अमरत्व भाग ६

 अमरत्व भाग 6

लेखिका: नियती जगतापपार्थ बेडरूम मधून मलम घेऊन बाहेर आला आणि साध्वी कडे बघून जोरात ओरडला "नित्याsssss".


साध्वीच्या बोटाला झालेली जखम पाहून पार्थ कासावीस झाला पण या सगळ्यामध्ये त्याचं लक्ष नित्या कडे गेलंच नाही. जसं साध्वीच्या बोटातून रक्त आलं तसं नित्याच्या चेहर्यावरचे हावभाव बदलले. ती साध्वीकडे अधाशासारखी बघत होती. पार्थ बेडरूम मध्ये गेला तसं नित्या ने साध्वी चा हात हातात घेतला ती गुरगुरायला लागली. ती अधाशासारखी साध्वीचं रक्त चोखू लागली. हे लांबूनच बघून पार्थ च्या तोंडून किंकाळी फुटली. पार्थ चा आवाज ऐकून नित्या भानावर आली. साध्वीची जखम बघून ती पण घाबरली. पार्थ च्या हातात मलम पाहून त्यालाही ओरडली. फक्त मलम लावून नाही चालणार, बेडरूम मधून फस्टएड बॉक्स आणून तिने साध्वीच्या हाताला पहिलं डेटाॅल लावलं आणि मग मलम लावून एक छोटीशी पट्टी बांधली. साध्वी परत खेळण्यात गुंतली पण नित्या अजूनही तिची काळजी करत होती आणि पार्थ हे सगळं अचंबित होऊन पाहत होता. 


आता हे सगळं जास्तच भयंकर होत चाललं आहे याची पार्थला पुर्ण कल्पना आली होती. त्याने पुन्हा अरूण ला फोन लावला आणि आता जे घडलं होतं ते सगळं सांगितलं. पंडितजींना पण येणार्या संकटाची चाहूल लागली होती पण ती चेटकीण आता खूपच शक्तीशाली झाली होती त्यामुळे पंडितजींची ताकद तिच्यापुढे कमी पडणार होती पण देवाची कृपा किंवा योगायोग म्हणा पंडितजीच्या मनात अचानक कामाख्या देवीचं दर्शन घ्यायची ईच्छा झाली आणि ते लगेच आसाम ला गेले सुद्धा. तिथे देवीचं दर्शन घेतल्यावर बाहेर येताना एक अघोरी देवळाच्या आवारात तपश्चर्या करताना त्यांना दिसला. आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळालं तो अघोरी गेली दहा वर्षे तिथेच देवीची आराधना करत होता. आत्तापर्यंत त्याला ना कोणी जागेवरून हाललेलं पाहीलं होतं ना बोललेलं. पण कोणी मनापासून त्यांच्याजवळ गेलं तर ते फक्त त्या व्यक्तीला कामाख्या देवीची आराधना करताना समोर ठेवलेल्या कुंकवामधलं थोडं कुंकू देत असत. तिथे त्या कुंकवाची इतकी ख्याती होती की एकदा ते कुंकू घेऊन गेलेला माणूस परत फक्त आणि फक्त धन्यवाद देण्यासाठीच येत असे.


पंडितजींना का कुणास ठाऊक पण त्या अघोरी साधूशी बोलण्याची खूप इच्छा झाली. ते त्यांच्या जवळ पोहोचले तर त्या साधूने डोळे उघडले आणि इतक्या वर्षात पहिल्यांदाच बोलले. "ती मुलगी सध्या कुठे आहे?, ती संकटात आहे, देवीची मर्जी आहे की मी तिला मदत करावी, देवी वचनबध्द आहे त्या मुलीची रक्षा करण्यासाठी, कुठे आहे ती मुलगी?" पंडितजींना तिच्या मामाचा पत्ता माहित होता, त्यांनी अघोरीला तो पत्ता दिला आणि अघोरी त्याच रात्री नित्या ला भेटायला निघाले. एवढं सांगून अरूण ने पार्थला नित्या ला घेऊन लगेच तिच्या अजोळी जायला सांगितलं. साध्वीला काही इजा होऊ नये म्हणून अरूण तिला काही दिवस स्वतःसोबत घेऊन जाणार होता. पार्थ ने ही होकार दिला आणि आपण उद्या गावी चाललो आहोत हे सांगण्यासाठी तो नित्याकडे गेला. नित्या साध्वी च्या खोलीत होती. पार्थ ने पाहीलं तेव्हा साध्वी शांतपणे झोपली होती पण नित्या एकटक तिच्याकडे पाहत होती. पार्थ ने नित्या ला दुसर्या दिवशी गावी जात असल्याचं सांगितलं. ती खूप खुश झाली पण तिचा प्रतिसाद बघून पार्थ मात्र घाबरला, आता मात्र ती खूपच खुनशी नजरेने साध्वी कडे पाहत होती. जमेल तेवढं शांत राहून पार्थ ने तिला झोपायला सांगितलं पण नित्या तिथून हलायला तयार होईना मग पार्थ पण साध्वी शेजारीच झोपला.  


दुसर्या दिवशी सकाळी अरूण ने दारावरची बेल वाजवल्यामुळे दोघांना जाग आली. नित्या आज नॉर्मल होती. अरूण च्या अचानक येण्याने ती सुखावली. ती आणि पार्थ पटकन त्यांचं आवरून आले. नित्या ने वडीलांच्या आवडीचे पोहे बनवले तोपर्यंत पार्थ साध्वीचं सगळं आवरून तिला तयार करून बाहेर आला. नाश्ता झाल्यावर पार्थ ने नित्या ला तयार व्हायला सांगितलं, तिने विचारलं अचानक कुठे आणि का जात आहोत आपण? पार्थ ला तिचं असं वागणं आता काही नवीन न्हवतं. त्याने शांतपणे तिला सांगितलं की आपण दोघं मामाकडे जात आहोत आणि साध्वी काही दिवसांसाठी अरूणकडे. हे ऐकताच नित्या रडू लागली. साध्वी ला पण बरोबरच घेऊन जायचं म्हणू लागली. पार्थ ने लगेच साध्वी ला तिच्या खोलीत पाठवलं. इकडे नित्या चिडून बोलली " साध्वी आपल्या बरोबरच येणार" 

अरूण: "नित्या तुला एकदा सांगितलं ना साध्वी काही दिवस माझ्यासोबत राहील."

आता नित्या चा आवाज जाड आणि खूप भेसूर झाला. " ए थेरड्या, मी माझ्यासोबतच घेऊन जाणार तिला. तुझी काय हिम्मत मला आडवायची. मला गरज आहे तिची, तुझी नात तर माझ्यासोबत येणारच पण लेकीला जिवंत बघायचं असल तर तिचं ते काचेच्या बाटलीच लॉकेट शोधून माझ्याकडं आणं." आणि नित्या ने अरूण ला हवेत भिरकावलं. अरूण सोफ्यावर पडल्यामुळे त्याला जास्त लागलं न्हवतं पण तो पुर्णपणे घाबरला, नित्या आणि साध्वी च्या काळजीने त्याला रडू यायला लागलं. पार्थ मात्र धीराचा होता, अरूण ला सावरत तो लगेच म्हणाला "आपण सगळेच जण गावी जात आहोत." तशी नित्या शांत झाली आणि जोरात हसली. "तू समजदार दिसतोयस, चल तुझ्या बायकोला परत देईल तुला पण मुलीला विसर, मोठं भाग्य घेऊन जन्माला आली आहे ती, सैतानाला नरबळी हवाय आणि तो ही तुझ्या मुलीचा. तुझी मुलगी मला अमर बनवून जाणार आहे." आणि नित्या परत जोरजोरात हसत बेशुद्ध झाली.


साध्वी बद्दल असं काही ऐकून पार्थ च्या पायाखालची जमीनच सरकली पण त्याचा विश्वास होता की एकदा तो अघोरी भेटला की नित्या आणि साध्वी वर पुन्हा कधीच काही संकट येणार नाही. त्याने बेशुद्ध नित्या ला तसंच गाडीत बसवलं आणि सगळे गावी निघाले. वाटेत थांबून त्याने मामा ला फोन करून सगळं सांगितलं आणि गावात त्या अघोरीला शोधायला सांगितलं. पुढचं जे काही बोलायचं ते सगळं फोनवर न बोलता मॅसेज वर बोलण्याचं ठरवून तो पुन्हा गावाच्या रस्त्याने निघाला. नित्या अजूनही बेशुद्ध होती. पार्थ गाडी चालवत होता. त्याला आता कोणताच धोका पत्कारायचा न्हवता त्यामुळे त्याने साध्वी ला त्याच्या जवळ पुढच्या सीटवर बसवले. पाठीमागच्या सीटवर अरूण बेशुद्ध नित्या च्या जवळ बसला होता. 


इकडे मामा अघोरीला शोधायला बाहेर पडतच होता की तो अघोरी मामाच्या घरी पोहोचला. त्याने मामाला पार्थला थेट गावच्या स्मशानभूमीत नित्याला घेऊन यायला सांगितलं. मामाच्या माथ्यावर देवीचं कुंकू लावून त्याने एक छोटी कुंकवाची पुडी त्याच्या हातात दिली, ही पुडी जवळ ठेऊनच मामा ला जुन्या पेटीत ठेवलेलं नित्याचं ते लॉकेट घेऊन स्मशानभूमीत बोलवलं. अघोरी पूजेची तयारी करायला निघून गेला. मामा ने पार्थ ला मॅसेज करून थेट स्मशानभूमीत बोलवलं आणि त्याने जुन्या पेटीतून लॉकेट काढलं. 

 

इकडे पार्थ गावाच्या वेशीवर पोहोचला. मामाने जसं ते लॉकेट हातात घेतलं तसं इकडे पार्थ ची गाडी बंद पडली. तो साध्वी ला गाडीमध्येच बसवून गाडी चेक करायला खाली उतरला. नित्या अजूनही बेशुद्ध होती त्यामुळे अरूणही गाडीतून खाली उतरला. पाच मिनिटांनी गाडी आपोआप चालू झाली जशी ती कधी बंद पडलीच न्हवती. साशंक मनाने पार्थ आणि अरूण पुन्हा गाडीत बसायला गेले तर गाडीमध्ये कोणीच न्हवतं. नित्या आणि साध्वी दोघीही गायब झाल्या होत्या.


**** क्रमशः ****

 

धन्यवाद 

*** @ या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. ****


सदर कथा /लेखन माझे, नियती जगताप चे असून ते मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा नियती जगताप यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. शब्दचाफा ब्लॉगींग कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post