धागेदोरे

धागेदोरे 

मंजिरी शास्त्री कुलकर्णी 

रात्रीची साधारण दहा वाजेची वेळ होती.जोशी नर्सिंग होम मध्ये रात्रीचा औषधांचा राऊंड संपवुन माळी सिस्टर रजिस्टरमधे नोंदी करत असतानाच एकता पोट धरुन .. केविलवाण्या चेहेर्याने आत आली.

"सिस्टर माझ्या पोटात खुप दुखतंय ..."

सिस्टरांनी तिला बेडवर झोपवली ... आणि डाॅक्टरांना बोलावलं ...डाॅक्टर आले त्यांनी तिच्या आवश्यक तपासण्या केल्या. काही प्रश्न विचारले .. आणि सिस्टरांना सुचना देऊन ते निघून गेले.सिस्टरांनी डाॅक्टरांच्या सुचनेनुसार तिला गोळ्या दिल्या ... आणि जागेवर येऊन बसल्या . रात्री एकता गाढ झोपलेली त्यांनी पाहीली . सकाळी दुसर्या सिस्टरांना ओव्हर देताना त्यांना एकता दिसली नाही..बेड नीट करताना रात्रीच्या गोळ्या सुद्धा त्यांना उशिच्या खाली सापडल्या .


एकताला खुप शोधलं गेलं ..पण ती सापडली नाही . पुन्हा पंधरा दिवसांनी एकता पोट दुखतं म्हणून जोशी नर्सिंग होम मध्ये आली . यावेळी दुसर्या सिस्टर ड्युटी वर असल्याने तिचं फावलं ..पुन्हा ती रात्री नुसती झोपुन सकाळी कुणालाही न सांगता गायब झाली . पुन्हा काही दिवसांनी एकता रात्री जोशी नर्सिंग होम मध्ये आली.यावेळी पुन्हा माळी सिस्टर ड्युटीवर होत्या .पण मधे बराच कालावधी गेल्याने त्यांनी एकताला ओळखलं नाही .पण तिच्याशी बोलताना " तुला कुठेतरी पाहील्यासारखं वाटतयं .."असं म्हणाल्या .एकता जरा चपापली...पण वेळ मारून न्यायची म्हणून तिनी खोटा पत्ता व खोटं नाव सांगितले.आणि पुन्हा सकाळी गायब ...
ती जेव्हा सकाळी दिसली नाही तेव्हा माळी सिस्टरांच्या लक्षात आलं कि ती एकता होती.पण ती असं विचीत्र का वागत होती हे काही समजलं नाही. पुन्हा आली कि चौकशी करू  ... असं ठरवतं तो विषय तिथेच संपला.माळी सिस्टरांची बहीण ही (भावना सिस्टर )प्राथमिक आरोग्य केंद्रात सिस्टर होती.एके दिवशी सहज इकडचे तिकडचे विषय बोलता बोलता ती माळी सिस्टरांना म्हणाली ..

"अगं काय आजकालची तरुण पिढी??काही समजत नाही बघ यांचं .. झटक्यात एक तर झटक्यात दुसरं ..त्यांचं त्यांना पण समजत नाही काय चाललं ते??बरं सगळं एकट्यानेच करायचं असतं .पालक नकोच असतात ...आता हेच बघ ना..एक मुलगी दोन दिवसांपूर्वी पोट दुखते म्हणून रात्री दहाच्या सुमारास आली.तिला तपासून औषधं दिली.. आणि ती झोपली.मला वाटलं तिनं औषधं घेतली असतील .पण सकाळी एक तर ती न सांगता निघून गेली आणि औषधं तिनी घेतलीच नव्हती.उशीखाली ठेवली होती ..काय म्हणावं या प्रकाराला आता तुच सांग .."


माळी सिस्टर हे ऐकून जरा सावध झाल्या. त्यांनी सविताला त्या मुलीचं वर्णन करुन सांगितले ..आलेली मुलगी एकताच आहे याची सविताने पुष्टी केल्यावर ..हे नक्की काय प्रकरण आहे याचा छडा लावायचा त्यांनी ठरवला.सविताकडे तिचा लिहीलेल्या पत्ता व आपल्या रेकाॅर्डमधला पत्ता त्यांनी तपासला.नशिबाने तो एकच होता... एकता एकोणीस वर्षांची तरुणी असल्याने त्यांनी तिच्याबद्दल माहीती काढण्यासाठी तिच्या घरच्या पत्यावर पोहोचल्या.तिच्या पालकांशी बोलुन तिच्या या विचीत्र वागण्याचं कारण ... काही धागेदोरे हाती लागतात ते शोधण्याचा प्रयत्न केला...माळी सिस्टर एकताने नमुद केलेल्या पत्यावर पोहोचल्या. वीस बिर्हाडांच्या त्या गल्लीत तिचं असलेलं हे घर तसं खुप काही मोठं नव्हतं. जेमतेम तीन खोल्या असतील . आई घरात स्वयंपाक करत होती. वडील नोकरीला गेले होते तर तिच्यापेक्षा मोठा असलेला भाऊ तथाकथित हाॅलमधे असलेल्या बेडवर आडवा होऊन मोबाईल पाहात होता. माळी सिस्टर आलेल्या पाहुन त्यांनी उठण्याची सुद्धा तसदी घेतली नव्हती. तिथुनच पडल्या पडल्या गुटखा भरलेल्या तोंडाने कशीबशी बाहेर पडणारी लाळ आवरत ओरडला .."मम्मे कोनतरी आलंय बघ तुझ्याकडं."


त्याचा आवाज ऐकून कणिक भरलेला हात घेऊन त्याची आई बाहेर आली. सिस्टरांना बघुन ती माऊली त्यांना "बसा ..मी आलेच "असं म्हणत आत गेली. पाच मिनीटांनी हातात पाण्याचा ग्लास घेऊन ती परत आली. मग सिस्टरांनी स्वतःचा परिचय दिला व एकताबद्दल विचारायला सुरुवात केली. काही प्रश्न झाल्यावर त्या म्हणाल्या...

"एकता ला काही त्रास आहे का पोटदुखी चा??"

तिची आई झटक्यात म्हणाली .."नाही..पण तुम्ही कायले इतके प्रश्न इचारीता??काय केलं हाय तिनं??"

यावर माळी सिस्टरांनी घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यांचं बोलणं संपतच होतं .. तेवढ्यात एक घाणेरडी शिवी हासडत तिचा मुलगा म्हणजे एकता चा भाऊ अर्धवट उठत बोलला .."तरीच घरी सापडना व्हय रातच्याला..."असं म्हणत मोबाईल घेत घराबाहेर पडला.
तिची आई मात्र काय समजायचं ते समजली होती हे तिच्या हावभावावरुन जाणवलं होतं . तोंडात पदराचा बोळा कोंबुंन जोरजोरात हुंदके देत होती. माळी सिस्टरांनी ऊठुन तिच्या पाठीवर हात फिरवला. तिला शांत केली.जरासं थांबुन ती बोलायला लागली ...

" एकता तिच्या बहीणीची मुलगी होती. ही मुलगी झाल्यावर तिची बहीण वारली म्हणून हिने तिचा सांभाळ करायचा ठरवलं आणि मुलगी म्हणून घरात आणली. ही गोष्ट तिच्या मोठ्या मुलाला माहीत होती. वयात आल्यावर त्याने एकताशी घाणेरडे चाळे करायचा प्रयत्न केला.. तेव्हा त्याच्या आईने त्याला चांगलचं खडसावले . काही वेळापुरतं हे थांबलं . तिला वाटलं त्याने एकताचा नाद सोडला असेल .


काही महिन्यांपूर्वी त्यांचे गावी घराचं बांधकाम सुरू झालं. त्याच्या देखरेखीसाठी या दोघांना म्हणजे एकताच्या आई बाबांना दर पंधरा वीस दिवसांनी गावी चक्कर टाकावी लागायची. तेव्हा बहुतेक या नराधमानं पुन्हा काही तरी केलं असणार .. असं म्हणत त्या परत रडायला लागल्या . त्यांचं बोलणं सुरु असताना एकता शाळेतुन घरी आली. माळी सिस्टरांना घरात बघुन ती घाबरली...आई रडत होती.. तिला काही समजेना ..आईनी तिला घट्ट मिठी मारली ..."लई गुनाची माझी प्योर...किती सहन करशीला लेकरा ...बोलायचं व्हतं मला ...माफ कर लेकरा ..तुझं रक्षण म्या न्हाय करु सकले .." दोघी एकमेकींच्या घट्ट मिठीत रडायला लागल्या .


तिच्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.. आईबाबासुद्धा घरात नसायचे म्हणून ती रात्र एकता कुठल्यातरी हाॅस्पिटल किंवा नर्सिंग होम मध्ये सुरक्षित राहाण्याकरता काढायची ... माळी सिस्टरांना हे धागेदोरे हाती लागल्यानंतर त्यांनी एकताला मदत करायची ठरवली. जेव्हा आई बाबा घरात नसतील किंवा ती एकटी असेल तेव्हा एकताने माळी सिस्टरांच्या घरी राहायचं ..  मग ते कितीही वेळ चालेल  असं ठरलं ...  तिला मदतीची ग्वाही देत त्या तिथुन बाहेर पडल्या... भरलेल्या डोळ्यांनी आणि जोडलेल्या हातांनी त्यांचे आभार व्यक्त केले होते कारण शब्द या माणुसकीच्या नात्यापुढे थिजले होते ...वरील कथा मंजिरी शास्त्री कुलकर्णी यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


तुम्हाला ही कथा सुध्दा वाचायला आवडेल.
👇
Post a Comment (0)
Previous Post Next Post