वाट वैरीण होते तेव्हा

 वाट वैरीण होते तेंव्हा!

✍️ श्री. संभाजी बबन गायके


राजा जनकाच्या अंगणात चार पालख्या निघण्यास तयार होत्या. बंधू कुशध्वजाची मुलगी मांडवी आणि श्रुतकिर्ति या तशा पुतण्या असल्या तरी लेकींपेक्षा कमी नव्हत्या. उर्मीला तर पोटचा गोळा..सुनयना राणीच्या उदरातून उगवलेलं कमळच जणू! आणि भूमिकन्या असली तरी जनकाचीच म्हणून ओळखली जाणारी जानकी...सीता...जनकाच्या श्वासांचं दुसरं नाव म्हणजे सीता! या चार नववधू सासरी जाण्यासाठी पालख्यांमध्ये माना खाली घालून बसल्या होत्या...माहेरचा वारा आपल्या उरात भरभरून घेत होत्या,डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या!


  राजा जनक ज्येष्ठ पिता म्हणून प्रत्येक पालखीपाशी जाऊन लेकींच्या माथ्यावर आपला हात ठेवून ‘जा,मुली!सासरी सुखी रहा!’ असा आशीर्वाद देत होते. चौथ्या पालखीपाशी,सीतेच्या पालखीपाशी येताच राजांची पावले जडावली. हातांची थरथर वाढली...त्यांनी जानकीच्या माथ्यावर थरथरते हात ठेवले खरे पण राजांच्या तोंडून आशीर्वादाचे शब्द एखाद्या खोल गुहेच्या अगदी आतून यावे तसे अस्पष्ट उमटले....”जाओ,बेटी,पतिगृह!” 


सीतेने नजर वर करून आपल्या पित्याच्या चेह-याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर तिला त्यांचा चेहरा स्पष्ट दिसेना....मध्ये आसवांची अभेद्य भिंत उभी होती...तिने उजव्या हाताच्या बोटांनी पापण्यांच्या किना-यावर आलेली आसवांची लाट पुसून दूर करण्याचा प्रयत्न करताच, दुसरी मोठी लाट येऊन आद्ळायची. धाकटी सीता तर खुद्द धरणीमातेची लेक...मातीच्या उदरातून एखाद्या नाजूक कोंबासारखी उगवलेली आणि जनकाच्या हृदयात मूळ धरलेली! सीतेचा विरह राणी सुनयना आणि राजा जनकांचं काळीज विदीर्ण करू पाहतोय....दूधावरच्या सायीसारखं जपलं होतं राणी ! अयोध्या कित्येक योजने दूर....कधी दिसतील लेकी नजरेला पुन्हा? हा दुखरा प्रश्न मनाच्या एका कोप-यात तिष्ठत ठेवून जनकांनी लेकींना निरोप दिला! रथांच्या चाकांनी आसमंतात उडवलेला धुरळा खाली बसेपर्यंत जनक त्या दिशेला पहात उभे होते...


काही क्षणांत धूळ खाली बसली पण पालख्या नजरेच्या ट्प्प्याच्या पलीकडे गेल्या होत्या! आता मुलींच्या बाहुल्यांकडे,त्यांच्या भातुकलीतल्या नवरा-नवरीकडे बघत त्यांच्या आठवणी जागवायच्या! तिकडे राम सोबत असले तरी सीतेची अवस्था निराळी कशी असेल? एका ठिकाणचं मूळ उपटून दुसरीकडे रूजवायला नेताना मधला काळ मूळांसाठी किती जिकिरीचा असेल ना?


जान्हवी जणू त्या रामायणातली सीताच या कलियुगातली! जान्हवीनं पहिला श्वास घेतला आणि तिच्या आईनं,वत्सलानं शेवटचा! पत्निविरहानं, दु:खातिशयानं जान्हवीच्या बाबांनी,नरहरींनी, बैराग्यांची संगत धरली....आणि मागील सर्व खाणाखुणा पुसून ते अनोळखी जगात निघून गेले! भावजयीच्या अकस्मात जाण्यानं आणि भावाच्या निघून जाण्यानं काशीनाथ कासावीस झाले! जान्हवीला दत्तक घ्यायला तिचा मामा तयार होता, पण काशीनाथला एकच मुलगा...त्याला बहीण आणि यमुनेला मुलगी हवीच होती म्हणून काशीनाथने मामांना नकार दिला आणि जान्हवी काशीनाथ आणि यमुनेची लेक झाली!


  भाऊबीज, राखीपौर्णिमा काशीनाथच्या घरात कायमची मुक्कामी आली! पंचवीस वर्षे उलटली आणि जान्हवीच्या जनकाने आणि सुनयनेने तिला जड मनाने सासरी धाडले....शेकडो मैल दूर!

माहेरी येताना जान्हवीची वाट भराभरा अंतर कापत घराकडे पळायची...तीन-साडेतीनशे मैलांचं अंतर माहेरी येताना कधी संपायचं ते समजायचंच नाही. जान्हवी अंगणातूनच आईकडे धाव घ्यायची....कित्येक वर्षे यमुनेच्या अंगणाला या धावपळीची जणू सवयच झाली होती. काशीनाथला जान्हवी हलकेच मिठी मारायची आणि यमुनेला अगदी घट्ट....जान्हवीने आयुष्यात पहिल्यांदा चाखलेल्या यमुनेच्या उरातल्या दुधासारखी ही मिठी घट्ट आणि स्निग्ध असे!


यमुनेच्या हृदयातलं जन्मापासून दडी मारून बसलेलं एक दुखणं अगदी संधी साधून प्रकट झालं. मुलगा आता हाताशी आल्यातच जमा होता,काशीनाथची नोकरी संपायला आता तीन-चार वर्षेच उरलेलेली होती...सुखाचे दिवस असताना दुखणं आगंतुक पाहुण्यासारखं आलं आणि जाण्याचं नाव घेईना. दुखण्याला डॉक्टरांच्या सुईचा धाक दाखवून झाला, अंगा-यांची धुरी देऊन पाहिली पण दुखण्याचा हट्ट काही संपता संपत नव्हता. एकदा तर जान्हवी नव-याला घेऊन माहेरी आलेली असतानाच मध्यरात्री यमुनेला इस्पितळात हलवावं लागलं होतं. पहिली आणि दुसरी असंख्य सेकंड ओपिनियन्स घेऊन शेवटी यमुनेला शस्त्रक्रियांच्या चक्रात घालावंच लागलं. तब्येत बरी आहे आणि स्थिर आहे या शब्दांच्या खेळात दीड वर्ष निघून गेलं.


सासरच्या जबाबदारीनं जान्हवीला आहे ते अंतर भराभर कापत परत जावं लागलं. आईची तब्येत आता बरी आहे! तिने मनाला समजावलं. दादाच्या नोकरीचं एकदा पक्कं झालं की ‘मला एक वहिनी आण’ असं जान्हवी म्हणणारच होती. पण वहिनीपेक्षा तिला आईसाठी एक सून आलेली पहायची होती. यमुनेची अवस्था दिवसेंदिवस नाजूक होत चाललेली ती पहात होती.


सासरी परतून जान्हवीचा दिनक्रम सुरू झाल्याला दोनच दिवस उलटले....दोन दिवस कुठले, दुस-या दिवशीच्या मध्यरात्री दीड वाजताच मोबाईल वाजला आणि गाढ झोपेत असलेल्या जान्हवीने दचकून डोळे उघडले. झोपण्यापूर्वी तर तिने बाबांना फोन लावायचा प्रयत्न केला होता,पण लागला नव्हता. पण आता यावेळी तिच्या मामाचा फोन होता. त्याचा आवाज स्पष्ट येईना म्हणून तिने नव-याकडे फोन दिला. नव-याने ‘निघतो’ म्हणून फोन ठेवला आणि ‘जान्हवी...निघायला हवं’ असं म्हणून त्यानं एकाला फोन लावला. ‘मिळेल ती गाडी....एसी,नॉन एसी...ड्रायवर नसला तर मी चालवीन’ असं काहीबाही तो बोलला. जान्हवी एकदम बधीर. ‘काय झालं?’ हा प्रश्न तिच्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच तिच्या चेह-यावर उमटला होता. ‘तुझ्या आईची तब्येत अचानक बिघडलीये, बाबांनी तुला असेल तशी निघून यायला सांगितलंय’ त्याने तिच्याकडे न पाहताच सांगितलं आणि सॅक भरायला सुरूवात केली! 


जान्हवीने यमुनेच्या फोनवर रिंग केली, मामाच्या फोनवर कॉल करायचा प्रयत्न केला पण सर्व फोन इतरांशी बोलण्यात गुंतलेले होते. विसाव्या मिनिटाला जान्हवी आणि तिचा नवरा मोटारीत बसलेले होते...चालकाला ‘लवकर चला’ एवढंच सांगू शकली जान्हवी! नवरा तिच्याकडे बघणं टाळत पण तिच्या खांद्यावर हात ठेवून पुढे बघत बसला होता. ‘कितना टाईम लगेगा नॉन्स-स्टॉप गये तो? त्याने चालकाला विचारले. “रास्ते में ट्राफिक कैसा है उसपर है साब’ असे म्हणून त्याने रस्त्यातल्या स्पीडब्रेकर ब्रेक न लावताच ओलांडला. त्याचा धक्का जान्हवीला जाणवलाच नाही.


‘लेक येईपर्यंत थांबायचं’ असा काशीनाथचा निग्रह ऐकून काशीनाथच्या अंगणात जमा झालेली निम्मी माणसं घरी परतली...जान्हवी अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचली की परत येऊ आणि बांधाबांधी करू असं सांगून व्यवस्था पाहणारी अनुभवी मंडळी त्यांच्या घरी गेली.


एवढ्या रात्री बॉडी घरी न्यायला नको म्हणून काशीनाथने सकाळी आठ-नऊ वाजता घरी पोहोचता येईल अशा बेतानं व्यवस्था करून ठेवली....तो पर्यंत जान्हवीही पोहोचेलच. आताच झोप लागलीये असा चेहरा दिसत होता यमुनेचा. या चेह-यावर आता कधीच वेदना उमटणार नव्हती....सुईची, काळीज शिवताना घातलेल्या टाक्यांची! ‘लांबचा प्रवास आहे...त्यात हा पाऊस आणि गर्दी. बारा वाजतील तिला यायला! यमुनेच्या अंथरूणाभोवती बसलेल्या गावातल्या बाया हळू आवाजात कुजबुजत होत्या, त्यातल्या काहीजणी उठून जाऊन पुन्हा लगबगीनं परतत होत्या.


इ कडे वाट जान्हवीची वैरीण झाली होती! उडता आलं असतं तर ती तशीच झेपावली असती आभाळात. वाहनचालक अनुभवी होता...अशी अनेक माणसं त्यानं वेळेत पोहोचवली होती. पण आज पावसाची रिपरीप थांबत नव्हती,पुढची वाहनं हलली तरच पुढं सरकणार मागचे!


जान्हवीला ती शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात असलेली ‘वाट’ कथा आठवत राहिली. फासेपारध्यांच्या गावोगावी भटकत जगण्याच्या आणि मरण्याच्या फरफटीत जख-याच्या बहिणीला,पावरीला तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मरणासन्न आईपर्यंत वेळेत पोहोचता आलं नव्हतं...पोहोचली तेंव्हा फक्त तिच्या राखेचा ढीगच पसरला होता तिच्या समोर. परीक्षेसाठी शिकत असल्याने एका तटस्थतेनं वाचलेली ती कथा आता मात्र जान्हवीच्या डोळ्यांसमोर उभी होती....जान्हवीचीही वाट आता संथपणे सरपटत चाललेली होती....तटस्थपणे!


दीड वाजून गेला. काशीनाथच्या अंगणात आता तशी शांतता होती पण थोड्याच वेळात तिचे रूपांतर अस्वस्थतेत झाले. किती वेळ वाट पाहणार ना जिवंत माणसं गेलेल्याला निरोप देण्यासाठी! बापे माणसं घाई करू लागली तशा म्हाता-या त्यांच्यावर कातावल्या! ‘लेकीला येऊ द्या...बघू द्या आईला डोळेभरून शेवटचं!” गडी पुन्हा अंगणात जाऊन कोपरे धरून बसले. घड्याळाचे काटे त्यांच्या नेहमीच्याच गतीने चाल चालत होते,जान्हवीची मोटार गावाच्या वेशीत शिरली तेंव्हा पावसाने उघडीप दिली. अंगणाबाहेर मोटार थांबली....ते पाहून अंगणात बसलेली माणसंही कपडे झटकून उठली आणि जान्हवीचा आक्रोश कानी पडताच शहारली. जान्हवीचा मामा तिला सामोरा गेला....जान्हवी वा-याच्या वेगानं तिच्या आईकडे धावत निघाली...मामाच्या जवळ येताच जान्हवीनं गुडघ्यावर बसकन मारली...अंगातले त्राण संपल्यासारखे!


  काशीनाथही पुढे आला,”बाबा,रस्ता संपतच नव्हता हो!” असे म्हणत जान्हवीने काशीनाथच्या पायांना मिठी मारली...काशीनाथने तिला उठवून उभे केले...जान्हवी अडखळत-ठेचकाळत आईला ठेवलेल्या खोलीकडे निघाली....! तिच्या प्रकट आणि यमुनेच्या मूक संवादाने बायामाणसांनी खचाखच भरून गेलेली खोली भरून गेली...एखादी पणती अंधार उजळून टाकते तशी....पण या पणतीच्या उजेडात विरहाचा दाह होता, काळजातली काळजी आणि तिची काजळी भरून राहिली होती! आईची आणि लेकीची गाठ पडली होती...वाटेने मुक्कामावर पाऊल ठेवले होते!

“या मायेसाठीच लेक असावी लागते”....एक म्हातारी म्हणाली आणि बायकांनी आपल्या डोळ्यांना पदर लावले....तिथल्या लेकींना आपल्या आया आणि प्रौढ बायकांना आपल्या लेकी आठवल्या!

समाप्त

✍️ श्री. संभाजी बबन गायके

एक विलक्षण कथेसाठी फोटोवर क्लिक करा. 



वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post