घास

 


घास

लेखिका: नियती जगताप



एका गाव वजा शहरात अनिल आणि सुनिल ही दोघं भावंडं आपली आई, शांता हिच्यासोबत राहत होती. बाप दारू च्या व्यसनापाई पहिल्यांदा पैसा अडका आणि नंतर जीव गमावून बसलेला. शांता चार घरची धुणीभांडी करून कसंबसं तिघांचं पोट भरत होती. इस्टेटीच्या नावावर गावात नदीकाठी एक पडकी खोली होती. शिक्षणाचा खर्च परवडणारा नाही या सबबीखाली दोघांनीपण आठवी-नववी मध्ये शाळेला राम राम ठोकला. मोठा सुनिल बापाच्या पाऊलांवर पाऊल ठेवत दारूच्या अड्ड्यापर्यंत पोहोचला होता, लहान अनिलचं मन मात्र एका गॅरेजमध्ये रमलेलं. दोघं वयाच्या विशीत होते आणि अल्लडपणा किंवा वात्रपणा अंगात भिनलेला. रोज सकाळी सात वाजता ऊठून आवरणं, शांता आणि अनिल ने कामाला तर सुनिल ने पत्ते खेळायला आणि दारू प्यायला जाणं. संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत सगळ्यांनी घरी परत येणं, थोड्या वेळाने शांता ने दुर्गा मातेच्या मंदिरात जाणं, तिथं सेवा करणं आणि सुनिल अनिल ने परत बाहेर ऊनाडक्या करायला जाणं ते थेट रात्री एक वाजता परत येणं हाच त्यांचा दिनक्रम होता. शांता नेहमी त्यांना ओरडतं असे पण ते ऐकून न ऐकल्यासारखं करत. 


एक दिवस नेहमी प्रमाणे दोघं रात्रीचे बाहेर फिरून नदीकाठच्या पायवाटेने परत घराकडं येत होते. त्यांना तिथं कोणीतरी लपून चाललेलं दिसलं. नीट पाहिल्यावर त्यांना एक माणूस बाईक वरून जाताना दिसला. ते परत नदीकिनारी आले. तिथे त्यांना एका पत्रावळीवर मटणाचं जेवण वाढलेलं दिसलं. एखादी पुरी जरी मिळाली तरी तो दिवस त्यांना दिवाळी वाटायचा आणि इथं तर मटण ते पण एवढं की दोघांचंही पोट भरेल. सुनिल ने ते मटण खायची इच्छा व्यक्त केली. गरीबीमुळे एका भाकरीवर ती पण कधी कधी भाजीशिवाय भूक भागवावी  लागायची म्हणून अनिल पण तयार झाला. पण अनिल ने शंका काढली की जर हा कोणासाठी तरी नैवेद्य असला आणि त्याचा आपल्यावर कोप झाला तर? सुनिल ने असं काही नसतं म्हणून ती शंका झुगारून लावली. असं काही असलं तरीसुद्धा मी मानत नाही असं म्हणून त्या पानाला लाथ मारली आणि हसून अनिल ला म्हणाला "घे, पळवून लावलं तुझ्या भूताला." अनिल त्या पत्रावळीच्या पाया पडला आणि दोघं तिथेच जेवायला बसले. दोघं जणं घरी परत आले आणि झोपून गेले.


दुसरा दिवस नेहमी सारखा न्हवता. सकाळी मुलं उठली नाहीत म्हणून शांता त्यांना उठवायला गेली. ती अनिलला हात लावला आणि लगेच हात बाजूला घेतला. दोघांचं अंग तापलं होतं, एवढं की त्यांचा चटका लागत होता. शांता लगेच धावत जाऊन डाॅक्टरांना घेऊन आली. डाॅक्टरांना पण तपासणी करताना चटका बसला तसे ते शाॅक झाले. त्यांनी अशी केस अत्तापर्यंत कधीच पाहिली न्हवती. त्यांनी शांताला त्यांच्याकडच्या काही गोळ्या दिल्या, तिन्ही जेवणांनंतर दोघांना द्यायला सांगून ते निघून गेले. शांता ने निरोप पाठवून काही दिवस कामावर सुट्टी घेतली. तिने दोन भाकर्या थापल्या, भाजी बनवली, दोन ताटं वाढून ती परत सुनिल अनिल च्या जवळ आली. दोघांना उठवून तीने त्यांना खायला दिलं. दोघं ही कसेबसे उठले पण घास हातात घेताच तो दोघांनी नकळत फेकून दिला, पुढ्यात वाढलेलं ताट पण भिरकावून लावलं. शांता ला काहीच कळत न्हवतं ती पुढे येऊन त्यांना ओरडणार तेवढ्यात दोघं जोरजोरात किंचाळायला लागले. "माझ्या त्वांडचा घास पळिवला, मी उपाशी र्हायले, आता तुमी बी उपाशी मरणार". दोघं जण विव्हळत होते मध्येच ओरडत होते. 


त्यांची अवस्था बघून शांता खूप घाबरली, जोरात रडू लागली. ज्या कोणी तिच्या मुलांना पकडलं होतं त्याला शिव्या देऊ लागली. आवाज ऐकून शेजारी पाजारी तिच्या घरात येत होते आणि त्या दोघांना असं बघून घाबरून पळून जात होते. पूर्ण दिवस हेच चालू होतं. शांता आक्रोश करण्याशिवाय अजून काहीही करू शकत न्हवती. संध्याकाळी दिवसभर अन्नाचा कण पोटात न गेल्यामुळे आणि तापामुळे शेवटी सुनिल अनिल दोघेही बेशुद्ध पडले. एवढा वेळ घाबरून गेलेली शांता आता थोडी शांत झाली. देवाकडं तिच्या मुलांना वाचवण्याची विनंती करू लागली, अचानक तिला काहीतरी आठवलं, तिने दोन्ही मुलांकडं बघितलं आणि ती लगेच घराबाहेर पडली. ती थेट रोज जायची त्या देवळात गेली. देवीचं दर्शन घेतलं आणि पुजार्याकडे गेली. पुजार्याला सकाळ पासून जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि देवीचा अंगारा घेऊन आली. घरात येताच सुनिल अनिल परत जागे झाले, मोठमोठ्याने ओरडायला लागले " तू काहीही कर, मी यांसनी सोडायची न्हाय. माझ्या त्वांडचा घास पळिवला, ह्ये बी उपाशी मरणार " दोघं जण परत विव्हळायला लागले. शांता ने लांबूनच दोघांच्या अंगावर तो अंगारा फुकला तसे जोरात ओरडून दोघं परत बेशुद्ध झाले. तशी शांता दोघांच्या जवळ गेली आणि तिने दोघांना अंगारा लावला. दोघंही थोडे शुद्धीवर आले. तिने लगेच दोघांना जेवण चारलं आणि डाॅक्टरांनी दिलेल्या गोळ्या दिल्या. गोळ्यां खाल्यामुळे आणि अशक्तपणामुळे त्यांना लगेच झोप लागली. 


  बराच वेळ झोपून दोघं जण उठले, आता त्यांना थोडं बर वाटत होतं. रात्री जेवून पुन्हा गोळ्या घेवून ते झोपले. आता त्यांना काही त्रास पण होत न्हवता म्हणून शांता पण निर्धास्त झाली. दुसर्या दिवशी दोघं अंघोळीला गेले. पाण्याने अंगारा वाहून गेला तसे दोघं परत जोरात ओरडायला आणि विव्हळायला लागले. शांता धावत त्यांच्याकडं गेली, ते दोघं खाली कोसळले होते, जमीनीवर लोळत होते. शांता ने परत त्यांच्यावर अंगारा फुकला. ते शांत झाले तसं शांता त्यांना घरात घेऊन आली. थोड्या वेळाने हवेने अंगारा उडून गेला आणि परत तोच त्रास सुरू झाला. शांता ने पुन्हा त्यांना अंगारा लावला. आणि तीने तडक देऊळ गाठलं, पुजार्याला सगळं सांगितलं. अंगारा त्या आत्म्याला दोघांपासून लांब ठेवतो त्यामुळे त्या दोघांना कायम अंगारा लावला लागले एवढं सांगून पुजारी तिथून निघून गेले.


आता सुनिल अनिल न चुकता रोज अंगारा लावत होते. झाल्या प्रसंगामुळे सुनिल ने दारू सोडली आणि अनिल बरोबर तो पण गॅरेजमध्ये काम करू लागला. दोघांनी संध्याकाळी बाहेर फिरणं पण सोडून दिलं. संध्याकाळी शांता, सुनिल आणि अनिल असे तिघंही मंदिरात जाऊ लागले. पण काम करताना घाम आल्यामुळे अंगारा निघून जायचा आणि दोघांना परत त्रास सुरू व्हायचा. कोणीतरी मग शांता ला निरोप देत असत आणि ती अंगारा घेऊन येत असे. तिघंही आता या त्रासला कंटाळले होते त्यात नवरात्र सुरू झाली.


नवरात्र सुरू झाली तोपर्यंत सर्व ठिक होत पण दसर्यानंतर जशी देवी झोपली तसं अंगारा पण काम करेनासा झाला.  आता सुनिल अनिल ला सारखाच त्रास होऊ लागला. शांता ला पण काही सुचत न्हवतं, अंगारा लावल्यावर थोडा वेळ बर वाटायचं आणि परत दोघंही भाऊ जमीनीवर लोळत विव्हळत पडायचे, कधी जोरात ओरडायचे तर कधी मोठ्याने रडायचे. असेच दोन दिवस गेले, तिसर्या दिवशी पहाटे सुनिल आणि अनिल खूप जास्त त्रास झाल्यामुळे बेशुद्ध पडले होते. शांता चा पण नुकताच डोळा लागला होता तेवढ्यात तिला जोरात आवाज आला "अल्लाह रेहम, दरवाजा खोल बेटी". 

शांता खडबडून जागी झाली तसेच सुनिल अनिल ही परत जोरात ओरडू लागले. "कोणीबी या, माझा घास मी सोडायची न्हाय, ह्यांच्यामुळं म्या उपाशी हाय, ह्ये बी उपाशीच जानार, म्या पोहचवनार यांना" जोरदार किंकाळी फोडून दोघं पण परत बेशुद्ध झाले. 



शांता ने लगबगीने दरवाजा खोलला. एक साठ पासष्ठ वर्षाचा फकीर दारात उभा होता. दरवाजा खोलताच तो शांता ला म्हणाला "बेटी, क्या अल्लाह, क्या भगवान दोनो एक ही रूहानी ताकद एक ही सच के दो नाम. अपने बच्चों पर मुसिबत आए तो वो किसी ना किसी को भेजता ही है. मला परवरदिगार ने सुनिल अनिल ला या मुसिबत मधून सुखरूप बाहेर काढण्याचा आदेश दिला आहे." 


शांता दचकली. दसर्यापासून सुनिल अनिल ला पुन्हा त्रास सुरू झाला हे तिने कोणालाच कळू दिलं न्हवतं. घरात गर्दी बघून ते जास्त ओरडत विव्हळत होते आणि येणारे जाणारे लोकं पण नकारात्मकच बोलत असत. त्यामुळे तिने दोघंही देवीचं व्रत करत आहेत आणि  कोजागिरी पौर्णिमेनंतरच घराबाहेर पडू शकतात असंच सगळ्यांना सांगितलं होतं. 


तिच्या चेहर्यावरचे हावभाव टिपून तो फकीर पुन्हा बोलू लागला "बेटी, तुला पडलेला प्रश्न मी समजू शकतो. मी बम्बई च्या हजरत पीर सैय्यद अली मिरा दातार दर्ग्यामध्ये खुदा ची इबादत करतो. काल मी मग़रीब ची नमाज अदा करत होतो तेव्हा अल्लाह ताला चा हुक्म झाला, त्यांनीच मला दाखवलं की सुनिल,अनिल कसे या अतृप्त आत्म्याचा शिकार झाले. नुकतीच जवानीत आलेली पोरं, गलती करून बसले. त्यांना त्याची सजा पण मिळाली, आता त्या आत्म्याला यांना सोडावचं लागल नाहीतर त्या आत्म्यावर खुदा चा कहर बरसेल." एवढं ऐकून शांता चा ही त्या फकीर बाबा वर विश्वास बसला. तिने त्यांना घरात घेतलं. 


त्यांनी घरात पाऊल टाकल्याबरोबर सुनिल अनिल जागे झाले. विभित्स हसत दोघे आधाश्यासारखे बाबा च्या जवळ येऊ लागले. त्यांनी झोळीतून एक बाटली काढली आणि लगेच त्यातलं पाणी दोघांच्या अंगावर शिंपडलं तसं त्या दोघांच्या अंगातून ठिणग्या बाहेर पडल्या ते बेशुद्ध व्हायला लागले. तसा तो फकीर परत जोरात ओरडायला "खबरदार, पळण्याची कोशिश जरी केली. इतने दिन यांना सोडत न्हवतीस तर आता पण मी बोलेल तोपर्यंत इथंच थांबायच". त्यांनी झोळीतून परत काही पिशव्या काढल्या आणि शांता कडे दिल्या. " बेटी, याच्यात जरूरत चं सगळ सामान आहे. एका तासात हे नीट बनवून आण आणि आत्ता पासून ते मी बोलवेल तोपर्यंत तूझ्या देवीच्या नावाचा जप करत रहा. ती तुला काही तकलीफ नाही होऊ देनार." 


शांता निघून गेली आणि सुनिल अनिल जोरजोरात फकीर बाबा ला शिव्या देऊ लागले. "म्या इतक्या सहजासहजी या दोघांना सोडायची न्हाय, म्या नाही जानार." फकीर बाबा ने झोळीतून त्यांचा सर्व साहित्य काढलं. लोभन जाळून पूर्ण घरभर ते फिरवलं तसं दोघं जण फकीर बाबाला मारायला त्याच्यावर धावून गेले, फकीर बाबा ने पुन्हा दोघांवर सिद्ध पाणी शिंपडलं तसे सुनिल आणि अनिल फरशीवर लोळून जोरजोरात रडायला लागले. फकीर बाबा ने त्या आत्म्याला समोर येऊन बसायला लावलं. पहिल्यांदा दोघांनी घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला पण लोभनाच्या धुराने त्यांच्या भोवती मजबूत रिंगण बनवले जे  तोडणं त्या आत्म्याला जमत न्हवतं ना फकीर बाबाला रोकता येत होतं म्हणूनच त्या आत्म्याने आता शांताचा वापर करून घरातून  पळ काढायचा प्रयत्न केला पण शांता देवीच्या नावाचा जप करत होती त्यामुळे त्या आत्म्याला शांता च्या जवळ पण जाता येत न्हवतं. आता सुटका नाही हे समजल्यावर तो आत्मा सुनिल आणि अनिल च्या शरीरातून काळ्या धुराच्या रूपात बाहेर आला आणि फकीर बाबाच्या समोर बसला. फकीर बाबा ने शांता ला बोलवलं, देवी चा अंगारा दोघांना लावायला सांगितला आणि स्वतःजवळचं पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडलं तसे दोघं जण शुद्धीवर आले. आता फकीर बाबा ने आपला मोरपीसांचा झाडू उचलला, पुन्हा लोभनाचा धूर केला आणि आत्म्याला विचारलं "बता, कोन आहेस तू आणि तूला काय पाहिजे?" 


त्या धुरातून आवाज येऊ लागला “म्या बयोअक्का, हे गाव माझं सासर हाय. लग्न होउन इथं आले अन माझ्या नवर्यानं अन सासरकडच्यांनी माझं माहेर मला तोडलं. जशी लग्न करून आले त्या दिसापासून मला घरातून बाह्यर न्हाय पडू दिली. माझं धनी माझ्याशी चांगलं वागायचं पर माझी सासू मला लय तरास करायची. सासरे बी त्यांच्या पुड कईबी बोलू शकत न्हवते. लग्नाला पाच वरीस झालं पण पाळणा काय हालीत न्हवता मंग माझ्या सासूनं माझ्या धन्याचं कान भरलं आणि माझ्या धन्यानं माझ्यासाठी सवत आन्ली. तिची कुस एका वरिसात उजवली, देवींनं वंशाचा दिवा पाठिवला व्हता. त्यो जल्माला आला आणि माझं आणि हाल सुरू झालं. धन्यासकट समद्यांना मी नकूशी झाले. एक दिस संमद्यांनी मला लय हाणलं, पार मरस्तोपरंत मारलं अन मंग मला एका खोलीत टाकलं आणि बाह्यरनं मोठालं टाळं ठोकलं. मला अन्नाचा एक कण दिला न्हाय का घ्वाटभर पानी दिलं न्हाय. चार पाच दिस म्या कशीतरी जगली आणि मंग म्या जीव सोडला. पर त्या लोकांना धडा शिकवाया म्या परत आली. त्यांना त्रास द्यायला लागली. संमद्यांचा नायनाट केला पर ते पोरं मोठं श्यान निघालं.  तीस वरीसाचं झालं ते पोर, त्याच्या आय ला म्या त्याच्या डोळयासमोर मारली, तसं ते पोर पळून गेलं अन थोड्या दिसानी तूज्यासारख्याच एका फकीर बाबास्नी घेऊन आलं. त्यानं मला तिथून जायला भाग पाडलं. उपाशी मेली म्हणून मटणाच्या जेवणाचा वायदा केला. इतक्या वरिसानं खाया मिळणार म्हणून म्या बी लय खुशीत व्हते पर या पोरांनी माझ्या त्वांडचा घास पळिवला. लय तरास काढला म्या, माझं कुंकू जित्ता असताना पन इधवेवानी दिस काढले. लय अपमान सहन केला बघा. उपास सहन केले, अन या भ**यांनी माझं शेवटालं जेवण बी गिळलं" आणि तो आत्मा जोरात रडू लागला. 


फकीर बाबा आता बोलू लागले, "बयोअक्का, तू जी तकलीफ सहन केली, अपमान सहन केला त्या सगळ्याची परतफेड खुदा तूझ्या पुढच्या जन्मात करलं. जेवढं या जन्मात सहन केलं तेवढंच सुख तूला पुढच्या जन्मात मिळणार आहे. अल्लाह ने तूझी किस्मत लिहून ठेवली आहे, तूला फक्त या जन्मातून आजाद व्हायचं आहे. जाताना तूझा मान पण तूला मिळलं, जिथं तो तूला मिळाला होता पण या दोघांच्या नादानीमुळं तो तुझ्यापर्यंत पोहोचला नाही तिथंच तूला मिळल. तो कबूल कर आणि आझाद हो". ठिक आहे बोलून तो काळा धूर तिथून गायब झाला. 


हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. फकीर बाबांनी सकाळी शांता ला पिशवीतून मटण आणि मसाला दिला होता. शांता ने सगळं जेवण बनवलं होतं. फकीर बाबांनी ते सगळं जेवण सुनिल ला एका केळीच्या पानावर वाढायला लावलं. अनिल ला बाजारातून एक हिरवी साडी, ओटी, हिरव्या बांगड्या, कुंकवाची डब्बी आणि गजरे आणायला सांगितले. सगळं सामान आणल्यावर एका ताटात केळीच्या पानावर वाढलेलं जेवण आणि एका ताटात साडी,ओटी आणि बाकीचं सगळं सामान घेऊन सर्व त्या नदीकाठी आले. तिथे बायअक्काची माफी मागून फकीर बाबांनी दोघांना दोन्ही ताटं पाण्यात सोडायला सांगितली. फकीर बाबांच्या सांगण्यावरून मागे वळून न बघता सर्वजण घराकडे परतले. इकडे दोन्ही ताटं पाण्यावर तरंगत नदीच्या मध्यभागी गेली आणि अचानक कोणीतरी ओढावं अशा पद्धतीने ती दोन्ही ताटं पाण्यात बुडाली.


**** समाप्त ****


धन्यवाद 


लेखिका: नियती जगताप


सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये. 

वरील कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी लेखिकेचे आहेत. कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली असून शब्दचाफा ब्लॉगिंग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post