव लिहिलं होतं... 'गुलजार'. १८ आॅगस्टला येणारा गुलजार साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा घाट, कुठल्याशा संस्थेने घातला होता. सरसरुन काटा आला त्याच्या अंगावर... त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. "आपल्याला चक्क गुलजारच्या शेरो - शायरीचा कार्यक्रम बघायला मिळणारेय?... पण का? आणि आता इतक्या वर्षांनंतर?... जेव्हा आपण हे सगळं आपल्या आयुष्यातून, केव्हाचं काढून टाकलंय... कोण ही अशी थट्टा करतोय माझ्यासोबत?". त्याच्या ह्या विचारांची तंद्री भंगली, त्या माणसाच्या आवाजाने... "सर, येताय ना?... कार्यक्रम सुरु होईल इतक्यातच". मग त्याने त्याच्या विचारांच्या उधळलेल्या घोड्यांना लगाम घातला, नी त्या माणसाच्या मागोमाग आत गेला तो. दुसर्‍या रांगेतली मधली सीट राखिव ठेवली होती त्याच्याकरता. त्याला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटू लागला होता. सगळ्या सीट्स एव्हाना भरल्या होत्या, फक्त... त्याच्या उजवीकडची सीट सोडून. 

कार्यक्रम चालू झाला. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेल्या... एक सो एक पेश-ए-खिदमतींनी, सभागृह भारावून गेलं होतं. शेर, शायरी, कविता, गाणी या त्यांच्या राण्या... अन् गझल ही त्यांची पट्टराणी, हातात हात घेऊन बेभान झिम्मा घालत होत्या... दर्शकांचा जीव वेडावून टाकत होत्या. 'तूम आ गए हो, नूर आ गया है.. नही तो चिरागोंसे लौ जा रही थी' ह्या गाण्याची क्लीप मागच्या मोठ्या पडद्यावर लागली. जागच्या जागी थिजून तो जिवघेणा अनुभव, दोन्ही डोळ्यांनी... दोन्ही कानांनी लुटत होता तो. पडद्यावर संजिव कुमार, सुचित्रा सेन... किशोर, लताचा आवाज... आर. डी., गुलजार युती... "सुख सुख म्हणतात ते आणखीन काय असतं?"... ह्या विचारातच मध्यांतर झाला होता कार्यक्रमाचा. त्याला जागेवरुन उठावसं वाटत नव्हतं की, कुठे जावसंही वाटत नव्हतं. कधी एकदा कार्यक्रम सुरु होतोयसं झालं होतं त्याला. बर्‍याच वर्षांनी कशाततरी गुंतला होता तो. आणि दिवे हळू हळू विझत गेले, जसा पडदा उघडत गेला.  

"मिलता तो बहोत कूछ है 


इस जिंदगी में


बस हम गिनती उसीकी करते है


जो हासिल ना हो सका"

हा शेर सादर करुन... पून्हा सुरु झाली होती, विविध रंगांची उधळण श्रोत्यांवर. अजून तास - दिडतास तमाम प्रेक्षकांबरोबर शब्दांची - सुरांची धुळवड खेळून झाल्यावर, अखेर किशोरचा आवाज साऊंड सिस्टिम मधून दुमदूमला... 'तूम जो कहे दो तो.. आजकी रात.. चाँद डुबेगा नही, रातको रोकलो'. 'तेरे बीना जिंदगीसे कोई' वर, कार्यक्रमाची सांगता झाली. पडदा पडला... लोक जायला उठले. त्याला वास्तवात यायला थोडा वेळ लागला... पण तो ही अखेर भानावर येऊन उठलाच. अन् त्याला अचानक जाणवलं... पुर्ण कार्यक्रम रिकाम्या असलेल्या त्याच्या उजव्या बाजूच्या सीटवर, कोणीतरी बसलंय. त्याने चमकून बाजूला बघितलं... आणि तो हबकलाच. ती बसली होती त्याच्या बाजूलाच... प्रसन्नपणे हसून बघत होती त्याच्याकडे. "म्हणजे... म्हणजे हे सगळं तू अरेंज केलेलंस?"... त्याने चमकून विचारलं तिला. "बाहेर जाऊन बोलूया?"... ती म्हणाली. ते दोघेही बाहेर आले. तिने त्याच्याकडे पाहिलं... त्याचा पुरता भांबावलेला चेहरा पाहून, तिला हसू फुटलं. त्याच्या विस्कटलेल्या केसांतून हात फिरवत, ते आणिक विस्कटत ती बोलू लागली...

"आप के बाद हर घडी हमने


आप के साथ ही गुजारी है...

अरे जरा हस की गधड्या... तुझ्या गुलजारचा शेर आहे हा... जो खरंतर तू माझ्यासाठी अर्ज करायला हवास... कसा राहतोस रे तू?... कसा जगतोस?... का हरवून बसलायस तू, तुझ्यातल्या तुला?... का मिटून घेतलंयस तू, त्या आॅफिसच्या बोअरींग फाईल्समध्ये स्वतःला?... किती संवेदनशील होतास तू... किती मनस्वी होतास... नखंशिखांत प्रेमात बुडलेलास माझ्या... स्वप्नाळू डोळ्यांचा... कविता करणारा, गझल लिहिणारा, त्या रसरसून मांडणारा, समरसून जगणारा... व्यक्त होणारा... गुलजार तोंडपाठ होता तुला... त्याचा लिहिलेला शब्द न शब्द मुरवला होतास तू तुझ्यात... ए तुला आठवतंय, तू एक शेर ऐकवायचास मला...

लोग कहते है समझो तो


खामोशियाँ भी बोलती है


मै अरसे से खामोश हूँ


और वोह बरसोंसे बेखबर

खरंच झालं रे ते माझ्या बाबतीत... आणि तेव्हापासूनच तुझं जे बिनसलं ते बिनसलंच... नको ना वागूस असा... पंधराहून जास्त वर्ष होऊन गेली रे आता त्याला... pls come out of it now... मी अजूनही सतत तुझ्याबरोबरच असते अरे... आणि नाही बघवत मला तू असा शांत... कायम वाटायचं सांगावं तुला की...

यू गुमसूम मत बैठो 


पराये लगते हो


मिठी बाते नही है


तो चलो, झगडा ही करलो

तुझी खरंच काही चूक नव्हती रे, जे घडलं त्यात... 'इजाजत' बघूनच आपण येत होतो... रात्रीची वेळ, झोंबणारा गार वारा, तुझ्या बाईकचा भन्नाट स्पीड, मागे तुझ्या अंगाला घट्ट विळखा घालून, तुझ्या खांद्यावर डोकं टेकवून, डोळे मिटून, आपल्या दोघांच्या स्वप्नांत हरवलेली मी... म्हणजेच 'माया'... 'एकसो सोला चाँद की रातें.. एक तुम्हारे कांधे का तिल' गुणगूणत... कळलंच नाही मला माझ्या ओढणीची दोन्ही टोकं... कधी नी कशी अडकली, बाईकच्या पाठच्या टायरमध्ये ते... आणि... आणि... तेव्हापासून तू गुलजार कायमचा हद्दपार केलास, तूझ्या आयुष्यातून अगदी 'on the spot'... जशी मी ही गेले होते सोडून तुला 'on the sp...".

तिच्या तोंडावर हात ठेवत... हमसून हमसून रडायला लागला तो. त्याला जाणवलं की, अधांतरीच होता हात त्याचा... आणि कोणीही नव्हतं आता त्याच्यासमोर. पण त्याच्या आजुबाजूला मात्र, सतत कोणी असणार होतं यापुढेही... लक्ष ठेऊन त्याच्यावर... काळजी घेत त्याची. खिशातलं तिकिट त्याला आता, टोचेनासं झालं होतं... नी मोबाईल मधला मेसेजही आता, नक्कीच सापडणार नव्हता त्याला. बर्‍याच वर्षांनी गुलजारचा शेर, आपसुकच आला होता त्याच्या ओठांवर...

"शाम से आँख में नमी सी है 


आज फिर आप की कमी सी है 


दफ़्न कर दो हमें कि साँस मिले 


नब्ज़ कुछ देर से थमी सी है"


---सचिन श. देशपांडे

वरील कथा श्री. सचिन देशपांडे यांची असून त्यांच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post