मळभ

 #मळभ

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

मी रात्री साडेदहाच्या सुमारास मंगेशच्या घराची बेल दाबली.

"आत्ता नक्की घरी असणार तो हरमखोर !" मनातल्या मनात शिवी हासडत अस्वस्थपणे हातावर हात चोळत मी पुटपुटलो. अपेक्षेप्रमाणे मंगेशनेच दार उघडले. मला पुढे पाहताच क्षणभर त्याच्या डोळ्यात उमटलेले भय मला स्पष्ट दिसले. त्याला आत ढकलत मी घरात प्रवेश केला. खरतर पूर्वी बऱ्याच वेळा मी त्याच्या घरी आलो होतो, पण आत्ता चाळीस वॅटच्या पिवळ्या बल्बच्या प्रकाशात त्याचे घर अगदीच भयाण वाटत होते ! भिंतीवरील जुना रंग पावसाच्या ओलीने पाघळला होता. भिंतीवर सगळीकडे पोपडे सुटलेले दिसत होते. जुनेपुराणे फर्निचर अस्ताव्यस्त पडले होते. कोपऱ्यात गादीची वळकटी दिसत होती. एका कोपर्‍यात जुन्या लाकडी टेबलवर गॅस दिसत होता. त्या मागील फडताळात काही डबे होते. कोपऱ्यात पिंप व नळ होता. मंगेशची आई गॅस पुढे काहीतरी करत होती.

किती थकल्या आहेत बाई आता ... मी बघत होतो. एकेकाळी मी लहान असताना शाळेत बाई मला शिकवायला होत्या. संस्कृत शिकवायच्या ! संस्कृतवरील त्यांचे प्रभुत्व पाहतांना आम्ही मुले अक्षरशः दिग्मूढ व्हायचो! त्यांनी शिकवलेले कळले नाही, असे कधी व्हायचे नाही ! टापटीप साडी नेसून प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या बाई तास घेण्यासाठी वर्गात शिरल्या कि वर्गातले वातावरण अगदी भारावून जात असे. आत्ताचे त्यांचे रूप माझ्या मनातल्या रूपापेक्षा अगदीच विपरीत होते. घरात कोणीतरी जबरदस्तीने शिरल्याचं लक्षात येताच त्यांचे शरीर लटलटा कापू लागले होते. शरमेनं मी अर्धमेला झालो. चटकन पुढे होऊन बाईंच्या पुढे वाकलो. त्यांच्या सुरकुतलेल्या पावलांना स्पर्श करत तो हात मी कपाळाला लावला.

" कोण रे बाळा तू ? मला अलीकडे नीट दिसत नाही. त्यातून या अंधारात तर मी तुला ओळखणे शक्यच नाही."

कंप पावणाऱ्या आवाजात बाई म्हणाल्या.

" बाई मी सुहास ... सुहास भावे ! सातवी ते दहावी तुम्हीच मला संस्कृत शिकवलेत."

आदरयुक्त आवाजात मी म्हणालो.

" अरेच्या !! सुहास का तू ? तू तर मंगेशच्याच वर्गात होतास. स्कॉलर मुलांची बॅच होती हो तुमची !! " बाई  पुटपुटल्या.

मी बाईंबरोबर बोलत असताना इकडे मंगेश चांगलाच सावरला होता.

" हे बघ सुहास, पैसे मागायला आला असशील तर आधीच सांगतो ... थोडं थांबावं लागेल."

निर्लज्ज आवाजात मंगेश म्हणाला.

" मंग्या ... महिना झाला ! तू माझ्याकडून फक्त एका आठवड्याच्या क्रेडिटवर माल घेऊन गेला होतास. परवा तुझा पोस्टडेटेड चेक बाउन्स झालाय. आत्ताच्या आत्ता मला कॅश दे !!!"

चढ्या आवाजात मी म्हणालो.

आता थोडी पार्श्वभूमी सांगतो.

माझे स्वतःचे मेकॅनिकल वर्कशॉप आहे. तेथे मी इंडस्ट्रियल क्लॅम्पिंग डिव्हायसेस मॅन्युफॅक्चर करतो. स्टड, टी नट, यू क्लॅम्प, स्ट्रप क्लॅम्प अशी संपूर्ण क्लॅम्पिंग प्रॉडक्टची रेंज मी बनवतो. महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या कंपन्यात मी हे प्रॉडक्ट विकत असतो. माझ्याकडून डिस्काउंटेड किमतीत विकत घेऊन इतर कारखान्यांना विकणारे बरेच डीलर मार्केटमध्ये होते. त्यातीलच एक मंगेश होता. खरं तर त्याचं मार्केटमधील रेप्युटेशन इतके खराब होते की रोख पैसे दिल्याशिवाय त्याला कोणीही माल देत नसे. त्या दिवशी तो मला भेटायला माझ्या कारखान्यांमध्ये आला आणि कधी नव्हे ते मी त्याच्या बोलण्याला फसलो !!!

" सुहास, अरे इतकी भरवशाची कंपनी आहे की काही विचारू नकोस. माल दिला की तिसऱ्या दिवशी मला चेक मिळेल. मी तुला पोस्ट डेटेड चेक देऊन ठेवतो. सात दिवसांनी न विचारता बेलाशक बँकेत भर !!"

आश्वासक स्वरात मला सांगत, मंगेश पंचवीस हजाराचा माल घेऊन गेला होता.

सात दिवसांनी त्याला चेक भरू का म्हणून फोन केला तर त्यानं उचलला नाही नंतर आत्तापर्यन्त त्याचा फोन  त्याने बंद करून ठेवला होता.

" हे बघ सुहास, त्या कंपनीत थोडा लोच्या झाला आहे. अजून पंधरा दिवस लागतील पेमेंट मिळायला !आणि काळजी करू नकोस, नाही तिकडून पेमेंट आले तरी सध्या मार्केट अप आहे. थोडे शेअर्स विकून देऊन टाकीन तुझे पैसे !!" 

बेफिकीर आवाजात मंगेश बोलला आणि आपले पैसे बुडाल्याचे मी ओळखले. मंगेशला कंपनीकडून पेमेंट मिळाले होते आणि त्याचे त्यानं शेअर्स खरेदी केले होते हे माझ्या लगेच लक्षात आले. या शेअर मार्केटच्या नादापायी अक्षरशः लाखो रुपयांना बुडूनही मंगेशला त्याचा मोह सुटत नव्हता.

" बस रे सुहास चहा पिऊन जा ! इतक्या दिवसांनी घरी आला आहेस. मोठा माणूस झाला आहेस तू ... असं मंगेश नेहमी सांगत असतो. बरं वाटतं रे असं काही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल ऐकलं की ..."

कंपयुक्त आवाजात बाई पुटपुटल्या आणि नकळत माझे डोळे भरून आले. स्वतःच्या दिवट्या चिरंजीवांच्या भविष्याचा घोर ऊरात बाळगत जगणार्‍या त्या माऊलीच्या मनात, इतरांची प्रगती पाहून होणारा हर्ष हा मला खरोखर अनाकलनीय होता.

" मंगेश सोड रे हा शेअर्सचा नाद !!" चहा पिता पिता मी म्हणालो.

" इतक्या वर्षात तुला शेअर बाजारातून पैसे मिळाले नाहीत, आता यापुढे काय मिळणार आहेत ? जरा स्वतःच्या आईकडे बघ ! म्हातारपणी बाईंना थोडे सुख दे . कशाला पाहिजेत तुला शेअर्समधून लाखो रुपये ? अरे सचोटीने धंदा करून मिळणारे दहा टक्के सुद्धा खूप असतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सावर स्वतःला !!" समजूतीचा सल्ला देत मी म्हणालो.

" अरे तुला नाही कळणार शेअर मार्केट! त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी असणारे माझ्यासारखे निडर लोक लागतात. बघशील तू ... माझे स्क्रिप्ट एकदा तेजीत आले ना, की पैशाचा पाऊस पडणार आहे. मग बघ आईला कसं सुखात ठेवतो ते ... तू सांगतोयस तसे दहा दहा टक्के मिळवून श्रीमंत होईपर्यंत मी म्हातारा होईन. तुला माहीत नसेल तर सांगतो, जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्तींपैकी आठ व्यक्ती या शेअर मार्केट मधून पैसा कमवूनच श्रीमंत झाल्या आहेत."

कुठल्यातरी धुंदीत मंगेश बरळला व कोपऱ्यात जाऊन कपाटामध्ये काहीतरी शोधत राहिला.

" बिचारा माझा पोरं ..." बाईंनी सुस्कारा सोडला.

" खूप प्रयत्न करतो बघ पैसे मिळवायचा, पण नशीब रुसलं आहे त्याच्यावर !! रात्र रात्र कॉम्प्युटरवर कंपन्यांचा अभ्यास करत असतो. अमुक कंपनीचे फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग आहेत ... तमुक कंपनीच्या टेक्निकल्सचा अभ्यास करून शेयर घ्यायचे आहेत ..." असं सारखं म्हणत असतो. पण एवढं सगळं करून पदरी अपयशच आहे ... पण मला खात्री आहे बरं सुहास ... कधीतरी माझा मंगेश यशस्वी होईलच !! पैशाचा पाऊस पडेल तो आमच्या घरात !!"

बाईंचा कंपित स्वर तलवारीसारखा माझे अंतकरण चिरत होता. माझ्या डोळ्यातील अश्रू चहाच्या कपात पडत होते. चहा संपवून मी पुन्हा एकदा बाईंच्या पावलांना स्पर्श केला आणि मूकपणे घराबाहेर पडलो.

त्यानंतर त्या पैशांवर मी तुळशीपत्र ठेवल्यातच जमा होतं ! नंतर मी मंगेशला त्यासाठी कधीच फोन केला नाही.बॅलन्स शीट मध्ये बॅड डेबट्सच्या यादीत टॉप वरचे मंगेशचे नाव पाहिले की मला थकलेल्या आणि वाकलेल्या बाई आठवत असतं ...

नंतर सुमारे वर्षभराने मी कारखान्यात असताना मंगेशचा फोन आला. दरम्यानच्या काळात फसवाफसवीची त्याची काही प्रकरणे माझ्या कानावर आली होती. एका बोहरी दुकानदाराने देणं दिलं नाही म्हणून, गुंडांकडून त्याला भरपूर चोप दिल्याचेही ऐकिवात आलं होतं ... त्याचा फोन खरंतर उचलण्याचीही माझी इच्छा नव्हती. पण माझं देणं द्यायचं असताना, पुन्हा उधार मालासाठी तो नक्कीच फोन करणार नाही असं वाटून मी फोन उचलला.

" सुहास ... माझी आई खूप आजारी आहे रे गेल्या काही दिवसांपासून ... तिला ऍडमिट करावे लागेल बहुतेक. तू येतोस का प्लीज घरी ?"

रडवेल्या आवाजात मंगेश विचारत होता.

" घाबरू नकोस मंगेश ! येतो मी थोड्यावेळात."

त्याला धीर देत मी बोललो. मंगेशने फोन ठेवला आणि टेबलमधल्या ड्रॉवरमधून पाचशेच्या नोटांचे एक बंडल खिशात टाकून मी कारखान्याबाहेर पडलो. 

ऐन पावसाळ्यातील कुंद दिवस होता तो ! दिवसभर पावसाची उदासवाणी रिपरिप चालू होती. गाडी वेगानं ड्राईव्ह करत मी मंगेशच्या घरी पोहोचलो. मंगेशच्या घरात मी शिरलो आणि कोपर्‍यातील गादीवर झोपलेल्या बाईंकडे नजर जाताच मी हबकलो. बाईंचा देह म्हणजे अक्षरशः हाडांचा सापळा उरला होता. त्यांची स्थिती फारच कठीण दिसत होती. मी घरात शिरलो आणि दुसर्‍या कोपर्‍यात खुर्चीवर बसलेला मंगेश पुढे आला.

" सुहास आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये लगेच ॲडमिट करावे लागेल. काहीही झाले तरी आईला काही होता कामा नये. आई सोडून माझं या जगात कोणीच नाही रे !! मला पैसे फक्त आईला सुखात ठेवण्यासाठी मिळवायचे होते. तिला सोन्यानं मढवण्याचं माझं स्वप्न होतं ... सुहास, मी तुझ्याकडे भीक मागतो ... प्लीज, माझ्या आईला वाचवं ... जन्मभर मी तुझा गुलाम म्हणून राहीन ..."

माझे पाय पकडून ढसाढसा रडत मंगेश बोलत होता.

" शांत हो मंगेश ..." त्याला वाकून उठवत मी म्हणालो.

" सुहास तू सांगत होतास ते आता पटतयं मला ... शेअर्समधून एकदम आणि विनासायास पैसे मिळत नसतात हे आता मी समजून चुकलो आहे. पण आता खूप उशीर झालाय रे ... प्लीज, माझ्या आईला वाचवं ... तिची शपथ घेऊन सांगतो की यापुढे शेअर मार्केट बंद !! यापुढे सचोटीने नोकरी करून चार पैसे मिळवेन आणि माझ्या आईला सुखात ठेवेन ... प्लीज सुहास काहीतरी कर ..."  गयावया करत मंगेश मला म्हणत होता.

पुढच्याच क्षणी मी शहरातल्या सर्वोत्तम हॉस्पिटलमधील माझ्या डॉक्टर मित्राला फोन लावला व मी बाईंना घेऊन येत आहे याची त्याला कल्पना दिली. लगेच ऍम्ब्युलन्सला फोन करून मी मंगेशच्या घराचा पत्ता दिला. 

"मंगेश .. बाईंचे कपडे व इतर नित्याच्या वस्तू पिशवीत भर! आपण त्यांना उपचारांसाठी ॲडमिट करतोय !!" मी मंगेशला म्हणालो. घाईघाईने मंगेश कपाटाकडे वळला. मी खिडकीबाहेर नजर टाकली. दिवसभर असलेलं आकाशातलं मळभ आता दूर झालं होतं. कलत्या उन्हाची तिरीप खिडकीतून खोलीत डोकावत होती. दूरवरून ऍम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येत होता. मी माझी नजर खिडकीतून पुन्हा बाईंकडे वळवली. बाईंच्या चेहऱ्यावर हास्य विलसतं होतं. माझ्याकडे बघून त्यांनी त्यांचा हात किंचित उचलला. मी समाधानाने बाईंकडे बघून हसलो. बाहेरच्या आकाशाप्रमाणेच बाईंच्या घरावरचं मळभही आता दूर होऊ लागलं होतं !!

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

ही कथा तुम्हाला आवडेल. हिंदोळा

वरील कथा मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post