स्वाभिमान

 स्वाभिमान 

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

" सुशीला, अगं तुला पैशांची इतकी गरज होती तर सरळ मला मागायचे होतेस ना !" प्रीती कमरेवर हात ठेवून बोलत होती. केर काढण्यासाठी कोपर्‍यात ठेवलेली केरसुणी उचलता उचलता सुशीला थबकली. प्रीतीच्या बोलण्याचा तिला अर्थबोधच होईना. वळून ती प्रीतीकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागली.
" मी दिले असते तुला पैसे, ऍडव्हान्स म्हणून..... टेबलावर ठेवलेले दहा हजार रुपये न सांगता कशाला घेतलेस ?" प्रीतीच्या प्रश्नाने सुशीला अवाकच झाली. हा तर सरळ सरळ चोरीचा आरोप होता .

सुशीलाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तोंडाला कोरड पडली.' हेच काय ते बाकी होते ' तिच्या मनात विचार आला. दोन महिन्यापूर्वीच सुशीलाच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती. अपंग असलेला तिचा नवरा प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या अपयशाला कंटाळला होता. कुठलीही कला आणि शिक्षण नसल्याने, कशाबशा मिळालेल्या हलक्या प्रतीच्या नोकऱ्याही त्याला टिकवता येत नसत. हातगाडीवर भाजी विकण्याचा धंदाही करून बघितला. पण कशातच म्हणून  यश नव्हते. घरच्यांचे आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांचे टोमणे ऐकून ऐकून तो कंटाळून गेला होता. शेवटी तर कडेलोटच झाला!! दोन आठवड्यापुर्वीच एका ऑफिसमध्ये मोठ्या मिन्नतवारीने मिळालेल्या 'प्यून'च्या नोकरीतूनही त्याला डच्चू मिळाला आणि त्याच्यावर न चिडणारी आणि त्याला कायम समजावून घेणारी त्याची आईही त्यादिवशी पटकन बोलून गेली,
"वाटलंच मला तुझं थोबाड बघून .... तू म्हणजे आपल्या घराण्याला लागलेला कलंक आहेस अगदी !! हो चालता माझ्या समोरून .... तोंड दाखवू नकोस मला !! मेला,' खायला कहार आणि धरणीला भार ' नुसता ..."
कुणावरही भार बनून जगण्यापेक्षा त्यानं त्याच रात्री गळफास घेऊन मरण पत्करलं, ते दोन कच्ची बच्ची , आणि सुशिलाला पोरकं करून !!

सुशीला वर जणू आभाळच कोसळलं. आधीच कमी वयात वडिलांनी लग्न करून दिलं होतं. शिकण्याची इच्छा असूनही शिकता आलं नव्हतं. मुलगी म्हणजे जीवाला लागलेला घोरच जणू !! ... अशा आविर्भावात कायम आई-वडील असत. त्यामुळे पहिल्यांदा ज्यांनं पसंत केलं, त्याच्याशी मुकाट्याने लग्न केलेलं !! एकमेकांना समजावून घेण्याच्या आधीच दोन पोरं पदरात पडली आणि काही कळायच्या आत नवरा आयुष्यातून कायमचा निघूनही गेला. आपल्या मागे बायको आणि पोरांचं काय होईल याचा विचारही न करता !! एकामागून एक होणारे आघात झेलत सुशीला कशीबशी जगत होती. प्रीतीच्या आरोपांमुळे काही काळ ती जणूकाही बधीरच झाली. आणि नंतर  झालेल्या अपमानाने तिला रडू कोसळले.

आजवरच्या आयुष्यात कधी कोणाचा एक रुपयाही, "असाच" न घेतलेल्या तिला, तो आरोप जिव्हारी लागला होता.
" ताई ,अहो मी कशाला घेऊ टेबलावर ठेवलेले पैसे ? मी तर पाहिले देखील नाहीत पैसे !! इतके दिवस तुमच्याकडे काम करते आहे... असं काही करायचं असतं ,तर कधीच केलं असतं ..." रडक्या आवाजात सुशीला प्रीतीला म्हणाली.
" तुझ्याशिवाय कालपासून बाहेरचं कोणीही घरात आलेलं नाही. मग पैसे गेले कुठे ? का त्यांना आपोआप पाय फुटले ?" प्रीती कडाडली.
" ताई, अहो खरंच मी नाही घेतले पैसे ... पाहिजे तर देवघरातले फूल उचलून सांगते. साहेबांनी किंवा पप्पू ने उचलून इकडे तिकडे ठेवले असतील." सुशीला गयावया करत म्हणाली.
" हे बघ ,शेखर ची शामत नाही मला विचारल्याशिवाय पैशांना हात लावायची !! आणि पप्पू काल दुपारपासून शाळेच्या ट्रिप बरोबर महाबळेश्वर ला गेला आहे." प्रीती घमेंडखोर आवाजात म्हणाली. बाथरूम शेजारील वॉश बेसिन समोर दाढी करत उभा असलेला शेखर, बायकोच्या बोलण्याने व्यथित झाला आणि काही न बोलता चटकन अंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरला.
" हे बघ सुशीला..... बऱ्या बोलाने तू कबूल झाली नाहीस, तर मला पोलिस कंप्लेंट करावी लागेल. मग पुढे होणाऱ्या त्रासाला तू जबाबदार असशील. दहा हजार कमवायला मला किती कष्ट करावे लागतात, हे माझे मला माहीतं ... ते तुझ्यावरील दयेसाठी असेच सोडायची माझी तयारी नाही." ठसक्यात बोलून प्रीती आतल्या खोलीत निघून गेली, आणि हातापायातलं त्राण जाऊन सुशीला तिथेच मटकन बसली.

शेखर नको म्हणत असतानाही ,प्रीतीने पोलिस कंप्लेंट केली आणि चोरीचा गुन्हा दाखल झाला. संशयित म्हणून सुशीलाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. महिला कॉन्स्टेबलने इरसाल भाषेत दम देऊन सुशीला कडून चोरीचा कबुलीजबाब मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मारहाणीची धमकीही देण्यात आली. अचानक आलेल्या संकटाने पहिल्यांदा सुशीला खूप घाबरली. पण न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी, प्रसंगी मार खाऊन आणि छळ सोसून त्याविरुद्ध लढण्याचे तिने ठरवले. त्याच सोसायटीत काम करणाऱ्या इतर कामवाल्या बायकांचे पाठबळ तिला मिळाले, आणि त्यांनी खोट्या तक्रारीसाठी सुशिलाच्या होणाऱ्या छळाविरुद्ध पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याची धमकी दिली, आणि पोलीस निवळले. पोलिसांनी प्रीतीला पुरावा देण्याची मागणी केली .पण कुठलाही ठोस पुरावा प्रीतीला सादर करता आला नाही. पुरावा नसल्याने  तक्रार मागे घ्यावी असा लकडा पोलिसांनी प्रीती मागे लावला.

" सुशीला बेटा ..... नाष्टा केलायस् का ? ये ... हे पोहे खा आणि गरम गरम चहा पी ! असं उपाशीपोटी काम करू नये." प्रीतीच्या बोलण्याने सुशीला आश्चर्याने स्तंभितच झाली. कालपर्यंत चोरीचा आरोप करून निर्दयपणे वागणारी आणि बोलणारी प्रीती अचानक इतकी कशी काय बदलली हे तिला समजेना.
" नको ताई ... सकाळी लवकर मला जात नाही अन्न ! मी नंतर खाईन माझा डबा !!" काम करता करता ती पुटपुटली.
" हे बघ सुशीला, या महिन्यापासून मी तुझा पगार दोनशे रुपयांनी वाढवणार आहे. रोज थोडं जास्त थांबून फर्निचर पुसत जा !" प्रीती मऊ आवाजात म्हणाली.
" नाही ताई ... एकदा तुमच्या चोरीचा छडा लागला, की मी तुमचं काम सोडणार आहे." ठाम स्वरात सुशीला बोलली.
" अगं वेडी आहेस का ? मी तर कालच पोलीस कम्प्लेंट मागे घेतली ..... विचार पाहिजे तर साहेबांना !" वॉश बेसिन पुढे उभ्या असलेल्या शेखरकडे अंगुलीनिर्देश करत प्रीती म्हणाली.
" पण मग चोरीला गेलेले पैसे ? .... " मान डोलावणार्‍या शेखरकडे पहात आश्चर्याने सुशीला पुटपुटली.
" अगं तो सगळा घोळ पप्पू ने घातला होता." मोठ्यांदा हसत प्रीती बोलू लागली. "त्या दिवशी दुपारी तो सहलीला निघाला होता. घरात कोणीच नव्हते आणि पैसे टेबलावर पडले होते. या शहाण्याने ते उचलून कपाटातील स्वतःच्या दप्तरात ठेवले आणि गेला तसाच, कोणालाही काही न सांगता. तो सहलीहून आल्यावर हा सगळा उलगडा झाला !!"

सुशीलाच्या डोक्यात संतापाचा स्फोट झाला. प्रीतीच्या डोळ्यांना डोळे भिडवून ती बोलू लागली, "आणि चोरीचा आरोप तुम्ही माझ्यावर केला .. कोणीही वाली नाही ना मला !! ज्याने उठावे त्याने मला झोडपावे. का असं वागलातं हो ताई ? किती चांगल्या स्वभावाची, समजत होते मी तुम्हाला !! पण या प्रसंगात तुम्ही तुमचं खरं रूप दाखवलं मला !!!" सुशीला क्षणभर बोलायची थांबली. एक दीर्घ श्वास घेऊन निश्चयाने म्हणाली,
" उद्यापासून मी येणार नाही ताई कामाला ! इतर ठिकाणी काम नाही मिळाले, तर अर्धपोटी राहीन,  मुलांना एक वेळचं जेवायला देईन, पण तुमच्याकडे काम करणार नाही ! ताई .... गेल्या सहा महिन्यात मी सगळं काही गमावलं !! काही उरलंच नाही हो गमावण्यासारखं !! फक्त एकच गोष्ट आता माझ्याकडे आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत मला ती गमवायची नाहीये ... तिच्यासाठी कोणताही त्याग करायची माझी तयारी आहे. तिला न्याय देण्यासाठी मला तुमची नोकरी करता येणार नाही !!!"
हातातील केरसुणी कोपऱ्यात ठेवून सुशीला दरवाजाकडे निघाली. दरवाजात क्षणभर थांबून ती मागे वळली.
" आणि हो ताई ....  या महिन्यातल्या झालेल्या दिवसांचा पगारही मी तुमच्याकडून घेणार नाही. तुम्हाला माझ्यामुळे झालेल्या मनस्तापाची किंमत म्हणून !!" दरवाजात असणार्या स्वतःच्या फाटक्या चपलेत पाय सरकवून ती निघणार तोच मोठ्यांदा ओरडून प्रीतीने तिला अडवले.

" थांब सुशीला,  इतका कसला माज आलाय तुला , की इतकी चांगली नोकरी लाथाडून निघाली आहेस ?"
सुशीला वळली तिच्या चेहऱ्यावर शांत हसू पसरले होते.
" ताई तुम्ही ज्याला 'माज' म्हणताय ना .... त्याला आम्ही 'स्वाभिमान' म्हणतो !! ..." एवढं बोलून तिने प्रीतीकडे पाठ केली आणि ती चालु लागली. ध्यानीमनी नसताना कोणीतरी फाडकन मुस्काडीत दिल्यासारखी अवस्था प्रीतीची झाली. अवाक होऊन प्रीती , ती गेलेल्या दिशेकडे बघतच राहिली, आणि आत वॉश बेसिन समोर उभा असलेला शेखर मनापासून हसला !!

© मिलिंद अष्टपुत्रे

वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post