'ओढ'
सचिन देशपांडे
जयदीपने लॅच की ने दरवाजा उघडला... आणि सवयीनुसार ट्युबचं नी पंख्याचं अशी दोन्ही बटणं, एकत्रच आॅन केली. खांद्यावरची लॅपटाॅपची बॅग सोफ्यावर ठेवायला तो वळला, नी दचकलाच एकदम. जान्हवी रोलिंग चेअरवर बसली होती... मागे मान टाकून, डोळे बंद करुन. जयदीपने सोफ्यावर बसत बुट - मोजे काढले... ते बाहेर ठेवले, आणि दरवाजा बंद केला शक्य होईल तितक्या हळू. पण तेवढ्या आवाजानेही, जान्हवी उठलीच. एक जांभई देत, रोलिंग चेअर वर सावरुन बसली ती. तिने घड्याळ पाहिलं... रात्रीचे साडे अकरा वाजले होते.
"अगं काय गं?... तू झोपली नाहीस अजून?".
"पडले होते रे... पण झोपच येईना... मग जुईलीच्या खोलीत जाऊन बसले, म्हंटलं लेकीशी जरा गप्पा मारु... तर ती दहा - पंधरा मिनिटांनंतर, मला कटवायलाच लागली... तिची स्पेस अडचणीत आणली ना मी... मग आले बाहेर... थोडावेळ TV पाहिला... थोडावेळ शं. ना. चाळले... पण मनच लागत नव्हतं कशात... मग अशीच बसले आरामखुर्चीत, डोकं मागे टेकून... जरा झापड आली असावी तेवढ्यात".
"आॅल वेल ना?... थोडीशी लाॅस्ट वाटतेयस... बरं वाटत नाहीये का?".
"नाही रे... बरं आहे... पण काही वर्षांपुर्वी तू हाच प्रश्न जेव्हा माझ्या कपाळाला, गळ्याला तुझा उपडा हात लाऊन विचारायचास ना... तेव्हा जेन्युईनली बरं वाटत नसतांनाही, मला साॅलिड बरं वाटायचं... गेलेले लाईट आल्यावर तो पंख्याच्या वार्याचा पहिला झोत अंगावर पडल्यावर, जसा 'व्वाॅव फिल' येतो ना... अगदी तसंच".
"अरे बापरे... गुलजारचा कुठला पिक्चर पाहिलायस का आज?... भुतकाळात रमणं चालू आहे म्हणून म्हंटलं".
"छे रे... आज मी आणि आई बाहेर गेलो होतो, ते विसरलास ना?... नाही म्हणजे दोनेक वेळा फोन झाला आपला संध्याकाळपासून, पण काही विचारलं नाहीस... आत्ताही काही नाही... म्हणून म्हणतेय".
"ओ... ओ... अॅम सो साॅरी... शप्पथ डोक्यात होतं, पण समहाऊ... सो साॅरी... मी पटकन आलो फ्रेश होऊन... यू जस्ट बी हियर... मला सांग सगळं इत्यंभूत... उद्या काय तसाही रविवारच आहे".
.
.
.
.
.
"हां... बोल... काय कल्ला घातलात दिवसभर, सासू - सुनेने मिळून".
"मस्त दिवस गेला रे... तुला सांगू आज सकाळी तू गेलास आॅफिसला आठ वाजता... पाठोपाठ जुईली गेली काॅलेजला... मला काॅम्प-आॅफ होता... काहीच सुचेना करावं तरी काय... TV ला दिवसभर चिकटून रहायचं नव्हतं, आणि व.पु. ना मनाला चिकटवून घ्यावं... असा काही 'आयसोलेट मूड' नव्हता... त्या विचारातच तासभर घालवला... घड्याळाचे काटे जाम सरकत नव्हते पुढे... आणि तेवढ्यात आठवले मला, ते तीन - चार वर्षांपुर्वीचे दिवस... मी आणि आईंनी दोघींनीच मिळून केलेली भटकंती... लिटरली उनाडायचो आम्ही दोघी... पण बाबांचं मोठ्ठ आजारपण आलं, नी आई बांधल्या गेल्या... बाबा गेले... आता तर दोन महिन्यांवर वर्षश्राद्ध आलंय त्यांचं... मी विचार केला म्हणजे आई सुद्धा आॅलमोस्ट वर्ष झालं, बाहेर अशा पडलेल्याच नाहीयेत... विसरलेच होते मी माझ्या 'फ्रिकआउट पार्टनर' ला... म्हणून मग आधी तुला फोन करुन सांगितलं की, आईंना जरा बाहेर काढतेय आज... आणि लगोलग त्यांना फोन केला... नको नकोच चाललेलं आधी बराचवेळ त्यांचं... पण अखेर हो - नाही करत, झाल्या तयार".
"हो... मलाही आला मग फोन तिचा... जान्हवी ऐकतच नाहीये म्हणाली... मी ही म्हंटलं की जा अगं बाहेर जरा... हट्टाने एकटी रहातीयेस आमच्याकडे न येता... निदान मग जिव तरी रमव स्वतःचा".
"बोलल्या मला आई, तुझ्याशी फोन झाल्याचं... आंघोळ - पांघोळ आटोपून... साडे दहा वाजायच्या सुमारास, गेटवर गेले त्यांच्या... तुझी आई म्हणजे 'आॅलवेज बिफोर टाईम' माहितीये ना... सव्वा दहा पासुनच उभ्या होत्या खाली... त्यांना मी आधी सांगितलंच नव्हतं बिलकूल, की काय प्लॅन आहे... त्यामुळे मग आपण दादरला जायचंय म्हंटल्यावर, दचकल्याच त्या... पण मला माहितीये त्यांचं, रादर त्या अख्ख्या पिढीचच दादर प्रेम... सो तो त्यांच्या मनातून फुटत चेहर्यावर उमटलेला आनंद, मी अचूक पकडला... मस्त १०:५० ची फास्ट पकडली... फोर्थ सॅटरडे असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती... बर्याच वर्षांनी आई ट्रेनमध्ये बसलेल्या... ते ही विंडो सीटवर... त्यांच्या समोर मी बसलेले... खिडकीतून बाहेर पाठी जाणारी झाडं बघतांना जणू, सुटलेल्या आठवणींचं बोट पकडू पहात होत्या त्या... भरुन आलेले डोळे लपवायला, एक खोटी खोटी जांभईही द्यावी लागली मग त्यांना... दादरला उतरुन आम्ही जेव्हा, वेस्टच्या एक नंबरवरुन बाहेर पडलो... आईंनी खोल श्वासांत भरुन घेतला गंध भाजीपाल्याचा, फुला - फळांचा... मला म्हणाल्या... चल 'श्रीकृष्ण' चा वडा खाऊया पहिला... हळूहळू कोषातून बाहेर येत होत्या आई... मग आम्ही मस्त एकेक बटाटे वडा खाल्ला, नी लस्सी प्यायलो बाजुलाच... 'आयडिअल बुक डेपो' वर विसेक मिनिटं आम्ही दोघींनी, शेकडो पुस्तकं पालथी केली मग...
बर्याच वर्षांनी नव्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाच्या झालेल्या गुळगुळीत स्पर्शानी, मोहरल्या होत्या आई... त्यानंतर 'छबिलदास' वरुन जातांना... आईंनी त्या काॅलेजमध्ये असतांना तिथे केलेल्या अनेक एकांकीकेंबद्दल सांगितलं मला... एक वेगळाच नूर टपकत होता रे, त्यांच्या चेहर्यावरुन त्यावेळेस... मग तो शिवाजी मंदीर ते कबुतरखाना, असा पुर्ण पट्टा फिरलो आम्ही पायी... प्रत्येक दुकानात शिरलो... प्रत्येक ठिकाणी भाव करत, काहीच घेतलं नाही... आई अक्षरशः त्यांच्या नुकतच लग्न झालेल्या दिवसांत पोहोचलेल्या... मला म्हणाल्या... मी आणि हे असेच फिरायचो, हिच सगळी दुकानं... नी घासाघीस करुन, काही न घेताच बाहेर पडायचो... आम्हाला कुठलं गं परवडायला त्यावेळी दादर... पण हे मला म्हणायचे... एक दिवस नक्की येईल असा, जेव्हा इथेच घेऊन येईन मी तुला आणि म्हणेन... जे हवं ते घे, अगदी भाव - बिव न करता... आणि खरच खूप मेहनत केली गं ह्यांनी... स्वकष्टावर चांगले दिवस आणले... मग दिनकर सहस्त्रबुद्धे एके दिवशी ठाण्याहून, टॅक्सीने घेऊन आले दमयंती सहस्त्रबुद्धेला थेट दादरला... आणि त्या दिवशी खर्या अर्थाने आम्ही जिवाची मुंबई केली... आमच्या पन्नाशीत... विस वर्ष उलटून गेलीयेत पण तो दिवस, लख्ख आठवतोय मला... आई कंप्लिट 'नाॅस्टॅल्जिया मोड' मध्ये गेलेल्या रे... अगदी बघत रहावं त्यांच्याकडे, इतक्या सुंदर दिसत होत्या... भरपुर फिरल्यावर मग, 'विसावा' मध्ये पुरी लंच घेतला आम्ही... तीनच वाजले होते तोपर्यंत... आईंना म्हंटलं... चला शिवाजी मंदीरला जाऊ... जे काय असेल ते बघू... पण त्या म्हणाल्या... नको अगं... सुटेपर्यंत सात वाजतील, नी ठाण्याला घरी पोहोचेपर्यंत नऊ... हे एकटे घाबरतील इतकावेळ घरी... त्यांचं हे ऐकून मीच घाबरले रे क्षणभर, पण त्यावेळी गप्प राहीले...
त्या कोणाशीतरी फोनवर बोलत होत्या... हसत होत्या... अधेमधे 'इश्य' ही ऐकू आलं मला... मी चांगलीच गोंधळले होते एव्हाना... त्यांचा फोन आटपल्यावर, मी घसा खाकरत विचारलं आईंना... कोण घाबरेल आई घरी?... तुम्ही एकट्याच तर असता ना?... माझ्या तोंडावर हात ठेवला आईंनी नी म्हणाल्या... हे असतात अगं घरात आजही... संध्याकाळचा रोज दिवा लावते मी देवासमोर, नी ह्यांच्या फोटोसमोरही... देवापुढच्या दिव्याची वात एकदम स्थिर असते... कायम... पण ह्यांच्या फोटोपुढच्या दिव्याची वात मात्र, इतकी फडफडत असते म्हणून सांगू... त्या निरांजनाच्या ज्योतीतूनच, हे बोलत असतात माझ्याशी... खूप गप्पा मारतो आम्ही रोज... जरा म्हणून उठू देत नाहीत मला जागेवरुन... जरा उठायला गेलं, की पार विझायलाच येतो दिवा... मग काहीसं दमात घेऊनच ह्यांना, उरकावी लागतात हो कामं मला... आणि कसल्या गोड हसल्या म्हणून सांगू आई... तेव्हा मला कळलं की, त्यांना दिवेलागणीच्या आत घरी का परतायचं होतं... मी मग काहीच बोलले नाही... तिथूनच आम्ही टॅक्सी पकडली... सायन येईपर्यंतच आईंचा डोळा लागला होता... मी हळूच उचलला फोन, त्यांनी मांडीवर ठेवलेला... काॅल लिस्टमध्ये जाऊन, लास्ट काॅल बघितला मी...
'अहो' लिहिलं होतं... मी ओळखलं हा बाबांचा नंबर... मीच आईंना सेव्ह करुन दिले होते सगळे नंबर, जेव्हा बाबांनी नविन फोन घेतला होता आईंना... मी विचारलं होतं त्यांना त्यावेळी की, बाबांचा नंबर कुठल्या नावाने सेव्ह करु?... त्या म्हणाल्या होत्या 'अहो'... आणि कसल्या गोड लाजल्या होत्या... मी भीत भीतच फोन लावला... बांबांच्या फोनची काॅलर ट्यून वाजली जयदीप... 'जे वेड मजला लागले.. तुजला ही ते लागेल का?.. माझ्या मनीची ही व्यथा, कोणी तूला सांगेल का?'... पण अर्थातच तो उचलला नाही कोणी... बट दॅट मिन्स आईंनी अजूनही, बाबांचा नंबर अॅक्टिव्ह ठेवलाय जयदीप... त्या अजूनही रिफिल करतायत त्यांचं सिमकार्ड... त्या अजूनही हा नंबर डायल करतात... त्या अजूनही ह्या नंबरवर, खोटं खोटं बोलतात... जयदीप आईंनी बाबांना आजही जिवंत ठेवलंय... त्या निरांजनाच्या ज्योतीतून... त्या फोनच्या काॅलर ट्यूनमधून... आपण एकदातरी लावला का रे फोन, बाबा गेल्यावर त्यांच्या नंबर वर?... रादर आपल्या डोक्यात तरी आलं का, की बाबांच्या नंबरचं काय?... आईंची बाबांप्रती असलेली ही कमाल 'ओढ', मला अस्वस्थ करुन गेली जयदीप... आणि मग तू घरी पोहोचायच्या आधीच, रोजच्यासारखं अंथरुणावर आरामात पडत... माझा काही डोळा लागेना... कुठे ती एकमेकांचं, अवघं 'जग' असलेली पिढी... आणि कुठे एकमेकांसाठी, 'जाग' नसलेली ही आपली पिढी".
जयदीपच्या जवळ येऊन... त्याच्या छातीवर डोकं ठेऊन, रडत होती जान्हवी. आणि तिच्या केसांवरुन हात फिरवता फिरवता... समोरच्या भिंतीवरील बाबांच्या फोटोकडे लक्ष गेलं जयदीपचं. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच खरंतर मुद्दामहून असं, बाबांच्या फोटोकडे बघणं झालं होतं. काहीसा निर्जिव भासला पण तो फोटो जयदीपला. आणि अचानक त्याला जाणवलं की, अरे बाबांचा जिव तर आत्ता तिथे आईकडच्या फोटोत एकवटला असेल नाही का?... गप्पा चालल्या असतील दोघांच्या.
धुसर होत गेला मग जयदीपच्या डोळ्यांतून... तो त्याच्याकडचा नुसता नावाला म्हणून भिंतीवर टांगलेला, त्याच्या बाबांचा फोटो.
---सचिन श. देशपांडे
वरील कथा श्री सचिन देशपांडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या पुर्वपरवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.
अप्रतिम..... 🎉🎉
ReplyDeleteApratim katha
ReplyDeleteसुंदर कथा
ReplyDeleteApratim
ReplyDelete