या जगण्यावर भाग दोन

 

ह्या जगण्यावर भाग २

बीना बाचल



भाग एक 
👇
भाग एक

राधा लवकरच घरी पोहोचली.सगळ्यांची जेवणं उरकल्यावर ती फोन घेऊन सुजय कडे गेली आणि तिनं आज घडलेली गोष्ट सांगितली ,त्याला तो मेसेज दाखवला.सुजय ने तो फोन नंबर आपल्या फोन वरून डायल करून पाहिला, पण कोणी उचलला नाही. मग सुजय म्हणाला", अग चुकून आला असेल तुझ्या नंबर वर हा मेसेज. फार काही मनावर घेऊ नकोस.आणि पोलिसांकडे तक्रार करण्या इतपत काही झाले नाहीये,उगाच कशाला त्या फंदात पडा" राधा ला हे पटेना" अरे सुजय,चुकून असा मेसेज कसा येईल माझ्या नंबर वर? मी माझा नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्ती ला दिलेला नाहीये कधीच!"

पण पुढे काही बोलण्याआधी सुजय गाढ झोपी गेला होता.

राधा ही मग झोपी गेली. पुढचे दोन दिवस काहीच घडले नाही, मग राधा ही समजून गेली की ' सुजय म्हणतो तसं खरंच चुकून आला असेल आपल्याला मेसेज!" नाहीतरी कोणी आपल्याला असा मेसेज करायला आपण कोण लागून गेलोय एवढ्या!! रोज आरशात धड बघायला ही वेळ होत नाही सकाळच्या गडबडीत, असो ,जाऊ देत आपण आणि आपले हे रोजचे आयुष्य हेच बरे!"

नंतर राधाने सावीला ही तसेच सांगितले.

" अग काहीतरी चूक झाली असेल ,बघ दोन दिवस कुठे काय मेसेज वगरे काही नाही ."

पुढचे काही दिवस असेच गेले.राधा आणि सावी चे पुन्हा रोजच्या गप्पा,लोकल गर्दी सगळे नेहमीप्रमाणे सुरू झाले.

अचानक  एक दिवस पुन्हा राधा ला पुन्हा मेसेज " आज निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये छानच दिसत होतीस!"

राधाच्या तोंडचे पाणीच पळाले!!हे काय कोणीतरी आपला पाठलाग करतंय की काय? माझ्या ड्रेसचा रंग समजे पर्यंत कोणाची मजल गेली!

तिनं सावीला तो मेसेज दाखवला .सावी ला ही काय बोलावे कळेना. पण वातावरण हलके करण्यासाठी तिनं उगाच म्हटलं" पण काही म्हण राधा,हा निळा रंग खरंच खुलून दिसतोय तुला!"

राधा ने तिला एक धपाटा घातला आणि राधा लाही  तिच्यामुळे हसू फुटले " तुला गंमत सुचतेय होय, इथे कोणी तरी माझ्या पाळतीवर आहे आणि तुला हे सुचतंय!"

त्यावर सावीचे उत्तर" अग जो कोणी मेसेज करतोय तो काही वाह्यात पणा करत नाहीये, फक्त तुला compliments देतोय,फार मनावर घेऊ नकोस,तू काहीच प्रत्युत्तर दिले नाहीस की आपोआप समजून जाईल जो कोणी असेल"

राधाने विषय तिथेच थांबवला.घरी आली तर सुजय आज उशिरा येणार होता म्हणून सगळी आवराआवर करून राधाच झोपी गेली. सकाळी कामाच्या घाईत ती सुजय ला काही सांगू शकली नाही.

आज ऑफिस ला पोहोचल्यावर राधा सर्वांकडे च जरा संशयाने बघत होती, कोणी ऑफिस मधले तर आपली फिरकी घेत नसेल ना?अखेर दिवस संपवून ती घरी निघाली. तर पुन्हा मेसेज " सांभाळून जा ,गर्दीत चढू नकोस ट्रेन मध्ये!" राधाने लगेच आपल्या आजूबाजूला पाहिले कोणी आपल्याला पाहतंय की काय म्हणून, पण ह्या एवढ्या गर्दीत तिला काहीच लक्षात आले नाही. आज सावीची आणि तिची चुकामुक झाली ट्रेन मध्ये त्यामुळे राधा एकटीच निघाली. राधाचा जरा डोळा लागला, पण पुन्हा फोन वरच्या मेसेज ने तिला जाग आली." राधा खूप छान आहेस ग तू,पण जरा स्वतः कडे लक्ष देत जा. दुःख कोणाला चुकली आहेत ,पण अशी निराश नको राहत जाऊ,हसलीस की किती छान दिसतेस बघ!!"

राधा ला काहीच सुचेना,हे काय चाललंय !! कोणाला आपल्या हसण्या विषयी,दिसण्याविषयी एवढी काळजी वाटतेय? कोणाला माझ्याशी काय घेणय? हल्ली सुजय ला देखील वेळ नसतो आपल्याकडे बघायला ही, आणि हा कोण लागून गेलाय एवढा?" तेवढ्यात राधाच्या लक्षात आलं की ही अनोळखी व्यक्ती पुरुष च असेल कशावरून?कुठल्याच मेसेज वरून तसं स्पष्ट कळत नाहीये.ही कदाचित.....कदाचित .....सावी तर नसेल? उगाच आपली थट्टा करायची म्हणून करतेय की काय हे सगळं? तरीच आपण मेसेज दाखवले की हसण्यावारी नेत होती प्रत्येक वेळी!! उद्या नेमका रविवार आलाय नाहीतर सावीला ट्रेन मधेच गाठलं असतं, येऊ देत सोमवारी ट्रेन मध्ये मग बघते तिला!!राधा चं मनोमन स्वगत सुरू होतं. आता तिला त्या मेसेज ची भीती वाटेना.  पर्स मध्ये फोन ठेवताना आज तिनं हळूच आरसा काढला आणि स्वतः ला न्याहाळल. ' हा कामाचा आणि इतर ताण असतो नाहीतर एवढ्या काही वाईट दिसत नाही आपण!!" आज तर राधाने त्याच आनंदात लोकल मध्ये येणाऱ्या मुलींकडून कानातले, गळ्यातले आणि केसांमध्ये लावायच्या क्लिप्स अशी छोटी मोठी खरेदी ही केली! तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.

 रविवार आला तसा भुर्रकन उडुनही गेला.

  आज राधाने जरा लवकर कामे आवरली. ऑफिस ला जाताना छान ड्रेस,त्यावर मॅचिंग कानातले ,छानशी टिकली आणि हलकीशी लिपस्टिक लावली. आरशात पाहताना तिचे तिलाच राहवले नाही" कित्येक महिने आपण स्वतः कडे लक्षच दिले नाहीये ,आपण किती छान दिसतोय आज!" सुजय ने बघून न बघितल्या सारखे केले तिला, पण राधा ला त्याचे काही वाटले नाही. आज तिची तीच खुश होती. राधा प्लॅटफॉर्म वर सावीची वाट पाहत उभी राहिली. ट्रेन आली पण सावीचा पत्ता नव्हता. अखेर राधा ट्रेन मध्ये चढली आणि ट्रेन सुरू होताना सावी धावताना दिसली पण तिला ट्रेन पकडता आलीच नाही. राधा चुटपुटली. आज ऑफिस मध्ये पोहोचताच सर्वांनी तिचं ' छान दिसते आहेस ' म्हणून कौतुक केलं. राधा दिवसभर तरंगत च होती. आज तिला सुजय ला कधी भेटतेय असे झाले होते, किती दिवस झाले आपण अशा छान तयार होऊन सुजय बरोबर कुठे फिरायला गेलो नाही. तिनं त्याला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तोवर त्यावर मेसेज आलेला च होता" बघ जरा स्वतः कडे, किती छान दिसतेस आज!अशीच रोज छान रहा, मजेत जग" तिला आज त्या मेसेज चा राग येण्याऐवजी हसूच आले. किती काळजी आहे कोणाला तरी आपली! 

 तिने सुजय ला अमुक एका ठिकाणी भेटायला सांगितले, सुजय वेळेआधीच पोहोचला. मग राधा आणि सुजय ट्रेन पकडण्याची घाई न करता जवळच्या बागेत गेले, बागेतल्या मंदिरात गेले. थोडा वेळ तिथे बसून गप्पा मारून मग घरी निघाले.सुजय ला हा बदल फार आवडला, नेहमी करवदलेली राधा आज चक्क गप्पा मारतेय, हसतेय. छान च!!

दोन दिवस सावी मात्र भेटत नव्हती ,आणि 'मेसेज' मात्र  सुरूच होते. राधा ही हे ' सावीचेच काम' म्हणून निर्धास्त होती. पण आता राधा स्वतः साठी वेळ काढत होती. जमेल तसे छान तयार होऊन ऑफिस ला जात होती.असे करता करता पुन्हा रविवार येऊन ठेपला.

आज आठवणीने सावीला फोन करायचाच म्हणून राधाने फोन हातात घेतला आणि सावीला फोन लावला" हॅलो सावी,अग राधा बोलतेय .गेला आठवडा झाला आपण भेटलो नाही आणि ह्या आठवड्यात बरंच काही घडून गेलंय. आपण आज भेटू यात का? मला तुझ्याशी बोलायचं आहे"

पण सावीने आज काम आहे घरातलं म्हणून टाळलं. राधा थोडी नाराज झाली .तिनं सुजय ला विचारलं की आपण कुठं जाऊ यात का फिरायला पण त्याचाही मित्रांसोबत आधीच प्लॅन ठरला होता.

मग राधा एकटीच बाहेर पडली.तिला आजचा निवांत वेळ सत्कारणी लावायचा होता, स्वतः साठी. तिनं जवळच्या मॉल मध्ये फेरी मारायचे ठरवले. ती तिथे पोहोचली. इकडे तिकडे बघत विंडो शॉपिंग करत ती भटकत होती. तेवढयात तिचं लक्ष फूड कोर्ट मध्ये एका टेबलापाशी गेलं.तिथं चक्क सावी बसली होती . कोणीतरी पुरुष सोबत होता तिच्या, राधाने थोडे पुढे होत पाहिले तर तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!! सावी सोबत चक्क सुजय होता तिथे!!त्याच्या हातात गुलाबाची फुलं होती , तीही राधाला आवडतात तीच!!

क्रमशः

(कथा कशी वाटतेय नक्की कळवा)

पुढील भाग वाचण्यास निळ्या रंगावर क्लिक करा.

 👇

भाग तीन

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post