अमरत्व भाग ५

 अमरत्व भाग 5

लेखिका: नियती जगतापरक्षाकवच धागा हातात बांधल्यापासून नित्या ला पुन्हा ते स्वप्न पडले नाही पण तरीही तिला सतत कोणीतरी तिच्यावर नजर ठेउन असल्यासारखं वाटायचं. नित्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि एकाच वर्षात तिला शोभेल अश्या मुलाशी, पार्थशी, अरूण ने तिचं लग्न लावून दिलं. पुढे दोन वर्षांनी तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तीचं नाव साध्वी ठेवलं. बघता बघता पाच वर्ष सरले. आज साध्वी चा पाचवा वाढदिवस होता, पार्थ ला तो दणक्यात साजरा करायचा होता. सर्व परिजनांना आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले. साध्वी ची तैयारी, पाहुण्यांना काय हवं नको ते बघण्यात नित्याची खूप धावपळ होत होती. साध्वी ने केक कापला आणि नित्याने पाहुण्यांच्या जेवणाची तैयारी सुरू केली. जेवण बाहेरून मागवले पण वाढायला घरचीच मंडळी होती. नित्या जेवणाचं मोठ्ठं पातेलं घेऊन किचन मधून बाहेर येत असताना तिच्या हातातला धागा दरवाज्याच्या कडीमध्ये अडकला. हातात मोठ्ठं पातेलं आणि बाहेर जेवणासाठी थांबलेली माणसं या गडबडीत तीने हाताला हिसका देऊन कडीमधून तो रक्षाकवच धागा सोडवला. धागा तुटलेला तिच्या लक्षात आलं तसं लगेच तिने एक गाठ मारली. निवांत झाल्यानंतर परत नीट बांधू असा विचार करून ती परत कामाला लागली. 


कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सगळे पाहूणे निघून गेले. नित्याने साध्वीचं सगळं आवरून तिला झोपवलं. पार्थ किचन मध्ये उरलेलं जेवण फ्रिज मध्ये नीट लावून ठेवत होता. नित्या सोफ्यावर निवांत बसली तेवढ्यात तिला त्या धाग्याची आठवण आली. तो धागा पुन्हा घट्ट बांधण्यासाठी तिने हात वर उचलला आणि तिला धक्का बसला, हातात तो धागा न्हवता. ईकडे पार्थ त्याचं काम आवरून किचन मधून बाहेर आला तर नित्या खूप अस्वस्थ होऊन काहीतरी शोधत असताना त्याला दिसली. पार्थ ने विचारताच नित्या ने तो धागा हरवल्याच सांगितलं. नित्या ने लग्न ठरतेवेळीच पार्थ ला त्या चेटकीणीबद्दल आणि रक्षाकवचाबद्दल कल्पना दिली होती त्यामुळे पार्थपण तो रक्षाकवच धागा हरवल्यामुळे थोडा टेंशन मध्ये आला. दोघांनी अख्ख्य घर पालथं घातलं पण तो धागा काही सापडला नाही. शेवटी पार्थ ने नित्या ची समजूत घातली की नऊ दहा वर्ष उलटून गेली आहेत तर आता काही त्रास नाही होणार. नाईलाजाने नित्या ही झोपायला गेली. दिवसभर दमछाक झाल्यामुळे पडल्या पडल्या तिचा डोळा लागला. घरातले सर्व दिवे अचानक चालू बंद होऊ लागले आणि दरवाज्याच्या फटीतून काळा धूर आत आला आणि नित्याच्या शरीरभर पसरला.


दुसर्या दिवशी नित्या सकाळी उठली तेच कपाळावर थंड काही जाणवल्याने. पार्थ तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवत होता. तिने बिछान्यातून उठण्याचा प्रयत्न केला पण तिला भयंकर अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टर येऊन इंजेक्शन आणि गोळ्या देऊन गेले. दोन दिवसांत नित्या व्यवस्थित बरी झाली. साध्वीच्या वाढदिवशी दगदग झाली त्यामुळे ताप आला असेल अस समजून आणि तो रक्षाकवच धागा तुटला तरी पुन्हा ते स्वप्न पडलं नाही त्यामुळे नित्या ने रक्षाकवच आणि चेटकीणीचा विषय सोडून दिला. दुसर्या दिवशी नित्या सकाळी सहाला जाग आली, तिला खूप थकवा जाणवत होता पण तरी ती उठली आणि समोर पाहून दचकली. सगळं घर अस्ताव्यस्त झालं होतं. तिने लगेच पार्थ ला उठवलं. रात्री घरात चोर शिरला की काय म्हणून दोघांनी अख्ख्य घर नीट बघितलं पण घरातून काही गायब झालं न्हवतं. एवढंच न्हवे तर घरातले खिडकी दरवाजे आतून बंद होते आणि देव्हाराच फक्त व्यवस्थित होता. दोघांनाही कळतं न्हवतं की रात्री झालं तरी काय. दोघांनी मिळून पटकन घर आवरलं, साध्वी ला तिच्या शाळेत सोडून दोघं त्यांच्या ऑफिस ला गेले. घरी आले तर सगळं घर व्यवस्थित होतं. पण दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा तेच, देव्हारा सोडून बाकी सगळं अस्ताव्यस्त. पार्थ ला संशय आला की हे बहूतेक तो धागा तुटल्याने होत आहे पण नित्या ने असं काही नसेल म्हणत विषय टाळला. पार्थ ला आश्चर्य वाटलं पण त्यानेही दूर्लक्ष केलं. 


आता रोज सकाळी घर अस्ताव्यस्त होणं नेहमीचंच झालं होतं. विशेष म्हणजे नित्याला काहीच वाटतं न्हवतं, रोजच्या कामाप्रमाणे ती घर आवरायचं काम करू लागली तिने अचानक नोकरी सोडून दिली. आता घरात राहून ती दिवसभर घरातलं सगळं सामान काढून परत लावू लागली. पार्थ ने तिला तिच्या अश्या वागण्याचं कारण विचारायचा खूप प्रयत्न केला पण ती प्रत्येक वेळी टाळत असे. पार्थ तिच्यावर या गोष्टीमुळे कित्येक वेळा चिडला पण तिला काहीच फरक पडत न्हवता. तिचं वागणं बोलणं सगळंच गुढ होऊ लागलं. कधी ती एकदम नॉर्मल असे आणि कधी कधी एकदम यांत्रिक. 


एक दिवस ती अशीच तिच्या मामाच्या गावी गेली, अचानक, कोणालाही न कळवता. आणि गेल्या गेल्या तिने ते घर पण आवरायला घेतलं. मामा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता आणि त्याचं लग्न त्या रक्षाकवच विधी नंतर झालं होतं त्यामुळे मामीला काही माहित न्हवतं. ती मामी ला सारखी फक्त तिच्या काचेची बाटली असलेल्या लॉकेट विषयी विचारत होती. ती पुर्ण रात्र घरात शोधत होती. पार्थ ला आता जास्त शंका आली होती, त्याने अरूण ला फोन केला पण अरूणच्या एकंदरीत बोलण्यावरून ती तिथं नसल्याचं त्याला समजलं. दुसर्या दिवशी पार्थ थेट नित्या च्या आजोळी गेला आणि तिला जबरदस्तीने घरी घेऊन आला. नित्याने तिथून निघताना त्याला खूप विरोध केला पण घरी आल्यावर ती अशी वागत होती जसं काही घडलंच नाही. ती हाॅलमध्ये आरामात बसली होती आणि साध्वी ला हाका मारत होती. पार्थ ला आता नित्या ची खूप काळजी वाटू लागली. त्याने साध्वीला आई सोबत खेळायला सांगितलं जेणेकरून नित्या साध्वीसोबत व्यस्त राहील. पार्थ लागलीच बेडरूम मध्ये आला आणि त्याने अरूण ला फोन करून रक्षाकवच धागा हरवल्यापासून ते आजपर्यंत जे काही घडलं ते सांगितलं. ज्या पंडितजींनी तो धागा दिला होता त्यांना पुन्हा संपर्क करायला सांगितलं. तेवढ्यात बाहेर साध्वीच्या रडण्याचा आवाज आला. तो धावत बाहेर आला, खेळताना कोणत्यातरी खेळण्याने तिच्या बोटाला जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होतं. जवळ घेऊन त्याने साध्वीला शांत केलं आणि मलम आणायला तो पुन्हा बेडरूममध्ये गेला. 


तो बाहेर आला आणि क्षणभर जागीच थबकला. साध्वीकडं पाहून तो जोरात ओरडला "नित्याssssss "


**** क्रमशः ****


धन्यवाद 

*** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****


सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post