#पॉझिटीव्हीटी
✍️ सौ बीना समीर बाचल
"आई,पक्का लवकर येशील ना? बघ हं आपली पिझ्झा पार्टी केव्हाची पेंडिंग आहे? आज दादू चा annual day पण आहे, आपण आधी त्याच्या स्कूल मध्ये जाऊ आणि मग तिथूनच तिघे बाहेर जाऊ,पिझ्झा खायला ,समजलं?" चिऊ न एका दमात आपलं वाक्य संपवलं .
"ऑफ कोर्स ,मी कसा विसरेन चिऊ,आज दादूचा annual day आहे ते, हे बघ हे काम फटाफट संपवतो आणि लगेच घरी येतो!"
आनंदने आपल्या लाडक्या चिऊला प्रॉमिस करत फोन ठेवला, तोच त्याचा कलीग रोहन त्याच्या केबिनमध्ये शिरतच होता." काय मग आनंद, आज काय फर्माईश चिऊ ची?"रोहननं विचारलं.
"अरे ,काही नाही यार, मयंकचा annual day आहे, तेव्हा त्याच्या स्कूल मध्ये जायचंय आणि मग तिथून direct पिझ्झा पार्टी!!" आनंद उत्तरला.
"यार ,मानलं पाहिजे तुला , आमच्या बरोबर एक दिवस पार्टीला चल म्हटलं तरी येत नाहीस, किती वर्षं झाली मुलांना सोडून साधा लोणावळ्यापर्यंत ही पिकनिकला नकार असतो तुझा नेहमी, एखाद्या बाईला लाजवेल अस घर आणि ऑफिस सांभाळतोस! एक दिवस तरी दे स्वतःला , अरे तुझी सारिका तुझा संसार असा तिच्या करिअरपायी अर्धा सोडून खुशाल मजेत जगतेय आणि तू ....तू मात्र पूर्ण अडकवून घेतलं आहेस ह्या सर्वांत" आनंद ह्या वाक्याने एक मिनिटभर शांत झाला . मनात कित्येकदा केलेल्या शब्दांची जुळवाजुळव त्याने पुन्हा एकदा केली आणि त्याच शांतपणे तो म्हणाला,
"रोहन, मी कितीदा सांगितलं तुला की सारिका मला सोडून गेली नाही, तिनं सुरुवातीलाच सांगितलं होतं की तिला मुलं सांभाळणं आणि टिपिकल संसार जो म्हणतात तसं काही जमणार नाहीये म्हणून! उगाच तिला बोल लावण्यात काय अर्थ आहे? तेव्हा मीच खूप प्रेमात होतो तिच्या rather अजून ही आहे , तेव्हा मला वाटलं की लग्न झालं की ती आपोआप संसारात रमेल, मयंक झाला तेव्हा आई होती म्हणून निभावले , मग चिऊ आल्यावर मात्र सारिकाचा patience संपला, तिनं कुठलाही त्रागा न करता , मला माझ्या आणि तिच्या लग्न ज्या अटीवर ठरलं त्या अटीची आठवण करून दिली आणि ती तिच्या वाटा धुंडाळायला बाहेर पडली. अर्थात मध्ये अधे ती मुलांची चौकशी करते, वेळ मिळाला तर भेटायला येते, आम्ही सगळे एकत्र बाहेरही जाऊन येतो पण तितकंच, यापुढे ती गुंतत नाही. ह्यात माझीही काही तक्रार नाही. मला मात्र माझी ही दोन पिल्लं, घर सगळं सगळं हवं आहे रे, आणि एक वडील या नात्याने मी ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत निभावेन! एखादी बाई घर आणि कामाची ठिकाणं लीलया सांभाळते rather तिच्याकडून त्या multi tasking ची अपेक्षाच असते सर्वांची! मग मी सांभाळल्या दोन्ही गोष्टी तर कुठे बिघडलं?शिवाय मी ही जबाबदारीपेक्षा आनंदाची गोष्टच मानतो." आनंदने त्याची बाजू जवळपास 'य' वेळा मांडली होती रोहन पुढे. पण रोहन काय इतर कोणालाही झेपणारं नव्हतं हे!ऑफिसमध्ये तर आनंद हा अगदी चेष्टेचा विषय होता!रोहनला आपल्या मित्राबद्दल बोललेलं आवडायचं नाही म्हणून तो परत परत आनंदला समजावू बघायचा पण आनंद मात्र त्याच्या मतांविषयी ठाम असायचा.
त्यामुळं " तुस्सी ग्रेट हो भाई! कुठून आणतोस एवढी positivity !" म्हणत रोहन आनंदला अगदी कोपरापासून हात 'जोडे' आणि तो विषय काही दिवसांपुरता का होईना पण मागे पडायचा!
आनंदलाही ऑफिस मधल्या वातावरणाची , त्याच्याविषयीच्या चर्चांची पूर्ण कल्पना होतीच! त्याला रोहनची कळकळ ही समजायची पण ईतक्या वर्षात तो हे सगळं हाताळायला शिकला होता त्यामुळे तो हसून त्याच्या पाठीवर थाप मारी आणि तो विषय टाळी.
आज तर उशीर व्हायला नको होता म्हणून रोहनला आज नुसतंच हसून निरोप देत आनंद ऑफिस मधून पळाला.
घरी जाऊन त्याने चिऊचं छान आवरलं, तिचे केस बांधायचे, छान कपडे घालायचे असे सगळे नखरे ही झेलले आणि दोघे त्यांच्या लाडक्या दादूच्या स्कूलमध्ये पोहोचले.
कार्यक्रम अगदी छान झाला , मुलांनी मस्त डान्स, नाटूकली सादर केली. आणि दरवर्षी प्रमाणे सर्वांना सर्वात जास्त उत्सुकता असणारा prize distribution चा कार्यक्रम सुरू झाला. ह्या वर्षी 'best behaved child'चे बक्षीस मयंकला मिळाले.
आनंद आणि चिऊने हात दुखेपर्यंत टाळ्या पिटल्या.
सर्व जण खूप कौतुक करत असलेले आनंदने पाहिले
" किती गोड आहे नाही मयंक, अभ्यास, स्पर्धा सगळीकडे भाग घेतो, धडपडतो पण माघार घेत नाही, ह्याची आई काय मेहनत घेत असेल नाही ह्याच्यावर ,कमाल आहे अगदी" शेजारची कुजबुज! , ती कुजबुज ऐकून आनंद सुखावला.
तेवढ्यात मयंकने आपलं बक्षीस घेतलं आणि त्याच्या शिक्षकेने त्याच्या हातात mike दिला,"मयंक , तुला हे बक्षीस मिळालं ह्याबद्दल दोन शब्द बोलशील का?तू शाळेत कसा वागतोस, तुझा अभ्यास कसा पूर्ण करतोस? स्पर्धेत भाग घेत राहतोस हे सगळं तुझ्या मित्र मैत्रिणींना सांग, ह्यातून त्यांना ही शिकता येईल, पुढल्या वर्षी अजून कोणी तरी हे खास बक्षीस मिळवू शकेल." बाईंनी त्याला विनंती केली.
मयंकने ही हसून दुजोरा दिला, "सर्व प्रथम मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि ज्या व्यक्तीमुळे मी हे मिळवू शकलो त्या माझ्या आईला मी stage वर बोलावू इच्छितो."
सगळे पालक मयंकच्या आईला प्रेक्षकांमध्ये शोधू लागले. मयंकने आनंदकडे हात दाखवत त्याला वर बोलावलं. आजूबाजूला कुजबुज वाढली. आनंद ही एक क्षण गडबडला पण हसून तो स्टेज वर जाऊ लागताच "आई" म्हणता आनंद का स्टेज वर जातोय हे नक्की काय प्रकरण आहे असा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
" तुम्हांला सर्वाना खूप आश्चर्य वाटलं असेल ना की आई म्हणून बोलावलं आणि माझा बाबा का आलाय इथे?
कारण ही तसेच आहे, मी फार लहान असल्या पासून बघतोय माझ्या मित्र मैत्रिणींना , शाळेची मिटिंग असो, पिकनिक असो, एखादी परीक्षा असो, किंवा अगदी रोजचा शाळेत आणण्याचा टिफिन ; सगळ्या आया इतक्या जागरूकपणे ही काम निभावायच्या की बस्स! पण माझ्या घरात ही सगळी कामे माझा बाबाच करत आलाय अगदी न चुकता आणि न कंटाळता! त्यामुळे माझ्या साठी आणि माझ्या बहिणीसाठी आमचा बाबाच आमची 'आई' आहे !
तेव्हा हा पुरस्कार माझ्या ह्या लाडक्या आईसाठी!"
मयंकचे हे दोन शब्द संपेपर्यंत पूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं होतं .त्या टाळ्यांमध्ये आनंदाचं कौतुक होतं, त्याच्या मुलांच्या विचारांचं अप्रूप होतं आणि 'आई' ही केवळ हाक न राहता तो एक स्वभावगुण असू शकतो आणि त्याला कुठल्याही स्त्री/पुरुष कुंपणाची बंधनं बांधून ठेवू शकत नाहीत ही जाणीव देखील होती!
अखेर आनंदला त्याच्या postivity चा स्रोत सापडला होता!
✍️ सौ बीना समीर बाचल
वरील कथा सौ बीना समीर बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.