राहू दे हात हाती गुंफलेले

 राहू दे हात हाती गुंफलेले!

✍️ श्री. संभाजी बबन गायके 

सकाळी साडेसात वाजता त्याने तिला “चल,उठ! असं दटावूनच बेडवर बसतं केलं. तिचा डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर घेतला,उजवा हात हलकेच कमरेवर ठेवून तिला बाथरूममध्ये नेलं. “नको आज आंघोळ! कंटाळा आलाय! आंघोळीसाठी परत हे पायावर बांधलेलं पॅड काढा,आंघोळ झाल्यावर पुन्हा घाला! खूप दुखतो पाय! आणि सुरेखा आल्यावर तिनं घातली असती की मला आंघोळ. रोज तुम्हीच आंघोळ घातली पाहिजे का मला?”

ती असं म्हणते तेंव्हा त्याच्या चेह-यावरचे न बोलता उमटणारे ‘आपल्या माणसासारखं कुणी बाहेरचं माणूस करतं का?” हे भाव तिला सवयीचे झाले होते!


  गेली पाच महिने यात खंड पडला नव्हता...तो स्वत: दोन दिवस आजारी पडला तेंव्हा त्यानं तिचं अंग गरम कपड्यानं पुसून दिलं होतं...तेवढाच काय तो आंघोळीत खंड!

“असू दे! काही नाही होत!” त्याने तिचं ऐकलं नाही नेहमीप्रमाणे. बाथरूममधल्या प्लास्टीकच्या स्टूलवर तिला बसवलं पाय थोडेसे लांबवून. तो स्वत: तिच्या शेजारी एका थोड्या उंच स्टुलवर बसला. “आज तुझे केस धुतले पाहिजेत!” असे म्हणत त्याने बादलीतील ऊन-ऊन पाणी तिच्या गळत गळत कमी कमी होत चाललेल्या केसांवर अलगदपणे घालायला सुरूवात केली. “फार गरम नाही ना पाणी?” तिने त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच “नाही!” असं म्हटलं लहान मूल आईला म्हणतं तसं!


  तिला तिचे काहीच वर्षांपूर्वी असलेले लांबसडक केस आठवले. ती लहान असताना तिची आई कंटाळून जायची तिची वेणी-फणी करताना. त्याने तिला अगदी निगुतीने न्हाऊ घातलं. दुख-या पायावर दोन तांबे जास्तीचे घातले गरम पाण्याचे..पण पाण्याचा चटका बसू नये अशा बेतानं...गरम पाणी आधी आपल्या उपड्या तळहातावर पडेल आणि मग तिच्या पायावर याची अर्थातच त्याने काळजी घेतलीच होती. तिला कपडे कसे घालायचे हे त्याने शिकून घेतले होते. 


“आम्हां बाप्याचं बरं असतं...निदान कपड्यांच्या बाबतीत तरी!” त्याने नेहमीसारखंच पुन्हा एकदा म्हटलं! तिला सावकाश बाथरूममधून बाहेर आणलं, आरशासमोर अलगद बसवलं. ड्रायरने केस कोरडे करून दिले लागलीच. बाहेर पहाटपासूनच खूप थंड वारं वहात होतं, केसांत पाणी राहिलं तर सर्दी व्हायची उगाचच. केसांना तिच्या आवडीचं थोडं तेल चोपडलं,कंगवा फिरवला..केस चापून-चोपून बसवले. पावडर लावली कपाळ, दोन्ही गालांना आणि कपाळाच्या मधोमध लाल टिकली दाबून चिकटवली. तिला लहानपणी टिकली लावलेली आवडायची नाही...पण आता ती मुकाट लावून घेते...त्याला आवडते म्हणून!


आता पायावर लांबलचक आणि तशी जड असलेली कॅप गुंडाळायची वेळ आली. “फार घट्ट नका ना बांधू. पाय एकदम बधीर होतो.” तिने नेहमीची तक्रार केली आणि “नाही बांधत फार घट्ट!” असं ठरलेलं उत्तर दिलं आणि कॅप जेवढी घट्ट बांधायला पाहिजे होती तेवढी घट्ट बांधलीच! डॉक्टरांनी पेशंटशी कसं बोलायचं आणि हवं तसंच कसं करून घ्यायचं हे त्याला कित्येक वर्षांच्या अनुभवाने पक्कं जमून गेलं होतं.


त्याने हॉलमधल्या सोफ्यावर तिला आरामशीर बसवलं आणि तिच्यापुढे ब्रेकफास्ट ठेवला. खाऊन झाल्यानंतर घ्यायच्या गोळ्या एका स्वच्छ प्लेटवर ओळीने ठेवल्या आणि तिचं खाऊन होईपर्यंत तो तिच्याजवळ बसून राहिला. नॅपकीनने तिचे ओठ पुसून घेतले. रिमोटने टीव्ही चालू करून तिच्या आवडीचं चॅनेल सुरू करून दिलं! त्याला स्वत:चं आवरून क्लिनिकमध्ये जायचं होतं. त्याने डेकेअर नर्सला फोन केला. एक नर्स दिवसभर घरी थांबायची हिला सोबत म्हणून.


“फार वेळ थांबू नका क्लिनिकमध्ये! घराजवळच क्लिनिक आहे, तुम्ही काय असताच दुपारपर्यंत सेवेला तयार म्हणून तुमचे पेशंट येत राहतात आणि तुम्ही शेवटचा पेशंट होईपर्यंत क्लिनिक बंद करायचं नाव घेत नाही! नशीब हल्ली गावातल्या क्लिनिकमध्ये तुम्ही आठवड्यातून चारच रात्री जाताय ते...तुमचं अगदी मध्यरात्र उलटून जाईपर्यंत पेशंट घेत राहणं आणि केंव्हातरी पहाटे येऊन आंघोळ करून, थोडं जेवून झोपणं काय आजचं थोडंच आहे?!” स्टेथोस्कोप,टॉर्च आणि त्याचा स्वत:चा औषधांचा पाऊच आणि मोबाईल घेऊन तो क्लिनिकला निघाला तेंव्हा तिने त्याला ऐकवलं. दोघांमधला हा संवाद वाक्यरचनेतील थोड्याफार फरकाने तसा नियमित झडणारा होता.


सूज आलेल्या पायांत त्याने दरवाजाजवळच्या स्टूलवर टेकून स्वच्छ शूज घातले, दरवाजा उघडला. हलकेच बाहेर गेला आणि दरवाजा लावून घ्यायला दरवाजाकडे तोंड केले...ती त्याच्याकडेच पहात होती...नेहमीसारखीच! “बाय! आलोच!” असं म्हणून तो मागे वळणार इतक्यात त्याच्या खिशातला मोबाईल वाजला. रिंगटोन ओळखीचीच असल्याने त्याने मोबाईलवरचे हिरवं आयकन क्लिक केलं आणि फोन कानाला लावला. वयोमानामुळे ऐकायला थोडंसं कमी होत चालल्याने त्याने मोबाईलचा आवाज तसा चढाच ठेवला होता. सातासमुद्रापल्याडून त्याची लाडकी नात ईशिता बोलत होती...हॅपी बर्थडे ग्रॅन्पा! यु हॅव टर्न्ड सेवेँटीफाईव टुडे! यु आर अमेझिंग.....!


मोबाईलमधून झिरपणारा मधाळ आवाज हिच्याही ओळखीचा होताच....तिच्या कानांवर यातील शब्दनशब्द बिनचूक पडला....” तुम्ही आज पंच्याहत्तर वर्षांचे झालात....हॅपी बर्थ डे,डॉक्टर! माझ्या मेलीच्या लक्षात कसं राहिलं नाही?” ती बेडवरून उठण्याचा प्रयत्न करीत जवळजवळ किंचाळीलच!


जाड भिंगाच्या चष्म्यातूनही त्याचे डोळे तिच्याकडे बघताना पिठुर चांदण्यातील दोन चांदण्यासारखे दिसत होते....”होतं असं म्हातारपणी...तु काही आता लहान राहिलीयेस होय? पुढच्या महिन्यात सात तारखेला त्र्याहत्तरची होशील....! तो मिश्किलपणे म्हणाला!


तिच्या चेह-यावरचं हसू केकवरच्या क्रीमसारखं शुभ्र आणि गोड भासलं.... त्याच्याकडे बघताना! तिने आपल्या उजव्या हाताची बोटं आपल्या सुकलेल्या ओठांवर हलकेच टेकवली आणि तो तळहात उपडा करून,बोटं त्याच्या दिशेला करून बोटांवर हलकेच फुंकर घातली... त्या फुंकरीतील गारवा त्याच्याही म्हाता-या गालांवर गुलाब फुलवून गेला!


समाप्त


✍️ श्री. संभाजी बबन गायके


वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post