ठेवू चरणावरी माथा

 ठेवू दे चरणावरी माथा..पंढरीनाथा!

✍️ श्री. संभाजी बबन गायके 

आळंदीतून माऊलींचे प्रस्थान झाल्याच्या दिवशी वैष्णवांच्या प्रवाहात सामील होणे म्हणजे गंगेच्या प्रवाहात पहिले पाऊल ठेवण्यासारखे! हा प्रवाह पुढे विठ्ठल नावाच्या महासागरात विलीन होण्यासाठी पुढे पुढे धाव घेताना मग प्रवाहातल्या थेंबांना स्वत: चालावेच लागत नाही...पांडुरंग चालवीत नेतो! सुखासाठी तळमळ करणा-यांना नामदेवरायांनी पंढरीसी एकवेळ जाण्याचा उपदेश दिला. जे लोक हा उपदेश एकदा जाऊन तर पाहू म्हणून अंमलात आणतात ते मग एकवेळ जाऊन थांबत नाहीत....त्यांना पंढरीचा टकळा लागू लागतो दर आषाढात....त्या रूपे सुंदर सावळ्या परब्रम्हाची मोहिनीच अशी आहे...प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांना हे रूप लोचनांनी पाहताच सुख जाहले, बापरखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर आहे याची खात्री पटली, जगदगुरू श्री तुकोबारायांना कर कटावरी ठेवलेल्या विठ्ठल-माधवाचे रूप बरवे वाटले, हेचि सर्व सुख आहे याचा प्रत्यय आला तिथे सामान्य भाविकाची काय कथा?

बन्सीबोवा सुद्धा याला कसे अपवाद असतील? बापजाद्यांनी मागे ठेवलेल्या जमीन-जुमल्याच्या व्यवहारात भावकीनं हातोहात फसवल्यानं बन्सी तालुक्याच्या गावी बि-हाड घेऊन आले ते पुन्हा गावाचं नाव घेतलं नाही, की कुणाचं सुतक पाळलं नाही. काळ्या मातीत राबलेलं आणि उन्हा-तान्हात रापलेलं शरीर होतं, थेट बाजारात हमालीचं काम खांद्यावर घेतलं. बि-हाडात तिसरं माणूस नव्हतं कारभारणीशिवाय. खाणारं एक अधिकचं तोंड नव्ह्तं संसारात हे एकापरीनं बरंच केलं होतं पांडुरंगानं! राधाक्काची कूस उजवली नव्हती असं नाही,पण तिच्या पोटी जन्मलेला बालकृष्ण अनाकलनीय आजाराच्या पुतना मावशीचं स्तन्य पचवू शकला नाही आणि त्याच्या आयुष्याभोवती अकाली मृत्यूचा कंस रेखला गेला! तालुक्याच्या गावातल्या एका कोप-यात एक झोपडवस्ती अंग चोरून उभी होती..तिनं बन्सी-राधाक्काला तिच्या वळचणीला आडोसा दिला होता. वस्तीच्या एका कोप-यात कुणीतरी एक छोटंसं राऊळ उभारलं होतं विठोबा-रखुमाईचं. त्यात एक आखीवरेखीव बाळकृष्णही होता...आता हाच बाळकृष्ण बन्सी-राधाक्कांच्या मनाच्या अंगणात दुडुदुडु धावू लागला!

बन्सीबोवा गावातच पखवाज वाजवायला शिकले होते लहानपणीच. राधाक्कांना त्यांच्या वडीलांनी पेटी शिकवून ठेवली होती त्यांच्या लहानपणी. या दोन्ही वाद्यांना या राऊळात आता जाणते हात लाभले आणि संध्याकाळचा हरिपाठ तेथे घुमू लागला....देवाचिये द्वारी उभे असूनही बन्सीबोवा आणि राधाक्का पुण्याची गणना करीत नव्हते, त्यांना आता काही मोजायची गरजच नव्हती. वयाची मध्यान्ह उलटून दिवस मावळतीला झुकू लागल्यावर कशाला काय मोजत बसायचं! हो, पण एक मोजदाद मात्र त्यांनी सुरू केली होती....पंढरीच्या वारीची! खरं तर जितकी वर्षे जगलो तितक्या वेळा वारी घडायला हवी...पण हा नाद लागायला थोडा उशीरच झाला होता दोघांना! एक तर रोज हमालीचं काम लागेलच असं नव्हतं. शिवाय अधूनमधून संप,बंद,पूर,दंगल इत्यादींमुळे बाजार बंद असायचाच. त्यात पंधरा-वीस दिवस खाडा झाला तर फारसं बिघडायचं कारण नव्हतं. त्यामुळे दोघांचीही पायी वारी सुरू झाली ती अव्याहतपणे चांगली अठ्ठावीस वर्षे चालली. दोघंही वारीत कुठल्याही दिंडीत न चालता स्वतंत्रपणे आपापल्या चालीने चालायचे. वाटेत सोय होईल तिथं रात्रभर अंग टाकायचं, वारीत कुणी उपवाशी झोपत नाही ज्ञानोबा-तुकोबांच्या कृपेने, त्यामुळे दोन वेळच्या घासांची कमतरता पडत नसे. वाखरीच्या आधीच्या मुक्कामापर्यंत चालायचं आणि एकादशी दोन दिवसांवर आली की एस.टी.पकडून पंढरी गाठायची आणि दर्शनबारीला लागायचं हा त्यांचा दरवेळीचा नेम, त्यात खंड कधी पडला नाही. इतर दिंड्या दशमीला पंढरीत पोहोचतात. एकादशीला नगरप्रदक्षिणा असते. विठोबारायाच्या राऊळाभोवती दिंडी प्रदक्षिणा घातली जाते. या दिवशी विठुरायाचं प्रत्यक्ष दर्शन मिळणं दुरापास्तच असतं. दिंडीला एखाद-दोन दर्शन पास मिळतात, पण तरीही आठ-दहा तास फिरावे लागते एका मजल्यावरून दुस-या मजल्यावर दर्शनमंडपाच्या. म्हणून पंढरीत पोहोचले,नगरप्रदक्षिणा झाली,दुसरे दिवशी सकाळी अगदी लवकरच बारस सोडली की बहुसंख्य वारकरी परतीची वाट धरतात. पूर्वी तर बुधवारी द्वादशी आली तर हा पांडुरंगाचा वार म्हणून वारकरी पंढरी सोडत नसत. काही पक्के वारकरी आजही हा नेम पाळतात. नित्यनेमाचे वारकरी मात्र गोपाळपुरात जाऊन गुरूपौर्णिमेचा काल्याचा लाही प्रसाद घेतल्याशिवाय पंढरी सोडत नाहीत, तर काही जण चातुर्मास पंढरीतच व्यतीत करतात.

या वर्षी मात्र बन्सीबोवा आधीच हमालीच्या कामाने वाकलेल्या म्हाता-या खांद्यांवर आणखी एक ओझं घेऊन वाट चालत होते...राधाक्कांच्या आठवणींचं! आजारपणात राधाक्कांनी बन्सीबोवांकडून ‘पंढरीची वारी..चुको न दे हरी’ असं वचन घेतलं होतें आणि त्या वैकुंठवासी झाल्या. राऊळातील रखुमाई दूरदेशी निघून गेली होती. हरिपाठात आता पेटीचा स्वर साथीला नव्हता. बन्सीबोवांचा पखवाज आता पोरका झाल्यासारखा वाजे. या वर्षी वारी निघाली आणि बन्सीबोवा निघाले...एकटेच! राधाक्का सोबतीला असत तेंव्हा त्यांच्यात नेहमी एक संवाद व्हायचाच...तो म्हणजे एकादशीच्या महापूजेला बसण्याचा मान मिळणा-या वारक-यांच्या जोडीबद्दलचा....त्या नशिबवान दांमप्त्याचे फोटो वर्तमानपत्रांत,टीव्हीवर आलेले त्यांनी कित्येकदा पाहिलेले होते. आपल्याही नशिबी हे भाग्य येईल का रे कधी विठुराया? राधाक्का मनोमन साकडं घालायच्या. दशमी उलटून एकादशी लागताच मध्यरात्री महापूजेच्या तयारीसाठी राऊळाचे द्वार बंद करून घेतले जाते आणि याच वेळी द्वारात प्रथम उभ्या असणा-या भाविकास महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळतो! बन्सीबोवा आणि राधाक्का काहीवेळा या द्वारापासून अगदी जवळच पोहोचले होते, पण द्वारात प्रथम क्रमांक नव्हता लाभला कधी. बंद दाराआड सुरू असणा-या महापूजेच्या निनादाचा आनंद मात्र कानांवर झेलत झेलत दोघेही रांगेत न कंटाळता प्रतिक्षा करीत असायचे. आता प्रतिक्षा करणरं एक मन बारीतून कमी झालेलं होतं.

या खेपेलाही बन्सीबोवांनी वाखरीच आधीच्याच मुक्कामावरून एस.टी.ने पंढरी गाठली,चंद्रभागेत डुबकी मारली आणि रांगेला लागले. पंढरीला वेढा घालून रांग गोपाळपुरापर्यंत लांबली होती. बारीत मध्ये घुसणा-यांकडे बन्सीबोवा नेहमीच दुर्लक्ष करीत. याही वेळी त्यांना कुणाच्याही पुढे जायचे नव्हते. चौ-याऐंशी योनींच्या फे-यांतून फिरून आलेला हा देह दर्शनबारीतील फे-यांना कंटाळणारा नव्हता. उलट जितका विलंब तितके जास्त नामस्मरण,तितका जास्त वेळ भाविकांचा सहवास अशी त्यांची धारणा होती. अध्यात्म यापेक्षा जास्त वेगळं नसते! चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा..गाईन केशवा नाम तुझे हे अभंग शब्द बन्सीबोवा प्रत्यक्षात जगत होते. रांग पुढे पुढे सरकत होतीच. मध्येच थांबतही होती. या मधल्या काही मिनिटांसाठी उभे राहून ताठलेले जीव खाली बसायचे आणि चला माऊली असा गलका झाल्यावर झटक्यात उभे राहून पुढे सरकत होते. बन्सीबोवांचं आता या गर्दीकडे लक्ष नव्हतंच मुळी. राधाक्का आपल्याच सोबत आहेत, असा भासही झाला त्यांना एक-दोनदा. रांगेत दशमीचा दिवस निघून गेला, सायंकाळ झाली. राऊळ दिव्यांच्या उजेडात न्हाऊन निघाली. सभोवतालच्या अंधारात कळस अधिकच प्रकाशमान भासत होता. बन्सीबोवांना वेळेचे भान राहिले नव्हते. हौशा-नवशा दर्शनार्थींचा गोंधळ त्यांना विचलीत करीत नव्हता. त्यातले कित्येक जण बन्सीबोवांना मागे सारून पुढेही जात होते. मध्यरात्रीचा प्रहर जवळ आला. आता आपण नेमके दरवाजात असताना दरवाजा बंद व्हावा, अशी इच्छा ज्यांना ही पद्धत माहित होती त्यांच्या मनात असणे स्वाभाविकच होती. हे भाग्य कुणाला नको असते? आषाढीच्या एकादशीला प्रत्यक्ष पांडुरंगरायाची, रूक्मिणीमातेची महापूजा नजरेसमोर होताना होणारा आनंद किती अवर्णनीय असेल, हे प्रत्यक्ष स्वत: अनुभवायला आले तरच समजू शकेल! बन्सीबोवा द्वाराच्या अगदी जवळपासच पोहोचले होते. सुदैव दार ठोठावते असे म्हणतात, इथे तर प्रत्येक जण संधीच्या दारातच उभा होता. आणि देव स्वत: द्वार उघडून निवडलेल्या भक्ताला आत घेणार होते! वारक-यांची अशीच भावना असते. काहीजण देवाला एकवेळ का होईना बघायला पंढरीत येतात, तर काहीजण एवढ्या लोकांना आकर्षित करणारे हे ध्यान आहे तरी कसे हे बघायला येतात. कुणी कोणत्याही भावनेने येतो, विठु दोन्ही बाह्या उभारून भक्तांना कवेत घेण्यास उभा असतोच!

बन्सीबोवा दारापाशी पोहोचले आणि आतील सेवकाने दरवाजा लोटून घेतला! जन्मोजन्मीची पुण्याई हे तर नव्हे? बोवांचे सर्वांग थरारले. आता राधाक्का सोबत असती तर? त्यांचे डोळे भरून आले. रांगेतील प्रत्येक जण बोवांकडे कौतुकाने,काहीशा असूयेने पहात होता. बोवा एकटेच आहेत, हे सुद्धा कुणाच्या नजरेतून सुटले नव्हते. वेळ सरली...द्वार पुन्हा उघडले गेले...बोवा थरथरत्या पावलांनी आत शिरले....पांडुरंगा...मायबापा! त्यांची सर्व दृष्टी त्या सावळ्या पाषाणातील चैतन्याकडे लागली. आतल्या गर्दीचे त्यांना अस्तित्व जाणवत नव्हते. खरे तर पांडुरंगाची महापूजा सपत्निक व्हायला हवी....बोवांना वाटत राहिले. राधाक्कांची आठवण डोक्यात रूंजी घालत होतीच. देवा, आज कारभारीण असायला पाहिजे होती तुझी पूजा पहायला! बोवा देवाशी बोलत होते. आणि त्याच वेळी ते विठ्ठलरूप डोळ्यांत साठवत होते. देवाच्या डोईवरून खाली येणारा दह्या-दुधाचा ओघळ बोवांच्या मनातील दु:खही खाली वाहून नेत होता. बोवांनाही दोन कलशभर पंचामृताने देवाला स्नान घालता आले....आता यापुढे आयुष्यात काहीही नाही मिळाले तरी चालणार होते! महाआरतीच्या तबकालाही बोवांचा हात लागला. त्या तबकाला आज राधाक्कांचाही हात लागला असता तर किती बहार आली असती! पांडुरंगरायाच्या चरणांवर मस्तक ठेऊन बोवा रूक्मिणीमातेच्या राऊळात गेले...आईसाहेबांचीही पूजा पाहिली....त्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यावर त्यांनी रखुमाईच्या मुखाकडे एकवार पाहिले...रखुमाईच्या डोळ्यांतून राधाक्का हस-या चेह-याने आपल्याकडे पहात असल्याचा बोवांना भास झाल! डोळ्यांना आसवांच्या धारा लागलेल्या अवस्थेत बोवा मागे मागे सरत मंदिराच्या बाहेर आले...क्षणभर डोळे मिटले! डोळे उघडले...रखुमाईंच्या चेह-यावरील गोड स्मित मनात साठवून बन्सीबोवा राऊळातून बाहेर पडले...वारी सुफळ संपूर्ण झाली होती!

✍️ श्री. संभाजी बबन गायके

वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post