यशोदा

 यशोदा.....

राजेंद्र भट



सावित्रीताई घ्या, साखर घातलेला चहा प्या आणि तोंड गोड करा...टेबलवर चहाचा कप ठेवत रमा बोलली... आपला गौरव येतोय भारतात परत पुढील आठवड्यात शिक्षण पूर्ण करून...

रमे नुसत्या चहावर नाही हो भागवायचं, माझ्या आवडीच्या पुरणपोळ्या करायला हव्यास.. सावित्रीताई बोलल्या..

रमा : अहो गौरव येऊ तर दे... तुम्ही म्हणाल ते करून घालीन खायला...

सावित्री : तीन वर्ष झाली त्याला शेवटचं बघितलं... अमेरिकेला जायला निघताना पाया पडला.. त्यानंतर काही त्याला डोळे भरून पाहता आलं नाही.. तुझं बरं आहे गं... आजकाल ते मोबाईलवर एकमेकांना पाहता तरी येतं एकमेकांना, काय ते व्हिडीओ कॉल का काय सांगत होतीस ते ... मला ती देखील सोय नाही... डोळे अगदी आतुर झालेत..

बोलता बोलता नकळत सावित्रीताई कातर झाल्या..

रमा : थोडयाच दिवसांचा प्रश्न आहे... एकदा तो इथे आला की काही परत जायचा नाही लांब कुठे. त्याला तरी कुठे करमतं माझ्याशिवाय. चार वेळा फोन येतो दिवसात त्याचा..

सावित्री : बाकी तू जिंकलंस रमे.. माझ्या लेकाला पोटच्या पोराची माया दिलीस. चांगलं शिक्षण संस्कार दिलेस... सोपं नसतं दुसऱ्याचं मूल आपलं म्हणून वाढवणं..

रमा : आई होणं सोपं कधीच नव्हतं... ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी..

सावित्री : तुला सांगते रमा, लग्न होऊन ह्या घरात आले... पहिलं वर्ष सण वार करण्यात उडून गेलं.. पण नंतर घरीदारी मुलासाठी चौकशा सुरु झाल्या.. आधी चेष्टा मस्करी चालायची, गोड बातमी कधी देणार अशी.. नंतर जसजशी वर्ष उलटू लागली त्रागा होऊ लागला... साधं एक मूल देऊ शकत नाही म्हणून टोमणे, कुचकट बोलणी सुरु झाली... पण मी हे काय मुद्दाम करत होते का? किती डॉक्टरचे उपाय करून झाले, मंत्रालयातली नोकरी सांभाळून उपास तापास करून झाले. देवाला साकडं घालून झालं... भले माझ्या पदरात मूल टाक आणि मला लगेच उचल... पण वांझोटी म्हणून मला मरायचं नाही..

रमा : देवाने तुमचं हे गाऱ्हाणं मनावर घेतलं आणि तब्बल बारा वर्षानी तुम्हाला दिवस राहिले..

सावित्री : हो ना... पण एकतर एवढ्या उशिरा दिवस राहिलेले, त्यात कडक उपास करून तब्बेत अगदी तोळामासा झाली होती.. सुरुवाती पासूनच बेडरेस्ट घ्यायला सांगितलं डॉक्टरने... विजू वन्स नाराजच होत्या.. त्याना करावं लागणार होतं ना घरात सर्व! पण आमच्या ह्यांच्यापुढे बोलायची काही टाप नव्हती विजू वन्सची .. कसंबसं पार पडलं बाई बाळंतपण.. खूप त्रास झाला डिलिव्हरीच्या वेळी... पण गोंडस गौरव बघितला आणि सगळ्याचं सार्थक झालं जणू...

रमा : हो पण नंतर देखील तुमची तब्येत काही सुधरत नव्हती... ऐकलं आहे मी विजूताईं कडून.. पडूनच असायच्या तुम्ही सतत... त्यातच चार महिन्यात तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला...

रमेचे डोळे पाणावले

सावित्री : हो ना.. मीच नव्हतं का देवाशी डील केलेलं, माझी कूस उजवू दे... मग मला उचल. माझी काहीच तक्रार नसेल... फक्त माझ्या माघारी गौरवची आबाळ होता कामा नये एवढीच इच्छा होती... गौरव सहा महिन्याचा झाला, उपडा पडू लागला... हळूहळू एकेक शब्द बोलू लागला आठव्या महिन्यात,  बाबा वगैरे ...मी त्याला शिकवत होती आई म्हण असं... पण कसं कोण जाणे तो मला अम्माच म्हणत असे... त्याच्या तोंडून आई ऐकायचं राहूनच गेलं... सावित्रीताईंच्या डोळ्याला अविरत धार चालू होती... तो नऊ महिन्याचा झाला आणि मला मरण आलं.. बाकी काही नाही गं पण त्याच्यामध्ये जीव अडकला होता ना...

रमा : हो ना... तुमच्या माघारी विजू ताई आणि ह्यांनी त्याला सांभाळलं काही महिने... पण आज ना उद्या विजू ताई लग्न करून सासरी जाणार होत्या. मग ह्यांनी लग्न करून मला घरी आणलं. कुठल्याही प्रसववेणा सहन न करता मी आई झाले...

मी कर्नाटकची... मला मराठी भाषा अजिबात येत नव्हती... गौरव तर लहानच होता... त्याला शिकवू ती भाषा तो शिकणार होता... मी त्याला मला अम्मा म्हणायला शिकवत होते आणि तो पहिल्या दिवसा पासून आई म्हणू लागला...

सावित्री : आणि मी आई म्हणायला सांगत होते तर तो अम्मा म्हणायचा मला... बहुतेक त्याच्या तोंडून देव संकेत देत असावा... त्याच्या नशिबात कर्नाटकी अम्माच आहे...पण तू माझ्या लेकाला खूप प्रेम दिलं.. चांगलं वाढवलंस हो...

रमा : पण ताई तुम्हाला देखील असंच वाटतं का हो? मला माझं मूल झालं असतं तर मी गौरवला अंतर दिलं असतं? ह्यांनी लग्न करून मला घरात आणलं तेव्हा पहिल्याच रात्री बजावलं... मला आपलं मूल नकोय व्हायला.. गौरवलाच मूल म्हणून वाढवायचं आपण ... मी नंतर देखील एक दोन वेळा हा विषय काढून पाहिलं.... आपल्याला मूल होऊ दे... मी आधी गौरवचं करीन मग माझ्या पोटच्या मुलाचं. पण माझ्यावर कदाचित ह्यांचा विश्वास नव्हता... शिवाय आजूबाजूला नातेवाईक वगैरे मंडळी होतीच मनात भरवून द्यायला, एकदा रमाला तीचं मूल झालं की कसं व्हायचं गौरवचं? वगैरे....

सावित्री : तो तूझ्यावर अन्यायच झाला बाई ... तूझ्या आई होण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला...

रमा : गौरवला वाढवणं एवढं सोपं नव्हतं... तो सुरुवाती पासूनच द्वाड होता... सतत घरात काही ना काही मस्ती, सांडणं लवंडणं चालूच असायचं...त्याची सक्खी आई असते तर चार धपाटे घालू शकत होते... पण मी हात उचलला असता तर मला दोष लागला असता, सावत्र म्हणून छळ करते मुलाचा असं...

सावित्री : तू काही बोलत नव्हतीस तरी देखील शेजारणी बोलायच्या, नुसता लाडावून ठेवलं आहे मुलाला, कसली शिस्त म्हणून नाही.. रमेचं लक्षच नसतं मुलावर...

रमा : हो ना.. दोन्हीकडून लोकं बोलायला मोकळे असतातच... मला खरंच काही सुचत नव्हतं कसं वागायला हवं गौरव बरोबर... पण माझ्या मनातला गोंधळ मिटवायला तुमची मदत झाली खूप... तुम्हीच मला सांगितलं, रमे गौरवला तुझा मुलगा असल्यासारखी शिस्त लाव. बिनधास्त ओरड त्याला, चार फटके दे... माझा तूझ्यावर विश्वास आहे.. तू कधी त्याच्या बाबतीत दुजेपणा करणार नाहीस.. तो तुझाच लेक आहे.. त्याचा तोंडवळा अगदी तूझ्यासारखा आहे.. माझ्या पोटी त्याने जन्म घेतला केवळ निमित्त म्हणून..

सावित्री : पण बरंच झालं ना त्याला वेळीच शिस्त लावलीस, त्याची मस्ती, आगाऊपणे बोलणं कमी कमी होत गेलं. अभ्यासात सुद्धा त्याला गती होती. सगळ्या गोष्टीमध्ये त्याने नाव काढलं. हे सगळं क्रेडिट तुझं आहे बरं...

रमा : हो... त्याला सुरुवातीपासूनच माझ्याबद्दल प्रेम आहे... कुठलीही गोष्ट बाबाला सांगायच्या आधी मला सांगत असे... बाबाबद्दल त्याला एवढी ओढ कधी वाटलीच नाही..

सावित्री : तू त्याचं नीट करत होतीस म्हणून हे निर्धास्त होऊन त्यांच्या बिझनेस मध्ये लक्ष घालू शकले. त्यामुळे गौरवला फार वेळ देता आला नाही त्यांना..

रमा : त्यामुळेच हे गेले तेव्हा खूप मनाला लावून नाही घेतलं गौरवने... पण मला साधा ताप जरी आला तरी तो खूप अस्वस्थ होतो..हे बघा गौरवचा व्हिडीओ कॉल आलाय.... आता दोन तासापूर्वी बोलणं झालं त्याच्या बरोबर, परत कॉल केलाय, चहा घेतलास का? बी पी च्या गोळया घेतल्यास ना विचारायला...

बोलता बोलता रमा गॅलरीत आली गौरव सोबत बोलायला...

गौरव : हाय आई काय करतेय?

रमा : काही नाही नेहमीचंच... कामं आटपली म्हणून बसली होते ताईंसोबत गप्पा मारत.

गौरव : मला नवल वाटतं तुझं... कशी तासंतास अम्माच्या फोटोबरोबर बोलू शकतेस तू?

रमा : फोटो बरोबर कशाला? पुढ्यात बसून गप्पा रंगतात आमच्या...आमचं राहू दे.. तुझं तिथलं व्यवस्थित आटपून घे.. चार पाच दिवसात तुला तिथलं सगळं वाईन्ड अप करायचं आहे... काही डॉक्यूमेन्ट वगैरे विसरू नकोस हं .

गौरव : नाही गं माझे आई... करीन मी सर्व मॅनेज नीट. तूझ्या कडून शिकलोय, सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवायला..

मायलेकाचा सुखसंवाद चालूच राहणार होता.

देवा पुढल्या जन्मी माझ्या गौरवला रमेच्या पोटी जन्म घेऊदे... सावित्रीताईंनी नेहमी प्रमाणे देवाची प्रार्थना केली...


समाप्त


राजेंद्र भट


वरील कथा श्री राजेंद्र भट यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post