आभाळमाया

 आभाळमाया

✍️ राजश्री सोवनी


कॉन्फरन्स रूमध्ये बसलेल्या मृणालनं एकवार घड्याळाकडे पहिलं. पावणे सहा वाजले होते. घरी जायला उशीर होतोय या विचारानं ती अस्वस्थ झाली होती. दुर्गा सिस्टिम्स कंपनीचा सगळा स्टाफच कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर देशमुख साहेबांची वाट पाहत होता.


            देशमुख साहेबांची गाडी कंपनीच्या गेट जवळ आली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. गेटमननं दरवाजा उघडला आणि एक कडक सॅल्यूट ठोकला. देशमुख साहेब गाडीतून उतरले आणि कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने चालू लागले. वाटेत भेटणारा प्रत्येक जण   त्यांना आदबीनं नमस्कार करत होता. साहेबांची ख्यातीच तशी होती; कडक शिस्तीचे तरीही  लोकप्रिय एम डी होते ते  कंपनीचे. कॉन्फरन्स हॉलमध्ये साहेबांचं आगमन होताच सगळेजण उठून उभे राहिले. ऑफिस संपल्यानंतर आज साहेबांनी ही मिटिंग कशासाठी बोलावली असेल याची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांनी हाताने सर्वांना बसण्याची खूण केली आणि बोलायला सुरुवात केली.

  “सध्याच्या या आधुनिक युगात सर्वच क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजीमध्ये सातत्यानं बदल होत आहेत. या स्पर्धेच्या काळात सर्वांना अप टु डेट राहणं अत्यंत गरजेचं आहे, आणि आपली कंपनी सुद्धा याला अपवाद नाही.  लवकरच आपल्या कंपनीमध्ये नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करावे लागणार आहे. त्यासाठी बेंगलोरला जाऊन स्टाफपैकी एकाला त्यासाठीचं ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि नंतर ऑफिस मधल्या सर्वांना ते द्यावं लागेल. यासाठी माझ्या डोळ्यांसमोर असलेलं नाव आहे......” 

सगळेच उत्सुकतेने पाहत होते सर कुणाचे नाव घेतील? "ते नाव म्हणजे मिसेस मृणाल देशपांडे.” 

मृणालसाठी हा सुखद धक्काच होता. “मृणाल यांची एफिशियन्सी, सिन्सीअॅरीटी वाखाणण्याजोगी आहे. मिसेस देशपांडे ही जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतील अशी माझी खात्री आहे.” सर्वांनी टाळ्या वाजून या निर्णयाचं स्वागत केलं. मृणालकडे बघून ते म्हणाले, ”मिसेस देशपांडे, तुम्हाला आपल्या बेंगलोरच्या हेड ऑफिस मध्ये जाऊन या महिना अखेरीला आठ दिवस ट्रेनिंग घेऊन यावं लागेल आणि त्यानंतर इथल्या आपल्या स्टाफला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी तुमची असेल. तुमची प्रवासाची, राहण्याची आणि इतरही सर्व व्यवस्था कंपनी करेल. आहात ना तयार यासाठी?” मृणाल क्षणभर विचारात पडली. 

तिच्या शेजारीच बसलेल्या माधुरीनं तिला भानावर आणलं. "मृणाल पटकन हो म्हण. अशी संधी वारंवार मिळत नाही.” 

मृणालने उठून सांगितलं, "सर, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा विश्वास मी सार्थ ठरवेन याची खात्री देते.” 

“इतर सर्व गोष्टी शहा मॅडमकडून समजावून घ्या.” देशमुख साहेबांनी मृणालला सांगितलं आणि ते हॉलच्या बाहेर पडले. सर्वांनीच मृणालचं अभिनंदन केलं. खरं तर या कंपनीत मृणाल तशी नवीनच होती आणि देशमुख साहेबांशी तिचा प्रत्यक्ष संबंध फारसा येत नसे. तरीही त्यांनी तिला दिलेली संधी, तिचं केलेलं कौतुक यानं ती खूपच भारावली होती. त्यांच्या गुणग्राहक स्वभावाविषयी ती ऐकून होतीच. आज प्रत्यक्ष अनुभव आला होता. 

मृणाल आज खूपच आनंदात होती. ऑफिसमध्ये तिचं झालेलं कौतुक, बेंगलोरला जाण्यासाठी तिची झालेली निवड या साऱ्यामुळे ती अगदी सुखावली होती. पण हे सारं मनोजला, तिच्या नवऱ्याला पटेल का याची मात्र तिला शंका वाटत होती. मनोजचा स्वभाव काहीसा विक्षिप्त, रागीट. हे सारं तो समजून घेईल का हा प्रश्नच होता. ती, मनोज, तिचा ज्यूनियर केजीमध्ये शिकणारा छोटू आणि सासूबाई असं तिचं छोटं कुटुंब होतं. नुकतीच त्यांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली होती. त्याचं लग्नही थोडं घाई गडबडीतच झालं होतं. 

मृणालने एम एस्सी झाल्यानंतर कॉम्प्युटरचा कोर्स केला आणि नोकरीच्या शोधात असतानाच शेजारच्या काकूंनी तिच्यासाठी मनोजचं स्थळ सुचवलं. मनोज इंजीनियर झालेला ,उत्तम पगाराची नोकरी असलेला, एकुलता एक, देखणा मुलगा होता. प्रथमदर्शनी स्थळ उत्तमच होतं. नाकारण्याचं काहीच कारण नव्हतं. दोन्ही बाजूंनी होकार आल्यानंतर लगेचच साखरपुडा झाला. त्यावेळी मनोजचे वडील आजारी असल्यानं अवघ्या महिनाभरातच त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर दोन महिन्यातच तिचे सासरे गेले.  दरम्यान दुर्गा सिस्टिम्स या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तिला जॉबही मिळाला होता. लग्न ठरल्यानंतर मनोज आणि मृणाल भेटत होते पण त्या भेटींमध्ये मनोजच्या विक्षीप्त स्वभावाची फारशी कल्पना तिला आली नाही. 

लग्नानंतर मात्र त्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा तिला त्रास होऊ लागला होता. मृणालच्या नोकरी करण्याला मनोजची ना नव्हती पण कधी कोणत्या गोष्टीला तो विरोध करेल याचा अंदाजच तिला यायचा नाही. एकुलता एक असल्यानं अत्यंत लाडात वाढलेल्या मनोजला प्रत्येक गोष्ट तो म्हणेल तशीच व्हायला हवी असायची. शांत स्वभावाची मृणाल त्याच्याशी शक्य तितकं जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती. हळूहळू त्याच्या स्वभावात बदल होईल अशी तिला आशा होती. तिच्या सासूबाईना अलीकडे संधिवाताचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे छोटूला सांभाळण्यासाठी तिनं दिवसभरासाठी बाई ठेवली होती. 


              आज ऑफिसमधल्या मीटिंगमुळे घरी जायला मात्र तिला उशीर झाला होता. जवळ जवळ सात वाजत आले होते. शक्य तितक्या फास्ट गाडी चालवत ती घरी जायला निघाली. एकीकडे विचारचक्र चालूच होतं. ट्रेनिंग याच म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरीला असल्याने आठ दिवस छोटूच्या शाळेला ख्रिसमसची सुट्टी असेल म्हणजे त्याला तिच्या आईकडे सोडता येईल; तसंच घरी पोळ्याच्या बाईंना दोन्ही वेळचा स्वयंपाक करायला सांगता येईल असा विचार तिनं केला. 

            ती घरी पोहोचली तेंव्हा शेजारच्या घरातून छोटूच्या खेळण्याचा आवाज येत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे मनोज ऑफिसमधुन घरी आलेला होता. हॉलमध्येच त्याचं जर्किन, ऑफिस बॅग अस्ताव्यस्त पडलेलं होतं. दारात चप्पल काढत असतानाच त्यानं विचारलं, ”किती वाजले? ऑफिस किती वाजता सुटतं?” त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. 

“ऑफिसमध्ये आज महत्त्वाची मीटिंग......” मृणालचं वाक्य अर्धवट तोडत मनोज म्हणाला, "स्पष्टीकरण नकोय. चहा मिळणार आहे की नाही मला? केंव्हाची वाट पाहतोय.”

  “आत्ता आणते” असं म्हणत ती हात-पाय धुऊन घाईघाईने स्वयंपाक घराकडे गेली आणि गॅसवर चहाचं आधण ठेवलं. घरातल्या या तंग वातावरणाने तिच्या आनंदावर विरजण पडलं होतं. काही क्षणांपूर्वीचा तिचा आनंद कुठल्याकुठे विरून गेला. मनोजचा स्वभाव विक्षिप्त, तापट. दुसऱ्याला समजून घेण्याची अपेक्षा त्याच्याकडून करणे व्यर्थ होतं. तिनं मनोजला चहा दिला. हॉलमधला पसारा उचलला आणि पुन्हा स्वयंपाकघरात कामाला सुरुवात केली. खरं म्हणजे ऑफिस मध्ये झालेल्या निर्णयाबद्दल मनोजला सांगण्यासाठी केवढी उत्सुक होती ती. पण या घडीला ते शक्यच नव्हतं. उद्या सकाळी बघू असं तिनं ठरवलं. ती पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

  तेवढ्यात चिमुकल्या हातांची मिठी तिच्या पायांना बसली. छोटू शेजारच्या काकूंकडून घरी आला होता. तिनं पटकन त्याला उचलून घेतलं आणि त्याचे पापे घेतले. “आज इतक्या उशीरा का आलीस?” त्यानं विचारलं.

 “अरे, खूप काम होतं ना ऑफिसमध्ये म्हणून झाला उशीर. थांब हं, मी तुला खाऊ देते.” त्याच्या त्या चिमुकल्या हातांच्या स्पर्शानं मृणाल सुखावली. नील अर्थात तिचा छोटू चारच वर्षांचा असला तरी त्याच्या सहवासात ती सगळी टेन्शन्स विसरून जायची. असं नेहमीच व्हायचं जेंव्हा जेंव्हा मनोजच्या तऱ्हेवाईक वागण्याचा, बोलण्याचा तिला त्रास व्हायचा तेंव्हा तेंव्हा छोटूचे निरागस बोबडे बोल त्यावर फुंकर घालायचे. 

              दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी मृणालनं मनोज आणि सासूबाईना सांगितलं की ऑफिस मध्ये झालेल्या मीटिंगमध्ये बेंगलोरला सॉफ्टवेअर ट्रेनिंगला जाण्यासाठी तिची निवड झाली आहे. नंतर इथल्या स्टाफला तिला ते ट्रेनिंग द्यायचं आहे. फक्त आठ दिवसांचाच प्रश्न आहे. खरंतर तिची झालेली निवड हा कौतुकाचा विषय होता पण तरीही हे सर्व ऐकल्यावर मनोज विनाकारण चिडला. या गोष्टीची थोडी धास्ती मृणालला होतीच. ”बेंगलोरला जावे लागेल म्हणजे काय? कुणाला विचारून ठरवलंस तू?” त्यानं चिडून विचारलं.

  “आज कालच्या मुलींना कुणाला काही विचारायला नको. निर्णय घेऊन मोकळ्या.” सासूबाईनीही  मनोजचीच री ओढली.

  “तसं नाही आपण सगळे मिळून ठरवूया.” मृणालनं समजावण्याचा प्रयत्न केला.

 “आणि मग छोटूचं काय? त्याला कोण सांभाळणार? आईची तब्येत पाहतेयस ना तू? तिला झोपणार आहे का घरचं सगळं?” मनोजनं रागावून विचारलं. 

“ऐक ना, आपल्या पोळ्याच्या बाईंना स्वयंपाक करायला सांगते दोन्ही वेळचा आणि छोटूला ख्रिसमसची सुट्टी आहे तेव्हा त्याला आईकडे सोडता येईल. मनोज, या ट्रेनिंग साठी माझं सिलेक्शन झालंय. देशमुखसाहेबांनी केवढ्या विश्वासानं ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मी नाही म्हटलं तर त्यांना काय वाटेल?” 

“अच्छा म्हणजे देशमुख साहेबांना काय वाटेल हे महत्वाचं. घरच्यांची गैरसोय झाली तरी चालेल. 

"असं काही नाहीये मनोज.” 

“नाहीये ना?. मग तुझ्या ऐवजी दुसरं कोणीतरी गेलं म्हणून आभाळ कोसळणार नाहीये; कळलं का?” मनोज म्हणाला. 

"अशी संधी पुन्हा मिळणार आहे का?. माझी खूप इच्छा आहे बेंगलोरला जाण्याची.” मृणाल म्हणाली. 

“हे बघ, तू  रोज जातेस ना दहा ते पाच ऑफिसला? तेच फार झालं. ट्रेनिंग बिनिंगला जाण्याची काही गरज नाहीये.” मनोज चिडून म्हणाला. 

"ऐक ना मनोज..” मृणाल रडवेली होत म्हणाली. 

“चर्चा बंद. आजच्या आज ऑफिसमध्ये सांगून टाक तुला जमणार नाही म्हणून.”

 “अरे पण का?” मृणालनं काकुळतीनं विचारलं. “मी म्हणतोय म्हणून.” मनोजनं  तिला बजावलं. मनोजच्या रागाचा पारा आणि आवाजाची पट्टी दोन्हीही वाढत चालले होते.


              घरात चाललेल्या या वादावादीमुळे बेडरुममध्ये झोपलेला छोटू जागा झाला पण घाबरून बेडवर तसाच पडून राहिला होता. मृणाल अगदीच निरुपाय झाली होती. जे आहे ते स्वीकारण्याशिवाय तिच्यासमोर पर्याय नव्हता. संताप, उदासीनता, असहाय्यता अशा संमिश्र भावना मृणालच्या मनात दाटून आल्या होत्या पण गप्प राहण्यावाचून ती काहीच करु शकत नव्हती. ऑफिसला जाण्याची घाई असल्याने ती पुन्हा कामाला लागली. तेवढ्यात मनोज ओरडला, ”मृणाsल छोटू कुठे आहे?” हातातलं काम टाकून मृणाल धावत गेली. बेडरूममध्ये छोटू नव्हता. 

“अरे, इथंच तर झोपलेला होता. थोड्या वेळाने उठवणार होते त्याला. कुठे गेला?” सगळं घरभर तिने शोधलं पण छोटू कुठेच नव्हता. ज्युनिअर केजी मधला मुलगा न सांगता कुठे जाईल असा? तिला काळजी वाटली. “इथं स्वतःच्या मुलाला नीट सांभाळता येत नाही आणि म्हणे लोकांना ट्रेनिंग द्यायचंय” मनोज अजूनच संतापला.

  “थांब, शेजारी बघून येते.” मृणाल म्हणाली. मनोजही छोटू कुठे दिसतो का ते पाहायला घराबाहेर पडला. सगळीकडे शोधलं पण छोटू कुठेच नव्हता. घाबरलेली मृणाल घरी आली. मनोजही आला. तो म्हणाला, ”कुठले कपडे घातले होते छोटूनं ते सांग. पोलीस कम्प्लेंट करतो.” मृणालच्या पायाखालची जमीनच सरकली. रडवेली होत ती म्हणाली, “थांब, मी पलीकडच्या सोसायटीतल्या मित्राकडे गेलाय का ते  बघून येते.” 

“हे बघ तिथे नसेल तर मला लगेच कळव.” मनोजनं बजावलं तिला.

                        घाईघाईनं तिनं पर्स खांद्याला अडकवली आणि ती धावत सुटली. पण शेजारच्या सोसायटीतल्या मित्राकडेही छोटू नव्हता. मृणालला आता काही सुचेनासं झालं होतं. मनोजला कळवण्यासाठी म्हणून तिनं मोबाईल काढायला पर्समध्ये हात घातला तर चॉकलेटचं रॅपर हातात आलं आणि परवा संध्याकाळचा प्रसंग तिला एकदम आठवला. 

मनोजच्या ऑफिसच्या पेपर्सना हात लावला म्हणून मनोज छोटूला खूप रागावला होता. छोटू बिचारा खूप रडला. खरंतर इतकं न रागवता समजावूनही सांगता आलं असतं; असं वाटलं तिला पण मनोजकडून अशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नव्हता. मनोजच्या या अशा स्वभावामुळे छोटू दूरच राहायचा त्याच्यापासून. मनोज रागावल्यामुळे खूपच हिरमुसला होता छोटू. कितीतरी वेळ रडत होता. शेवटी ती छोटूला घेऊन बागेत गेली आणि समजावलं तिनं त्याला, "बाबा रागावला ना तुला? पण तो का रागवला हे लक्षात आलं का? त्याच्या ऑफिसचे महत्त्वाचे कागद होते ते. ते फाटले असते तर बाबाला त्याचे बॉस रागवले असते ना? इथून पुढे बाबाच्या कोणत्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. कळलंs?” लहानग्या छोटूनं मान डोलावली होती आणि मग त्याची आवडती कॅडबरी तिनं त्याला घेऊन दिली. तेव्हा कुठे कळी खुलली होती स्वारीची. हे सर्व आठवून खूपच गहिवरून आलं तिला. छोटूच्या आठवणीने ती सैरभैर झाली होती. 

              मनोजला कळवायला हवं म्हणून तिने मोबाईल हातात घेतला. एवढ्यात समोरून छोटू पळत येताना दिसला. हातात त्याची पिगीबँक होती. धापा टाकत छोटू मृणालजवळ आला. "छोटू, कुठे होतास राजा?” मृणाल म्हणाली. खिशात हात घालून त्यानं कॅडबरी काढली आणि म्हणाला, "हे घे.” 

“हे काय?” तिने विचारलं. 

तेव्हा तो म्हणाला, "तुझ्यासाठी कॅडबरी आणायला गेलो होतो. घरातले सगळे रागावतात ना तुला?” मृणालनं  छोटूला घट्ट मिठी मारली आणि तिच्या मनामध्ये भरून आलेलं आभाळ डोळ्यातून वाहू लागलं... 


✍️ राजश्री सोवनी


वरील कथा राजश्री सोवनी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post