अमरत्व

 अमरत्व

✍️ पूजा सारंग 

"आज काय अजून निघायचा विचार दिसत नाही तुझा अनामिका.." तिने आवाजाच्या दिशेने मागे वळून बघितलं. नेहमीप्रमाणे तिच्या मागे हाताची घडी घालून तो तिला बघत होता.       "तुला किती वेळा सांगितलं आहे आनंद. असा माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. आणि हे काय रे रोजच माझ्या मागे ऊभा असतोस. मी काही शिक्षा नाही केली तुला " - अनामिका .


      "तुझी ही शिक्षा मी कायम भोगायला तयार आहे. पर तुम मुझे उस काबील समझती नही हो... क्या करू... " आनंद म्हणाला.


      तिने त्याच्याकडे जरा नाराजीनेच बघितलं. म्हणाली, "हे बघ आनंद तूला नेहमीच मी सांगत आहे माझा नाद सोडून दे. तू जी स्वप्न बघत आहेस ती मी कधीच पूर्ण करू शकत नाही. प्लीज "


      "अगं पण प्रॉब्लेम काय आहे ते तरी एकदा मला सांग. माझ्यात काही कमी आहे का? मी कुठे चुकतो आहे का? माझं कुठलं वागणं, कुठली सवय तुला आवडतं नाही. तु सांग तर खरं. मी स्वतःला तुझ्या अपेक्षेनुसार बदलायला तयार आहे. फक्त एकदा बोल तरी माझ्याबरोबर प्लीज..."


      "हे बघ आनंद तुझ्यात काहीच कमी नाही आहे. इन फॅक्ट तू खूप चांगला आहेस. पण मी ..मी .. मी नाही त्या वाटेवरून जाऊ शकत परत. आणि हे बघ मला .. मला .. सोड.. तू जा इथून..." अनामिका जरा जास्तच चिडून बोलत होती. जेणेकरून आनंदला राग येईल आणि तो निघून जाईल. पण तो तर हसत होता. 


"अरे तू हसतोयस काय ? मी इतकं  चिडून बोलते आहे तुझ्याबरोबर आणि तू... "


      "अगं अनामिका आपण कोणावर चिडतो. कोणावर आपला राग काढतो... ज्याच्यावर आपलं प्रेम असतं . जी व्यक्ती आपली असते त्यांच्यावरच ना..तू माझ्यावर चिडली म्हणजे मी तूझ्या जवळची व्यक्ती आहे हो ना..."


      "हे बघ आनंद.  तू हे असे शब्दांचे खेळ करू नकोस.. आणि तू दूर रहा माझ्यापासून.  मी प्रेम नाही समजू शकत. मी कुणालाही नाही समजू शकतं. माझ्यापासून दूर रहा... नाहीतर मी तुला सुद्धा गमावून बसेन आणि मी नाही सहन करू शकत. आता कुणालाही गमावण्याची ताकद नाही राहिली माझ्यात. माझ्यापासून दूर रहा. दूर रहा. नाही आहे आपल्यात काही.. नाही आहे काही आपल्यात.. प्लीज दूर रहा...."


      अनामिकेचा दूर रहाचा जप सुरूच होता. तिच्या मनातील भिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आनंदने तिला शपथ घातली. तरीदेखील ती काहीच सांगत नव्हती. आनंदला कळत होतं तिने खूप काही मनात साठवून ठेवले आहे. त्यामुळेच ती आयुष्यात पुढे जात नाही. त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. आणि आज तिच्या मनातली भिती काढून टाकण्याचे त्याने ठरवले होते.


      "हे बघ अनामिका तू मनात खूप साठवून ठेवले आहेस. मला ते जाणवतंय. चेहर्‍यावर एक फेक स्माईल घेऊन वावरते सगळ्यांमध्ये. पण मन मोकळं जगायला हवंस तू. मी तुला साथ देईन.  फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. सांगून बघ मला."


      "हे बघ मला काहीच सांगायचं नाही. मी काही साठवून ठेवलं नाही. तू काहीतरीच बोलत आहेस. आपल्यात काहीच नाही. मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही समजलास... जा इथून तू." अनामिका त्याच्यावर असलेली नजर खाली करत बोलली.


      "अच्छा... तुला नाही ना वाटतं काही माझ्याबद्दल. ठीक आहे. मग आता ह्या समुद्राची आणि ह्या सूर्यास्ताची शपथ आहे मला. ह्या समुद्रात स्वतःला वाहून देतो मी. तसं ही तुला काय फरक पडणार आहे माझ्या असण्या नसण्याचा." असं म्हणत आनंद तिथून समुद्राच्या दिशेने चालू लागला. हे बघून अनामिका खूप पॅनिक झाली आणि जीवाच्या आकांताने आनंदला हाका मारून लागली. आनंदने वळून बघितले तर अनामिका पांढरीफटक पडली होती. ती थरथर कापत होती. कधीही आपली शुद्ध हरपून बसेल असं वाटतं होतं. आनंदला तिला तसं बघून काहीतरी हरवणारं आहे असं वाटलं. त्याने धावत जाऊन तिला सावरलं. पाणी प्यायला दिलं. पण ती आनंदला मारू लागली.


      "काय करायला चालला होतास. कळतंय का तुला.. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं. ह्या आधीसुद्धा मी माझं प्रेम गमावून बसले आहे. त्याला नाही वाचवू शकले मी. त्याच्यासाठी नाही काही करू शकले. त्याचीच शिक्षा स्वतःला देत आहे. सगळ्यांपासून दूर राहत आहे. पण तुझ्याजवळ जाण्यापासून नाही स्वतःला थांबवू शकत होते. तरीसुद्धा माझ्या नशिबाची काळी सावली तुझ्यावर नको पडायला म्हणून टाळत आहे तुला. आणि तू चाललास त्याच्यात वाहून जायला. अरे ह्याच्याबरोबर मी रोज इथे येऊन भांडते आहे. त्याने माझ्या सागरला गिळलं रे.. आणि आज माझा आनंदसुद्धा हिरावून घेऊन असाच शांत राहील हा . खूप दुष्ट आहे हा.. खूप दुष्ट..."


      "हे बघ तू आधी शांत हो अनामिका. हे बघ मी तुझ्यासमोर उभा आहे धडधाकट.  तुझा आनंद तुझ्यासमोर आहे. शांत हो." 


ती थोडी शांत झाल्यावर आनंदने तिला विचारलं, "हे बघ अनामिका तू मगाशी जे काही बोलत होतीस त्यावरून मला इतकंच कळलं की तुझं सागरवर प्रेम होतं. पण पुढे काय ते नाही समजलं. तुला जर बरं वाटणार असेल आणि मुख्य म्हणजे माझ्यावर विश्वास असेल तर मला सांगून बघ."


      " सागर... माझा सागर.  कविता करायचा. खूप काही लिहायचा. रोज आमचं इथे भेटायचं ठरलेलं. आणि दिवसभरात त्याने लिहीलेलं मला ऐकवायचा. त्याच्या बहुतेक कविता ह्या समुद्रावर आणि सुर्यास्तावर असायच्या. मी त्याला विचारलं सुद्धा नेहमीच तू ह्या दोघांवर का कविता करतोस कधीतरी माझ्यावर कविता कर. तर म्हणाला.. मी फक्त स्वतःवर आणि स्वतःसाठीच कविता करतो. अगं सागर म्हणजे समुद्र.  म्हणजे आम्ही दोघं एकच आहोत. फक्त नावं वेगळी. आणि सुर्यास्त आवडतो कारण हा समुद्र त्याला आपल्यात सामावून घेतो आणि आपल्या पोटात त्याची दाहकता शांत करतो. शांत करायला तेवढीच क्षमता लागते ती त्याच्यात आहे.

      


      खूप भारी बोलायचा. पण कायम गूढ वाटायचं त्याचं बोलणं. कधी समजायचं नाही मला. किंवा मग मी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही असं मला आता वाटतं. मी कमी पडले त्याच्या बोलण्यातला अर्थ समजून घ्यायला. त्यादिवशी असंच सुर्यास्त बघताना मला एक कविता ऐकवली. पण त्यातला अर्थ मला नंतर कळाला. त्यादिवशी त्याने कवितेतून मला सुचवलं होतं त्याचा अस्त काळ. पण मला नाही समजलं. मी कमी पडले.       त्यानंतर कळालं मला त्यादिवशी त्याच्या वडिलांनी त्याचं स्वप्न,  त्याचं अस्तित्व.. त्याच्या कविता जाळून टाकल्या त्याच्यासमोर. त्याला खूप काही बोलले. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये त्याला आणायचं होतं. रोजच त्यांचे ह्यावरून वाद होत होते. आणि त्यादिवशी भांडण विकोपाला गेले आणि त्याच्या वडिलांनी त्याची स्वप्ने जाळली. सागरला हे सहन झाले नाही आणि मला भेटल्यानंतर तो परत ह्याच नेहमीच्या ठिकाणी येऊन स्वतःला ह्या समुद्रात अर्पण झाला. आत्महत्या केली त्याने. इथेच स्वतःचा जीव दिला. ह्या सूर्यास्ताचे रंग सगळ्यांना लोभस वाटतात. पण माझ्या आयुष्यातील काळोखी रात्र आणली ह्याने. म्हणून सांगते मला ती रात्र रोज रोज जगावी लागेल."


      अनामिका हमसून हमसून रडत होती. आनंदने ही तिला मनसोक्त रडू दिले. थोड्या वेळानंतर अनामिका थोडी शांत झाली. आनंदने तिला शांत झाल्यावर सांगितले..."हे बघ तुझं दुःख मी समजू शकतो असं नाही म्हणणार. पण इतकं नक्कीच सांगू शकतो की तू कुठेच कमी नाही पडली. कमी पडला असेल तर तो विश्वास. एकमेकांवर विश्वास ठेवून सगळंच बोलला असतात तर नक्कीच मार्ग निघाला असता. सागरने विश्वासात घेऊन वेळीच तुला त्याची स्वप्न सांगितली असती किंवा वेळेत तू तुझ्या मनातील शंका त्याला विचारल्या असत्यास तर कदाचित आज तुम्ही एकत्र असता. नवीन कविता जन्माला आली असती. असो पण जे झाले ते झाले.       आणि अजून एक हा समुद्र म्हणजेच सागर हो ना. मग त्या सागरवर राग धरून ठेवणार आहेस का. अग सागराला अमरत्व लाभलं आहे. तो झऱ्यासारखा आटत नाही की नदीसारखा सुकून कोरडा होत नाही. तो फक्त सामावून घेतो भलं बुरं... सगळंच... मनातला गाळ, अपयश, अपूर्ण स्वप्न, किती तरी सामावून घेतो. आणि साक्षीदार बनतो केलेल्या प्रयत्नांचा, पूर्ण झालेल्या विश्वासाचा ... अमरत्व वरदान की शाप हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर आहे. आता तू ठरवं तुला तुझ्या सागरचं अमरत्व वरदान ठरवायचं आहे की शाप. कारण तो ह्या समुद्राच्या पोटाशी शांत झाला आहे. त्याच्या इथे बसून ऐकलेल्या कविता परत एकदा आठवणीत आणून लिहून काढ. पुस्तक छापून काढू त्या कवितांचं आपण. त्या पुस्तकाच्या स्वरूपात त्याला जिवंत करू. अमरत्व वरदान ठरवू त्याचं. बघ जमेल का तुला. आणि मला माझ्या  प्रेमाला  सुद्धा अमर करायचं आहे... अनामिकेची आनंदी करून.... "


✍️ पूजा सारंग


वरील कथा पूजा सारंग यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post