अमरत्व भाग ४

 अमरत्व भाग 4 

लेखिका: नियती जगताप



अमावस्येला अजून दहा दिवस बाकी होते. अरूण आणि मामा पंडितजींनी सांगितलेल्या सामानाची जुळवाजुळव करत होते. नित्या पण सगळं ठिक होईल की नाही याच काळजीत होती. आता तिचं स्वप्न पण अधिकच किळसवाणं होऊ लागलं होतं. तेच स्वप्न, तेच सर्व पण आता ती बाई जेव्हा नित्या च्या मागे लागत होती तेव्हा तिच्या अंगावरचं सडत चाललेलं मांस खाली पडत होतं आणि ती बाई ते मांस तोंडात टाकत टाकत नित्या मागे पळत असे. सलग दोन दिवस हेच स्वप्न पडल्यावर नित्या ने घरातल्यांना आणि पंडितजींना याची कल्पना दिली, पंडितजींनी लगेच मंदिरातच तिची झोपायची व्यवस्था करायला लावली. त्या रात्रीपासून ती बाई नित्या च्या स्वप्नात फक्त पाच दहा सेकंदांसाठी यायची आणि लांबूनच तिच्यावर ओरडायची, तिची ती वस्तू मागायची पण घाबरून लगेच गायब व्हायची. नित्याची झोप आता नीट व्हायला लागली आणि त्यामुळे तिची तब्येत पण जरा सुधारली. 


आज पुन्हा अमावस्येची रात्र होती. सकाळी अंघोळ करून अरूण, मामा आणि नित्या पुन्हा एकदा मंदिरात आले. देवीचं दर्शन घेतलं आणि पंडितजींजवळ बसले. पंडितजींनी रात्रीसाठी काही सुचना दिल्या. 


"ती चेटकीण भ्रम निर्माण करून, काही भयानक दृश्य दाखवून किंवा ओळखीच्या माणसाच्या आवाजात बोलून, आखून दिलेल्या सुरक्षा वर्तुळातून तूम्हाला बाहेर काढायला बघेल त्यामुळे काहीही झालं तरी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत जागेवरून हलायचं नाही. मी एका तांब्यात तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केलेलं गंगाजल देईल, पुजा संपेपर्यंत ते बसल्या जागेवरून चारही दिशांना थोड्या थोड्या  वेळाने शिंपडत रहायचं. आज घरात ती वस्तू शोधा जी ती चेटकीण मागत आहे, त्या वस्तूचा वापर नित्याला तिच्यापासून कायमचं लांब ठेवण्यासाठी करता येईल." एवढ्या सुचना देऊन पंडितजी पुन्हा ध्यानाला बसले.


घरी आल्यावर अरूण, मामा आणि नित्या ने अख्ख्य घर पालथं घातलं पण अशी कोणतीही वस्तू सापडली नाही जी त्यांनी कधीच पाहिली न्हवती किंवा संशयास्पद होती. मामा ने एक शेवटचा प्रयत्न म्हणून नित्या च्या वस्तूंनी भरलेली एक जुनी पेटी माळ्यावरून काढली. त्यामध्ये नित्या चे लहानपणीची खेळणी, तिने लहानपणी जत्रेमधून घेतलेलं कितीतरी सामान होतं. ते सामान एक एक करत बघता बघता सगळेच भूतकाळात हरवून गेले. सगळ्यांनाच कविता ची आठवण येऊ लागली. नित्या ची नजर त्या लॉकेट वर पडली, आईच्या पाठीमागे लागून, कितीवेळ हट्ट करून तिने ते लॉकेट घेतलं होतं. ऐक्सिडेन्ट झाला त्या दिवशी पाहीलं आणि शेवटचं ते लॉकेट तिने घातलं होतं.  आईला ते लॉकेट घालून दाखवलं तेव्हा तिचं, तिच्या रूपाचं कौतुक करत तिच्या आईने पप्पी घेतली होती. नित्या ला ते सगळं आठवलं. तिने रडत रडत ते लॉकेट उचललं आणि अचानक ती गुरगुरायला लागली. अरूण आणि मामा दोघांनी तीला काही त्रास होतोय का? मंदिरात जायचं का? म्हणून विचारलं तसं तिचे डोळे लालबूंद झाले. ती मोठमोठ्या गुरगुरायला लागली, तिचा चेहरा काळा ठिक्कर पडला आणि चेहर्यावर एक आसुरी हास्य पसरलं. मामा आणि अरूण तिचं हे असं रूप बघून जागीच थबकले, दोघं इतके घाबरले की त्यांना ना हलता येत होतं ना घश्यातून आवाज बाहेर पडतं होता. नित्या गुडघ्यावर बसल्या बसल्याच पुढे पुढे चालू लागली. दरवाज्याजवळ पोहोचताक्षणी तिला देवीचे रागाने वटारलेले डोळे दिसले आणि विजेचा झटका बसावा तशी नित्या उडून पडली ते लॉकेट पण तिच्या हातातून खाली पडलं. अरूण आणि मामा ने तिला शुद्धीवर आणलं. नित्या ला  काही क्षणांपुर्वी काय झालं ते काहीच आठवत न्हवतं. त्या दोघांनी तीला शांत केलं, पाणी पाजलं तेवढ्यात मामाला पंडितजींचा फोन आला.


पंडितजींनी  त्या तिघांना ताबडतोब मंदिरात बोलवून घेतलं. अरूण आणि मामा काही बोलणार तेवढ्यात पंडितजी म्हणाले त्या चेटकीणीची ती वस्तू मिळवण्याची ईच्छा दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे, जर आत्ताच काही नाही केलं तर ती सारखा नित्या च्या शरीराचा ताबा घ्यायला बघेल, आज देवीने तिला वाचवली पण ती चेटकीण काही शांत बसणार नाही.  आज कोणत्याही परिस्थितीत ही पुजा पार पाडावीच लागेल, आणि मंदिराच्या आवारातच ती पुजा सफल होऊ शकते, देवापुढे त्या चेटकीणीच काही चालणार नाही पण आता आपल्याला उशिर करून चालणार नाही, आता वाट बघणं धोक्याचं आहे रात्री पर्यंत पण नाही.


संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली होती, आरती झाल्यानंतर मंदिर बंद करून लगेच पुजा सुरू करण्याचा निर्णय पंडितजींनी घेतला आणि तसं पुजार्यालाही कळवलं. मंदिराचे मेन गेट बंद झाले आणि पंडितजींनी हळद कुंकवाचे एक मोठे रिंगण आखले. सगळं सामान एकत्र करून पंडितजी त्या रिंगणात बसले. त्यांच्यासमोर होम, त्यापुढे नित्या आणि तिच्या मागे अरूण आणि  मामा बसले. पंडितजींनी मामाला तो गंगाजल भरलेला तांब्या आणि अंब्याचं एक पानं दिलं. आतापासून पुजा संपेपर्यंत कोणीही एक अक्षरीही बोलायचं नाही असं सांगितलं आणि पुजा सुरू केली. होम प्रज्वलीत केल्यावर पंडितजींनी पंचरंगी धागा होमामध्ये टाकला. एक एक जिन्नस होमामध्ये टाकत पंडितजी काही मंत्र म्हणत होते. एका कोपर्यात काळा धूर जमा झाला आणि त्या धुरातून गुरगुरण्याचे, विव्हळण्याचे आवाज येऊ लागले. मामा वेळोवेळी गंगाजल शिंपडत होता आणि ते देवीचं देऊळ असल्यामुळे त्या चेटकीणीला कोणालाही काहीही करता येत न्हवतं. रात्रीचे बारा वाजले आणि त्या चेटकीणीची ताकद वाढू लागली. पंडितजी आणि ती चेटकीण या दोघांनाही माहित होतं  की त्या रिंगणाच्या आत तिची शक्ती चालू शकणार न्हवती. तिने आपल्या शक्तीने नित्या, अरूण आणि मामाला जागेवरून उचलून फेकण्याचे खूप प्रयत्न केले पण देवीच्या दारात सगळे होते त्यामुळे तिची शक्ती अपूरी पडत होती उलट गंगाजल अंगावर पडून तीचं अंग जळत होतं. अचानक अरूण ला कविताचा आवाज ऐकू आला, ती त्याला रिंगणाबाहेर उभी राहून स्वतःकडे बोलवत होती. तो जागेवरून उठणार तेवढ्यात मामा ने त्याचा हात धरला, इशार्यानेच नाही म्हणाला आणि पून्हा चारही बाजूंना गंगाजल शिंपडलं. कविता ची आकृती गायब झाली. ती चेटकीण आता सगळ्यांना कविता च्या रूपाने आवाज देत होती, बाहेर बोलवत होती पण कोणीही जागचं हालत न्हवतं. ती चेटकीण आता जोरात ओरडली. "कितीही प्रयत्न करा पण माझी वस्तू मी मिळवणारच" आणि कर्कश्य आवाजात ओरडत ती तिथून गायब झाली. 


रक्षाकवच विधी पार पडला होता. पंडितजींनी त्या होमाजवळ हात नेला आणि त्यामध्ये टाकलेला पंचरंगी धागा बाहेर काढला आणि नित्या च्या हातात बांधला.सगळे पंडितजींकडे आश्चर्याने बघत होते. पंडितजी म्हणाले " या मुलीची पाठराखीण स्वतः तुमची गावदेवी आहे, तिचा आणि महादेवाचा आशिर्वाद आहे या धाग्यात. त्या चेटकीणीचा आत्मा अजूनही मुक्त झालेला नाही पण जोपर्यंत हा धागा नित्या च्या हातात आहे तोपर्यंत ती नित्या ला काहीही त्रास देऊ शकणार नाही. घाबरायच कारण नाही पण काळजी घ्या." 


त्याच दिवशी पंडितजी काशीला निघून गेले. नित्याने पण आता शिक्षण पूर्ण केलं आणि ती अरूण सोबत पुन्हा मुंबईला स्थायिक झाली. पण दर वर्षी न चुकता ती मामाकडे गावदेवीच्या जत्रेला जाऊ लागली.


**** क्रमशः ****


धन्यवाद 

*** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****

सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post