बदला

 बदला


लेखिका - सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 


रात्रीचे बारा वाजले होते. पार्टीसाठी आलेले जवळजवळ सगळे आमंत्रित निघून गेले होते. भलंमोठं लाॅन मोकळं झाले होते. थोड्या वेळापुर्वी पार्टीची शान वाढवणारी रोषणाई आता मलूल वाटत होती. नोकरमंडळी साफसफाई करत होती. रत्नप्रभाबाई आपल्या खोलीत आल्या. दमून गेल्या होत्या त्या. संजयराव आणि रत्नप्रभाबाईंच्या लग्नाचा वाढदिवस होता आज. त्याचीच पार्टी होती ती. भल्यामोठ्या सुपरमार्केट चेनचे आरपी मार्ट्सचे सर्वेसर्वा संजय  देशमाने आणि रत्नप्रभा देशमाने होते ते. ड्रेसिंग टेबलसमोर बसून रत्नप्रभाबाई आपले दागिने उतरवू लागल्या. गळ्याला काचणारा जडावाचा नेकलेस काढून ठेवल्यावर त्यांना छान वाटलं. सगळे दागिने काढून, ड्रॉवरमध्ये ठेवल्यावर साडी बदलून त्या अंघोळीला गेल्या. अंघोळ करून सैलसर नाईट गाऊन घालून त्या बेडरूममध्ये परतल्या. तोपर्यंत संजयरावही कपडे बदलून बसले होते. ते फ्रेश होवून येईपर्यंत रत्नप्रभाबाई गाढ झोपी गेल्या होत्या. एक उसासा सोडून संजयही त्यांच्या बाजूला आडवे झाले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले. तीस वर्षे झाली आज आपल्या लग्नाला. उद्योगाचा हा इतका मोठा पसारा रत्नाच्या वडिलांचा. राजाराम थोरात एका किराणा दुकानात कामाला होते. मालकासोबत क्षुल्लक कारणाने वाद झाला आणि इतका मोठा होईन की तुझे दुकान तुझ्यासकट विकत घेईन ही चाणक्यप्रतिज्ञा करून थोरात बाहेर पडले. तिथून निघाले ते सरळ एका मित्राकडे गेले. एका चाळीत मित्राचे दोन गाळे होते. त्याचे हातपाय पडून दोन महिन्याच्या बोलीवर ते भाड्याने घेतले. मग तडक घरी. रत्नाची आई वाटच पाहत होती कारण तिला नवऱ्याला गोड बातमी द्यायची होती ना.  बातमी ऐकून राजाराम थरारून गेला. किती मोठी जबाबदारी अंगावर आली होती. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य ठरवत. शेवटी बायकोला राहवले नाही. तिने खोदून कारण विचारले. त्याने सांगून टाकला आपला वेडेपणा. पण तिने त्याला वेड्यात काढले नाही. आपल्याकडे असलेले जेमतेम चार दागिने त्याच्या हवाली केले, सुरू केलेले काम पुर्ण करण्यासाठी. राजारामला उभारी मिळाली. त्याने दोन गाळ्यात सर्वसामान्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू विकायला सुरू केले. छोटंसं सुपरमार्केट त्या वस्तीत सुरू झाले. 


दोन महिन्यात छान रिस्पाॅन्स मिळू लागला. वर्षाभरात  बँकेकडून कर्ज घेवून राजारामने ते दोन गाळे मित्राकडून विकत घेतले. तोपर्यंत रत्नप्रभाचा जन्म झाला होता. रत्नप्रभाच्या जन्मानंतर राजाराम थोरातांचे दुकान जोरात चालू लागले. त्यांनी एकाची चार दुकानं केली. रत्नप्रभाच्या पायगुणाने आपली भरभराट झाली असा त्यांना विश्वास होता म्हणून आपल्या दुकानाचे नाव त्यांनी आरपी मार्ट असे ठेवले होते. रत्नप्रभा दहा वर्षाची होईपर्यंत आर पी मार्टच्या बारा शाखा झाल्या होत्या आणि त्यातील एक ते दुकान होते जिथून राजाराम प्रतिज्ञा करून बाहेर पडला होता.  रत्नप्रभाच्या नंतर थोरात दांपत्याला दुसरे मूल झाले नाही म्हणून ती एकटीच त्या साम्राज्याची वारस होती. रत्नप्रभा एक सर्वसाधारण मुलगी होती, दिसायला आणि वागणुकीलाही. व्यवहारचातुर्य असले तरी वडिलांचा उद्योग पुढे नेण्याइतपत ज्ञान तिला नव्हते आणि तशी इच्छा आवड ही नव्हती तिला. ती एक सुखवस्तू मुलगी होती, घरदार आणि मुलाबाळांची स्वप्न बघणारी. तिच्या वडिलांनाही त्यात काही वावगे वाटत नव्हते. फक्त एक चांगला जावई शोधला की झाले.  


त्यांचे ती इच्छा अनपेक्षितरित्या पुर्ण झाली. मॅनेजरच्या पोस्टसाठी दिलेल्या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक उच्चशिक्षीत उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. त्यातील संजय देशमाने थोरातांच्या निकषात बरोबर बसत होते. त्यांची निवड संजय देशमानेंनी सार्थ ठरवली आणि आर पी मार्ट्सने यशाची नवी क्षितिजे गाठली. राजाराम थोरातांना संजयच्या रूपात आपला जावई गवसला. संजय आपल्या कर्तृत्वाने आर पी मार्ट्सचे सीईओ झाले. राजारामनी केलेल्या मृत्युपत्रानुसार रत्नप्रभा त्यांच्या सर्व इस्टेटीची एकमेव वारस होती. दूरदृष्टीच्या थोरातांनी मृत्युपत्रात एक अनोखी अट घातली होती ज्याबद्दल फक्त रत्नप्रभा आणि त्यांचे वकील दोघांनाच माहिती होती.  लवकरच रत्नप्रभा आणि संजयचे लग्न झाले. तसं पाहायला गेलं तर जोडा फारसा अनुरूप नव्हता. कारण रत्नप्रभा साधारण व्यक्तीमत्वाची स्त्री तर संजय प्रभावशाली. रत्नप्रभा अल्पसंतुष्ट, थोडक्यात समाधान मानणारी तर संजय महत्वाकांक्षी, रसिक. पण तरीही ते सुखी होते, त्यांचा संसार यशस्वी होता आणि याचाच पुरावा होता आजचा सोहळा. संजयरावांच्या डोळ्यावर आज झोप नव्हती. जणु निद्रादेवी त्यांच्यावर रूसली होती. पायात सपाता चढवून ते बेडरूमच्या बाल्कनीत आले. थंडगार हवा सुटली होती. मोबाईल घेवून एका फोल्डरमध्ये पासवर्ड टाकून त्यात सेव केलेले फोटो पाहू लागले. थोड्या वेळाने डोळ्यावर गुंगी येवू लागल्यावर ते आत येवून झोपून गेले.  पार्टीसाठी म्हणून आलेला संजयराव आणि रत्नप्रभाबाईंचा मुलगा निरामय परत होस्टेलला जाण्याची तयारी करत होता. त्याने आपल्या बॅगमधून एक पाकीट बाहेर काढून वडिलांच्या हाती दिले. 


“मम्मी पप्पा मी तुम्हाला अनिवर्सरीचे गिफ्ट काल नाही दिले. मी तुमच्या दोघांसाठी एक आठवडयाच्या केरळ ट्रिपची तिकीटं बुक केली आहेत. मला माहीत आहे केरळ तुम्हा दोघांसाठी नवीन नाही पण हे तिकीट मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने काढले आहे. मी कॉलेज करत पार्टटाईम जॉब करायचो यासाठी.”


रत्नप्रभाबाईंना आपल्या मुलाचा अभिमान वाटला.  ठरल्याप्रमाणे पुढील आठवडयात संजय आणि रत्नप्रभा सहलीसाठी रवाना झाले. संजयरावांना हा ब्रेक हवाच होता. कंपनीचे सीईओ या नात्याने ते नेहमी कामात असायचे. बऱ्याचदा ते नवीन डील, वेंडर, मीटिंग्स यासाठी आठवडे न आठवडे घराबाहेर असायचे. रत्नप्रभाबाई घरी काय करायच्या, कसा वेळ घालवायच्या याबाबत त्यांना तिळमात्र माहिती नव्हती. ते एका छताखाली राहायचे इतकेच बाकी पती पत्नीमध्ये कसलाच संबंध उरला नव्हता.  केरळ खरोखरच एक देवभूमी आहें. नजर पोहोचेल तिथपर्यंत हिरवळ, डोलणारे माड, वाहणारे पाणी... हे सुंदर स्वर्गासम वातावरण पाहून संजयरावांच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या.  निरामयने आईवडिलांसाठी एक सुंदर हाऊसबोट  बुक केली होती, पाण्यावरील सुंदर महालच जणु. रात्रीच्या रोमँटिक कॅंडल लाईट डिनरनंतर संजयरावांनी रेड वाईनची बाटली उघडली.  


रत्नप्रभाबाई नको म्हणत असतानाही त्यांनी आग्रह करून वाईन प्यायला लावली. वाईनमध्ये अल्कोहोलचा अंश कमी असला तरी पहिल्यांदा ती घेणाऱ्या रत्नप्रभाबाईंवर त्याचा परिणाम दिसू लागला. गाल आणि नेत्र आरक्त झाले. संजयराव त्यांच्याकडे पाहतच राहिले... अतिशय सुंदर दिसत होत्या त्या. नकळत ते त्यांच्याकडे सरकले. त्यांचा चेहरा हातात घेवून त्यांच्या डोळ्यात पाहताना लग्नानंतरचे फुलपंखी दिवस आठवले. भलेही रत्नप्रभा सौंदर्यवती नव्हत्या पण चारचौघींसारख्या नक्की होत्या. दोघांनी वैवाहिक सुख पुरेपूर उपभोगले होते. असीम आनंदाच्या डोहात अगणित डुबक्या मारल्या होत्या.  काही वर्षात ही नवलाई ओसरली. संजयराव आपल्या कामात गुंतून गेले. रत्नप्रभाबाई निरामयचे पालनपोषण यात वेळ व्यतीत करू लागल्या. आताशा दोघांची शारीरिक जवळीकही, जी कित्येक महिन्यांनी व्हायची, केवळ एक उपचारच राहिली होती. आता रतनप्रभाबाईंकडे पाहताना संजयरावांचे त्यांच्याबद्दलचे आकर्षण उफाळून आले. त्यांनी हळुवारपणे रत्नप्रभाच्या ओठांवर आपले ओठ टेकले. दोघांच्या शरीरात वीज चमकली. क्षणात कपड्यांचा अडसर दूर झाला. काही एकमेकांना बिलगलेले दोन देह सुखसागरात स्वतःला हरवून बसले. उष्ण उसासे आणि हुंकार यांनी पुर्ण खोली धुंद होवून गेली. भरतीच्या त्या लाटेवर आरूढ झालेल्या, वाईनमुळे भान हरवलेल्या रत्नप्रभाबाईंच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “ओह राजेश.”  ते शब्द ऐकून संजयरावांच्या पायाखालील जमीन सरकली. आपली बायको आणि अशा क्षणी कुणा परपुरूषाचे नाव घेते!!! रत्नप्रभाबाई तर काही स्पष्टीकरण देण्याच्या अवस्थेत नव्हत्या. ती रात्र संजयरावांनी अशीच तळमळत काढली. पण ते दुसऱ्या दिवशी जरूर हा विषय काढणार होते. त्यांच्या ईगोला मोठीच ठेच लागली होती. विचाराच्या आवर्तनात पहाटे त्यांचा डोळा लागला.  सकाळी संजयरावांना जाग आली तेव्हा रत्नप्रभाबाई गुणगुणत केस पुसत होत्या. त्यांची प्रफुल्लित मुद्रा पाहून संजयना कसेसेच झाले. जास्त न बोलता त्यांनी नाश्ता वगैरे उरकला. बाजूला बसलेल्या रत्नप्रभाबाईंना त्यांनी प्रश्न केला, “रत्ना हा राजेश कोण ज्याचे नाव तू काल झोपेत आय मीन आपण एकत्र असताना घेत होतीस?”  रत्नप्रभाबाईंच्या चेहऱ्यावर तणाव उमटला. पण संजयरावांचा दगडी चेहरा पाहून त्यांनी कसलासा निश्चय केला. त्या म्हणाल्या, “राजेश माझ्या एका मैत्रिणीचे पती आहेत.”“आणि तुझे आणि त्याचे अफेयर आहे? तू या वयात आपल्या मैत्रिणीचा संसार मोडायला निघालीस?” संजयच्या शब्दातून राग ओसांडून वाहत होता.  “नाही, माझे कोणासोबतच अफेयर नाही. प्रत्येक स्त्रीची आपल्या नवऱ्याबद्दल काही अपेक्षा असतात, स्वप्न असतात. मी तुमच्या तुलनेत अगदीच सामान्य स्त्री आहे. मी तुमच्यासारखी देखणी, ॲंबीशियस नाही. माझे एकच स्वप्न होते की सर्वसामान्यासारखा आपला संसार असावा. रोज सकाळी आपण उठून मुलांचा, नवऱ्याचा डबा बनवावा. नवरा आॅफिसला जाताना आपण दारातून हसून अच्छा करावे. संध्याकाळी घरी येताच त्याने आपल्याला मिठीत घ्यावे. रात्रीची वाट पाहता पाहता संध्याकाळ हळूच उलटून जावी. एक सुंदर मध्यमवर्गीय जीवन हवे होते. पण सर्व गोष्टी मनासारख्या फक्त कल्पनेतच होतात.” “तुम्ही एवढा मोठा उद्योग सांभाळता म्हणून तुमचे वेळीअवेळी घरी येणे, सतत फिरतीवर असणे मी मान्य केले. मी निरामयमध्ये, मैत्रिणींमध्ये मन रमवू लागले. एक दिवस माझी भेट राजेशसोबत झाली. त्यांची बायको माझी प्रिय मैत्रिण असल्याने त्यांच्या घरी नेहमी येणे जाणे होवू लागले. मध्यमवर्गीय लोक आहेत ते आणि सुखी संसार अगदी माझ्या स्वप्नातल्या सारखा. पण माझ्या मनात फक्त तुम्हीच होतात जोपर्यंत नफीसा, तुमची देखणी पर्सनल सेक्रेटरी, घरी आली नाही तोपर्यंत.” ते नाव ऐकून संजयराव दचकले. “नफीसाने मला तुम्हा दोघांबद्दल सांगितले. मला धक्काच बसला. आपले तोंड बंद ठेवण्याची तिने किंमत मागितली. तुमच्या बाहेरख्यालीपणाची मी किंमत मोजली. फक्त नफीसा नाही तर रोझी, नम्रता, सुनयना अशा बऱ्याचजणी. सगळ्यांना मी वाटेला लावलं. पण तुम्ही माझ्या मनातून नवऱ्याच्या जागेवरून पायउतार झालात. जेव्हा जेव्हा तुम्ही शारीरिक जवळीक साधण्यास जवळ यायचात तेव्हा डोक्यात विचार यायचा, शरीराने जरी तुम्ही माझ्यासोबत असलात तरी मनातून तुम्ही कोणासोबत असाल! आणि नकळत मीही तसाच कल्पनाविलास करू लागले. तसे करताना मनात पहिले नाव आले राजेश. एक योग्य पती, जो बायकोबरोबर प्रामाणिक आहे, रसिक रोमांटिक आणि प्रेमळ पुरुष...म्हणूनच काल त्या एका क्षणी तोंडून ते नाव निसटले. तसं पाहायला गेलं तर याबाबतीत कदाचित आपण दोघे एकाच पातळींवर आहोत, फरक इतकाच की तुम्ही शारीरिक व्यभिचार करून मला फसवत आहात आणि मी मानसिक.” 


“आता तुम्ही म्हणाल की तुमची चोरी पकडली जावूनही मी का तुम्हाला काहीच बोलले नाही? तर मी विचार केला की दुसरा चांगला सीईओ माझ्या कंपनीला मिळणार नाही. तुम्ही कंपनीचे जुने कर्मचारी आहात, अगदी पप्पा असल्यापासून. म्हणून मी विचार केला की तुमची लफडी निस्तरन्यासाठी लागणारा पैसा हा तुमच्या पॅकेजचा एक भाग मानू.” “माझं पॅकेज, काय बोलतेस तू रत्ना? तुझ्या पप्पांची तू वारसदार असलीस तरी तुझा नवरा या नात्याने मीही मालक आहे कंपनीचा.” संजयराव रागाने बोलले. “चुकता आहात तुम्ही, माझ्या पप्पांच्या मृत्युपत्राप्रमाणे माझ्या वयाच्या पन्नाशीपर्यंत मी एकमेव वारस आहे त्यांच्या सर्व इस्टेटीची, अगदी माझा मुलगा, नवरा यांना सुद्धा त्यात स्थान नाही. त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की माझ्या पन्नाशीनंतर जर मी स्वतःचे मृत्युपत्र बनवले तर हे रद्दबादल होईल आणि ते लागू होईल. आणि जर त्या आधी माझा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक मृत्यु झाला तर इस्टेट आपोआप एका ट्रस्टला हस्तांतरित होईल. मी आधी विचार केला होता मृत्युपत्रात तुमचे नाव घालावे....


पण जेव्हा ती हुशार कामिनी तुमचे मूल पोटात घेवून माझ्याकडे येवून मी तुम्हाला घटस्फोट द्यावा अशी मागणी करू लागली तेव्हाच मी निर्णय घेतला की काही झाले तरी तुम्हाला आपला वारस बनवायचे नाही. तिचे म्हणणे होते तुम्ही आर पी मार्ट्सचे मालक आहात आणि तुमच्या इस्टेटीवर तिच्या गर्भातील बाळाचाही हिस्सा आहे. नंतर होणारी बदनामी टाळण्यासाठी मी आधीच तुम्हाला घटस्फोट द्यावा त्या बदल्यात तुम्हाला सांगून ती मला मोठी पोटगी द्यायला लावेल. हाउ फनी! हा हा हा.... सत्य समजल्यावर बिचारीचे मालकीण होण्याचे स्वप्न भंगले.” “ तर मिस्टर संजय कायद्याप्रमाणे तुम्ही माझे पती असलात तरी त्याच कायदयाने तुम्ही माझे वारसदार नाही आहात. तुम्ही फक्त माझ्या कंपनीत काम करणारे कर्मचारी आहात आणि तुमचा पगार नियमित तुमच्या खात्यावर जमा होतो.”


संजयराव सुन्न होवून ऐकत होते.  रत्नप्रभाबाईंनी मनात आणले असते तर क्षणात रावाचा रंक झाला असता. वरकरणी काहीही न करता शांतपणे त्यांनी संजयरावांना जोरदार चपराक लगावली होती जिचा आवाज तर झाला नव्हता पण वळ खोलवर उमटले होते जे कधीच भरून येणार नव्हते.

समाप्त

©️Savita Kirnale

तुम्हाला ही कथा आवडेल. 👉 गुंता

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


4 Comments

  1. खूप छान गोष्ट आहे, प्रत्येक स्त्रीने अशी हुशारी दाखवली पाहीजे

    ReplyDelete
  2. Different kind of story, nice

    ReplyDelete
  3. बायकोचा विश्वासघात करणाऱ्या नवऱ्याला असा धडा शिकवलाच पाहिजे

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post