गुंतूनी गुंत्यात साऱ्या

 गुंतूनी गुंत्यात साऱ्या

✍️ सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

"सुलूताई चला हो लवकर, प्रवचन सुरु झालं असेल." गोखले आजी घाई करत होत्या. 

"आले हो, तेवढा चहा झाकून ठेवते म्हणजे राधिकाला आल्या आल्या गरम करून पिता येईल."

"काय हो तुम्ही पण, करुन घेईल ना ती स्वतः. सगळं असं हातात देवून सुनेला लाडावून नका ठेवू बरं, अवघड जाईल नंतर तुम्हालाच."

"नाही हो वहिनी, यात लाडवण्यासारखं काय आहे. सकाळी उठून स्वयंपाक पाणी आवरून जाते ती कामाला. आणि इतकी लोंबकळत वगैरे जाते ते घरासाठीच ना. आपण केली मदत दोन चार कामं करुन तर काय बिघडलं? आपले ही हातपाय चालतात त्यामुळे." सुलूताई समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. 

"अहो पण आपले काय काम करायचे वय राहिले का आता? उगी देवाचं नाव घेत बसून राहायचं आणि आपल्या सासवा इतक्या प्रेमाने वागायच्या का कधी. सुनेने मापटं ओलांडून घरात पाऊल टाकलं की या झाल्या मोकळ्या बाहेर पडायला." गोखले आजींच्या बोलण्यात खंत व्यक्त होत होती.

"जाऊ द्या हो, लोकं आपल्यासोबत वाईट वागली म्हणून आपणही तसचं वागावं असं मला वाटत नाही. त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरु मारायचं का? चला, आवरलं माझं." हातात छोटी पिशवी घेत ताई म्हणाल्या.

प्रवचन आधीच सुरू झालं होतं. बुवांच्या स्वरात मिठास होती. लोक तल्लीन झाले होते. प्रवचन संपल्यावर ताई आणि आजी देवळातल्या ओट्यावर विसावल्या. 

"काय बाई आजकालच्या सूना हो! काल कसलं तरी पार्सल घरी आलं. सूनबाई नव्हती घरी म्हणून उघडून पाहिलं तर एवढुसा, झिरमिॆळी ड्रेस निघाला. इतकी लाज वाटली पाहून मला... घालताना कसं वाटत नसेल यांना?"

"वहिनी अहो पण पार्सल सुनेच्या नावाने होतं तर तुम्ही कशाला उघडलं? ज्याची वस्तू त्याच्या ताब्यात द्यायची." ताई चक्रवल्या होत्या.

"अहो काय म्हणता तुम्ही! घरात काय चाललंय समजायला नको का आपल्याला? जर आपण वडीलधाऱ्या माणसांनी लक्ष नाही दिलं तर मोकळी सुटतील हे लोकं. आणि दुधात पडलेल्या माशीसारखं आपल्यालाच अलगद बाजूला काढून फेकतील एक दिवस."

"तुमचं आणि माझं यावर एकमत होणे कठीण दिसतंय. असो, चला निघूया." ताई उठल्याच.


शांत स्वभावाच्या सुलूताई वेगळंच रसायन होत्या. त्यांच्या तरुणपणी कडक स्वभावाच्या त्यांच्या सासूबाईंनी बराच त्रास दिला म्हणतात. पण कधी यांच्या तोंडून या गोष्टी कुणी ऐकल्या नाहीत. गावगप्पांमधून लोकांना समजायचे तेवढेच. एखाद्या आईबाईने कधी काही विचारलंच तर त्या हसून उडवून लावायच्या.

"अहो काकू काय विचारता तुम्ही पण... आपल्या माणसाला रागावणार तर परक्याला रागावणार का कुणी. सासूबाई चिडतात कधी पण त्यातही त्यांचे प्रेम दिसून येते. त्यांना जर माझी काळजी, पर्वा नसती तर दुर्लक्ष नसते केले का त्यांनी माझ्या चुकांकडे?"

"अगो पण ती इतका तोंडाचा पट्टा सोडते, तू चकार शब्दही बोलत नाहीस, असं कसं जमतं तुला शांत राहायला."

"ते माझे गुपित आहे. त्या अशा चिडून बोलायला लागल्या की मी सरळ मनातल्या मनात नामस्मरण करायला सुरुवात करते. त्यामुळे लक्ष जातच नाही त्यांच्या अपशब्दांकडे." ताई हसत सांगत. ती बाई  'धन्य आहेस हो तू' म्हणत निघून जाई.

कदाचित हा शांतपणाच सुलूताईंच्या संसाराचे गुपित होते. आताही त्या जास्त कुठल्याच झमेल्यात पडत नसत. कमळदलावरील दवबिंदूप्रमाणे अलिप्त राहण्याची कला त्यांना अवगत झाली होती. सून राधिका, मुलगा वैभव आणि नात वेदिका सुलूताईंना खूप मान देत. वेदिकाची तर त्या कूल ग्रॅनी होत्या. असं म्हणतात, की नव्या आणि जुन्या पिढीत जनरेशन गॅप असतो. पण तो या घरात बिलकुल जाणवत नसे कारण एकच सुलूताईंचे घरच्यांच्या रंगात रंगूनही पारदर्शी राहणे. 


नेमकी याच्याविरुद्ध परिस्थिती होती गोखले आजींच्या घरी. घरातील प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच केली पाहिजे असा आजींचा खाक्या होता. हातात जपमाळ घेवून सोफ्यावर बसून त्या सर्वत्र घारीसारखी नजर ठेवून असायच्या. नात कसे कपडे घालते, कधी घराबाहेर पडते आणि परत येते, कामाशिवाय बाहेर गेली तर कोणाबरोबर जाते आणि सोडायला कोण येते, सून, नात फोनवर कुणाशी, काय, किती बोलतात या सगळया आणि इतर गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. 

पण त्यांचा या हट्टापायी घरातील लोकांची घुसमट, कुचंबणा होते आहे हे त्यांना लक्षात येत नसे. मग काही गोष्टी त्यांच्यापासून लपवल्या जात असत, जसे आवडलेला ड्रेस गुपचूप मागवणे, मैत्रिणीचे कारण सांगून हॉटेलिंग करणे, नातीचे क्वचित उलट उत्तर देणं. अशावेळी आजी अजूनच रुसत, रागावत.  त्यांना वाईटही फार वाटे. 


आज असाच एक प्रसंग घडला. आजींच्या सूनेचा मावसभाऊ अचानक घरी आला. भावाला पाहून ती खूष झाली. मामाने भाचीसाठी सुंदर कुर्ता आणला होता. आजींचा मुलगा मेव्हण्याबरोबर गप्पा मारू लागला. आजींचा मात्र पापड मोडला. त्या जेवढ्यापुरत तेवढं बोलू लागल्या. त्यांची नाराजी सर्वांच्या लक्षात आली. भाऊ गेल्यावर न राहवून सूनेने विचारलेच, 

"का हो आई, माझा भाऊ आलेला तुम्हाला आवडलेले दिसत नाही? तो बिचारा किती बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि तुम्ही मात्र तोंड फुगवून बसला होतात."

"तोंड सांभाळून बोल, सूनबाई. एक तर तुझा भाऊ न सांगता सवरता आला. लोकांच्या घरी असं अचानक जायचं नाही हे माहीत नाही का त्याला?"

"लोकांच्या घरी म्हणजे? त्याच्या बहिणीचे घर लोकांचे आहे का? आणि अपॉइंटमेंट घेवून यायला काय सेलिब्रिटी आहोत काय आपण? आणि जरी कुणी न कळवता आलं असेल तर तुमच्याकडे असं तोंड फुगवून बसतात का त्यांच्यासमोर?" तिने आज सगळं बाहेर काढायचे ठरवलेच होते. माहेरच्या माणसांचा मान राखणे आवश्यक असतेच.

"मला उलट उत्तर देतेस? हे संस्कार दिले का माहेरच्यांनी?" आजींचा तोल सुटला.

"अहाहा माझे संस्कार काढता, तुमचे बघा आधी. पैलतीरी डोळे लागले तरी मन अजून लेकाच्या संसारातच. स्वतःचा करून झाला की, आता करु द्या आमचा आम्हाला. सारखं आपलं ते धारेवर धरणे." सून नवऱ्याकडे वळली,

"तुम्हाला मी शेवटचं सांगते, या घरात राहतील नाहीतर मी. मला यांच्यासोबत घरात एकत्र राहणे जमणार नाही."

आता मुलगीही मैदानात उतरली, "हो आजी तुला काय गरज असते प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची? येता जाता माझ्यावर कमेंट्स करत असते, कधी कपड्यांवरून तर कधी मित्रमैत्रिणींवरुन. आम्ही तुला कधी विचारतो का रोज संध्याकाळी कुठे जाते, कशाला आणि कोणाबरोबर जाते वगैरे. आजी सगळया गोष्टी तुला माहीत असायलाच हव्यात असा का हट्ट तुझा? घुसमट होते आमची. असं वाटतं आम्ही आमच्या घरात नाही तर फक्त तुझ्या घरात राहतो. बाबा मलाही नाही राहायचे इथे."


दोघींचे बोलणे ऐकून गोखले आजी थरारल्या. गोष्टी या थराला जातील असा विचार आजींनी स्वप्नातही केला नव्हता. मुलगी- बायको आणि आई यात मुलगा आईची बाजू कदापि घेणार नाही हे त्यांना समजून चुकले होते. त्या दुःखाने घराबाहेर पडल्या आणि सुलूताईंकडे निघाल्या. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचेही त्यांना भान नव्हते.


अखंड वाजणारी डोरबेल बाहेर उभं असणाऱ्यांच्या निकडीची जाणीव करून देत होती. सुलूताई शक्य तेवढ्या लगबगीने दार उघडायला गेल्या. बाहेर गोखले आजी रडव्या चेहऱ्याने उभ्या होत्या. काही तरी वाईट घडल्याच्या आशंकेने त्या घाबरल्या.

"वहिनी अहो काय झाले? का रडतात आणि अशा अचानक कशा आल्या?"

"काय सांगायचं तुम्हाला... माझं नशीबच फुटके." आजींनी सगळा प्रकार मीठ मिरची लावून रडत रडत सांगितला. त्या बोलेपर्यंत ताईंनी छान कॉफी बनवली होती. 

"मला सांगा ताई, काय चुकलं माझं? लहानांवर लक्ष ठेवणं हे वडीलधाऱ्या लोकांचं कामच आहे ना... कधी चुकून एखादा शब्द इकडचा तिकडे होत असेल पण म्हणून मी खाष्ट, कजाग का? आज थोडं चुकलं माझं तिच्या भावाच्या बाबतीत पण यावरुन आमचा संसार आम्हाला करु द्या असं म्हणाली ती मला चक्क... तरुण मुलगी कोणाच्या संगतीत राहते, कसे कपडे घालते हे पाहणं तर आजच्या काळात गरजेचे आहेच ना... उद्या काही झालं गेलं तर दोष कुणाचा माथी येईल? म्हणून मी नातीला हटकते तर ती या घरात मी राहणार नाही असं म्हणाली. मी खरंच इतकी वाईट आहे का, की घरच्यांना मी नकोशी व्हावी. या वयात मी कुठं जाऊ? ... जाते एखाद्या वृद्धाश्रमात... कशाला आपली लुडबुड..." आजींना अश्रू अनावर झाले.

"शांत व्हा वहिनी, अशा चिडू नका. ती कॉफी घ्या बरं म्हणजे जरा छान वाटेल."

आजींनी कॉफी संपवली. त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत आलेल्या पाहून ताई बोलू लागल्या.

"वहिनी तुम्ही जरा शांतपणे विचार करा. काही गोष्टी तुमच्या बरोबर असतात तर काही समोरच्या. आता आपलं वय झालं. संसार करून झालाय. पुढच्या पिढीच्या हाती सूत्र सोपवायची ही वेळ असते कारण शरीर आणि मन दोन्ही थकलेले असतात. जर या वयातही आपण हट्टाने मी म्हणेन तेच खरं, मीच या घरातील सर्वेसर्वा अशा आविर्भावात वागत असू तर तरुणांनी त्यांचं आयुष्य कसं काढायचं? आपल्या दबावाखाली राहून? ते सहन करतील आपल्या आदरापोटी पण रबर मर्यादेपलीकडे ताणला तर तुटणारच. आज तुमच्या घरी तेच झालं. घर सुनेचे ही आहे मग तिच्या भावाने तुमच्या परवानगीने यावं हा तुमचा हट्ट बरोबर आहे का? आजची पिढी हुशार, समजूतदार आहे. आपल्या कृतीचा अर्थ आणि त्याचे होणारे परिणाम त्यांना आधीच माहीत असतात. मग नातीवर नजर ठेवून आपण काय मिळवणार आहोत? वहिनी मला जास्त काही समजत नाही पण इतकं जरूर समजतं, की पूर्वीच्या काळी मुलांचे लग्न झाले की पालक वानप्रस्थान करत. आता ते शक्य नसलं तरी घरात राहून ही आपण मानसिक वानप्रस्थ स्वीकारू शकतोच. वहिनी, मी आधीच सांगत होते, आता नाही गुंतायचं जास्त कशात. सगळ्या गोतावळ्यात राहूनही अलिप्त राहायचं. अवघड आहे पण जमतं हळूहळू. तुमची सूनही वाईट नाही हो. आज तिचा राग उफाळून आला इतकंच. तुम्ही अजून थोडा वेळ थांबा, कशी तुम्हाला शोधत येते ते पहा." सुलूताई हसल्या.

आजी त्यांच्या बोलण्यावर विचार करत राहिल्या. बऱ्याच वेळाने ताईंनी म्हटल्याप्रमाणे खरंच आजींनी सून घाबरून ताईंच्या घरी आली .

"काकू आमच्या आई आल्या आहेत का हो? थोड्या रागातच निघाल्या होत्या. सगळीकडे शोधलं शेवटी इथे आले. माझंही चुकलंच... रागात खूप जास्त बोलून गेले..."

तिला थांबवत सुलूताई म्हणाल्या, "अग थोडा श्वास घे. आहेत वहिनी इथे." 

तेवढ्यात आतल्या खोलीतून आजी बाहेर आल्या, "आहे ग मी इथेच. चल जाऊया घरी."

त्यांचा हसरा चेहरा पाहून सुनेचाही चेहरा उजळला. 

'खरंच रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा हे शब्द किती खरे आहेत,' सुनेचा हात धरुन घरी जाणाऱ्या आजी विचार करत होत्या. 

समाप्त 


✍️ सविता किरनाळे

 वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post