उतराई

 उतराई.....

राजेंद्र भटनाना घरात आले.. पंखा चालू केला. शर्ट हँगरला लटकवला. पाण्याचा तांब्या घेऊन खुर्चीवर विसावले. पाठोपाठ शारदा काकू घरात शिरल्या..

आलात का नाना मेधाकडे जाऊन? कशी आहे तिची प्रकृती? सासरचे काय म्हणतात तिच्या? काकूंनी प्रश्नाचा भडीमार केला.

मेधा उत्तम आहे. आताच सहावा लागलाय तिला. पण सासरची मंडळी जरा नाराज आहेत. त्यांचं देखील काय चुकलं म्हणा? रीती प्रमाणे पहिलं बाळंतपण माहेरी व्हायला हवं. पण मेधाला आई नाही. जवळचं दुसरं असं कुणी नाही जिच्या भरवशावर तिला माहेरी बोलवावं. मी होईल तो खर्च उचलून द्यायचं कबूल केलं आहे... अर्थात त्यांना तशी माझ्या पैशाची गरज नाही.. पण मेधाला इथे आणता आलं असतं तर तिलादेखील बरं वाटलं असतं.

अहो नाना बोलवा की तिला मग इथे. मी आहे अजून धडधाकट. मी करेन तिचं बाळंतपण. काकूंनी दिलासा दिला.

काकू तुम्ही बोललात हेच खूप.. पण उगाच तुम्हाला कशाला त्रास?.... नाना

अहो त्रास कसला नाना? इतक्या वर्षांचा आपला शेजार... तुम्ही काय कमी केलं आहे का माझ्यासाठी? ह्यांच्या शेवटच्या आजारपणात तुमची साथ होती म्हणून माझं निभावलं . निनाद कायमसाठी यु एस निघून गेला मला एकटीला टाकून.. त्या एकटेपणात मेधानेच तर मुलीची माया लावली... काकू नकळत कातर झाल्या.

नानांना काय बोलावं कळेना. त्यांनी पाण्याचा तांब्या दिला काकूंना. थोडं पाणी पिऊन त्या सावरल्या. बरं ऐका मी उद्या सकाळीच जाऊन मेधाला घेऊन येतेय.. त्यांनी डिक्लिअर करून टाकलं.

काकूंनी सांगितलं तसं दुसऱ्या दिवशी मेधाला जाऊन घेऊन आल्या. नानांना तर तिला कुठे ठेवू, कुठे नको असं झालं.

काकूंनी मेधाचं नाश्ता, जेवण, फळं, टॉनिक सगळ्याचं वेळापत्रक बनवून टाकलं. आता त्यांच्याच घरून नाना आणि मेधासाठी जेवण वगैरे येऊ लागलं. कधी कधी मेधा कंटाळा करी औषधं घ्यायला, दूध प्यायला. पण काकूंपुढे तिचं काही चाललं नाही.

प्रसूतीच्या वेळी काही अडचणी आल्या. पण काकू मेधाजवळ थांबून तिला धीर देत होत्या. मेधाने गुटगुटीत मुलाला जन्म दिला. पहिला मुलगा म्हणून सासरीदेखील आनंदीआनंद झाला. बाळाचं बारसं झालं. बाबाच्या आवडीचं आदित्य नाव सर्वानाच आवडलं.

तीन महिने विश्रांती घेऊन मेधा आणि आदित्य सासरी रवाना झाले. नंतर देखील उष्टावण, बोरन्हाण, पहिला वाढदिवस काकूंच्या मदतीने माहेरी साजरे होत राहिले.आजकाल काकू थोडया थकल्या सारख्या वाटत.  इतक्या वर्षात निनाद एकदाच इथे येऊन गेला, ते देखील जेमतेम दोन दिवस घरी राहिला. चाळीत रहायला औकवर्ड वाटतं म्हणून तो आणि त्याची बायको हॉटेलवर राहिले. डोळे मिटण्याआधी एकदातरी निनादला पाहावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. सध्या शक्य नाही एवढं बोलून निनाद भारतात येणं टाळत होता.

त्या दिवशी चाळीत पूजा होती. पण काकू सकाळपासून बाहेर दिसल्याच नाही कुठे. शेवटी आजूबाजूच्या दोन तीन बायका येऊन त्यांचं दार वाजवू लागल्या. दार नुसतंच लोटलं होतं. आत येऊन पाहिलं तर काकू खाटेवर बसून होत्या. बायकांना थोडं विचित्र वाटलं. त्यांनी हात लावून पाहिलं तर तेवढ्या धक्याने त्या कलंडल्या. त्याना जाऊन बराच वेळ झाला असावा. चाळीत शोककळा पसरली. कुणीतरी जाऊन डॉक्टरना आणलं. त्यांनी तपासून सांगितलं हृदयक्रिया बंद पडून काकू सुमारे पाच सहा तासापूर्वीच गेल्या असं.

नानांनी एव्हाना मेधाला फोन करून कळवलं होतं. तिचा नवरा नेमका टूरवर होता. ती दहा वर्षाच्या आदित्यला घेऊन चाळीत आली. वाटेत येताना तिने निनादला मॅसेज केला. त्याला ही बातमी अगोदरच समजली होती.

बरं येतोय ना तू? तिने निनादला विचारलं..

नाही गं मला लगेच यायला नाही जमणार...माझं एक प्रोजेक्ट चालू आहे. किमान पंधरा दिवस तरी मला इथून हलता नाही येणार... कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. तुम्ही करून घ्या अंत्यविधी. निनाद उत्तरला.

पुढे त्याच्या सोबत संवाद वाढवावा असं वाटलंच नाही तिला.

ती चाळीत पोचली. तिने पाहिलं अंत्यविधीची कसलीच तयारी दिसत नव्हती. फुलं, गोवऱ्या, उदबत्या, मडकं, काकूंसाठी नवी साडी.. काहीच दिसेना.. फक्त तिरडी बांधून तयार होती.

निनाद येणार नाही म्हणाला.. कोण घेणार जबाबदारी? जवळचे कुणी नातेवाईक देखील नव्हते. त्यामुळे सर्वानुमते त्यांना भडाग्नी द्यायचं ठरलं.  

मेधाला ऐकूनच कसं तरी वाटलं. काकूंनी आपलं सगळं पोटच्या लेकीसारखं केलं आणि त्यांना असं बेवारस मरण यावं. प्राण सोडले तेव्हा त्यांना पाणी द्यायला देखील कोणी नव्हतं. किमान त्यांचे अंत्यविधी तरी रीतसर व्हायला हवेत. त्याशिवाय त्यांना शांती नाही मिळणार.

काहीतरी ठरवून तिने चाळीतल्या मुलांना सर्व सामान आणायला आणि भटजीना बोलवायला पाठवलं. आदित्यला जवळ घेऊन विचारलं बाळा तू शारदा आजीचं सर्व करशील ना? घाबरू नकोस मी आहेच तुझ्यासोबत.. दहा वर्षाच्या आदित्यला आईचं ऐकायचं एवढंच ठाऊक. त्याने नुसतीच मान डोलावली.

एव्हाना सर्व सामान आलेलं. ऍम्ब्युलन्स देखील येऊन उभी होती. मेधाने काकूंच्या अंगावर नवीन साडी टाकली. पायावर पाणी घातलं. आणि डोकं टेकवलं. खूप मोठा हुंदका देऊन रडावंसं वाटत होतं तिला. पण तिने भावनाना आवर घातला. आदित्यने नानांच्या मदतीने काकूंना हार घातला.

कुणीतरी मडक्यात गोवऱ्या आणि उदबत्या टाकून अग्नी पेटवला होता. नानांनी ते मडकं हातात घेतलं... राम नाम सत्य आहेचा जप सुरु झाला. चार माणसानी तिरडी उचलली. चाळकरी बायकांना परत एकदा हुंदका अनावर झाला.

चार पावलं चालून तिरडी ऍम्ब्युलन्समध्ये ठेवली गेली. मेधा आणि आदित्य ड्रायवरच्या  बाजूला बसले. नाना आणि अजून दोन पुरुष पाठी बसले. बाकीचे गाडी, रिक्षा करून स्मशानात पोचले.

वेळ दिल्याप्रमाणे भटजी स्मशानात हजर होतेच. त्यांची तयारी चालू होती..

कार्य करायला कोण बसणार आहे? भटजीनी विचारलं..

त्यांचा नातू करेल सर्व, मेधा म्हणाली. तिने आदित्यला पुढे केलं.

बेटा नमस्कार कर गुरुजींना... आदित्य त्यांच्या पाया पडला.. त्यांनी सांगितलं तसं तो एकेक विधी करत होता.

एव्हाना चिता रचून तयार होती. सर्वांनी परत एकदा काकूंना नमस्कार केला. प्रदक्षिणा झाली.

आदित्यच्या खांद्यावर पाण्याचं मडकं दिलं. चितेला प्रदक्षिणा घालून मागल्या बाजूला ते टाकायला आणि बोंब मारायला सांगितली.

काकू... मेधाने मोठा टाहो फोडला.

आदित्यने आजीला अग्नी दिला. लहान वय असलं तरी त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्याच. ह्या सगळ्याचं त्या बालमनावर दडपण आलेलंच.. त्याने आईच्या कमरेला घट्ट मिठी मारली. दोघं आता धाय मोकलून रडत होते.

दुसऱ्या दिवशी स्मशानात जाऊन अस्थी आणल्या गेल्या. तिसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात त्यांचं विसर्जन झालं. काकूंचं उरलं सुरलं अस्तित्व विरून गेलं...

काकूंनी आपलं इतकं काही केलं.. त्यांच्या ऋणातून थोडं तरी उतराई व्हायला जमलं आपल्याला.. मरणोत्तर त्यांचं सर्व यथासांग पार पडलं हेच एक त्यातल्या त्यात समाधान मिळालं मेधाला.


समाप्त

राजेंद्र भट 


वरील कथा श्री राजेंद्र भट यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या पुर्वपरवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post