चष्मा बदल

 चष्मा बदल 

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

नुकताच मॉर्निंग वॉक करून आलेल्या वीणाताई हॉलमधील सोफ्यात विसावल्या होत्या. सकाळी आलेले ताजे वर्तमानपत्र गरम चहाचे घुटके घेत घेत वाचायला वीणाताईंना खूप आवडायचं. कुठलीतरी इंटरेस्टिंग बातमी वाचण्यात गुंग असताना, कोणीतरी समोर उभे असल्याची जाणीव त्यांना झाली. वर्तमानपत्रातून डोकावून बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मुलगा शैलेश समोर उभा होता.

" काय रे शैलेश ? असा का उभा आहेस ? काही काम होतं का माझ्याकडे ?" वीणाताईंनी शैलेशला विचारले. अस्वस्थपणे शैलेशने डोळ्यांवरील चष्मा काढला आणि स्वतःच्या बनियने पुसून पुन्हा घातला. 

"आई ... अग रोज सोसायटीच्या बागेतील बाकावर बसून इतका वेळ तू रवी काकांशी काय बोलत असतेस ? मी बघत असतो आपल्या बाल्कनीतून ... चांगलं दिसतं का या वयात असं वागणं ? लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर !! " शैलेश त्राग्याने म्हणाला आणि वीणाताईंनी पुढे काही बोलायच्या आत आतील खोलीत निघून गेला. वीणाताईंनी एक खोल सुस्कारा सोडला. कपात उरलेल्या चहाचा शेवटचा घोट घेत त्या भूतकाळात हरवल्या.

  अगदी लहानपणी शाळेत असताना वर्गातल्या मुलांबरोबर गप्पा मारण्यात वेळ घालवला की त्यांचे वडील त्यांना असेच ओरडायचे. त्या ओरड्याबरोबर क्वचित एखादा धपाटाही त्यांना खावा लागायचा. इतकेच काय कधी कधी शिक्षा म्हणून त्यांना रात्रीचे जेवण सुद्धा मिळत नसे. मुलांशी बोलणं ही वाईट गोष्ट आहे. मुलींनी फक्त मुलींशीच मैत्री करायची असते हे अगदी तेव्हापासून त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं ... 

त्यानंतर कॉलेजच्या रंगीबेरंगी दिवसांमध्येही त्यांना वडिलांच्या धाकामुळे कोणा तरुणाशी मैत्री करणं जमलं नव्हतं ... 

पदवी मिळताच वेळ न घालवता वडिलांनी स्थळे पाहण्यास सुरुवात केली आणि लगेचच त्यांचा विवाह संतोषरावांबरोबर झाला. संतोषरावांचा प्रिंटिंग प्रेसचा बिझनेस होता. सिझनच्या काळात प्रेस मध्ये इतकं काम असे की ते आठवड्याच्या आठवडे घरी फिरकतच नसत.  घर भाड्याचे आणि दोनच खोल्यांचे ... त्यात सासू, सासरे आणि लग्न न झालेली धाकटी नणंद ... नवीन जोडपे असूनही सहवास सुख शून्य होते. त्यातून स्वभावानं संतोषराव अगदी ऑर्थोडॉक्स होते. सासू-सासरेही जुन्या विचारांचे आणि वळणाचे .... घरातील सर्व स्त्रियांनी मर्यादेतच राहण्याची रीत होती. कॉलेजमध्ये घालत असलेल्या पंजाबी सलवार कमीजलाही सासरी स्थान नव्हते. लग्नानंतर त्यांना साडी चिकटली ती कायमचीच ... कधीतरी विमनस्कपणे स्वतःचेच वेगवेगळ्या पोशाखातील जुने फोटो बघून वीणाताई समाधान मानायच्या. नाही म्हणायला संतोषरावांच्या काही मित्रांच्या कुटुंबाबरोबर उन्हाळी पर्यटनात त्यांनी मनमोकळ्या गप्पा गोष्टी केल्या होत्या, वेगवेगळे ड्रेस घालून फोटोही काढले होते, पण ते त्या सहली पुरतेच ...  

सासरी परपुरुषांची बोलणं चालायचं नाही. अगदी शेजारी रहात असलेल्या कुटुंबातील पुरुष मंडळींशी चार शब्द हसून बोलले तरी सासूबाई अबोला धरत असत ... जसं काही सून काहीतरी पाप कर्म करून आल्यासारखा त्यांचा चेहरा असे ... संसाराला हातभार म्हणून वीणाताई नोकरी करायच्या. सुदैवाने एका सरकारी बँकेतील नोकरी त्यांना लग्नानंतर लगेच मिळालेली होती. तेथे त्या पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून काम करायच्या. ती नोकरी हाच खरं तर त्यांचा विरंगुळा होता. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत बँकेत त्यांचा वेळ छान जात असे. बँकेतील सर्व सहकारी मंडळींमधून त्यांना अगदी जवळचे मित्र आणि मैत्रिणी मिळाल्या होत्या. त्यांनी बँकेतील नोकरी खरोखरच खूप एन्जॉय केली होती.

  बँकेतील सहकाऱ्यांमध्येही स्त्री पुरुष मैत्री बाबत त्यावेळी खूप चर्चा चालायची. मात्र चर्चेच्या शेवटी " स्त्रीचा खरा मित्र हा तीचा नवराच असतो "... असे शिक्कामोर्तब तिच्या सर्व मैत्रिणी करत असत ... त्यातच या निष्कर्षाला पुरुष सहकारीही माना डोलवून संमती द्यायचे ,पण वीणाताईना मात्र व्यक्तिशः पटत नसे ... खरच एक स्त्री तिच्या नवऱ्याबरोबर सगळं काही शेअर करू शकते ? मनातल्या काही गोष्टी शेअर करायला मित्र-मैत्रिणीच लागतात असं त्यांना मनापासून वाटायचं ... 

नोकरी करताना पब्लिक रिलेशन ऑफिसर या नात्याने त्यांना ऑफिस स्टाफ खेरीज इतर वेगवेगळ्या लोकांशी रोज बोलायला लागे, त्यामुळे त्या पुरुषांची सहजतेने बोलू शकत ... त्यांच्या महिला सहकार्यांना त्यामुळे त्यांची असूया वाटत असे.

" तुला बरं बाई पुरुषांशी बोलायला जमतं ... आम्हाला काय बोलावं तेच कळत नाही ... तोंडाला कोरडच पडते." त्या म्हणायच्या. नोकरीच्या शेवटच्या काही दिवसात तर वीणाताई बँकेच्या मुख्य प्रबंधकाच्या पीए होत्या त्यामुळे विविध स्तरातील अनेक नामवंत व्यक्तींशी त्यांना कायम संवाद साधावा लागत असे.

निवृत्तीनंतर वीणाताईंना  खरा निवांत वेळ मिळू लागला. मध्यंतरीच्या काळात वृद्धापकाळाने सासू सासरे निवर्तले होते. धाकट्या नणंदेचा सुस्थळी विवाह झाला होता. भाड्याच्या घरातून स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्थलांतर झाले होते. उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीचे लग्न चांगल्या घराण्यात झाल्याने तिचीही चिंता नव्हती. मुलगा शैलेश सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचा प्रेमविवाह त्याच्याच ऑफिसमधील रागिणी नावाच्या मुलीशी झाला होता. वीणाताईंना पेन्शन असल्याने आणि संतोषरावांनी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले व्याज येत असल्याने पैशांची चिंता अजिबात नव्हती. आता दोघांनी मिळून जग भ्रमंती करण्याचा विणाताईंचा मानस होता, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अल्पशा आजारात संतोष रावांचे अकाली निधन झाले आणि वीणाताई अगदी एकाकी पडल्या. जेव्हा जीवाभावाच्या जोडीदारा बरोबर खऱ्या अर्थाने सहजीवनाची वेळ आली त्याचवेळी तो आयुष्यातून निघून गेला होता. खरं तर त्या आघाताने वीणाताई खचून गेल्या होत्या. त्यांच्या आयुष्यात काही राम उरला नव्हता. काही वेळा जीवन संपवण्याचे टोकाचे विचारही त्यांच्या मनात येत असत. पण मग हळूहळू त्या सावरल्या म्हणतात ना काळ हे सगळ्या दुःखांचे औषध आहे. जोडीदाराच्या सहवासाची ओढ त्या मित्र-मैत्रिणींमध्ये शोधू लागल्या. हळूहळू मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप तयार झाले. त्या रहात असलेल्या सोसायटीतही त्याच्या मैत्रिणींचा एक ग्रुप होता. या मैत्रिणींबरोबरच सोसायटीतील काही समवयस्क पुरुष मंडळींशीही त्या हसून खेळून बोलत असत. कधीतरी त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन पाच सात मिनिटे त्यांच्याबरोबर हास्यविनोद करायला त्यांना आवडत असे. क्वचित प्रसंगी सर्व मंडळींसाठी त्या कॉफी सुद्धा मागवायच्या. गेल्या वर्षी पावसाळ्यात वर्षा सहल आयोजित करून सगळ्यांनी खूप धमाल केली होती.  या सगळ्याचा त्यांचा मुलगा शैलेश असा काही अर्थ काढेल असं त्यांना बिलकुल वाटलं नव्हतं ...

  दारावरची बेल वाजली आणि वीणाताई भानावर आल्या. दार उघडण्यासाठी त्या बसल्या जागेवरून उठणार एव्हढ्यात आपल्या खोलीतून शैलेश बाहेर आला आणि दार उघडून त्याने दूधवाल्याने दिलेली पिशवी घेतली. दार बंद करून तो किचनकडे निघाला होता तोच वीणाताईंनी त्याला थांबवले. शेजारील टेबलावर दुधाची पिशवी ठेवून तो वीणाताईंसमोर उभा राहिला.

" शैलेश तू मघाशी मला जे बोललास त्याचं उत्तरही ऐकून जा ... तुझे बाबा काही वर्षांपूर्वी गेले आणि एक विचित्र असा रिकामेपणा माझ्या आयुष्यात भरून राहिला. समवयस्क मित्र मैत्रिणींचा सहवास एवढाच विरंगुळा राहिला. रवी काका आणि तुझे बाबा चांगले मित्र होते हे तर तू जाणतोसच ... माझ्याशीही ते कायम छान गप्पा मारतात. त्यांची पत्नी आणि तुझे बाबा आता हयात नाहीत. पण म्हणून आम्ही पूर्वीसारख्या गप्पा मारणं सोडलं नाही. आणि का सोडावं ? 

आज तुझ्या बोलण्यातून तुझे विचार ऐकल्यावर एक आई म्हणून मी स्त्री-पुरुष समानतेबाबत तुझे मत बनवण्यासाठी काहीच केले नाही म्हणून मला स्वतःचाच राग आला. तुला ऑफिसमध्ये मैत्रिणी आहेत. तुझी बायको रागिणी तिच्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर तासंतास फोनवर बोलत असते, आणि मी मात्र दहा मिनिटे रवी काकांशी बोलले तर तो तुला अक्षम्य गुन्हा वाटतो ?" आलेला हुंदका दाबण्यासाठी वीणाताई बोलायच्या थांबल्या. पुढे उभ्या असलेल्या शैलेशने अस्वस्थपणे डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि पुन्हा एकदा स्वतःच्या बनियने पुसला.

" कसं आहे ना  शैलेश ... आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो त्याच रंगाची दुनिया आपल्याला दिसते. लाल, पिवळी, हिरवी .... पण दिसतं तसं नसतं ! आत्ता सुद्धा तू तुझा चष्मा सारखा पुसतोयस ... तुझा नंबर बदलला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुला तुझा चष्मा बदलण्याची गरज आहे म्हणजे आजूबाजूचं सगळं काही स्वच्छ दिसायला लागेल ..." उपरोधिकपणे म्हणत त्यांनी पुन्हा वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात केली. चष्म्याच्या आडून मारलेला टोमणा ऐकून आवाक झालेल्या शैलेशने नकळत पुन्हा चष्मा काढून बनियनला पुसल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नव्हते.

© मिलिंद अष्टपुत्रे

तुम्हाला ही कथा आवडेल. 👉 त्या दोघी

वरील कथा मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post