हिंदोळा

 हिंदोळा

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

दिवेलागणीची वेळ होती. बाहेरच्या ढगाळ हवेमुळे एक प्रकारचा उदासपणा चोहीकडे भरून गेला होता. मीनाताई खुर्चीवर स्तब्धपणे बसल्या होत्या. पुढ्यात असलेल्या डायनिंग टेबलवर त्यांचा मोबाईल पडला होता. खरंतर त्यांना त्याच्याकडे ढुंकूनही बघावेसे वाटत नव्हते. पण तरीही थोड्या वेळाने त्यांनी तो नकळत हातात घेतला. सराईतपणे त्याचा स्क्रीन अनलॉक करून, त्यांनी फेसबुक उघडले. स्क्रीनवर दिसणारी सोहमची पोस्ट त्या पुन्हा एकदा वाचू लागल्या.

" सर्वांना कळविण्यास मला अत्यंत आनंद होतो आहे की, येत्या काही दिवसात मी माझी "स्पोर्ट्स मेडिसिन सर्जरी रेसिडन्सी" सुरू करत आहे.
प्रांजली ..... तुझ्याशिवाय हे खरच अशक्य होतं.... या सगळ्या क्लिष्ट प्रक्रियेत तू कायम माझ्या मागे राहिलीस .....
एखाद्या पर्वतासारखं माझ्यामागे राहिल्याबद्दल तुझे आभार ....
खरंच मला न मागता एवढं चांगलं कुटुंब लाभलं ....
तुझं माझ्याबरोबर असण, आणि माझ्या करिअर साठी तू केलेल्या असंख्य तडजोडी, या सगळ्यामुळे तर हे फळ मिळालं आहे .....
आणखी काय लिहू ?
या सगळ्यासाठी मी कायम तुझ्या ऋणात असेन ...
थँक्यू वन्स अगेन ...."

अश्रुंचे दोन थेंब स्क्रीन वर पडले आणि मीनाताई भानावर आल्या. नकळत आणि नको असतानाही त्यांना हुंदका फुटला. खरं तर त्यांनी मन अगदी वज्रासारखं घट्ट करायचं ठरवलं होतं ..... पण त्यांचा तो दृढ संकल्प वादळातल्या पालापाचोळ्यासारखा भिरकावला गेला होता.... एकामागोमाग एक येणाऱ्या हुंदक्यांनी त्यांचे शरीर गदगदून गेले. मनसोक्तपणे त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. थोड्यावेळाने भावनांचा बहर ओसरला आणि त्या शांत झाल्या.
बाहेर आणखीनच अंधारून आलं होतं. खरं तर दिवे लावायला हवे होते, पण त्या तशाच अंधारात बसून राहिल्या. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकत त्यांचे मन भूतकाळात कधी शिरले ते त्यांनाही कळले नाही.

सोहम .... मीनाताई आणि सुहासरावांचं एकुलते एक अपत्य .... थोडं उशिराच झालेलं .... सुहासरावांचं उत्पन्न तसं बेताचंच ..... प्रायव्हेट कंपनीतील कारकुनाला असा किती पगार असणार ? जेमतेम भागत होतं ... पण दोघांच्याही आयुष्याच एकमेव उद्दिष्ट सोहमच करिअर हेच होतं .... तो थोडा मोठा झाला आणि त्यांचे खर्च वाढले. शाळा, प्रायव्हेट ट्यूशन, ग्राउंड, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज , पैशाला वाटा फुटायला आणखी काय पाहिजे ?
मग मीनाताईंनीही पैसे मिळवण्यासाठी शिवणकाम सुरू केले. बाळपणापासून असलेली शिवणकला कामास आली....
नाही म्हटले तरी संसाराला हातभार लागू लागला. हा हा म्हणता सोहम मोठा झाला. जात्याच असलेल्या हुशारीमुळे शाळेत पहिला येण्याचा शिरस्ता, त्याने कॉलेजमध्येही कायम ठेवला आणि सहजपणे मेडिकलला ऍडमिशन मिळवली. त्यादिवशी अक्षरश: आकाश ठेंगणे झाले होते मीनाताई आणि सुहासरावांना .... इतकी वर्ष जीवापाड केलेल्या कष्टांचे चीज झाले होते.

घड्याळात रात्रीचे आठ वाजल्याचे ठोके पडले आणि मीनाताई भानावर आल्या. खरं तर आता उठून भाताचा कुकर लावायला हवा होता. पण आज हाता पायातलं त्राणच गेलं होतं. त्या उदासपणे तशाच बसून राहिल्या. घड्याळात ठोके पडायचे थांबले आणि पुन्हा त्याची टिक टिक सुरू झाली. अव्याहतपणे होणारी ती टिक टिक ऐकता-ऐकता मीनाताई पुन्हा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलू लागल्या.

ऐन तारुण्यात मीनाताईंनी आणि सुहासरावांनी कुठलीच हौस मौज केली नव्हती. ओळखीची समवयस्क जोडपी जोडीनं सिनेमाला जायची, हॉटेलमध्ये जेवायची, सुट्टीच्या दिवसात ट्रिपा करायची ... यापैकी काहीच मीनाताईंच्या नशिबात नव्हते. त्यांच्या नशिबी होते अपार कष्ट ... रात्र-रात्र जागून करायचं शिवणकाम ! पण मीनाताईंना त्याची फारशी खंत वाटत नसे .... सोहम कडे बघितलं की त्या सगळे कष्ट विसरत असत. सुहासरावांची गोष्ट ही काही फार वेगळी नव्हती. दोघेहीजण सोहमच्या यशातच स्वतःचा आनंद शोधत होते ... सोहम मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता तेव्हा सुहासराव खूप आजारी पडले. डॉक्टरांनी दोन्ही किडन्या खराब झाल्याचं निदान केलं. खरं तर सुहासरावांना खूप आधीपासून हा त्रास सुरू झाला होता. पण त्यांनी कधीच तपासण्या करून घेतल्या नाहीत. काही आजार निघाला तर बरे होण्यासाठी लागणारा खर्च कसा करणार या भीतीने .... आजाराचं निदान झालं त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. खूप रडल्या होत्या मीनाताई तेव्हा..... सुहासरावांनी त्यांना शपथ घातली होती ... खर्च होईल आणि सोहमच्या शिक्षणासाठी पैसे उरणार नाहीत या भीतीने तपासण्याच केलेल्या नव्हत्या हे सोहमला न सांगण्याची.....
त्यांनी घातलेली शपथ मोडली असती तर बरं झालं असतं.... मीनाताईंच्या मनात आलं. निदान आईबापांनी आपल्यासाठी केलेला त्याग त्या कृतघ्न पोराला कळला तरी असता !!

" कृतघ्न " आपल्या मनात नकळत आलेल्या त्या शब्दाचे मीनाताईंना खूप आश्चर्य वाटले .... माझ्यापेक्षा त्याची बायको त्याला प्रिय आहे म्हणून मला तो कृतघ्न वाटतोय का ? पण त्याने आईबापांच्या कष्टाची जाणीव नको होती का ठेवायला ? त्या पोस्टमध्ये तो माझा व यांचा उल्लेख तर नक्कीच करू शकला असता .... मोबाईलचा रिंगटोन वाजला तशा मीनाताई भानावर आल्या. कामवाल्या बाईचा फोन होता. उद्या कामाला येणार नाही एवढं सांगून तिनं फोन ठेवला. मीनाताईंना आणखीनच उदास आणि खचल्यासारखे वाटू लागलं. आता या उतारवयात कोणीतरी आधार देणार असतं तर किती बरं झालं असतं .... हक्काचं माणूस तर कधीच गमावलं होतं ! आणि ज्याच्यासाठी गमावलं तोही आता परका झाला होता ...
मीनाताईंना आठवलं ..... सोहम शेवटच्या सेमिस्टरला होता तेव्हा प्रांजली सोहम बरोबर घरी आली होती. खरं तर ती कॉमर्स साईडची, पण कुठल्यातरी समारंभात तिची व सोहमची ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मीनाताईंशी ओळख करून घ्यायची म्हणून प्रांजली घरी आली होती. मात्र त्यावेळचे तिचे वागणे मीनाताईंना चांगलेच खटकले होते. बोलताना वाक्यावाक्यात तिचा गर्विष्ठपणा डोकावत होता. मधूनच सोहमवरही ती रुबाब करत होती. ते दोघ भेटून घराबाहेर पडले, तेव्हाच मीनाताईंनी मनोमन तिला नाकारायचे ठरवले होते. तिला सोडून परत घरी आल्यावर त्यांनी ताबडतोब सोहमला ते बोलूनही दाखवले, पण तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सोहम वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

सोहम एमबीबीएस झाला आणि लगेच प्रांजलीच्या आईवडिलांनी लग्नाचा प्रस्ताव पुढे ठेवला. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याकारणाने त्यांनी लेकीचे लग्न अगदी धुमधडाक्यात करून दिले. लग्नानंतर सोहम आणि प्रांजलीसाठी तिच्या वडिलांनी नवीन फ्लॅट घेऊन दिला. प्रांजलीने मीनाताईंना नवीन घरी राहायला यायचा खूप आग्रह केला. पण तो आग्रह फक्त वरवरचा आणि दिखाव्यासाठीचा होता हे न कळण्याइतक्या दूधखुळ्या मीनाताई नक्कीच नव्हत्या.. लग्नानंतर राजाराणीचा संसार सुरू झाला आणि मीनाताई त्यांच्या संसारातून एखाद्या खड्यासारख्या बाहेर फेकल्या गेल्या. आता आयुष्यात उरल्या होत्या फक्त जुन्या आठवणी.....

सोहम लहान होता तेव्हा आईशिवाय त्याचे पान हलायचे नाही. मित्रांबरोबर बाहेर खेळत असला तरी थोड्या थोड्या वेळाने घरी परत यायचा .
"का रे सारखा सारखा येतो आहेस ?" मीनाताई विचारायच्या.
" तू आहेस ना ? कुठे गेली तर नाहीस ना ? हे बघायला आलो होतो." असं निरागसपणे सांगून पुन्हा खेळायला पळायचा.
मीनाताईंना पुन्हा हुंदका फुटला ... आता आई दुःखात जळत असताना मात्र त्यांचा लेक बायकोबरोबर मजा करण्यात मशगुल होता... का झाला सोहम मोठा ? मला तो तसाच बाळकृष्णा सारखा छोटा आणि निरागस राहायला हवा होता..... मीनाताईंच्या मनाने टाहो फोडला. नकळत त्या पुन्हा मुसमुसू लागल्या. बाहेर कसलातरी मोठा आवाज झाला आणि मीनाताई भानावर आल्या. खाली रस्त्यावर बहुतेक कुठल्यातरी गाडीचा टायर फुटला असावा. चटकन उठून मीनाताईंनी घरातले दिवे लावले. देव्हाऱ्यात देवापुढे मनोमन हात जोडून त्यांनी सांजवात लावली. वॉश बेसिनपाशी जाऊन त्यांनी चेहऱ्यावर गार पाण्याचे हबके मारले. नॅपकिनने चेहरा पुसून त्यांनी बाहेरच्या खोलीत पाऊल ठेवले आणि त्यांचे लक्ष सुहासरावांच्या फोटोकडे गेले. हसतमुख चेहऱ्याने जणू सुहासराव फोटोतून मीनाताईंकडे बघत होते. मीनाताईंच्या चेहऱ्यावरही हास्य विलसले !!

जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहून मनाला त्रास करून घेण्यापेक्षा पुन्हा एकदा नव्या उमेदीने राहिलेल्या आयुष्याला सामोरे जायचे त्यांनी मनोमन ठरवले.
दूर कोठेतरी रेडिओवर रफी सुरेल आवाजात गात होता,
"जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया।"
" जो खो गया मै उसको भूलाता चला गया।"
" मै जिंदगी का साथ निभाता चला गया।"
" हर फिक्र को धुवेमे उडाता चला गया।"

© मिलिंद अष्टपुत्रे

वरील कथा मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post