अमरत्व भाग ३

 अमरत्व भाग 3

लेखिका: नियती जगतापपुन्हा तेच स्वप्नं, तोच भितीदायक सुनसान रस्ता, रात्रीचा अधिकच गडद काळोख आणि रस्त्यावरून पळणारी ती भयानक बाई. पुन्हा थांबून कर्कश्य आवाजात तेच ओरडणारी " माझी वस्तू मला परत हवी" पुन्हा गावदेवीचे डोळे. नित्या आज परत दचकून जागी झाली. अरूण ने पुन्हा तिला झोपवलं. पण हल्ली हे रोजचं झालं होतं. गेली पंधरा दिवस दिवस नित्या या स्वप्नामुळे नीट झोपू शकली न्हवती. तिचं ना अभ्यास लक्ष लागतं होतं ना खाण्या-पिण्यात. कविता गेल्यावर अरूण ला फक्त नित्याचाच आधार होता आणि तिच्या बाबतीत आता तो जास्तच हळवा झाला होता. त्याला नित्या ची आशी अवस्था बघवत न्हवती. त्याला वाटतं होतं की कविता च्या अचानक जाण्याने तिला भावनिक धक्का बसला असेल म्हणून तिला सारखं असं स्वप्न पडत असेल. शेवटी अरूण तिला सायकायट्रिस्ट कडे घेऊन गेला. सायकायट्रिस्टने तिचे समुपदेशन केले पण नित्या च्या स्वप्नांचं कारण कविता चा मृत्यू  हेच आहे असा निकष काढून तिला गोळ्या सुरू केल्या आणि एक आठवड्याने पुन्हा बोलवल. या गोळ्यांमुळे नित्या ला शांत झोप ही लागणार होती आणि मानसिक त्राण ही कमी होणार होता. रात्री आठ वाजता नित्या गोळ्या घेऊन झोपली. तिला असं शांत झोपलेलं पाहुन अरूणही सुखावला. तिच्या शेजारीच अरूण काम करत बसला होता. रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते आणि अचानक नित्या झोपेतच पुन्हा अस्वस्थ झाली. थोड्या वेळात ती परत दचकून जागी झाली. आता मात्र अरूण पण गोंधळला. त्याने दुसर्यां दिवशी नित्या च्या सायकायट्रिस्टला फोन करून रात्री पुन्हा नित्या ला तेच स्वप्न पडल्याचं सांगितलं. सायकायट्रिस्टने जास्त  पॉवरच्या गोळ्या दिल्या पण तरीही नित्या ला रोज रात्री तेच स्वप्न पडू लागलं. एका महिन्यातच नित्या ची तब्येत खूप खालावली. दिवसभर ती ठीक असे पण रात्री झोपायला ती खूप घाबरू लागली. प्रयत्नपूर्वक रात्री जागी राहू लागली. तरी थोडावेळ डोळा लागतच असे आणि तेवढ्याच वेळात तीला ते स्वप्न पडत असे. 


एक वर्ष होत आलं, अरूण ने बरेच सायकायट्रिस्ट बदलले पण कोणाचाच फरक पडत न्हवता. आज सोमवती अमावस्या होती. नित्या पहाटे तीन पर्यंत कशीबशी जागी राहीली पण आता तिचा डोळा लागला. आज ती त्या सुनसान रस्त्यावर उभी होती. ती बाई पळत पळत तिच्या जवळ आली. तिच्या पाठीमागे तिला मारायला काही लोकं लागले होते. नित्या ला बघताच ती बाई जागेवर थांबली. तिच्या जखमांमधून अजूनही रक्त वाहत होतं पण आता तिचं शरीर सडत चाललं होतं. ती पुन्हा कर्कश्य आवाजात ओरडली त्या बाईच्या अंगावरचं मांस गळून खाली पडत होतं आणि ती बाई नित्या च्या दिशेने सरपटत येत होती. अतिशय किळसवाणं ते दृश्य बघून नित्या खूप घाबरली आणि पळू लागली. बराच वेळ पळाल्यावर नित्या खूप थकली, तीला एकही पाऊल पुढं टाकता येत न्हवतं. पाठीमागून ती बाई वेगाने सरपटत तिच्या जवळ येत होती. आता घाबरून नित्या ने जोरात गावदेवीला साद घातली. " देवीआई मला वाचव" त्याक्षणी नित्या च्या समोर अचानक प्रखर प्रकाश पडला आणि त्यातून दोन मोठे डोळे दिसले आणि नित्या जागी झाली. ती पुर्णपणे घाबरली होती, चेहरा घामाघुम झालेला आणि बरीच थकलेली ही दिसत होती. अरूण काही बोलणार तेवढ्यात ती बेशुद्ध झाली. नित्या ची अशी अवस्था बघून अरूण ने देश सोडण्याचा निर्णय घेतला.


तो नित्या ला घेऊन अमेरिकेला कायमचा निघून गेला. तिकडे गेल्यावर नित्या ची रोजची स्वप्न बंद झाली पण दर अमावस्येला अजूनही ते स्वप्न काही तिचा पिच्छा सोडत न्हवतं. दहा वर्षे उलटून गेली पण दर अमावस्येला ती रात्रीची झोपायला घाबरायची. आता अरूण ला पण संशय आला की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. त्याने नित्याच्या मामाला फोन करून कविताच्या दहाव्यापासून ते आतापर्यंत रोज रात्री  नित्या ला पडत असलेल्या स्वप्नाविषयी सांगितलं. मामा ने लगेच दोघांना गावी यायला सांगितलं. अरूण आणि नित्या गावी पोहोचले. बस स्टॅन्ड वर मामा त्यांना घ्यायला आला होता. आणि घरी पोहचेपर्यंत मामा ने दोघांना शेजारच्या शहरातल्या चेटकीणीविषयी कल्पना दिली. नित्याने  स्वप्नातल्या बाईचं जे वर्णन सांगितलं ते बर्यापैकी त्या चेटकीणीशी मिळतं जुळतं होतं. त्यामुळेच मामाने तातडीने दोघांना गावी बोलवून घेतलं. 


संध्याकाळच्या आरतीला सर्वजण मंदिरात पोहोचले. मामांनी पुजार्यांला आधीच कल्पना देऊन ठेवली होती म्हणून पुजार्यांने काशीवरून एका सिद्ध पंडिताला बोलवले होते. ते आज संध्याकाळ पर्यंत पोहोचणार होते. आरती झाल्यानंतर मामा, अरूण आणि नित्या मंदिरात थांबले. ते पंडितजी पण मंदिरात पोहोचले, नित्या ला समोर बसवून त्यांनी त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा तिच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध लावला. नित्याला बसल्या जागी पुन्हा तेच स्वप्न पडलं. त्या पंडितजींना पण तिचं स्वप्न दिसलं. त्यांनी नित्या ला जागं केलं आणि सगळ्यांना सांगू लागले. ती चेटकीण खूप शक्तीशाली आहे.   जिवंत असताना तिची खूप महत्वाची वस्तू तिने नित्या कडे दिली होती जी परत घेण्यासाठी ती आता नित्याच्या पाठीमागे लागली आहे. तिला संपवण खूप अवघड आहे, पण तीला नित्या ला त्रास देण्यापासून आपण रोखू शकतो. नित्याचं रक्षण स्वतः लक्ष्मी माता करत आहे पण सद्ध्या तरी असे दिसत आहे की त्या चेटकीणीची ती वस्तू नित्याने संभाळून ठेवली आहे त्यामुळे ती चेटकीण स्वप्न मार्गे येऊन नित्या कडून ती मागातही आहे आणि तिच्या शरीरातून ऊर्जा शोषून घेऊन स्वतःची शक्ती वाढवत आहे. ते येत्या अमावस्येलाच नित्या ला रक्षाकवच देण्याचं बोलले पण या कामात पण ती चेटकीण अडथळा आणेल आणि रक्षाकवच पूर्ण होऊ न देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, ज्या साठी ती कोणाचा जीवनही घेऊ शकते याचीही शक्यता वर्तवली. अरूण आणि मामा, दोघांना नित्याचीच काळजी होती म्हणून त्यांनी पंडितजींना कोणत्याही परिस्थितीत ही पुजा पार पाडण्याची विनंती केली. पंडितजींनी त्यासाठी लागणार्या सामानाची यादी करून अरूण जवळ दिली आणि येत्या अमावस्येला ते सर्व सामान घेऊन रात्री दहा वाजता मंदिरात यायला सांगितलं.


**** क्रमशः ****


धन्यवाद *** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****

सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post