पाठीवर हात ठेवून

 पाठीवर हात ठेवून...!

✍️ श्री. संभाजी बबन गायके सर बसची वाट बघत बसथांब्यावर उभे होते. पण आज सरांसोबत इतर कुणीही प्रवासी नव्हते. आज बस येण्यास तसा उशीरच लागणार होता. तासाभरापूर्वीच्या मुसळधार पावसानं रस्ता चिखलानं माखलेला होता. बसथांब्यापासून जवळच एक रिक्षा उभी होती पॅसेंजरच्या प्रतिक्षेत. एरव्ही गर्दी असली की रिक्षेत पाच-सहा सीटं कोंबून घेऊन जाण्याची रिक्षावाल्या दादाला तशी सवयच होती. पण आज बसथांब्यावर एकच माणूस उभा होता. बसला पावसामुळे उशीर लागतोय तेंव्हा हा प्रवासी आपल्याला निश्चित विचारणार याची रिक्षावाल्या दादाला खात्रीच होती. पण एकट्यासाठीच रिक्षा करायची म्हणजे जादा पैसे द्यावे लागतील, याची सरांना कल्पना होती. महिना अखेरीचे दिवस होते. पगार मिळायला अजून अवकाश होता. तेवढ्यात पावसाची आणखी एक जोरदार सर आली आणि गेलीसुद्धा. बसथांब्यावर उभे राहिल्यावर ऊन, वारा, पाऊस यांपासून सुरक्षित राहण्यासारखं बसथांब्यांचं डिझाईन सहसा आपल्यकडे का नसतं याचा विचार करत सर अंग चोरून उभे होते. बसथांब्यासमोर एक पांढरी आलिशान कार येऊन उभी राहिली. कार मधील व्यक्ती सरांकडे एकटक पाहत होती. पत्ता विचारण्यासाठी कुणी बाहेरगावचा मनुष्य थांबला असावा. कारच्या नंबरप्लेटवरून ती कार इथली नव्हती हे सरांनी ओळखलं. आता हा कारवाला आपल्याला पत्ता विचारणार असे रिक्षावाल्या दादाला जास्त वाटले! गुगल मॅपचा जमाना येण्याआधीची ही गोष्ट आहे. कारच्या चालकाने कार बसस्टॉपच्या आणखी जवळ आणली. मागे बसलेली व्यक्ती कारमधून पायउतार झाली. पण तो मनुष्य रिक्षावाल्याकडे न वळता बसथांब्यावर उभ्या असलेल्या सरांकडे चालत जाऊ लागला. त्याच्या अंगावर असलेल्या पांढ-या,उंची सूटवर चिखलाचे शिंतोडे उडत होते. खरे तर त्याने कार मध्ये बसूनच पत्ता विचारला असता तरीही तो आपण सांगितला असता, असे सरांना वाटून गेले! रिक्षावाल्याला मात्र हा पत्ता विचारण्यासाठी कारमधून खाली उतरला याचा आनंद वाटला होता.!


तो मनुष्य आता सरांच्या अगदी समोर उभा होता. तेवढ्यात बस आली. आता यांना पटकन पत्ता सांगावा आणि बसकडे पळावं असं सरांना वाटून गेलं. पण तो मनुष्य काही बोलायचं नाव घेत नव्हता. सरांनी एकदा बसकडे पाहिले आणि ते तिकडे निघणार इतक्यात त्या मनुष्याने पायातले बूट काढले. सॉक्सही काढून बुटात ठेवले,गुडघ्यावर बसून सरांच्या चिखलमाखल्या चपला असलेल्या पायांवर डोके ठेवले! प्रवासी बसकडे येत नाही हे पाहून आधीच घाईत असलेल्या बसचालकाने बस पुढे दामटली होती. आपल्या पायांवर त्या मनुष्याने डोके ठेवले हे पाहून सर दचकून आणि काहीसे संकोचून मागे सरले. “अहो,हे काय करताहात?” असे भाव सरांच्या सुरकुतलेल्या चेह-यावर उमटले.


तो मनुष्य उठून उभा राहिला. “ओळखलंत का सर,मला?” कुसुमाग्रजांनी अजरामर करून ठेवलेल्या ओळी त्याच्याही मुखातून बाहेर पडल्या. या ओळी म्हणणाराही पावसातच आलेला होता...योगायोगानं! सरांनी डोळ्यांवरील चष्म्याच्या काचा रूमालानं पटकन पुसल्या आणि त्या मनुष्याच्या चेह-याकडे पाहिलं. नुकतंच मोतीबिंदुचं ऑपरेशन झालं होतं उजव्या डोळ्याचं आणि पुढच्या सहा महिन्यात डाव्याही डोळ्याचा मोतीबिंदू काढायचा होता. “साहेब, मी दिलगीर आहे,पण मला काही संगती लागत नाहीये!” सर म्हणाले. इंग्लिशवर मजबूत पकड असलेले सर व्यवहारात मात्र अस्ख्लित मराठीत बोलायचे.


  “सर,मी प्रभाकर. प्रभाकर राहुरीकर. पभ्या म्हणायचे सगळे मला शाळेत. तुम्ही मला इंग्लिशला होतात शाळेत....सहावी ड चा वर्ग सर. सगळ्यात वांड मुलांचा!” प्रभाकरने एका दमात सर्व सांगून टाकलं...वर्गात घाईघाईत हजेरी द्यावी तसे!

तालुक्यातून शहरात येऊन सरांना किमान तीस वर्षे उलटून गेली होती. ग्रामीण भागात विद्यार्थी शिक्षकांशी शिकत असताना भले कसेही वागोत, मात्र पुढच्या आयुष्यात कधी भेट झालीच तर खाली वाकून नमस्कार केल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. सरांना त्यामुळेच एखाद्या विद्यार्थ्यानं असं भर चिखलात गुडघ्यावर बसून आपल्या पायांवर डोके ठेवणं सवयीचं नव्हतं.


प्रभाकरनंच पुढं सांगायला सुरूवात केली. प्रभाकरचे वडील वारले तो सहावीत असतानाच. बिचारे भूमिहीन शेतमजूर होते. प्रभाकरच्या आईनंच पुढं संसाराचा गाडा ओढायला सुरूवात केली. प्रभाकर वांड मुलांच्यात राहून अभ्यासात मागे पडत होता. सहामाहीत चार विषयांत नापासचा शिक्का बसल्यावर शाळेने त्याच्या आईला शाळेत बोलावून घेतलं. प्रभाकरच्या इतरही ब-याच तक्रारी होत्याच. हेडमास्तरांनी आईसमोरच प्रभाकरच्या कानशीलात भडकावली आणि इथून पुढं अभ्यास केला पाहिजे, अशी तंबी दिली. प्रभाकरच्या आईनं “तु आता सुधारला नाहीस तर मी माहेरी जाऊन राहीन, तुझं तू बघ” अशी रडत-रडत धमकी दिल्यानं प्रभाकर बावरून गेला. दोघं मायलेक व्हरांड्यातून शाळेच्या बाहेर पडत असतानाच आपला तास संपवून सर शिक्षक-कक्षाकडे निघालेले होते. प्रभाकरने त्यांच्याकडे पाहिलं. प्रभाकर इंग्लिशमध्ये काठावर पास होता. प्रभाकरच्या आईच्या डोळ्यांतले पाणी पाहून सरांनी त्यांना थांबवलं. त्या माऊलीनं बिचारीनं सरांना सारी कर्मकहाणी सांगितली. सासरचे लोक कसे छळताहेत, प्रभाकर कसा वागतो हे सगळं बोलून घेतलं.


“प्रभाकर, का रे असं?” म्हणत सरांनी प्रभाकरच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला आणि उद्या शाळा भरायच्या आधी माझ्या खोलीवर येऊन जा असे सांगून सर शिक्षक कक्षाकडे निघून गेले. प्रभाकर दुस-या दिवशी तासभर आधीच सरांच्या खोलीपाशी जाऊन दारात उभा राहिला. सर स्टोव्हवर स्वयंपाक करीत होते. त्यांनी त्याला आत बोलावले. सरांची पत्नी बहुदा माहेरी गेलेली होती. खोलीतल्या भिंतीवर एक तसबीर लटकत होती. सरांच्या स्वर्गवासी आईची असावी, प्रभाकरने तसबीरीतल्या फोटोखाली लिहिलेली कै.श्रीमती.....ही अक्षरे वाचून ते ओळखलं. 


सरांनी दोन थाळ्या घेतल्या. प्रभाकरला खाली बसवलं आणि त्याच्यापुढे भाजी भाकरी असलेली थाळी सरकवली. “खा,सावकाश. आई लवकर शेतात जाते ना? असं म्हणत सरांनीही चार घास खाऊन घेतले, स्वत:चा डबा भरला आणि प्रभाकरचाही. प्रभाकरला काही समजेना. “प्रभाकर, ही फोटोत आहे ना ती माझी आई आहे.....म्हणजे होती! माझेही वडील तुझ्या वडीलांसारखेच लवकर गेले. मीही तुझ्याएवढाच होतो तेंव्हा आणि तुझ्यासारखाच होतो. तुझी आई जसं तुला सांगते ना तसंच माझी आईही सांगायची. मग मला माझ्या एका शिक्षकांनी योग्य रस्त्यावर आणलं...कधी मार देऊन तर कधी प्रेमानं. मी शिकलो, शिक्षक झालो...आईला तिच्या उतारवयात जमेल तेवढं सुख दिलं. आता ती नाही या जगात!”


प्रभाकरला पुन्हा कधी काही सांगावं लागलं नाही. सर प्रभाकरसाठी रोजचा दुपारचा डबा घेऊन यायचेच शाळेत....कुणाला समजणार नाही अशा बेतानं प्रभाकरला द्यायचे. शाळा सुटल्यावर अभ्यासाला प्रभाकर सरांच्याच खोलीवर जाई. सहावीचं वर्ष सरलं आणि सरांना शहरातल्या चांगल्या मोठ्या शाळेत ऑफर आली. त्यानंतर सरांची आणि प्रभाकरची भेट व्हायचं काही कारण नव्हतं.


आज तीस वर्षांनंतरही आता सरांना प्रभाकर आठवला. “सर,मी जमेल तसा अभ्यास केला. इंजिनियर झालो. गावाशेजारीच स्वत:चे वर्कशॉप उघडले. लग्न केलं,आईला सुख दिलं तुम्ही तुमच्या आईला दिलं तसं. माझी आईही आता फोटोत आहे....पण तिचा चेहरा हसरा दिसतो!


सरांनी आता मात्र प्रभाकरला मिठी मारली. मोतीबिंदू असलेल्या डोळ्यातूनही मोत्यासारखे अश्रू ओघळत होते त्यांच्या डोळ्यातून. “सर, एका क्लायंटला भेटायला शहरात आलो होतो, तुम्ही अचानक दिसलात बसस्टॉपवर. सर,चला घरी सोडतो.” प्रभाकर म्हणाला. “नको, माझं घर तुझ्या रस्त्यावर नाही. आडबाजूला आहे. मी जाईन बसने.” प्रभाकरने खूप आग्रह केला पण सर नकोच म्हणाले.

 त्याने सरांच्या हातावर त्याचं विजीटींग कार्ड ठेवलं, "सर,माझ्या घरी नक्की यायचं, फोन करा, गाडी पाठवतो” आणि त्यांना पुन्हा एकदा नमस्कार करून,हाता बूट मोजे घेऊन प्रभाकर कार मध्ये बसला आणि सरांकडे पहात-पहात पुढे निघून गेला.


सरांची बस तर केंव्हाच निघून गेली होती. दुसरी बस आता कधी येणार कुणास ठाऊक? रिक्षावाला दादा वाटच पहात होता, त्यालाही रिकामं घरी जाणं परवडणारं नव्हतं. आज तसा काही धंदा झालेला नव्हता त्याचाही. सर नाईलाजाने रिक्षेत बसले. किती पैसे होतील? हे विचारांच्या नादात सर रिक्षावाल्याला विचारायचे विसरले होते. रिक्षा घराच्या कोप-यावर पोहोचली, सर खाली उतरले, पैशांचं पाकीट काढून आता हा किती पैसे सांगतोय या विचारात असतानाच, रिक्षावाला दादा रिक्षेतून खाली उतरला, त्याने पायातल्या चपला काढल्या,रस्त्यावर चिखल होता. त्याने गुडघ्यावर बसून सरांच्या पायांवर डोकं ठेवलं. सर चमकून मागे सरकले. “पैसे नकोत साहेब. मी काही खूप शिकलेलो नाही. पण कारमधून उतरून सुटाबुटातला माणूस तुमच्या पाया पडतो, ते सुद्धा चिखलात पायातले बूट-मोजे काढून...म्हणजे तुम्ही कोणतरी मोठा माणूस असणार, हे समजलं मला!” आणि पटकन रिक्षा सुरू करून तो निघूनही गेला! सर घरात शिरले...भिंतीवर लटकवलेल्या फोटोतल्या त्यांच्या आईच्या चेह-यावर आज नेहमीपेक्षा जास्त हसू होतं!


समाप्त

✍️ श्री.  संभाजी बबन गायके


वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post