दुखावलेली

 दुखावलेली 

✍️ सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

"अहो आज संध्याकाळी जेवायला काय बनवू?" गाडीची चावी सोहमच्या हाती देताना अंजलीने सहज विचारले. 

"बनव जे वाटेल ते, तसंही तू काहीही बनवलं तरी ते बेचवच असणार आहे." सोहम चावी घेऊन सरळ घराबाहेर पडला. अंजली काही न बोलता दार बंद करून पुढील कामाकडे वळली. लग्न होऊन आठ महिने झाले होते पण सोहम अंजलीच्या पाणउतारा करण्याची एक संधी सोडत नव्हता. त्याच्या मनाविरुद्ध झालेलं लग्न होतं त्यांचं आणि त्याची शिक्षा अंजलीला मिळत होती. 


सोहम सातपुते इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता. पण त्याने नोकरी करण्याचा पारंपरिक मार्ग न चोखाळता निरनिराळ्या मशिन्सच्या स्पेअर पार्टस विक्रीचे दुकान सुरू केले होते. धंदा चांगला सुरू होता. काही दिवसात सोहम त्याची गर्लफ्रेंड रितिकाला घरी घेऊन जाणार होता, आई वडीलांना भेटावयाला. 


रितिका हाय सोसायटी गर्ल होती. तिची आणि सोहमची कॉलेजपासूनची मैत्री होती. सोहम तिच्यावर भरपूर खर्च करत असे म्हणून ती त्याला चिटकली होती. सोहमच्या वडिलांना या सगळ्याची कल्पना होती, त्यांचे केस उन्हाने पांढरे झाले नव्हते. म्हणूनच त्यांनी सोहमचे काहीही न ऐकता आपली मित्राची मुलगी अंजली बरोबर त्याचे लग्न करून दिले.


अंजलीने सोहमशी जुळवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती पण दिवसेंदिवस त्याचा उद्धटपणा वाढतच चालला होता. त्याला तिच्या हातचे जेवण आवडत नसे म्हणून तिने कुकरी क्लास करून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घातले. (पुरुषाच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो म्हणे...)  लेटेस्ट फॅशनचे कपडे परिधान करून अट्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करून पाहिले. रुसून माहेरी जाऊन पाहिले. थोडक्यात तिने संसार वाचवण्याचे जवळजवळ सगळे उपाय करून पाहिले पण पालथ्या घड्यावर पाणी.  सासरे वडिलांचे मित्र असल्याने तिला माहेरीही काही बोलता येत नव्हते. चांगली सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली मुलगी इकडे आड तिकडे विहीर अशा अवस्थेत होती. पण याचा तिच्या शरीरावर मात्र नकळत परिणाम होत होता. अंजलीला pcos ची लक्षणं जाणवू लागली होती. तिचे वजन वाढू लागले, चेहऱ्यावर मुरुम, लव वाढू लागली. अंजलीने ट्रीटमेंट सुरु केली होती. ती औषधं घेऊ लागली. जमेल तसा व्यायाम, आहारविहार पाळू लागली. पण म्हणावा तसा फरक पडत नव्हता. कारण डोक्यावरचा ताण तिला manage करता येत नव्हता.


दुसरीकडे सोहम मात्र अजूनही रितिकाच्या संपर्कात होता. अजूनही तिच्यावर भरमसाठ खर्च करत होता.

"सोहम, अजून किती दिवस मी वाट पाहायची, मला नाही वाटत आपलं पुढे काही होईल म्हणून." हॉटेलमध्ये सोहमच्या कुशीत पहुडलेली रितिका त्याच्या उघड्या छातीवरून बोट फिरवत म्हणत होती. 

"बेबी करेन मी काहीतरी. तू काळजी करू नकोस. We are meant for each other." सोहम तिच्या मोकळ्या केसांत हात फिरवत म्हणाला. 


"काल रात्री पप्पांचा फोन आला होता. तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना. कुठे होतात तुम्ही दोन दिवस. काही सांगून ही नाही गेलात." जेवल्यानंतर सोहमच्या हाती बडीशेप देताना अंजली म्हणाली. 

"गेलो होतो मन शांत करायला कुठेतरी. तुझ्यासारखी हिडिंबा बायको म्हणून नशिबात आली तर बिचारा पुरुष काय करणार? तू स्वतःचं तोंड बघितलंय का ग हल्ली आरशात. चक्क दाढी मिशा दिसायला लागल्यात. म्हणे कुठे होतात रात्री!"


आज मात्र सोहमने कहर केला होता. बिचारी अंजली...  एकतर अतिताणामुळे औषधं ही लागू पडत नव्हती. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था झाली होती. शेवटी न राहवून तिने तिची मैत्रिण मुग्धाला कॉल केला. 

"आहे हे असं आहे. मला तर सुचतच नाही काय करू ते. माहेरी जावं तर पप्पा मम्मीला त्रास. सासरी बिचारे सासू सासरे खूप चांगले आहेत. त्यांनाही दुखवाव असं वाटत नाही ग."

"मूर्ख मुली, तू काहीच स्टँड न घेऊन स्वतःच्या हाताने नुकसान करुन घेतलं आहेस. आता तरी जागी हो. एकटीच सहन करण्यापेक्षा तुझ्या आणि त्याच्या आई वडीलांना समोर बसवून सगळं सांगून टाक. बघ ते काय म्हणतात. आणि एक सांगते जर काही समाधानकारक उपाय नाही निघाला तर तू सरळ माझ्याकडे निघून ये. संसार वाचवण्याची जबाबदारी फक्त स्त्रीचीच नसते. समोरून जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर दगडावर डोकं आपटून फायदा नाही. उलट आपलंच डोकं फुटतं."

मुग्धाचं बोलणं अंजलीला पटले. तिने लगेच दुसऱ्या दिवशी सासुसासरे आणि आईवडिलांना एकत्र बसवून अथ पासून इतिपर्यंत सांगितलं. 

"तुला इतका त्रास होता तर तू का कधीच काही बोलली नाहीस?" वडील संतापले होते.

"पप्पा होईल सगळं ठीक या आशेवर होते मी. प्रत्येक नात्याला आणि माणसाला थोडा वेळ तर द्यावा लागतो ना रुळायला. मी ही दिला. पण कालचे यांचे बोलणे ऐकून मला आता खात्री पटली की मी कितीही प्रयत्न केले तरी हे नातं नाही निभावता येणार." स्वतःच्या वडीलांना शांत करत अंजली म्हणाली.

"सोहम चुकतोय, आम्ही त्याला समजावू. तू त्याला एक संधी दे फक्त." सासरे म्हणाले.

"पण शंभर टक्के चूक सोहमची आहे असंही म्हणता येणार नाही. मनामध्ये दुसरीच कुणी असताना जर मारून मुटकून बोहल्यावर उभं केलं तर चूक घरच्यांचीही असते. पप्पा तुम्हाला यांचं प्रेमप्रकरण माहीत असून तुम्ही हे लग्न लावलं. कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल पण तुमच्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही एक संधी मागताय पण लग्न झाल्या दिवसापासून अनेक संधी तर देतेय मी. स्वीकारणं, सुधारणे तर दूरच पावलोपावली माझा अपमान तेवढा केला जातो. झाली तेवढी फरफट बस झाली. मला या नात्यातून मुक्त करा. मला माझं आयुष्य जगू द्या." आज सासऱ्यांना सडेतोड उत्तर देताना अंजली कचरली नाही. ते ही काही बोलू शकले नाहीत कारण त्यांचेच नाणे खोटे होते. 


ठरवल्याप्रमाणे अंजली घर सोडून मुग्धाकडे गेली. तिने स्वतःवर मेहनत घ्यायला सुरू केली. डायटेशियनच्या सल्ल्याने घेतलेला योग्य आहार, डॉक्टरांची ट्रीटमेंट, व्यायाम, कौन्सेलिंग यामुळे तिचा PCOS रिव्हर्स झाला. आत्मविश्वास वाढला. मुग्धाच्या मदतीने तिला एका स्टार्टअपमध्ये नोकरीही मिळाली. नवीन ज्ञान आत्मसात करून, जुन्या नव्याची सांगड घालून तिने त्या कंपनीला दोन वर्षात शिखरावर नेऊन पोहचवले. आता ती तिथे फक्त एक एम्प्लॉइ नव्हती तर पार्टनर झाली होती. आत्मविश्वासाच्या आंतरिक तेजाने झळाळून उठली होती. मधल्या काळात सोहमने पाठवलेल्या घटस्फोटाच्या पेपरवर तिने क्षणात सही केली होती.


आज चार वर्षानंतर एका पॉश कॅफेमध्ये अंजलीला पुन्हा सोहम दिसला. खरं तर तिने त्याला एन्ट्री करतानाच पाहिले होते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती लॅपटॉपवरील कामात गुंतली. काही क्षणात अंजलीसमोरील खुर्ची ओढली गेली आणि त्यावर कुणीतरी येवून बसले. 

"हाऊ रुड!" म्हणत रागातच अंजलीने वर पाहिले. समोर सोहम होता. त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचे हसू होते. पण अंजलीचा कोरा चेहरा पाहून त्याचे हसू लोपले. 

"हॅलो", सोहमने अभिवादन केले.

"येस, काय काम आहे?" त्याच्या अभिवादनाकडे दुर्लक्ष करत तिने विचारले.

"तुझ्याकडे काही काम नाही, एका व्यक्तीला भेटायला आलो होतो. तू समोर दिसलीस म्हणून..."

"अनोळखी व्यक्तीशी बोलताना सलगी करू नये, तिच्या परवानगीशिवाय तिने बुक केलेल्या जागेवर बसू नये इतकेही manners नाहीत का तुमच्यात मिस्टर?" त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच तिने फटकारले. ते पाहून सोहम दचकला. 

'हीच का ती अंजली जिची माझ्यासमोर मान वर करायची हिंमत नव्हती.' विचार करतच तो तिथून उठला आणि दुसऱ्या रिकाम्या टेबलावर जाऊन बसला. बसल्या बसल्या तो तिचे निरीक्षण करू लागला. बेबी पिंक रंगाचा फॉर्मल शर्ट, काळी ट्राऊजर, बाजूच्या खुर्चीला लटकावलेला कोटही त्याला दिसला. खांद्यापर्यंत येणारे व्यवस्थित सेट केलेले केस, माफक मेकअप आणि गळ्यात रुळणारे लहानसे हिऱ्याचे लखलखते मंगळसूत्र... खूपच सुंदर दिसत होती ती, अगदी परफेक्ट.

'हम्म चांगला पैसेवाला गटवलेला दिसतोय हिने.  फिगर पण छान मेन्टेन ठेवलीय. कदाचित आधीचा कोणी आशिक असावा म्हणून तर लगेच घटस्फोट दिला.' कुजकट हसत सोहम विचार करत होता.

'माझ्या आयुष्याची वाट लावून ** कशी मजेत बसलीय दुसऱ्याला बकऱ्याला गटवून. ही निघून गेली म्हणून बापाने माझ्यासोबतचे संबंध तोडले. करोडोच्या दौलतीमधून बेदखल केलं. ती ** रितिका, पैसा असताना बेबी बेबी करत मागे मागे फिरायची. माझ्याकडून काहीही मिळणार नाही हे लक्षात येताच सरळ पतिव्रता बनून लग्न करून अमेरिकेला निघून गेली. बघू आजचा शेवटचा प्रयत्न करून. आताचा इंटरव्ह्यू चांगला झाला, नोकरी मिळाली तर ठीक नाहीतर जावं लागेल बापासमोर नाक घासायला. पण ही अंजली इथे काय करतेय, तीही माझ्यासारखी इंटरव्ह्यूसाठी आलीय का?'

समोरच्या टेबलावर उसने अवसान आणून बसलेल्या सोहमला पाहून अंजलीला खरं तर मनातून बरं वाटत होतं. त्याच्या आयुष्यात काय झाले हे वडिलांकडून तिला समजले होतेच. त्याच्यासोबत काढलेलं वर्ष तिला दहा वर्षांसारख वाटत होतं. योग्य वेळी बाहेर पडून स्वतःचे विश्व उभे केले म्हणून. नाहीतर आजही ती त्याच्या सुधारण्याची वाट पाहत खितपत पडली असती.

 दारातून आत येणाऱ्या व्यक्तीकडे अंजलीची नजर गेली आणि तिचा चेहरा उजळला. रुबाबदार पावलं टाकत विक्रम, तिचा नवरा, तिच्याजवळ आला. कॅफेमध्ये असणारी प्रत्येक मुलगी त्याक्षणी असूयेने अंजलीकडे पाहत होती. विक्रम शास्त्री, तरुण उद्योजक आणि तरुणाईचा आदर्श, अंजलीचा बिझनेस पार्टनर आणि जीवनसाथी. 

त्याला पाहताच सोहमच्या डोक्यात प्रकाश पडला. तो विक्रमलाच भेटायला आला होता. कोणाच्या तरी ओळखीने विक्रमने त्याला भेटायला इथे बोलावले होते.  विक्रमची बायको त्याची बिझनेस पार्टनर असल्याची गोष्ट त्याला माहीत होती. पण ती अंजलीच आहे याची त्याला कल्पना नव्हती. काही क्षणात विक्रम आपल्याला कॉल करेल आणि अंजली समोर आपलं हसू होईल त्याआधीच इथून निघून जावा असा विचार करत सोहम उठला. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. समोरच्या टेबलावरून रिंगचा आवाज येताच कॉल कट करून विक्रमने हात हलवून सोहमला जवळ बोलावले. नाईलाजाने सोहम उठून त्याच्याकडे आला. विक्रमला त्याने अभिवादन केले. 

"अंजू हा रोहन कारखानीसचा क्लासमेट आहे. आपल्याकडे वेकन्सीज आहेत ना त्यासाठी..."

"अं हो विकी, फक्त ज्युनिअर इंजिनिअरची पोस्ट रिकामी आहे. हवं तर ती ऑफर करू शकतोस. बाकी सगळ्या पोस्ट्सवर आत्ताच मी योग्य कँडिडेट्स अपॉइंट केले आहेत." अंजली निर्विकारपणे म्हणाली. विक्रम तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिच्या लॅपटॉपवर तिने टाइप केलेलं सोहमचे पूर्ण नाव पाहून मात्र त्याला सगळा उलगडा झाला. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरले आणि त्याने मान डोलावली. 

"मिस्टर सोहम सातपुते हो ना, ॲक्च्युअली तुमच्यासाठी माझ्या कंपनीत अजिबात जागा नाही. पण तुम्ही नकळत का होईना माझ्यावर एक उपकार केला आहे. म्हणून तुम्हाला एक जागा मी दाखवू शकतो आय मीन ऑफर करू शकतो, ज्युनिअर इंजिनियरची. हवी असेल तर उद्या ऑफीसला येऊन एचआरला भेटा. बाय द वे मीट माय लाईफ अँड बिझनेस पार्टनर अंजली. तुम्ही जर हिच्यासोबत चांगलं वागला असतात तर कदाचित आम्ही, आणि ही कंपनी राहिली नसती. Anyways हिऱ्याला सोन्याचेच कोंदण हवे नाही का? जाऊ दे मी पण कोणासमोर बोलत बसलोय. तुम्ही जाऊ शकता." 

बाहेर पडणाऱ्या सोहमला मात्र आपल्या आईचे बोलणे आठवत होते, एक स्त्री आपला संसार वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आणि इतकं करूनही त्यात तिला अपयश आले की ती दुखावलेली नागिण बनते, तिच्या वाटेला गेलं की डसणारच.

समाप्त 

✍️ सविता किरनाळे

या लेखिकेच्या अनेक सुंदर कथा आमच्या शब्द चाफा या चॅनलवर उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.

खालील फोटोवर क्लिक करा आणि पाहा या लेखिकेची दुसरी एक कथा.



वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post