#त्या दोघी
✍️ योगेश साळवी
"रश्मी मी येतेय ग... सकाळच्या फ्लाईटने मुंबईला.."
मंजिरी प्रधानचा फोन आला आणि रश्मीचा उर अभिमानाने भरून आला.
मंजिरी प्रधान एक प्रथितयश लेखिका. स्त्रीवादी लेखन, स्त्रीवादी कविता आणि स्त्रियांविषयी कादंबरी लेखनात ती अग्रगण्य होती. 'अंगणातली तुळस' या काव्यसंग्रहाला आणि 'गुदमरलेले श्वास ' या कादंबरीला म्हणजे पर्यायाने मंजिरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. रश्मीची आणि मंजिरीची ओळख अशीच एकदा पुस्तक जत्रेत झाली. आधीपासूनच रश्मी मंजिरीच्या लेखनाची चाहती होती. आपली आवडती लेखिका पुस्तक जत्रेत स्वतः स्टॉलवर बसून कादंबरीवर स्वतःची स्वाक्षरी करून देते म्हटल्यावर रश्मीने आवर्जून मंजिरीच्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट दिली. तिच्या लेखनामुळे आपण किती प्रभावित झालो आहोत हे मंजिरीला सांगितलं. मग दोघींची फोन नंबरची देवाणघेवाण, मंजिरीच्या नव्या पुस्तकांवरचे तिचे अभिप्राय, व्हाट्सअप वरच्या गप्पा... करता करता मंजिरीची मंजू रश्मी साठी कधी झाली ते दोघांनाही कळलं नाही.... इतक्या जवळ आल्या दोघीजणी. लेखक आणि वाचक यांचे नातं एकदा जुळलं की कसं जुळतं याचे एक उदाहरण झाल्या दोघी.
आज नागपूरला राहणारी आपली मैत्रीण प्रसिद्ध लेखिका मंजिरी प्रधान दस्तूर खुद्द आपल्याकडे आपल्या गोरेगावच्या घरी येणार हे कळताच रश्मी हरखून गेली. नवऱ्याला सांगून तिने आपली इनोव्हा आज घरीच आहे याची खात्री करून घेतली. स्वतः इनोव्हा गाडी चालवून विमानतळावर आपल्या मैत्रिणीला.. मंजिरीला पिकअप करायला..आणण्याकरता ती मुद्दाम गेली. खरंतर आदेश तिचा नवरा म्हणाला होता मी येतो तुझ्याबरोबर म्हणून...
पण रश्मीला दाखवायचं होतं की मी आजच्या काळातली स्त्री जिला पुरुषी आधाराची गरज नाही आणि जिथे तिथे नवऱ्याची मदत आपण कशी घेत नाही.. आपण एक आत्मनिर्भर स्त्री आहोत अशीच प्रतिमा तिला मंजिरी समोर उभी करायची होती.
रश्मीचे हे गोरेगाव चे घर अगदी मोठं होतं. खरंतर मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात बंगले वजा बैठे घर मिळणं ही चैनीची गोष्ट म्हणायला हवी. मंजिरीची राहण्याची सोय एका प्रशस्त खोलीत तिने केली. अगदी त्याच दिवशी रश्मीच्या मैत्रिणी चांगल्या ८-१० च्या संख्येने भेटल्या संध्याकाळी लेखिकेला. रश्मीने सगळीकडे सांगूनच ठेवलेलं की ज्या लेखिकेच्या स्त्रीप्रधान, वास्तववादी पुस्तकाची आपण आतुरतेने वाट पाहतो ती मंजिरी प्रधान प्रत्यक्षात आपली मैत्रीण आहे म्हणून... आणि माझ्याच घरी उतरली म्हणून. मग चहा, समोसे.. ढोकळ्याच्या साथीने सर्व महिला मंडळाच्या गप्पा रंगल्या... बाहेरच्या प्रशस्त हॉलमध्ये. पुरुषांकडून स्त्रीवर जाणते- अजाणतेपणे होणारे अन्याय, कामाच्या ठिकाणी स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणूक, रेल्वे आणि इतर वाहतूक मार्गावर स्त्रियांसाठी असणारी स्वच्छतागृहांची चणचण, सामाजिक माध्यमांवरील महिलांची सुरक्षितता... असे सर्वच विषय ऐरणीवर आले. त्यानंतर मंजिरी बरोबरचे फोटो सर्वच जणींनी आपापल्या मोबाईलवर काढून समाज माध्यमावर अपलोड केले.
मंजिरीला इतक्या लहान वयात एवढी प्रसिद्धी मिळाली ती तिच्या रोखठोक व्यक्त केलेल्या विचारांमुळे असं वाचकांचे मत होतं. वैचारिक कीड लागलेल्या पुरुषी विचारसरणीच्या गोष्टींना मंजिरी नेहमीच विरोध करायची...
आपल्या कादंबरीतून, कविता मधून समरसून व्यक्त व्हायची. एकतर्फी प्रेमाचा हैदोस, आत्महत्यांचे संधी साधू उदात्तीकरण, कुमारी मातांचे प्रश्न, स्त्रिया बाबतीत माणुसकीचा अभाव.. असे कितीतरी विषय वाचकांना अंतर्मुख करून टाकायचे. 'आपलं नेमकं चुकते कुठे ?'
असा विचार करायला लावणारे प्रश्न वाचकांपुढे ठेवून मंजिरी त्यांना खडबडून जागे करायची.
मंजिरीच्या कादंबरीतल्या नायिकेच्या जीवनात एखादी भयंकर धक्कादायक घटना घडायची आणि नायिका उध्वस्त व्हायची. भयंकर दुःखात इतकी बुडून जायची की त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नसायचा.
सगळीकडे काळोख दाटून यायचा. मग आदिम प्रेरणा जागृत होऊन त्या विशिष्ट अप्रिय परिस्थितीतून बाहेर येऊन स्वतःच्या जखमांवर फुंकर नायिका घालायची. उपचार करायची.. स्वतःचा, इतरांचा.. त्यांच्या परिस्थितीचा आणि आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घ्यावी तशी भरारी घ्यायची.
मंजिरीच्या लेखनाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने अल्पावधीतच चोखंदळ वाचकांच्या पसंतीस ती उतरली.
तिच्या चाहत्या महिला मोठ्या प्रमाणावर होत्याच शिवाय उदारमतवादी पुरुषही तिच्या लेखनाकडे गांभीर्याने पाहू लागले.
रश्मी बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असलेल्या एका श्रीमंत कुटुंबात होती. तिच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात एका जाहिरात कंपनीत ती नामवंत मॉडेल होती. सकाळी नियमितपणे बस पकडून ती अंधेरीला कामाला जायची आणि दिवसभर कामात बुडून जायची. रश्मी एक स्वतंत्र विचारसरणीची स्त्री होती. आपल्या लग्नात आपलं नाव बदलले जाऊ नये यावर ती ठाम होती. खरंतर नवऱ्याचं आदेश सरकारचे आडनाव फक्त कागदोपत्री गैरसोय होऊ नये म्हणूनच लावायची ती. सौ. रश्मी सरकार हिच्या लेखी तिचा चेहरा, तिचा भूतकाळ, तिच्या आयुष्यातल्या घडामोडी आणि अचिव्हमेंट्स यांना फार महत्त्व होतं. तिला आदेश सरकार याची बायको हे आणि एवढंच अस्तित्व नको होतं.
आदेशचे आपल्या बायकोवर कितीही मनापासून प्रेम असलं तरी रश्मीला आपला नवरा आपल्या मागे मागे लुडबुड करणारा नको होता. सर्व आयुष्याला जर पुरुष संदर्भ लावले तर मग स्त्रीचे वेगळे आयुष्य काय राहिलं..??
नवऱ्याची बायको, बापाची मुलगी.. यापेक्षा मी 'मी ' आहे यावर रश्मीचा भर असे. एक 'फीमेल बिइंग ' म्हणून तिला तिच्या अस्तित्वाचे सत्व टिकवावे असं वाटे .
आता मंजिरीला रश्मीकडे येऊन चांगले सात-आठ दिवस झाले तरी अगदी कालच आल्यासारखं वाटत होतं.
याचं कारण रश्मी तिला अगदी मोठ्या बहिणीसारखीच वागवायची. मुंबईतील साहित्यिक प्रेमींना आवडतील अशी सारी ठिकाण रश्मीने मंजिरीला फिरवून आणली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, एशियाटिक लायब्ररी, म्युझियम दाखवलं. चर्चगेटच्या रस्त्यांवर चांगल्या प्रतीची पण घासाघीस करून वाजवी दरात मिळणारी निरनिराळ्या विषयावरची मराठी, इंग्रजी उत्तमोत्तम ग्रंथसंपदा कुठे मिळते ते दाखवलं. ती पुस्तकं विकत घेताना मंजिरीला तर अलीबाबाच्या गुहेतच आल्यासारखं वाटलं.
सकाळी रश्मी कामावर निघून गेली की दिवसभर मंजिरीसुद्धा कुठे प्रदर्शन, कुठे साहित्य सभेत वक्ता म्हणून भाषण.. तर कुठे एखादे चर्चासत्र... यात व्यग्र असायची. तिने रश्मीला एकदा सांगितलं होतं की नागपूरला आपण एका नवीन घराच्या शोधात आहोत आणि ते नवीन घर मिळालं त्याचे व्यवहार वगैरे पूर्ण झाले की आपण नागपूरला परत जाणार आहोत. अर्थात रश्मीला ती किती दिवस राहणार याच्याशी फारसे कर्तव्यही नव्हतं. ती काही मंजिरीला 'इतके दिवसच रहा ' वगैरे बोलली नव्हती. पाच फूट दहा इंच उंचीचा, काळ्याभोर डोळ्यांच्या... मानेपर्यंतचे केस असलेल्या, पातळशी मिशी राखलेल्या आदेशच्या प्रेमात ती वयाच्या विसाव्या वर्षी पडली. तेव्हा आदेश पंचवीस वयाचा होता. आदेश घरचा श्रीमंत होता. नवी नवी ओळख झाली तेव्हा आपल्या कारमधून आदेश रश्मीला कॉलेजला सोडायचा. दोघांची लग्नाळू वये, मिळालेली मोकळीक, रोमँटिक गाणी ऐकण्याची दोघांची आवड यामुळे त्यांच्यातला मुग्ध प्रणय उमलायला लागला. कष्टाळू स्वभावाचा आदेश तेव्हा छोट्या मोठ्या नोकऱ्या करायचा. रश्मीच्या घरच्यांनी पण मग ती दोघे एकत्र कार्यक्रमांना आणि चित्रपटांना जातील याची पुरेपूर काळजी घेतली.
अखेर मोजक्या लोकांच्या साक्षीनं दोघांचं लग्न मुंबईत झालं. लग्नाच्या सुरुवातीला भावनिक पातळीवर आदेशवर विसंबून असलेल्या रश्मीला स्वयंपाकात अजिबात गती नव्हती. त्या वाचून काही अडलंही नाही म्हणा. इतर कुटुंबात आईपणाचे ओझं बाळगणाऱ्या अनेक स्त्रिया पहिल्यांदा रश्मीला मातृत्वाची पण भीतीच वाटायची.
त्या दिवसात एका कंपनीत रश्मी असेम्ब्ली लाईनमध्ये काम करायची. एकदा त्या नामवंत कंपनीच्या जाहिरातीसाठी एका फोटोग्राफरने योगायोगाने रश्मीचे स्वतंत्र फोटो काढले. अतिशय सुंदर आलेले ते फोटो बघून त्याने रश्मीला मॉडेलिंगचा सल्ला दिला. फोटो चांगले यावे त्यासाठी कपडे कोणते घालावेत... लिपस्टिक कशी लावावी इत्यादी गोष्टी सांगितल्या. फोटोमुळे रश्मी काही मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली. लवकरच केसांना झटके देणारी, आपले घारे डोळे मिचकवणारी.. खट्याळ हसणारी... आणि कोणत्याही पोझमध्ये सहज सुंदर भासणारी रश्मी प्रत्येक फोटोग्राफरची अल्पावधीतच ड्रीम मॉडेल बनली. तिच्या चेहऱ्यात एक तेज होतं. निरागसता आणि उत्पादकता याचं अनोखे मिश्रण होतं.
र श्मीच्या मॉडेलिंगच्या करिअरबद्दल आदेशला काही आक्षेप नव्हता. खरंतर या अतिरिक्त वरकमाईबद्दल आदेशने आनंद व्यक्त केला होता. पण काही काळातच दोघांची संसाराबद्दलची मतं वेगवेगळी असल्याचे स्पष्ट झालं. संसार करण्यापेक्षाही आपल्या अस्तित्वाचा शोध घेणे रश्मीला गरजेचे वाटत होतं... पण रश्मीने नीट प्रकारे प्रपंच करावा असा आदेशला वाटायचं. मग त्यापेक्षा तिचं स्वतःवर अवलंबून असणं.. हे अधिक चांगलं होतं असा आदेशला वाटायचं. तसं तो एकांतात तिला बोलून दाखवायचा.
त्यादिवशी जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला शक्तीचा सत्कार सोहळा ' झाला. एक प्रथितयश आणि यशस्वी मॉडेल म्हणून रश्मीला गौरवण्यात आलं. योगायोग हा की हा पुरस्कार तिला 'मंजिरी प्रधान ' या स्त्रीवादी लेखिका म्हणजे तिच्या मैत्रिणीकडूनच स्टेजवर देण्यात आला. हा दुहेरी आनंद साजरा करायला त्या दोघीच निवांत त्यांच्या बंगलेवजा घराच्या छोटेखानी बगीच्यात बसल्या होत्या. दोघी मैत्रिणींच्या गप्पांच्या जोडीला उंची विदेशी स्कॉच असल्याने गप्पा रंगात आल्या. आपल्या जीवनाचा पट रश्मीनं अगदी मोकळा होऊन मैत्रिणीसमोर मांडला.
" बघ बघ बरं मंजू... माझी लव स्टोरी... करियर... नवरा... यांच्या विषयी सगळं सगळं सांगितलं तुला... कुणाला सांगावं पुढे मागे कधीतरी माझ्यावर कादंबरी लिहिशील तू... हे पण माझं नाव बदल बर का... नाहीतर उगाचच नवरोबांची खप्पा मर्जी व्हायची माझ्यावर..." रश्मी हसत हसत म्हणाली. समोरच्या बशीतले दोन काजू उचलून स्कॉचचा घुटका घेऊन... खरंच आपल्या कार्याची दखल कुणी घेतली की स्री ला किती बरं वाटत असावं... आपण मॉडेलिंगच कार्यक्षेत्र निवडलं याचा अभिमान तिला वाटत होता.
मंजिरीने एक खोल श्वास घेतला आणि ती म्हणाली...
" तुम्ही आज ज्या वेदना अनुभवता ती तुमची उद्याची शक्ती बनते. "
" कोण्या लेखकाने म्हटलंय असं... साधारण एका दशकापूर्वी ज्या वेदना मी अनुभवल्या.. दुःख सोसली.. त्यातच माझ्या लेखनाची शक्ती आहे... असं मला वाटतं. अठरा वर्षाची झाले तोच वडिलांनी माझं लग्न करून दिलं. माझ्या आणि समीरच्या प्रेम कहाणीला अनेक कंगोरे आणि विरोधाभास होते. प्रेम, अति प्रेम, शंका कुशंका, मत्सर, हेवा द्वेष... अशा पायऱ्या ते सतत चढत उतरत राहिले. एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या आम्हा दोघांना एकमेकांशिवाय राहता येत नव्हतं. आम्ही दोघं अति जवळ आल्यानंतर आमच्यातील तणाव कळसाला पोचले. तंबोऱ्याच्या दोन तारा वाजवीपेक्षा जास्त जवळ आल्या तर त्यांच्यातून सूर नीटपणे निघत नाही तसे...."
" आमच्यातील भांडण विकोपाला पोचली आणि आम्ही दोघांनी शेवटी घटस्फोट घेतला. पुढे माझ्या आयुष्यात अजित देशमुख आला... पहिल्या लग्नापेक्षा उलट दुसऱ्या लग्नात जास्त त्रास झाला. हा देशमुख दारूबाज आणि जुगारी निघाला. एकदा जुगारात एक लाख हरल्यानंतर त्याने मला प्रथम मारहाण केली आणि नंतर हे सत्र चालूच राहिलं. त्याच्यापासून एकदा गर्भवती असताना त्यांना लाथा बुक्क्यांनी मारल्यावर माझा गर्भपात झाला.. आणि मी देशमुखला सोडून माहेरी परतले...."
" दरम्यानच्या काळात माझं लेखन जोरात चालू होतं. मी सोसलेल्या वेदना, दुःख झपाट्याने कागदावर उतरवत गेले... माझ्या जागी दुसऱ्या कोणीतरी बाईचं कल्पना चित्र उभं करून... मी लिहिलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.. त्याच्या प्रति वेगाने खपू लागल्या."
" दोन-तीन कादंबऱ्या लिहिल्या. त्याही आवडल्या वाचकांना भलत्याच... प्रकाशकांकडून विचारणा होऊ लागली पुढचा काव्यसंग्रह, कादंबरी कधी देताय म्हणून. प्रकाशक आगाऊ रक्कम ठेवून जात. बऱ्यापैकी आर्थिक प्रश्न सुटल्याने मी पण आनंदात जगू लागले."
"पण माझ्यासारखी नवोदित लेखिका असा मानमरातब, पैसा मिळवते हे काही वरिष्ठ माझ्यापेक्षा वयाने व नावाने मोठ्या लेखकांना आवडलं नाही. मत्सर वाटून त्या लोकांनी माझ्याविषयी काही अर्धसत्य.. काही अफवा पसरवायला सुरुवात केली. माझ्या लेखनात आक्षेपार्ह.. लैंगिक वर्णने.. आणि अश्लील गोष्टी जास्त असतात असे मानणाऱ्या लोकांचा गट तयार केला. एकदा एका मासिकात एक लेख येऊन त्यात माझ्याविषयी नको नको ते छापून आलं."
मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसत आणि स्वतःला सावरत ती पुढे बोलू लागली.
" छापून आलेल्या गोष्टींवर लोक पटकन विश्वास ठेवतात. लोकांचे एक वेळ जाऊ द्या पण सख्खे वडील मला नको नको ते बोलले.. या घरात.. म्हणजे त्यांच्या घरात राहायचं नाही म्हणाले.. दुसरं घर बघावं लागलं मला "
" शेवटी अशाच तुझ्यासारख्या माझ्या लेखनाची आवड असणाऱ्या माझ्या वाचकाच्या ... चाहात्याच्या ओळखीवर रिंग रोडला एक भाड्याचं घर मिळालं. सुखाने चार-पाच महिने झाले असतील नसतील तर माझा दुसरा नवरा देशमुख माझं घर शोधत तिथे आला. आधीच सगळं विसरून जाऊ म्हणाला. मलाही कसं कोण जाणे त्यावेळेस लेखिका सौ. देशमुख म्हणून समाजात स्थान असावं, आपलंही इतर पांढरपेशा स्त्रियांसारखं जनरीतीप्रमाणे सुरळीत व्हावं असं वाटलं."
मंजिरीने डोळे मिटून घेतले... एक मिनिटभर.. मग एक निश्वास टाकून डोळे उघडून रश्मीकडे पहात ती पुढे बोलू लागली.
" काही दिवस बरं चाललं होतं आमचं.. मग एक दिवस देशमुख दारू पिऊन आला.. कसला तरी सुड उगवल्यासारखा मला मारहाण करू लागला.. कोणीतरी माझ्याविषयी भडकवलं होतें त्याला... त्या रात्रीपासून मारहाण करण्याचं आणि मग देशमुखला त्याला हवं ते ओरबाडून घेण्याचे सत्र पुन्हा चालू झालं. आजूबाजूच्यांना .. विशेषतः त्या इमारती राहणाऱ्या घरमालकाच्या लक्षात येऊ नये म्हणून मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते."
" मी स्त्रीवादी लेखिका... एखाद्या कसलेल्या कुस्तीगीराप्रमाणे पुरुषांना धोबीपछाड घालून चितपट करते.. त्यांना धडा शिकवते.. पण ते माझ्या पुस्तकातून.. लिखाणातून... प्रत्यक्षात मात्र मी माझ्या नवऱ्याकडून लाथा खाते.. त्याच्यासमोर रडते ..भेकते त्याची विनवणी करते. हे माझ्या वाचकांसमोर यायला नको होतं मला..."
" एके रात्री कळस झाला. देशमुख ना माझे केस धरून पट्ट्याने मारत मारत मला घराबाहेर काढलं. रात्री अवेळी उशिरा कुठे जाणार.. मग मी घर मालकाच्या घराचा आश्रय घेतला. घरमालक भला माणूस निघाला. त्याचा स्वतःचे कुटुंब होतं तो, बायको , दोन मुलं.. तरी आपल्या खोलीत पड म्हणाली दोघं. मला काय खातेस का जेवतेस का विचारलं. उजाडलं तसं त्याची बायको मला समजवायला लागली... की मी घरी परत जावे म्हणून.. नवरे लोकांना अधिकार गाजवायची सवयच असते...बाईने कसं समजून घ्यायचं वगैरे.. मी म्हणाले त्यांना मी परत जाणार नाही म्हणून... घर माझ्या नावावर आहे... तुम्हीच त्या आगंतुकाला नोटीस पाठवा घर सोडून जा म्हणून...."
" इतके दिवस देशमुख आयत्या बिळावर नागोबा घरात ठाण मांडून होता.. काल घरमालकाचा फोन आला होता. चार दिवसात देशमुख घर खाली करतोय म्हणून... जवळजवळ महिनाभर तुझ्याकडे राहिले.. उद्या जाते मी माझ्या घरी..." मंजिरी शांतपणे म्हणाली.
रश्मी सुन्न झाली होती . तिच्यासमोर साहित्य पुरस्कार विजेती मंजिरी बसली होती. तिचे स्फूर्ती स्थान... आदर्श..आजच्या दिवशी तिच्या हस्ते रश्मीला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर नेहमीच्या शैलीत मंजिरीने मोजक्या शब्दात स्त्री शोषणाविरुद्ध, स्त्री स्वातंत्र्याचा उदो उदो करणारं छोटेखानी भाषण सुद्धा केलं होतं.
दुसऱ्या दिवशी मंजिरीला विमानतळावर निरोप द्यायला रश्मीबरोबर आदेश आला होता. अगदी शेवटपर्यंत रश्मी आणि आदेश मंजिरीबरोबर थांबले होते. मंजिरीचा हात हातात घेऊन रश्मी म्हणाली.
" कधी मुंबईला यावसं वाटलं तर बिनदिक्कत माझ्याकडेच ये... नागपूरला पोचलीस की मला फोन कर."
मंजिरीने काही न बोलता तिचा हात दाबून होकार दर्शवला.
मंजिरी गेल्यावर परत येताना आदेश गाडी चालवत होता. रश्मी खिडकीतून दूर कुठेतरी पाहत विचार करत होती. मधेच तिने वळून आदेश कडे पाहिलं. आदेश ट्राफिक मधून गाडी बाहेर काढण्यात मग्न होता. न राहवून रश्मीने आदेशच्या खांद्यावर डोकं टेकलं... आदेशनेही मग एका हातानं तिला थोपटल्यासारखे केलं.
✍️ योगेश साळवी.
वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.