अमरत्व भाग २

 अमरत्व भाग 2

लेखिका: नियती जगताप



हॉस्पिटल मध्ये कविता जखमी अवस्थेत स्टेचरवर पडली होती. आज तिला स्टेचरवर पडल्या पडल्या सर्वकाही आठवतं होतं.   ती एम.बी.ए. तर तिचा नवरा अरूण हा इंजिनिअर होता. तिची गावदेवीवर, लक्ष्मी मातेवर खुप श्रद्धा होती, प्रत्येक जत्रेला ती गावदेवीची ओटी भरत असे आणि त्यावेळेस तिला देवीचे डोळे खूप आश्वासक आणि बोलके वाटत असे. लग्नानंतर बरीच वर्षे त्यांना मुल होतं न्हवतं म्हणून मोठ्या श्रद्धेने देवीला नवस बोलली आणि एका वर्षात एक गोंडस मुलीला जन्म दिला. देवीचं वरदान म्हणून देवीच्याच एका नावावर तीचं नाव ठेवलं 'नित्या'. नित्या दोन वर्षांची झाली तेव्हा खूप हैसेने तिला आणि अरूण ला घेऊन कविता माहेरी नवस फेडायला आली. लहान नित्या आई काय करत आहे ते कुतूहलाने बघत होती. का कोण जाणे पण नित्याला सुद्धा देवीचे डोळे खूप आश्वासक आणि बोलके वाटले. तिला असं वाटलं की ती कोणा जवळच्या नातेवाईकाला भेटत आहे. तेव्हापासून ती सारखी देवीला भेटायचं म्हणून हट्ट करू लागली. अरूण कविता एवढा देववेडा  न्हवता पण कविता आणि आता नित्या ची गावदेवीवर केवढी श्रद्धा आहे हे तो ओळखून होता त्यामुळे दर जत्रेला तो या दोघींसोबत त्याच्या सासूरवाडीला येत असे. 


आता नित्या बारा वर्षांची झाली होती आणि या ही वर्षी तिघं जत्रेसाठी कविताच्या माहेरी आले होते. कविताने खूप श्रद्धेने, मनोभावे देवीची ओटी भरली, नित्या पण देवीचं रूप मनामध्ये साठवून घेत होती. आपल्याला या वर्षी काय काय हवंय याची यादी देवीला सांगत होती. पण आज देवीच्या चेहरा प्रसन्न वाटत न्हवता. घरी आल्यावर नित्या ची बडबड सुरु झाली " आज की नाई मी देवीआई कडं ईतकं काय काय मागितलं की देवीआई थकली". सगळे हसायला लागले, म्हणाले खरंच लक्ष्मी मातेची मुलगी आहेस. तुझ्या आईच्या पाठीमागे तर लागतेसच हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणतं पण देवीलाही सोडत नाहीस. तिच्याकडून पण लाड करून घेतेस. तशी नित्या लगेच आई कडे पळाली. आज जत्रेतून खरेदी केलेली खेळणी, वेगवेगळे कानातले डूल सगळ्यांना दाखवायला लागली. तिला एक लॉकेट खूप आवडलं होतं, काळ्या दोर्यात एक छोटीशी बाटली, रंगीत पाण्याने अर्धी भरलेली. हट्टाने तिने कविताला ते घ्यायला लावलं. आणि लगेच ते लॉकेट गळ्यात घातलं पण. 


दोन दिवसांनी हे कुटुंब परत त्यांच्या घरी जायला निघाले पण कविता खूप अस्वस्थ झाली होती. कारण कळतं न्हवतं पण तिला आज खूप भिती वाटतं होती. तिने तसं अरूण ला बोलून दाखवलं पण दोन दिवस खूप दगदग झाली म्हणून असेल एवढं बोलून अरूण ने ही तो विषय तिथेच संपवला. ते त्यांच्या कार मधून निघाले. नित्या ला पण अस्वस्थ वाटतं होतं म्हणून अरूण ने तिला आज पुढे कविता सोबत बसू न देता मागच्या सीट वर झोपवले. ब्रेक मारला तर झोपेत ती पडू नये म्हणून नीट ब्लांकेट लावून मग सीटबेल्ट लावला. कविता पुढे बसली आणि अरूण गाडी चालवत होता. तिचं माहेर पुढे एक छोटं शहर आणि पुढे ते राहत होते ते शहर असा त्यांचा तीन साडेतीन तासांचा प्रवास होता. ते पुढच्या छोट्या शहरात आले आणि कविता अजूनच अस्वस्थ झाली. सीटबेल्ट जास्त घट्ट बसल्यामुळे असं वाटतं असेल असा विचार करून तिने सीटबेल्ट काढला. अरूण तिला सीटबेल्ट लावायला सांगतच होता की तितक्यात एक बाईक चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने त्यांच्या कार समोर आली. अरूण ने ऐक्सिडेन्ट टाळण्यासाठी पटकन उजवीकडे कार वळवली पण त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका झाडावर आदळली.   


मागे सीटबेल्ट लावल्याने नित्या ला फार काही लागलं न्हवतं पण डोक्याला थोडा मार बसला होता. त्यामुळे आणि अचानक झालेल्या प्रकाराने घाबरून ती बेशुद्ध पडली. अरूणचं डोकं स्टेरिंग वर आपटून पुन्हा मागे सीट वर आपटलं होतं त्यामुळे त्याला ही बर्यापैकी मार लागला होता. पण कविता ने सीटबेल्ट लावला नसल्याने तिला खूप जास्त लागलं होतं. बघ्यांपैकी एकाने पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये भरती केलं होतं. पोलिस हॉस्पिटलची औपचारिकता पूर्ण करत असताना कविता ला जाग आली. वेदनेमुळे आणि जखमांमुळे तिला ना हलता येत होतं ना बोलता येत होतं. तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. अरूण तिच्या शेजारच्या स्टेचरवर होता, तिला त्याला असं निपचित पडलेलं बघून खूप रडू आलं. त्याच्या स्टेचर च्या मागे दुसर्या स्टेचरवर नित्या होती पण तिच्याकडे बघून कविता खूप घाबरली. एक अतिशय भयंकर दिसणारी बाई तिच्या गळ्याजवळ काहीतरी करत होती. कविताला त्याच क्षणी ओरडून त्या बाईला नित्यापासून लांब करायचं होतं पण तिला तोंडही उघडता येत न्हवतं.   


कविता ला काही सुचत न्हवतं, तेवढ्यात तिला गावदेवीचा पडलेला चेहरा आठवला. अशा अवस्थेत सुद्धा कविता ने मनोभावे मनातल्या मनात देवीला नमस्कार केला. माझ्या नित्याला वाचव, तिला कायम सुखरूप ठेव अशी प्रार्थना केली, अचानक तिच्या डोळ्यांसमोर देवीचा हसरा चेहरा आणि आश्वासक डोळे तराळून गेले. जणू काही देवीने कविता ला  नित्या ची काळजी घेण्याचं वचन दिलं. कविता ने डोळे उघडले, ती भयानक बाई तिथून पळून जाताना दिसली. कविता ने पुन्हा डोळे बंद केले, यावेळी मात्र कायमचे. दोन दिवसांनी अरूण ला हॉस्पिटल मधून सोडलं. नित्या कविताच्या माहेरीच होती. कविता वर अंत्यसंस्कार करून अरूण ने ते शहरचं सोडलं. तो आता मुंबईत स्थाईक झाला. तो आता गाडी चालवायला घाबरू लागला. मरण म्हणजे काय हे नित्याला माहित न्हवतं पण आता आपली आई कधीच परत येणार नाही हे तिला कळालं होतं. नित्या लहान होती पण समजुतदार होती. तीही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. 


कविता जाऊन आता दहा दिवस झाले. तिच्या दहाव्यासाठी ते दोघं पुन्हा कविताच्या माहेरी आले. दहावा पार पडला आणि ते परत मुंबईला जायला निघाले. बसला बराच वेळ होता म्हणून नित्याने गावदेवीचं दर्शन घ्यायची ईच्छा बोलून दाखवली. तिने हट्ट केला नाही, अरूण ने पण विरोध केला नाही पण मंदिरात आतमध्ये जायला नकार दिला. नित्या एकटी देवीच्या मुर्तीजवळ गेली. आज तिला देवीचे डोळे जास्त बोलके आणि आश्वासक वाटले. तिने दर्शन घेतलं आणि दोघं मुंबईला परत आले. 


रात्री साडेबारा- एक च्या सुमारास तिला खूप भयानक स्वप्नं पडलं. काळी साडी नेसलेली एक बाई सुनसान रस्त्यावरून पळत आहे. तिच्या पाठीमागे तिला मारायला काही लोकं लागलेत, अचानक ती बाई थांबली आणि पाठीमागे वळली, तिचा चेहरा जागोजागी फाटला होता. त्यातून रक्त आणि काही ठिकाणी मांस बाहेर आलं होतं, लांबसडक काळे केस, रक्ताने माखलेले पण मोकळे सोडलेले आणि लालभडक डोळ्यात भरपूर काजळ भरलेलं. ती कर्कश्य आवाजात ओरडली, "माझी वस्तू मला परत हवी". ती बाई नित्या च्या एकदम जवळ आली आणि अचानक नित्या ला देवीचे डोळे दिसले आणि ती बाई गायब झाली. नित्या दचकून जागी झाली, अरूण जो तिच्या शेजारच्याच पलंगावर झोपला होता तो ही जागा झाला. नित्या घाबरून रडू लागली. अरूण ने तिला पाणी पाजलं. हे फक्त एक स्वप्नं आहे असं समजाऊन सांगितले  आणि परत झोपवलं.


दुसरा दिवस नेहमी सारखाच गेला. नित्या ते स्वप्नं विसरून पण गेली.  रात्री ती शांत झोपली. साडेबारा- एक च्या सुमारास तिला पुन्हा तेच स्वप्नं पडलं. ती दचकून जागी झाली.


**** क्रमशः ****


धन्यवाद 



*** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****

सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.
Post a Comment (0)
Previous Post Next Post