सावित्रीचा वसा

सावित्रीचा वसा

✍️ सौ. प्रतिभा परांजपे 

     रखमाने पटापट ओटा आवरला, तवा परात घासायला ठेवून, ताई मी येते -- म्हणत निघाली.

अजून दोन घरचे काम उरकायचे आहे. अकरा वाजत आले. आज  हात भराभर काम उरकत नव्हते. थकवा ही वाटत होता.

 सकाळचा फक्त एक कप चहा पोटात होता.

रोज ती रात्रीची भाकरी खाऊन निघायची त्यामुळे पोटाला आधार असायचा.

 पण, आज पौर्णिमेचा उपास. तिला आठवलं लग्न झालं त्या वर्षी सासूने तिला उपवास करायला लावला. किती छान दिवस होते,

सासूनी समजावल वडाच्या झाडाला फेर्या मारून धागा बांधायचा म्हणजे नवऱ्याच्या आयुष्याची दोर बळकट होते असे कहाणीमध्ये सांगितले आहे.

बिरजू रखमाचा नवरा , त्याचे खूप प्रेम रखमावर.

 नवी साडी नेसून जेव्हा रखमा पूजा करून आली तेव्हा हरखून एकटक पाहतच राहिला, रखमा तर लाजून चूर चूर होत होती.

लग्नाला एक वर्ष सरायच्या आधीच बिरजू तिला शहरात घेऊन आला. रिक्षा चालवायचा बिरजू  भाड्याने घेऊन.

पुढे पैसे जमा करून स्वताची रिक्षा घेण्याचे स्वप्न होते बिरजूचे.

म्हणायचा तुला राणी सारख ठेवीन.

 छान सुखात दिवस चालले होते.

पण कोणाची नजर लागली काय माहित.

 एक दिवस एक गाय अचानक रिक्षा समोर आली तिला वाचवायला बिरजू ने अचानक ब्रेक लावला नि रिक्षा पलटली   आणि,---बिरजू  पडला एक पाय मोडला. 

कामही बंद पडले . रखमाला काय करावे सुचेना .शेजारच्या रहिमच्या मदतीने  दवाखान्यात नेले.. डॉ म्हणाले हाडं मोडल आहे आप्रेशन करावे लागेल.. बरेच दिवस लागतील बरे व्हायला.

गावात कळवल पण सासूला बर नव्हते. माहेरी पण हातावर पोट कोण काय मदत करणार?

 जवळ होतं नव्हतं ते सर्व विकलं गेलं. .एक मंगळसूत्र होतं तेही रखमाने विकलं. रात्रीचा दिवस केला आणि बिरजूला बरा केला.  रिक्षा मोडली, बिरजूला काम नाही, गावी जाऊनही काही फायदा नाही कसेबसे दिवस रेटले , मग 1-2 घरी स्वयंपाकाचे काम घेतले हळूहळू घर वाढवली ...

कुकरच्या शिट्टीने रखमा भानावर आली. तिने घड्याळ पाहिलं साडेअकरा झाले होते .

पटापटा काम आटोपून   सोमण आजींकडे रखमा पोचली तेव्हा तिला पाहून आजी म्हणाल्या, "अगं बस जरा दोन मिनिट, दम घे जरा, किती धावपळ करते."

      "आज लय उशीर झाला बघा,

त्या सुळे आंटीकडे पाहुणे आले आहे म्हणून थोडा जास्त स्वैपाक ."

"अगं हो हे घे पाणी, त्यांनी तिला बळेच बसवून ग्लास हातात दिला. एक घोट घेतात रखमाला कळले पाणी म्हणून आजींनी तिला लिंबू सरबत दिले."

तिने आजींन कडे पाहताच---

"उपास केलाय ना? पित्त होतं ग म्हणून सरबत दिले, आरामात पी."आजी
"भाजी कोणती करू,  हे पीत  पीत भाजी  चिरते."

"नको, आज काहीही करायचं नाहीये. मी भगर केलीये उपासाची. तुझे आजोबा पण तेच खाणार आहे, बरोबर आमटी, काकडीची कोशिंबीर आहे ग." आजी म्हणाल्या.

"आजोबा दिसले नाय?"

"अग ते गेले आहे झाड लावायला . बिरजूला घेऊन."

   "मग मी निघू?"

"थांब, स्वयंपाकाला तुला अर्धा तास लागतोच ना? तेवढेच थांब, आणि आत ये."

रखमा आत जाताच तिला पाटावर बसवून तिच्या कपाळावर कुंकू लावून, साडी ,चोळी ,सौभाग्यवाण देउन  गहू आंब्यानी  तिची ओटी भरली.

"हे काय आजी आज काय?"

"अगं वर्षातून एकदा मी भरते सवाष्णीची ओटी.

 आज दिवस चांगला. तुझ्यासारखी सावित्रीची लेक सवाष्ण म्हणून दारात आली, बघ साडी आवडते का?"

रखमाने पाहिले आंब्याच्या रंगाची, हिरवे काठ असलेली भरजरी साडी तिच्या अगदी मनात असलेली, तिने वाकुन नमस्कार करताच,

 "हं ,नेस  बरं ती साडी."

    "आत्ता?"

     "हो पूजेला चलतेस ना ?समोरच्या बागेत झाड आहे. तुझा उपास आहे ना? पूजा झाली का?"

"नाही, सकाळच्या घाईत वेळ नाही भेटला. पण आजी त्या सोसायटीतल्या बायकांनी एक एक फांदी तोडून आणून घरीच पूजा केली."

"अग अस करून झाडाच नुकसान होते. त्यापेक्षा कुंडीत रोपं  लावून पूजावे. आपल्या तर समोरच आहे वृक्ष म्हणून हे पुजेच साहित्य व ही काही रोप, हे सर्व    घेऊन चल."

"आजी रोपं कशाला?"

"अगं ही रोपं वाटायला."

बागेतल्या  वडाच्या झाडाखाली बायकांची गर्दी होती. 

पूजा करून झाल्यावर आजींनी सवाष्णींना हळदी कुंकू लावून गहू आंब्याने ओटी भरली व प्रत्येकीला एक एक रोप दिले व तुमच्या परिसरात झाड नक्की लावा असा प्रेमळ आग्रह केला.

पूजा करून आल्यावर आजींनी पिशवीत एक डब्ब्यात भगर नी आंबे दिले व म्हणाल्या, "अंबे खाऊन कोयी फेकू नको" .

"मग चुलीत जाळू लाकडांसंग?"

"अगं नाही वेडे,  राखेमधे घालून ठेव. पाऊस सुरु झाला की झाड लावायला कामी येतील."

रखमाच्या हातावर पैसे ठेवत आजी म्हणाल्या, "आता उशीर झालाय ना ?मग रिक्षा करूनच घरी जा पायी जाऊ नको समजलं. अंगात दम तर हवा न, ज्याच्यासाठी उपास केला त्याच्यासाठी कष्ट करायला."

"आजी सावित्रीची कथा सांगा ना."

"ती पुराणातील कथा  की आधुनिक सावित्रीची ?" आजींनी हसत विचारले.

"अजून पण एक सावित्री हाय व्हय?"

"हो तर, ती आपल्या सारखीच पण खूप पूर्वीची. लहान वयात लग्न झाले , नवर्याची इच्छा व तिला आवड म्हणून शिक्षण पूर्ण केले.

 त्या काळात मुलींना शिक्षण देत नसत. पण या सावित्रीने शिक्षणाचा उपयोग केला. मुलीची शाळा स्थापन केली सनातनी लोकांनी विरोध केला तिच्यावर  दगड,चिखलफेक केला.

पुराणातील सावित्री प्रमाणेच पतीवर प्रेम व मनाची जिद्द,घेतलेला वसा पूर्ण केला.विधवा स्त्रीचे मूल दत्तक घेतले. सत्यवानाच्या सावित्रीने चाणाक्षपणे आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. या सावित्रीने नवऱ्याच्या कार्यात  त्याला साथ दिली. मुलींसाठी शाळा स्थापली. या  सावित्री बाई फुलेच्या नावाने महिला मुक्ती दिन आणि बालिका दिन साजरा होतो."

"अगं बाई ह्या सावित्रीची कथा तर अजून  छान आहे. "

"एकुण काय रखमा पती प्रेम आणि कर्तव्य ह्याचा मेळकरून जी स्री आपल्या संसार करते ती सावित्री ची लेकच आहे. तू देखील बिरजूच्या संकटकाळी  जे करते आहे ते कौतुकास्पदच आहे ."

"पण आजी मी शाळा शिकले नाही. आता शिकू तर ."

"अगं लिहिता वाचता येत तुला, आता हा फोन दिला आहे मी तोही वापरतेच."

"ते सर्व तुमच्या मुळे आजी. पण नौकरी करणार्या बायांना पाहिल की वाटतं..."

"अगं तुला जे येतं त्याचा उपयोग कर तुला स्वैपाक उत्तम येतो,त्याचा उपयोग करून घे. त्याच्यातही बराच पैसा मिळतो."

"कस काय?"

" हे बघ तुझ्या हाताला चव आहे. छोटे आर्डर मिळतील ते घे स्वैपाकाचें. त्यातून मिळकत वाढेल व काम नीट पाहिलं कि अजून काम मिळेल."

"हे बेस हाय  मी उद्याच वर्मा बाईंच वाढदिवसाच्या कामाला हो बोलते."

रखमाच मन भरून आले,

आजी म्हणत ती त्यांच्या पाया पडली.

"असेच अंगात बळ नी मनात प्रेम असू दे ग बाई, सावित्री सारखेच नवऱ्याला यमाच्या तावडीतून सोडवले, देव तुला शक्ती देवो, माझा आशीर्वाद आहे."

तेवढ्या त दारात रिक्षा थांबल्याचा आवाज आला. बाहेर बिरजू रिक्षा घेऊन उभा .
  "घे तुझा सत्यवान गाडी घेऊन हजर आहे", आजींनी हसत म्हंटले.

  खाली उतरत आजोबा म्हणाले, "बिरजू त्या पाच झाडांना नियमित पाणी घालायचे लक्षात राहिल न?"

"व्हय आजोबा, हा विसरला तरी म्या आठवण करून देईन." रखमा म्हणाली.

रखमा  बिरजूच्या रिक्षेत बसली. रखमाला एक टक पाहत बिरजू  म्हणाला, "आज पौर्णिमेची रात्र आहे पण-- चंद्र तर दिवसाच  माझ्या रिक्षेत कसा उगवला कोण जाणे?"

बिरजूचे कौतुकाचे बोल समजून रखमा लाजून चूर चूर झाली.

------------------------------------------- 

लेखन---सौ.प्रतिभा परांजपे

वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.




Post a Comment (0)
Previous Post Next Post