यंत्र की मानव

        यंत्र की मानव

✍️ राजश्री सोवनी   


सकाळचे  दहा वाजत आले होते. नुकतीच पावसाची एक सर येऊन गेली होती. सगळीकडे मातीचा मंद सुगंध पसरला होता. इतकं आल्हाददायक वातावरण असूनही सकाळपासून कामं करून थकल्यानं मानसी घामाघूम झाली होती. अजूनही बरीच कामे व्हायची होती.  सावनी.... तिची कन्या मदतीला येईल अशी काहीच चिन्हं दिसत  नव्हती. शेवटी मानसीनेच तिला हाक मारली. “सावनी   ए सावनी..” 

“आई मी बाहेर निघाले आहे.” सावनी तिच्या रूममधून डोकावत म्हणाली.

  “सावनी, मला थोडी मदत कर ना. बाहेर जाण्याआधी थोडी भांडी घासून जाना.” मानसी म्हणाली.

 “आता मला शक्य नाहीये ग आई.”  

“मग  केर काढतेस का दोन खोल्यांचा तरी?”

  “आई, अगं हा काय ऑप्शन आहे? नाही हं मी आज काहीही करणार नाहीये. गेले चार दिवस  हेच चाललंय. धुणं धुवा,  भांडी घासा आणि केर काढा. मी अगदी कंटाळून गेलेय. आज मी काहीही करणार नाहीये. मी चालले ईशाकडे.” मैत्रिणीकडे निघालेल्या सावनीची आज काहीही काम करण्याची तयारी नव्हती. 

“आणि आई, साहिल ची थोडीतरी मदत घे ना गं. दरवेळी मीच कशी सापडते तुला?” 

“घरी नाहीये ग तो.”  मानसीने सांगितलं.

 “कधी असतो?”

 “सावनी, तू जा  मैत्रिणीकडे. उगीच वाद घालू नकोस माझ्याशी.” नेहमीप्रमाणे आई-मुलीचं संभाषण रंगलं होतं. मानसी सुनील आणि त्यांची सावनी आणि साहिल ही दोन कॉलेज वयीन मुलं असं हे चौकोनी सुखवस्तू कुटुंब. आयटी इंजिनियर झालेला सुनील एका कंपनीत मोठ्या पदावर होता तर मानसी एका खाजगी कंपनीत.


    गेल्या चार दिवसांपासून विमल म्हणजे त्यांची कामवाली आलेली नव्हती. त्यामुळे काम करून करून मानसी आणि सावनी यांची वैतागलेल्या होत्या. आलिया भोगासी म्हणत मानसी पुन्हा एकदा कामाला लागली. पर्यायच नव्हता काही. सगळी कामं स्वतः करायची असल्यान तिनं आज रजा घेतली होती.


           काही वेळानं  मानसीच्या मोबाईलची रिंग वाजली.  तिची ऑफिसमधली मैत्रीण विशाखा बोलत होती. “हॅलो मानसी, तू कामवाली बाई या  विषयावरून अगदी वैतागलेली आहेस ना? मला पूर्ण कल्पना आहे." 

“अग हो ग बाई. वैताग आणलाय या कामवाल्यांनी.”

 “ऐक मानसी, या साऱ्यावर एक सॉलिड उपाय सापडलाय मला.” “विशाखा नवीन बाई मिळाली आहे का? तसं असेल तर सांग मला.”

 “अगं मानसी, ऐक तरी आधी. मी नवीन बाईच  लावणार आहे पण ही नवीन कामवाली आपल्याला विकत घ्यावी लागते.” 

“काय?” मानसी किंचाळलीच. 

“अगं, हो हो. आधी ऐकून तरी घे. ही कामवाली म्हणजे डोमेस्टिक हेल्पर असा एक रोबो असणार आहे. तोच घरातली सगळी कामं करणार.”

  “ए विशाखा, अगं काहीतरीच काय? आणि मला बाई रोबोंची फार भीती वाटते.”

 “अगं घाबरायचं काय त्यात? हे बघ, किंमत जरा जास्त आहे. पण तू दरमहा कामवाल्यांवर पैसे खर्च करतेस ना? शिवाय त्यांच्या तक्रारी, दांड्या हे वेगळच. त्यापेक्षा एकदाच  रोबो  विकत घेऊन टाकायचा. रोबो सेंटरमध्ये जाऊन त्यासाठीचं ट्रेनिंग घ्यायचं. आपल्याला कोणकोणती कामं करून हवी आहेत, त्याप्रमाणे प्रोग्रॅम फीड केला जाईल. त्यानुसार योग्य ती कमांड दिली की हा रोबो आपल्याला मदत करेल. मी तर बाई ठरवलंय रोबो घेऊन टाकायचा. बघ तुला पटतंय का आणि मग मला कळव काय ते.” विशाखा नं फोन ठेवला.

मानसी विचारात पडली. हळूहळू तिला विशाखाचे विचार पटू लागले. याबद्दल तिनं नवऱ्याशी म्हणजे सुनीलशी बोलायचं ठरवलं. बऱ्याच विचारमंथनानंतर मानसी विशाखाबरोबर रोबो सेंटर मध्ये जायला तयार झाली. मानसीने निवड केलेल्या रोबोचं नाव ॲना  होतं. मानसी आणि सावनीनं  त्यासाठीचं ट्रेनिंग घेतलं. ॲनाला घेऊन मानसी घरी आली. दिलेल्या कमांडप्रमाणे ॲना काम करू लागली. सकाळी सात वाजता घराची  स्वच्छता करणे नंतर भांडी घासणे, धुणे धुणे वगैरे वगैरे. सकाळी सात वाजले की  ॲनाची साफसफाई सुरू होई. घरातली कामे करायला हाडामासाच्या माणसाऐवजी चालता-बोलतं यंत्र वावरताना पाहून सुरुवातीला सगळ्यांनाच विचित्र वाटलं पण हळूहळू सर्वांना ॲनाची सवय होत होती. 


          एकदा गंमतच झाली साहिलचे मित्र प्रोजेक्टसाठी घरी आले होते. रात्री खूप उशिरापर्यंत जागून हॉलमध्ये झोपले. तर ॲनाने नेहमीप्रमाणे सकाळी सातला साफसफाई सुरू केली. “सावनी अग ही केर काय काढतेय? मुले झोपली आहेत ना?” मानसी वैतागून म्हणाली. 

“आई, तिला तसा प्रोग्रॅम फीड केलेला आहे. तिला थांबवण्याची कमांड द्यावी लागेल.” सावनीन सांगितलं. ॲना ला कसबसं थांबवण्यात आलं. बाकी ॲनाच काम अगदी सिस्टिमॅटिक होतं. अगदी ठरलेल्या वेळी ते सुरू होई.


          एकदा मानसीने एक कप  जास्त चहा केला. सावनी म्हणाली, “आई, हा चहा कुणासाठी?"

“अगं त्या ॲनाला म्हणावं दमली असशील तर चहा घे जरा.”

 “आई, ते मशीन आहे. ते कसं चहा पिणार? आणि ते दमतही नाही बरं का.” 

“खरंच गं  विसरतेच  मी कधीकधी.” मानसी हसून म्हणाली. ॲनाची  सगळी कामं एका ठराविक सिस्टिम मधून होत होती. आज कामवाली  येईल की नाही ही मानसीची  चिंता आता मिटली होती.  पण काहीतरी मिसिंग होतं एवढ नक्की.  मानसीचं मन अनेकदा नकळत ॲना आणि विमलची तुलना करायचं. अलीकडे विमलचं सुट्ट्या घेण्याचं प्रमाण वाढलं होतं  तरी  अनेक वर्ष मानसीकडे काम करणारी विमल मानसीच्या घरातलीच असल्यासारखी होती. तिच्या ठरलेल्या कामा व्यतिरिक्त इतर कामेही ती अनेकदा करायची. सुट्टीच्या दिवशी किंवा  आजारी असताना मानसीला विमलची सोबत वाटायची. तसं ॲनच्या बाबतीत होत नव्हतं. शेवटी यंत्रच  ते त्याला माणसाची सर कशी येणार?


        “येऊ का?” सकाळीच  शेजारच्या राणे वहिनी आल्या होत्या. मानसी बाहेर आली. 

“मी असं ऐकलंय  की तुमच्याकडे ॲना काम करते. खरं सांगू का, मी पण खूप वैतागले आहे कामवाल्या बायकांमुळे.   ती आमच्याकडे पण येईल का कामाला?” राणे वहिनीनी विचारलं.

 “अहो राणेवाहिनी, ती काही नेहमीसारखी कामवाली नाहीये. चांगले भरपूर पैसे देऊन विकत आणली आहे. अशी कशी येईल तुमच्याकडे?” मानसीने समजावलं त्यांना.

  “आम्ही पण देऊ ना आमचं कॉन्ट्रीब्युशन आणि तसंही तुमच्याकडंच काम झाल्यावर रिकामीच असते ना ती?" 

“पण तुम्हाला त्यासाठी ट्रेनिंग घ्यावे लागेल.”मानसी म्हणाली.

 “ते घेईन ग मी.” राणेकाकूंची तयारी होती. शेवटी ॲनाला राणे काकूंकडे पाठवायचं ठरलं.  राण्याकडेचं कामही ती करू लागली. त्यासाठी तिच्या प्रोग्रॅममध्ये काही बदल करावे लागले.


          आज मानसीला थोडं बरं वाटत नसल्याने ती घरीच होती. दुपारी शेजारच्या राणेकाकू कुठेतरी बाहेर जाताना दिसल्या. तिला उत्सुकता वाटली. कुठे गेल्या असतील एवढ्या उन्हाच्या? पण  आता विमल नाहीये ना काही बातमी कळायला. मानसीला वाटून गेलं. “ए सावनी, ॲनाला अशी काही कमांड देता येईल का ज्यामुळे राणेकाकूंकडच्या बातम्या कळतील आपल्याला?” 

“काय हे आई? तू पण कमाल करतेस हं.” शेवटी यंत्र आणि माणूस यात एवढा फरक राहणारच.” सावनी हसून  म्हणाली.

  

        असेच काही दिवस गेले. एक दिवस अचानक विमल घरी आली. अगदी खचलेली वाटत होती. तब्येत उतरलेली, डोळे खोल गेलेले. तिचे पाणावलेले डोळे पाहून मानसीला दयाच आली तिची. ती सांगत होती पूर्वी पाच -सहा घरी काम करायची ती. पण आता बर्‍याच जणांनी रोबो घरी आणल्याने एक दोनच कामं उरली होती तिची. तिचा नवरा पॅरालीसीसनं आजारी होता. अगदी तुटपुंजे पैसे तिला आता मिळत होते आणि इतक्या कमी पैशात घरखर्च भागवणे अशक्य होतं तिच्यासाठी. मानसीला अगदी काकुळतीला येऊन ती काम मागत होती. “आता जास्त सुट्ट्या नाही घेणार मी आणि कधी घेतली घेतलीच तर माझ्या मैत्रिणीला पाठवीन कामासाठी.” विमल म्हणाली. तिचं सुट्ट्या घेण्याचे प्रमाण नवऱ्याच्या आजारपणामुळे अलीकडे वाढलं होतं पण तिच्या परीने तिने उपाय शोधला होता.


       विमलची  अवस्था बघून मानसी अस्वस्थ झाली होती डोमेस्टिक हेल्पर म्हणून कुणाला ठेवायचं? यंत्र की मानव? असा प्रश्न तिच्या समोर होता. एकीकडे माणसापेक्षा अधिक क्षमतेने, अचूकपणे काम करणारी ॲना होती तर दुसरीकडे विमल. कामसू, प्रामाणिक, स्वभावाने अगदी साधी. अर्थात आजारपणं, घरच्या अडचणी, वाढतं वय या मानवी मर्यादा तिलाही होत्याच.  मानसीला वाटलं... यंत्र माणसापेक्षा अधिक कार्यक्षमतेने काम करेल यात  शंका नाही तरीही   जिथे माणसांना काम करणं जोखमीचं  आहे अशा ठिकाणी यंत्रमानवाचा वापर केला तर ते योग्यच ठरेल मात्र जी कामं माणसं सहजगत्या करत आहेत तीही यंत्र मानव करायला लागले तर भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात माणसांचं काय होईल? उद्या आपल्या ऑफिसमध्ये ही अशीच एखादी ॲना.... नुसत्या विचारानेच मानसीच्या अंगावर काटा आला.


यंत्र की मानव अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या तिच्या मनानं माणसाच्या बाजूने कौल दिला होता. ॲना ऐवजी पुन्हा विमलला कामावर ठेवायचं तिने ठरवलं. 


✍️ राजश्री सोवनी 


वरील कथा राजश्री सोवनी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post