घुसमट

 घुसमट...

राजेंद्र भट

निर्मला... दिसायला तशी सुमारच म्हणायला हवी.. काळेपणाकडे झुकणारा सावळा वर्ण, उंची पाच फूट एक इंच, मानेच्या वर केसांचा पोनी.. दोन दात पुढे, कृष अंगकाठी.

तिचा धाकटा भाऊ निरंजन तिच्या अगदी विरुद्ध. निर्मला आणि निरंजन सख्खे बहीण भाऊ आहेत हे कुणाला सांगून देखील खरं वाटत नसे.

निरंजन दोन वर्षानी लहान. सहा फूट ताडमाड उंच, गोरा पान, जिम करून आवडीने कमावलेली बॉडी.. ह्यामुळे अगोदर पासूनच हार्ट थ्रोब म्हणावा असा. त्यामुळे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मुलींना तोटा नव्हता. पण वडील लहानपणीच गेले होते. त्याला आईने केलेल्या कष्टाची जाण होती. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये टाईम पास करण्यापेक्षा त्याने नेहमीच आपला अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित केलं. व चांगल्या ठिकाणी सेटल झाल्यावर मगच त्याने मधुराला होकार दिला.

पण मुख्य अडचण होती निर्मला.. तिशीला आली तरी तिचं कुठे जमत नव्हतं. त्यात अजून पत्रिकेत मंगळ.. तिला एक दोन स्थळं आली होती.  पण त्यांना हुंडा हवा होता दोन तीन लाख.. कुठून आणायचा एवढा पैसा?

मोठया बहिणीचं जमत नाही म्हणून निरंजन देखील अडकून पडला.. तिच्या आधी कसं लग्न करणार? पण मधुराने तरी किती दिवस थांबायचं? शेवटी निदान लेकाचं तरी वेळच्या वेळी सगळं मार्गी लागू दे म्हणून आईनेच त्याला लग्नाला परवानगी दिली. आणि दहा बाय दहाच्या वन रूम किचनमध्ये अजून एक माणूस ऍड झालं..

आता निरंजन मधुरा किचनमध्ये झोपत.. बाहेर आई आणि निर्मला... कितीही हळू आवाजात बोललं तरी बाहेर निर्मलाच्या कानावर थोडी कुजबुज, हालचाल येतच असे. सुरुवातीला तिला मजा वाटायची ते सर्व ऐकायला. ते दोघं काय बोलत असतील? वगैरे इमॅजिन करण्यात तिची रात्र सरून जायची..

पण त्यांचं लग्न होऊन तीन वर्ष झाली... छोटया पाहुण्याची चाहूलही लागली. तरी मी मात्र अजून एकटीच तळमळत रात्र काढते ह्या विचाराने तिचा राग राग होत असे. मग मुद्दाम ती रात्री उठून किचनमध्ये कधी पाणी प्यायला तर कधी बाथरूमला जात असे.

ती सर्व मुद्दाम करते हे मधुराला समजत होतं. पण ती त्याबद्दल तिला चकार शब्द बोलत नसे. तिला तिची होणारी घुसमट समजत होती. पण पर्याय नव्हता कुठलाच.. खूप ठिकाणी जोडे झीजवून झाले पण निर्मला उजवत नव्हती.. मधल्या काळात निर्मलाची आई वारली छोटं आजाराचं निमित्त होऊन.

लवकरच मधुराला छान मुलगी झाली.. आत्याने तिचं नाव परी ठेवलं. परीचा पायगुणच म्हणायला हवा, इतकी वर्ष रखडलेल्या निर्मलाला विलासचं स्थळ चालून आलं. विलास दिसायला निर्मलापेक्षा निश्चितच सरस होता. पण त्यांची पत्रिका जुळली आणि एकदाचे निर्मलाचे दोनाचे चार हात झाले.

विलासच्या घरीदेखील तशी बरी परिस्थिती नव्हती. तो छोटया खोलीत राहत होता. जवळचं असं त्याला कोण नव्हतं. एक चुलत बहीण होती. तिच जाऊन येऊन असायची. विलासचं घर त्याच्या आजोबानी घेतलेलं. त्यामुळे त्या घरात आपला देखील हिस्सा आहे म्हणून ती यायची. पण एरव्ही घरी दोघेच राजा राणी.

विलासने मात्र तिला भरभरून सुख दिलं. इतकी वर्ष तृषार्त राहिलेल्या जमिनीवर चिंब पाऊस पडावा तशी निर्मला विलासच्या वर्षावात न्हाऊन निघाली.

मात्र निर्मलाच्या पत्रिकेत विवाहसुख नव्हतंच बहुधा. एक दिवस कामावरून येताना त्याचा अपघात झाला आणि तो ऑन द स्पॉट खल्लास झाला. निर्मलावर तर आभाळच कोसळलं. राहत्या घरावर विलासच्या बहिणीने हक्क दाखवून तिला घराबाहेर काढलं आणि ती माहेरी परतली.

विलासच्या आठवणीमध्ये ती दिवसभर एका जागी बसून रहायची . रात्र तर तिच्या अंगावरच येत असे. पण हे दुःख कुणाला बोलून दाखवता येतं का?

निरंजनने तिच्यासाठी एक छोटा जॉब पाहिला. आपलं मन गुंतून राहील, शिवाय भावाला देखील थोडी मदत म्हणून ती जॉईन झाली तिथे.

हळूहळू तिचं रुटीन सेट होत होतं.. तिचा बॉस नाडकर्णी तसा बरा होता स्वभावाने. तो देखील तिच्यासारखा विधुर होता. त्याचं वय निर्मलापेक्षा आठ एक वर्ष तरी जास्त असेल. शिवाय त्याला एक मुलगा देखील होता. त्याची बायको दोन वर्षापूर्वी वारली होती.

आजकाल नाडकर्णी आणि निर्मला दोघांमध्ये चांगलं जमत होतं. त्याला आपण आवडतोय हे ती जाणून होती. त्याने लग्नासाठी विचारलं तर ती तयार होती त्याच्या मुलासकट त्याचा स्वीकार करायला.

एक दिवस त्याने आपण होऊन तिला सांगितलं संध्याकाळी हॉटेलमध्ये भेटूया. तिला खूप आनंद झाला. ती आतापासूनच स्वप्नं रंगवू लागली..

मात्र त्याने तिचा भ्रमनिरास केला. त्याने तिला डायरेक्ट विचारलं एक दोन दिवसासाठी कुठे तरी बाहेर जाऊ दोघंच.. थोडी मज्जा करू.

मला वाटलं तुम्ही मला लग्नासाठी विचाराल. तिने बोलून दाखवलं.

छे छे, माझ्या बाबांना तू सून म्हणून पसंत नाही पडणार.. त्यांना परजातीची सून नकोय. शिवाय तुला पाहूनच ते नाही म्हणतील. माझी बायको दिसायला थोडी तरी मला साजेशी हवी. 

म्हणजे ह्याला मी बेड पार्टनर म्हणून आवडते,  पण लाईफ पार्टनर म्हणून लाज वाटते. चार लोकात त्याच्या कानाखाली वाजवावं असं तिला वाटत होतं. पण तिच्यात एवढी हिम्मत नव्हती.

ती तडक बाहेर पडली. अंगाचा नुसता तीळपापड होत होता. ह्या क्षणी आपल्याला स्वतःच्या दिसण्याचा राग येतोय की स्वतःच्या बाईपणाचा हेच तिला समजत नव्हतं. जिथे तिथे हाच त्रास. चाळीत इतकी वर्ष ज्यांच्या सोबत राहिलो, खेळलो, घरात हक्काने वावरलो ते देखील आजकाल आपल्याकडे पाहून सूचक इशारे करतात. अचकट विचकट कॉमेंट्स करतात.. एकटी स्त्री म्हणजे त्यांना ओपन इन्व्हिटेशन का वाटतं?

ती नुसतीच भरकटत दिशाहीन फिरत होती. तंद्रीमध्ये समुद्रावर कधी पोचली तिलाच नाही समजलं. किनाऱ्यावरून चालत चालत ती बरीच पुढे आली. आता हा परिसर बराच मोकळा होता. नकळत तिची पावलं पाण्याच्या दिशेला वळली.

पायाला पाण्याचा स्पर्श झाल्यावर तिला थोडं शांत वाटलं. शरीराची होणारी काहीली थोडी कमी झाल्यासारखं वाटलं तिला. खांद्यावरची पर्स आणी मोबाईल तिने वाळूवर ठेऊन दिली.

चालत चालत अजून आत आत गेली. पाणी कमरेपर्यंत आलं. भिजल्यावर तिला थोडं शहारल्यासारखं झालं. तरी नेटाने ती पुढे जातच राहिली. आता फक्त दोन चार पावलं पुढे जायचं धीर एकवटून. थोडा होईल त्रास. पाणी नाका तोंडात शिरल्यावर घुसमट होईल... पण ती क्षणिक असेल.. ती जरा सहन केली की मग सगळे त्रास चुटकीसरशी संपून जातील. आजवर आयुष्यात आपण फक्त सहनच करत आलोय.. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला अशक्य नाहीच.

तिने एकवार पाठी किनाऱ्यावर वळून पाहिलं. पाठी सर्वच अंधुक दिसत होतं.. इतक्यात मोठी लाट आली, आणि निर्मलाला आपल्यासोबत घेऊन गेली. काही वेळासाठी निर्मलाच्या जीवाची तडफड झाली. आणि काही क्षणातच सर्व काही शांत झालं.

समाप्त

राजेंद्र भट 

वरील कथा श्री राजेंद्र भट यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post