बंद लिफाफा

 बंद लिफाफा

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

शांभवी कपाट रिकामं करून आपली बॅग भरत होती. पुढच्या आठवड्यात तिचे लग्न मग नवीन घरी जाणार. हवं असलेलं सगळं सामान तर नेलं पाहिजे ना सोबत. इतक्या वर्षात कपाटात लपवून ठेवलेल्या एक एक चीजा बाहेर निघत होत्या. एक टोकदार कावळ्याचे पंख, जाळीदार पिंपळपान, पहिले वाहिले प्रेमपत्र जे कोपऱ्यावरच्या सौमित्रने दिले होते. (आता तो सौमित्रच तिचा नवरा होणार होता म्हणा.) आवडत्या म्हणून लपवून ठेवलेल्या बांगड्या, एक ना दोन तर अनेक वस्तू. प्रत्येक गोष्ट हाताळून थोडा विचार करून शांभवी ती एक तर बॅगेत भरायची किंवा बाजूच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकायची. प्रत्येक वस्तूसोबत जोडल्या गेलेल्या आठवणी मात्र उसळून वर यायच्या. त्यामुळे चार तास झाले तरी तिचे काम काही उरकले नव्हते. जवळपास सगळं आवरलं होतं. तरी खात्री करावी म्हणून तिने ड्रॉवर पूर्ण बाहेर काढला. तर एक लिफाफा खाली पडला. ड्रॉवरच्या खाली ठेवला की लपवला होता तो. नीट पाहिले तर त्यावर शांभवीच्या आईचे म्हणजे नीरजाचे नाव होते. लिफाफा अजूनही सीलबंद होता. पण इतके दिवस पडून राहिल्याने त्याचा कुबट वास येत होता. आईने न वाचताच का बरं हा लपवला असावा. विचार करतच तिने बाहेरचा कानोसा घेतला. नीरजा फोनवर कुणाला तरी आमंत्रण देत होती. शांभवीने लिफाफा आपल्या डायरीत ठेवला आणि डायरी उशीखाली सरकवून दुसरी कामं करायला बाहेर पडली. 


रात्री शांभवीला त्या लिफाफ्याची आठवण आली. उठून तिने तो हातात घेतला. आईच्या नावे आलेले ते पत्र फोडावे की नको अशा द्विधा मनस्थितीत असताना शेवटी एकदा वाचून पहावे कदाचित साधे एखादे असावे या विचाराने तिने ते उघडले.


'प्रिय नीरजा,

आता तुला प्रिय म्हणावे की नाही असे धर्मसंकट पडले होते. पण तू मला प्रिय आहेस आणि राहशील असा मनाने कौल दिला म्हणून प्रिय म्हणायचे धाडस करतोय.'


मायना आणि पहिला परिच्छेद वाचून शांभवी बुचकळ्यात पडली. न राहवून तिने पत्राखालची 

सही पाहिली.


'तुझाच शंतनु'


अक्षरशः दचकलीच शांभवी. म्हणजे बाबा कधी कधी नशेत जे बोलायचे ते खरं होतं की काय! बाबा नेहमीच आईबद्दल तिच्या अपरोक्ष भलतंच काहीतरी सांगायचे. सुंदर आणि वडिलांपेक्षा जास्त कमावत्या आईने कसं काय वडिलांना होकार दिला याचे तिला नेहमी आश्चर्य वाटायचे. त्यामुळे शांभवीसुध्दा नीरजाकडे एका विशिष्ट नजरेने पाहायची. फारसं काही सख्य नव्हतं मायलेकीत. पाहता पाहता शांभवीने पूर्ण पत्र वाचले. ज्या वडिलांना ती आदर्श मानायची त्यांनी कधी काळी केलेल्या वर्तनाचा पाढा वाचून तिला मनस्वी वाईट वाटले. 


शंतनु म्हणजे तिचा मावस काका, तिच्या वडिलांचा मावस भाऊ. या काकाचे घरी जेव्हा केव्हा नाव निघे तेव्हा एरवी आदर्शवत असणारे तिच्या वडिलांचे वागणे बदलून जायचे. अतिशय खालच्या पातळीवर उतरून शिव्या द्यायचे ते काकाला. त्यांच्या वागण्या बोलण्यातून शांभवीला इतके कळले की हे काका चांगले नसावेत. किंवा त्यांनी आपल्या बाबांचे काहीतरी मोठे नुकसान केले असावे. पण एखाद्या समारंभात वगैरे ते काका दिसायचे तेव्हा त्यांच्या आजूबाजूला जमणारा गोतावळा, त्यांचे सुसंस्कृत बोलणे, वागणे बघून पुन्हा संभ्रम निर्माण व्हायचा. कुठेतरी खूप मोठ्या पदावर होते म्हणे ते.  शांभवीची आजी असेपर्यंत काका अधून मधून घरी यायचे, खूप सारा खाऊ, शांभवीसाठी कपडे, खेळणी वगैरे घेऊन. पण जशी आजी गेली काकांचे येणे बंद झाले. 


शंतनुच्या आईचे अकाली निधन झाल्यावर त्याच्या मावशीने म्हणजे शांभवीच्या आजीने त्याला आपल्या घरी आणले. शंतनु आणि सुरेश समवयीन एकत्र शिकतील, राहतील हा हेतू होता तिचा. पण आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत वरचढ असलेल्या शंतनुचा सुरेश हेवा करायचा. बालपणातील हेवा मोठेपणी अढीमध्ये बदलला.  शंतनुला आवडलेला शर्ट याला हवा असायचा, शंतनुच्या ताटातील आंब्याची फोड याला गोड लागायची इतकंच काय शंतनुच्या डोक्याला तेल लावणारी आईही याला खुपायची. शंतनुकडे असणारी प्रत्येक गोष्ट माझ्याकडेच असली पाहिजे असा त्याचा अट्टाहास होता. मावसभाऊ असूनही आश्रितासारखे वागवयाचा सुरेश त्याला. फक्त ही एकच गोष्ट मनात ठेवून शंतनु एक एक पायरी वर जात राहिला. आपल्या कष्टाने  मोठ्या पदावर विराजमान झाला. याउलट अभ्यासात ठीकठाक असणारा सुरेश वडिलांच्या पुण्याईवर बँकेत क्लार्कच्या पदावर चिटकला. 


कॉलेजला असतानाच छोटी मोठी काम करून शंतनु वेगळा राहायला लागला. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर त्याने स्टाफ लोन घेऊन छानसा बंगला विकत घेतला. पण मावशीचे आयुष्यातील योगदान तो विसरला नाही. वास्तुशांती मावशीच्या हातूनच केली. 

"बाळा आता तुला नोकरी आहे, स्वतःचे घर झाले. एक गृहस्वामिनी तेवढी आण म्हणजे तुझ्या आईला दिलेल्या वचनातून मी मुक्त होईन." मावशी बोलून गेली. 

त्याचवेळेस शंतनुच्या डोळ्यात आलेली चमक आणि गालावरचे स्मित पाहून सुरेश सजग झाला. त्यातील गुपित त्याला उलगडले. सलग आठवडाभर पाळत ठेवल्यावर त्याच्या हाती काही तरी लागले. आपल्याच वयाचा आपला भाऊ जीवनात इतका पुढे निघून गेला आणि आपण बसलोय खर्डेघाशी करत याचा त्याला कुठेतरी सल होता. 

एक दिवस बँकेतून येताना सुरेश आईच्या आवडीची मिठाई घेऊन आला. त्या मिठाईबरोबर गोड बोलून त्याने आपले म्हणणेही आईच्या गळी उतरवले आणि येणाऱ्या रविवारीच नीरजाच्या घरी सुरेश आणि आई स्थळ पाहायला जाऊन ठेपले. 

नीरजा... सुंदर, सालस एका कंपनीत नोकरी करणारी तरुणी. कुठेतरी ओळख झाली होती तिची आणि शंतनुची. काही महिन्यांत दोघेही मनोमन एकमेकांना जीवनसाथीच्या रुपात पाहू लागले. हेच शंतनुचे गुपित जे सुरेशच्या हाती लागले होते. जुने होते ते दिवस. मुलींना स्वतःसाठी स्वतःच वर शोधण्याची अनुमती बिलकुल नव्हती. अगदी न सांगता नाही पण धाकदपटशा दाखवून किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून मुलींना आई वडिलांनी निवडलेल्या स्थळाला होकार द्यावाच लागे. एखादी प्रवाहाविरुद्ध जाण्याची हिंमत करू पाहे पण आपल्यामागे दुसऱ्या बहीण भावाच्या लग्नात अडथळे येतील या विचाराने पाऊल मागे घ्यावे लागे. 

शंतनुमध्ये नकार द्यावे असे काहीच नव्हते पण मुलीने लग्न परस्पर ठरवणे आणि घरच्यांनी मान्यता देणे म्हणजे अगदीच अशक्य. त्यापेक्षा समोरून चालून आलेले स्थळ, फक्त मुलगी आणि नारळ मागणारे. अजून काय हवे तीन मुली आणि दोन मुलं पदरात असलेल्या बापाला.

नीरजा आणि शंतनुने गुपचूप लग्न करायचे ठरवले. दोघांनी गुपचूप तयारी सुरू केली. नीरजा बॅग भरून तयार होती. इकडे सुरेशच्या लग्नाची तयारी सुरू होती. अगदी आठवड्याभरातला मुहूर्त धरला होता. 

"शंतनु बाळा उद्या घरी येशील का? नवरीचा शालू पोहोचवून येशील, म्हणजे त्यांना ब्लाऊज वगैरे शिवायला बरं पडेल. तसंही तू मुलगी पाहायला आला नाहीस, कोणत्या कार्यक्रमाला आला नाहीस. यानिमित्ताने बघशील तरी एकदा तुझी होणारी वहिनी कशी आहे." 

मावशीचा फोन आल्यावर शंतनु नाही म्हणू शकला नाही. दुसऱ्या दिवशी तो शालू घेऊन सांगितलेल्या पत्त्यावर निघाला. टॅक्सी त्या घराबाहेर थांबताच आपल्याला हार्ट अटॅक येतोय का असे त्याला वाटले. 

'सुरेशच्या बायकोचे नावही नीरजाच आहे... म्हणजे माझी नीरजाच माझी वहिनी होणार की काय!'

धडधडते अंतःकरण घेऊन तो घरात गेला. नीरजा त्यावेळी घरी नव्हती. कुठेतरी केळवणाला गेली होती. पण घरात असणारे तिचे फोटो वगैरे त्याची अशुभ शंका खरी असल्याचे ओरडून सांगत होते. शालू देऊन तो कसाबसा घरी पोहोचला. आल्या आल्या सुरेशने छद्मी हसत विचारलेच, "कशी वाटली शंतनु तुझी होणारी वहिनी?"

"बघितली नाही रे, कुठेतरी बाहेर गेली होती वाटतं. घरी तिचे आई वडील आणि भावंडं होती फक्त." शंतनुने शांत स्वरात उत्तर दिले.

 "मावशी असं अचानक आठवड्याभरात लग्न... कुणी सुचवले ग हे स्थळ?" अगदी सहज सुरात त्याने विचारले.

"अरे कुणी सुचवले नाही. तुझ्याकडून आलो वास्तुशांती करून आणि चार पाच दिवसात सुरेश म्हणू लागला, ही अशी अशी मुलगी आहे. मला आवडली. तिच्याशीच लग्न करेन वगैरे. तरी मी म्हटलं की आताच कुठे स्थिरस्थावर होतोय तू. पाहू एखाद्या वर्षाने तर म्हणे मग खूप उशीर होईल. आजकाल चांगल्या मुली कुठे मिळतात वगैरे. म्हटलं इतकं म्हणतोय तर पहायला काय हरकत आहे. जमलं, झालं." 

शंतनुला सगळा उलगडा झाला. भावाने दावा साधला होता. लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत तो लग्नघरी धावपळ करत होता. ताण सहन न होऊन त्याने सुरेशला जाब विचारला. सुरेशने सहज मान्य केले की त्याने असं मुद्दाम केलं होतं. शंतनुने मावशीला सगळं सांगायचा विचार केला पण सुरेशचे एक वाक्य ऐकून त्याने तो विचार सोडून दिला. लग्नाच्या दिवशी मात्र अर्जंट आलेल्या कामाचे निमित्त करून गावाबाहेर निघून गेला. इकडे नीरजा मात्र त्याची वाटच पाहत राहिली. ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलेलं असतं तिने ऐनवेळेस प्रतारणा करण्यासारखं दुःख नसतं. नंतर जेव्हा तिला शंतनु सुरेशचे नातं समजलं तेव्हा तिला अजून वाईट वाटले. आपण चुकीच्या माणसावर प्रेम केलं असेच तिला वाटत राहिले. जो माणूस स्वतःसाठी उभा नाही राहू शकत तो काय आपली कठीण काळात साथ देईल असेच तिला वाटले. ती कधीच शंतनु समोर आली नाही. आधी त्याच्यावरील रागामुळे आणि नंतर सुरेशच्या संशय घेण्यामुळे. एका सुंदर नात्याला कधी योग्य क्लोजर मिळालेच नाही. त्या बंद लिफाफ्यात नीरजाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. कधी काळी आलेलं ते पत्र न उघडताच तिने कधी हाती येऊ नये अशा ठिकाणी ठेवलं होतं. 

पत्र वाचून शांभवीला नीरजाच्या वागण्याचा अर्थ लागू लागला. शांभवी - सौमित्रच्या नात्याबद्दल कळताच खूप रागावली होती ती. हरेक प्रकारे त्याची परीक्षा घेतल्यावर, शब्दश: असंख्य वेळा त्याच्याशी बोलून खात्री पटल्यावरच तिने लग्नासाठी मान्यता दिली होती. 

"सानू अगं आई आहे तुझी मी. इतकी वर्षे तुझ्या बाबांसारख्या संशयपिशाच्च्याबरोबर घालवल्यावर प्रत्येक मुलावर संशय तर मी घेणारच ना. प्रेमाचं नाटक करुन मुलींना फसवणाऱ्या मुलांना चांगलंच ओळखते मी." आई म्हणाली होती. त्या शब्दांचा अर्थ आता शांभवीला लागत होता. 


"आई शंतनुकाकांची काही चूक नव्हती ग तेव्हा. बाबांनी दुसरा मार्गच नाही ठेवला त्यांच्यासमोर." डायनिंग टेबलवर नाश्ता करताना शांभवी म्हणाली तसं चहा घेऊन येणाऱ्या नीरजाच्या हातातील कप खाली पडला. 

"तू... तू काय म्हणालीस?" अविश्र्वासाने तिने विचारले.

"तेच जे तू ऐकलं. आई ये इथे बस जरा. हे वाच म्हणजे तुला समजेल." हातातील पत्र देत शांभवी म्हणाली. वाचता वाचता नीरजाचे डोळे भरुन आले. 


'नीरजा, अनाथपण मोठं वाईट असतं ग. आई असताना ज्या गोष्टी मावशीकडून हक्काने घ्यायचो त्या घेताना नंतर उपकार घेतल्यासारखे वाटायचं. अगदी सणावाराला नवे कपडे घालतानाही सुरेश म्हणायचा, शांत्या माझ्या आईने घेतलेत हे कपडे तुला. आम्ही पोसतोय म्हणून जगतोय वगैरे. 

मी सुरेशला विचारलं तर तो म्हणाला फक्त तुला आवडते या एकाच कारणासाठी मी तिच्याशी लग्न करतोय. पळून जाऊन लग्न करण्याचा विचारही नको करुस. कारण तसं केलंस तर त्या मुलीच्या कुटुंबाची बदनामी तर होईलच शिवाय तुझ्या मावशीला वाटेल कसला साप आपण पाळला होता. आपल्याच होणाऱ्या सुनेला घेऊन पळाला. खूप विश्वास आणि प्रेम आहे तिचं तुझ्यावर... सगळं मातीमोल होईल.

नीरजा, जर मावशी नसती तर मी राहिलोच नसतो. माझी मावशी मला देवाच्या जागी आहे. तिला दुखवण्याचे पाप करण्यापेक्षा मी तुझा गुन्हेगार म्हणून जगणं स्वीकारलं.' पत्रातून शंतनु संवाद साधत होता.

"सानू खरंच ग, त्याचीही अशी काही बाजू असेल असा विचार तर मी कधीच केला नाही. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मी देत होते आणि तो स्वतःला दोषी मानत राहिला. बेटा एक काम करशील? शंतनु काकांचा पत्ता शोधून त्यांना निमंत्रण देशील? मला माफी मागायची आहे त्यांची." भावनातिरेकाने आपले थरथरणारे हात स्थिर करण्याचा प्रयत्न करत नीरजा म्हणाली. शांभवीने आईचे हात आपल्या हाती घेतले. शांत स्वरात तिने उत्तर दिले.

"हो आई नक्की करेन... पण एक सांगू का आलेले लिफाफे आणि मन दोन्हीही वेळेवर उघडायचे असतात. नाहीतर उगाच ते गुदमरत राहतात." 

हाच धडा शांभवीने स्वतःही गिरवला. आईबद्दलचे मनातील आकस काढून टाकला.


समाप्त


✍️ सविता किरनाळे 


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post