सेल्फ डिक्लेअर्ड…
©️मुक्ता कुलकर्णी
अनन्या येणार आहे हे समजताच स्वाती फार खुश होऊन गेली होती. त्यात भेटण्याचा आनंद जितका होता त्याहून जास्त आनंद होता तो आपली प्रगती बघितल्यावर तिची रिअॅक्शन कशी असेल.. आपल्यावर जळेल का ती... कधी चांगली साडी, चांगला ड्रेस घातलेला दिसला की म्हणायची..किती छान दिसतेस..मी जळते तुझ्यावर. आता कशी असेल तिची प्रतिक्रिया.. एकाच आॅफीसमध्ये सहकारी म्हणून काम करताना तिच्यासोबत तशी मजा यायची. अनन्या एकदम फन का एंटेना होती. पण भयंकर फटकळ स्वभावाची अनन्या फारशी कुणाला आवडायची नाही. तिला त्या गोष्टीने फारसा फरक पडत नव्हता. ती तोंडावर सांगायची, मी कुणालाही इंप्रेस करायला काहीही करत नाही. तुला मी आवडते...आवडत नाही मला देणं घेणं नाही. मला माझ्या कामाशी काम ठेवायला आवडतं. गोड गोड बोलून आपली जागा बनवणं मला जमणार नाही.
स्वाती आणि अनन्या एका वर्षाच्या फरकाने आॅफीसला जाॅईन झाल्या होत्या. स्वातीचं आणि कौस्तुभचं अफेअर चालू झालं.. साखरपुडा झाला. एकाच आॅफीसमध्ये काम करत असल्यामुळे ते दोघंही सोबत असायचे. पुढच्या वर्षी अनन्या जाॅईन झाली. स्वाती, कौस्तुभ काही ना काही कारणाने पार्टी देत..कधी हाॅटेलमध्ये..कधी घरी.. पण अनन्या सहसा टाळायची. ना तिने कधी पार्टी दिली..ना कधी घरी बोलावलं. डब्यात जे काही करुन आणायची त्यावरुन ती स्वयंपाक चांगला करत असावी असं वाटायचं. पण तिनं चुकूनही कधी घरी या असं आमंत्रण दिलं नाही. कधी यावरुन बोललं तर सरळ सांगायची, मी इथं नोकरी करुन पैसा मिळवायला आले आहे. असले रिलेशन बनवण्यात मला काडीचाही रस नाही. बी प्रोफेशनल!!! ते खाणं पिणं.. बनवणं खिलवणं नाॅट माय कप आॅफ टी..
तिच्या या स्पष्ट बोलण्यानं सगळेच तिच्यापासून लांब रहायचे. त्यानंही तिला फारसा काही फरक पडत नव्हता. तरीही कौस्तुभला तिच्या काही काही गोष्टी आवडायच्या. स्वाती एकदा म्हणाली," कशी काय ही असं राहू शकती? माणसं नकोत.. हे नको...ते नको."
" हे बघ स्वाती, तो तिचा स्वभाव आहे. आणि त्यामुळं तिचं काही अडलं आहे का आजवर? आपण कोण तिला जज् करणारे. ती प्रामाणिकपणे सांगते हेच ग्रेट आहे. " कौस्तुभ शांतपणे म्हणाला.
स्वातीनं एखादा छान ड्रेस घातला, सुंदर साडी नेसली की हमखास अनन्या म्हणायची, "काय मस्त दिसतेस गं.. कौस्तुभ मरतोय आज.. जळते मी तुझ्यावर.." स्वातीला ड्रेसचे पैसे फिटल्याचा फील यायचा. एक वर्षभर स्वाती आणि अनन्या सोबत काम करत होत्या. पण अनन्या काही तिला फारशी आवडली नव्हती. गोड गोड बोलून स्वातीनं आॅफीसमध्ये आपली जागा बळकट केली. अनन्या मात्र निघून गेली. त्यालाही आता पाच वर्षं होऊन गेली होती. तिची काहीच खबरबात माहीत नव्हती. एव्हाना स्वातीचं नी कौस्तूभचं लग्न झालं होतं. प्रमोशनवर दोघांच्या परदेश वाऱ्या झाल्या होत्या.प्रत्येक वेळी तिला आठवायचं.. मी जळते तुझ्यावर. किती जळाली असती अनन्या आपल्यावर!!! काय करत असेल ती? कुठंतरी टिकली असेल का? सरळ सांगायची माझ्यापासून दूर रहा.. मी चांगली नाही स्वभावानं. परवा दिवशी अचानक अनन्याचा फोन आला. "स्वाती, अनन्या बोलतेय… तुला भेटायचं आहे."
" ओये….कुठं आहे पत्ता तुझा? गेलीस की गायबच झाली. काय चाललंय सध्या? कुठं नोकरी करतेस?"
"अगं, आॅफीसच्या कामासाठीच आलेय. उद्या वेळ आहे का तुला भेटायला?"
" नसता तरी तुझ्यासाठी काढला असता. केंव्हा भेटूया?"
"दुपारी तीन वाजता? हाॅटेल तेच जिथं तुम्ही पार्टी द्यायचा.."
"तीन वाजता…….???? करेन काहीतरी मॅनेज. असंही आता सगळं मीच मॅनेज करते. मला काही परवानगीची गरज नाही. हो नक्की भेटू" त्यातल्या त्यात तिनं आपला टेंभा मिरवून घेतला.
"डन्" इतकं बोलून स्वातीनं फोन ठेवला.
थोड्याच वेळात कौस्तुभचा फोन आला. " स्वाती, एक गुड न्यूज आहे. आपण भरलेलं टेंडर जवळपास पास झालं आहे. आणि एक मिटींग फिक्स केली आहे. दुपारी तीन वाजता हाॅटेल आऊटलूक..तुला जावं लागेल. मी माझ्या अपाॅईंटमेंट बघतो. मॅनेज करेन पण तू वेळेत पोच"
"ओह गाॅड...जरा आधी का नाही सांगितलंस?१० मिनीटामागे अनन्याचा फोन आला होता. ती येते आहे. दुपारी तीन वाजता आऊटलूक मध्येच भेटायला बोलावलं आहे तिनं."
"काय ऽऽऽ अनन्या??? अरे.. हिला पण आत्ताच यायचं होतं...मी ही भेटलो असतो. काय करते आता ती?"
" ते नाही झालं बोलणं..मी तिला सांगते नंतर भेटू. पण मला मुद्दाम भेटायचं आहे त्या जळकीला. तिला दाखवायचं आहे. मी कुठं पोचले माणसं सांभाळून..आणि तू कुठं राहीलीस मी जळते तुझ्यावर म्हणत.."
" तू अजूनही विसरली नाहीस" कौस्तुभनं हसत विचारलं,
" होय… फार काॅम्पिटिशन करायची माझ्याशी. सेल्फ डिक्लेअर्ड काॅम्पिटिटर होती माझी.." मोठ्यांदा हसत स्वाती म्हणाली. " जाऊदे कळवत नाही तिला.. उद्या तिथंच काॅन्ट्रॅक्ट साईन करुया..तिच्यासमोरच."
दुसऱ्या दिवशी सारी तयारी करुन स्वाती आऊटलूक मध्ये पोहोचली. कौस्तुभही जाॅईन झाला. काॅन्ट्रॅक्ट साईन झालं. तीनचे चार वाजले तरीही अनन्या आली नव्हती. आता सलील पार्थसारथी या भारदस्त माणसाला निरोप देऊन अनन्याची वाट पहावी लागणार. साला इतका प्लॅन केला होता तिला डाऊन करायचा.आता हा बाबा पण जाईल.हा असतानाच ती आली असती तर तिला आपला रुबाब समजला असता..
" तुम्ही कुणाची वाट पहात आहात का?" सलील पार्थसारथी नी विचारलं.
" होय.. आमची एक जुनी कलिग आहे..ती भेटणार होती इथं." कौस्तुभ म्हणाला," स्वातीची जरा जास्तच इच्छा होती तिला भेटायची. तिची सेल्फ डिक्लेअर्ड काॅम्पिटिटर होती एकेकाळी."
" कौस्तुभ...व्हाॅट इज धिस? ती आली नी ऐकलं तर तिनं? आणि अशा पहील्यांदाच भेटणाऱ्या माणसाला काय सांगतोस हे?काय वाटेल त्यांना? " स्वाती कुजबुजली.
" असं काही नाही सर.. ती तेंव्हा नेहमी म्हणायची मी जळते तुझ्यावर.. म्हणून हा चिडवायचा मला" सावरुन घेत स्वाती म्हणाली.
"ओह..व्हेरी स्ट्रेंज..ती स्वतः असं म्हणायची?"
"हो.. म्हणूनच तर आम्हा सर्वांना वाटायचं ती जळकी आहे" कौस्तुभ हसत म्हणाला.
" नो..नो. असं काही नसतं मॅडम. माझा अनुभव सांगतो..जी माणसं असं स्वतः सांगतात , मी वाईट आहे.. मी जळतो..मी खडूस आहे..ती माणसं कधीही तशी नसतात. जी माणसं स्वतःच्या तोंडानं मी लो प्रोफाईल आहे, डाऊन टू अर्थ आहे असं सांगतात ती अजिबात तशी नसतात. त्यांना कुठली ना कुठली घमेंड असतेच. आणि लोकांनी आपल्याला तसं म्हणावं यासाठी हा आटापिटा असतो. तुम्हाला सांगून कुणी तुमच्यावर ईर्ष्या करत नसतात. पण ही सेल्फ डिक्लेअर्ड खडूस वगैरे एकदम निर्धोक असतात . लोकांना आपल्यापासून दूर ठेवायची ती ट्रीक असते त्यांची. कदाचित त्यांचे अनुभव वाईट असतात.. पुन्हा पुन्हा तेच फटके खाण्यापेक्षा लोकं दूर असलेली बरी म्हणून ते मुद्दाम असा देखावा करतात. अशी माणसं फार कमी असतात नी फार कमी लोकांना सापडतात. जर सापडली तर कधीच गमावू नये त्यांना. माझी पार्टनर आहे ती असं सर्रास म्हणते नी लोकांना चांगलं काम करायला इन्स्पायर करते. मी तिला बरोब्बर ओळखलं आहे. ती कुणाशीही ईर्ष्या करत नाही. कुणावरही जळत नाही. पण लोकांना दाखवते अशी कि तिच्या वाऱ्याला सुध्दा कुणी थांबू नये." सलील सर म्हणाले.
"एकेकाळी मी पण असा विचार करायचो. तिनं सुधारलं मला. म्हणायची, बायकांसारखे कुजकट विचार करु नका. कुणालाही तुमच्यावर जळायला वेळ नसतो. जगाच्या पसाऱ्यात इतके फडतूस असता तुम्ही की कुणी बघणार सुध्दा नाही तुमच्याकडं.. वेल, मी निघतो. मला उशिर होतो आहे. येतो मी."
ते गेले नी पाचच मिनिटात अनन्या आली.
"साॅरी..साॅरी. मलाही एक मिटींग होती. आणि ती लांबल्यामुळे मलाही वेळ झाला. आणि मी पाचच मिनिटांत निघणार आहे. पुन्हा आले की नक्की भेटेन."
"अगं काय तू...पाच वर्षं झाली भेटून. मुद्दाम वेळ काढून आले मी भेटायला तुला... कितीतरी बोलायचं आहे. तू नशिबानं सापडलीस परत…" स्वाती म्हणाली.
" अजून पण मी जळते तुझ्यावर..किती छान दिसते आहेस. कौस्तुभ सर मरतात आज.. सर, अजूनही पाच वर्षांपूर्वी जसे होता तसेच दिसता हं.. चल.. फार वेळ झाला आहे. पुन्हा भेटू..बाय" ती गेली पण.. ती जाताना एक कार्ड पडलं. ती गेल्यावर कौस्तुभनं ते उचललं ते वाचून तो उडालाच..त्यावर नांव होतं अनन्या & सलील पार्थसारथी!!!
माणूस ओळखायला अवघड असतो हेच खरं. कधीही त्याच्या बाह्यरुपाला, बोलण्याला भुलू नये. वरवर तुमच्याशी गोड बोलणारी माणसं हृदयात तुमच्यासाठी विष भरुन हितशत्रू बनून हिंडत असतात..तर वरवर तुम्हाला फटकवणारी माणसे तुमची हितचिंतक असू शकतात.
©️मुक्ता कुलकर्णी
वरील कथेचे सर्व हक्क लेखिका मुक्ता कुलकर्णी यांच्याकडे असून ही कथा त्यांच्या पुर्वपरवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करण्यात आली आहे.