ह्या जगण्यावर भाग एक

ह्या जगण्यावर....


#भाग१

बीना बाचल



राधा आणि सुजय हे एका महानगरात राहणारं सर्वसामान्य जोडपं. ठरवून लग्न केलेलं.खरं तर ह्या महानगरात लोक  घर आणि ऑफिस च्या लोकल ची स्टेशनं किती  येतात यावर सुद्धा लग्न ठरवतात पण राधानं तिच्या माहेरची नाजूक आर्थिक परिस्थिती चा विचार करत सुजयच्या स्थळा ला होकार दिला होता. पण त्यामुळं झालं काय की तीला थेट मुख्य शहराच्या अगदी टोकाच्या उपनगरात  यावं लागलं सुजयच्या घरी!

        जरा विस्तारत जाऊन सांगायचे तर मुख्य शहराच्या ईतक्या  दूरवर असूनही सुजयचं घर अगदीच लहान होतं आणि त्याही उपर म्हणजे एवढ्याशा टीचभर घरात सासू सासरे,सुजयचा भाऊ,बहीण राहणारे किंवा कसे बसे दिवस ढकलून जगणारे.शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जीव मुठीत धरून गच्च लोकल मध्ये लटकत अर्धे आयुष्य काढणारे हे जोडपं. रोज थोडं थोडं मरत जगणारं! ना कुठली आकांक्षा , ना उमेद! फक्त आला दिवस ढकलायचा आणि आठवड्यातून एकदा येणाऱ्या रविवारची डोळे लावून वाट बघायची बस्स!

बरं ऑफिस मध्ये ही सुखासुखी काही नव्हतंच.तिथेही डेड lines पाळायच्या,बॉस ची बोलणी खायची तीही अगदी गपगुमान.ऑफिस मध्ये मर मर काम करून घरी आले की घरच्या समस्यांना तोंड देत नाकी नऊ यायचे त्यांच्या, कुठं सासू सासऱ्यांचं दुखणं खुपणं तर कुठे सुजयच्या भाऊ बहिणीच्या शिक्षण वगरेचा  खर्च!त्यामुळे एकमेकांसाठी वेळ देणं तसं मुश्किलच!! हा ,सकाळी सकाळी ऑफिस गाठण्यासाठी एकत्र बाहेर पडायचे तेवढाच काय तो त्यांचा ' me time'. सुरुवातीला ते दोघेही एकत्र बाहेर पडताना अगदी खुश असायचे, किती गप्पा मारू आणि किती नाही असं व्हायचं दोघांना  पण हल्ली त्या वेळी ही ते प्रेमाच्या गप्पा मारायचे विसरले होते. बोलणं व्हायचं म्हणजे ते फक्त हिशोब, बिलं भरायची तारीख, बँकेची कामं इत्यादी इत्यादी.त्या me time चाही अगदी कंटाळा यायला लागला होता दोघांना .

 नवरा बायको एकमेकांशी थोड्या प्रेमाच्या गोष्टीही करू शकतात हेच विसरले होते दोघे.

अलीकडे gents डब्यात गर्दी होते फार, हे कारण देत राधा ladies मधूनच जायची ऑफिस ला. खूप guilt यायचा तिला पण खरंच तेच तेच वाद, त्याच समस्या;अगदी नको व्हायचं तिला म्हणून मग  एकदा का कानाला earphone अडकवले की पुढचा अर्धा पाऊण तास जरा शांततेत जायचा तिचा.सुजय शी त्याच त्याच गोष्टी ,घरातले वाद discuss करण्यापासून तेवढीच सुटका व्हायची तिची.

अशीच एक दिवस ती मोबाइलमध्ये गाणी ऐकत असताना एक तिच्याच वयाची स्त्री तिच्या शेजारी येऊन खेटून बसली.खरं तर राधा वैतागली ह्या 'फोर्थ सीट' मुळे पण ही नाही तर कोणी दुसरी येऊन बसणारच ह्या विचाराने ती गुपचूप आत सरकली . त्या दुसरीने हसून राधा कडे पाहिले", Hi मी सावित्री पण सगळे मला सावी म्हणतात"

राधा ला तिचा हा भोचकपणा मुळीच आवडला नाही,' तुला सावी म्हणोत की अजून काही, मला काय घेणय!! आणि इथे कोणाला वेळ आहे ह्या hi hello ला' अर्थात हे सगळं मनातल्या मनात बोलत राधा  तिच्याकडे पाहून कसनुस हसली. सावी ला आता चान्स च मिळाला ,तिनं तिची बडबड सुरू केली की कशी ती ह्या शहरात नवीन आहे, अजून इथल्या सगळ्या गोष्टींची तिची कशी ओळख व्हायची आहे, तिला सगळ्या गोष्टी अनुभवयच्या आहेत, infact ही गर्दी पण तिला एन्जॉय करायची आहे वगरे वगरे!!" सावी ची अखंड बडबड सुरूच होती. पण राधाला त्याचा आता वैताग येऊ लागला होता.

राधा (पुन्हा मनातच)" एन्जॉय करायचंय म्हणे,एकदा लोकल पकडताना चिरडली गेली ना गर्दीत की समजेल कसे असते ते!! थोडे दिवस थांब नाही ह्या शहराने तुझे यंत्र बनवून टाकले तर मग सांग!इथे जीव नकोसा होतो रोज प्रवासात आणि हिचं भलतंच काही चाललंय"

राधा पुन्हा" हो का? अरे वाह,छान" एवढे प्रकट बोलून गप्प बसली.

आता हे रोजचेच झाले. राधाने  येऊन ट्रेन पकडली की कशी ही करून सावी तिच्या शेजारचे सीट गाठायची. राधा ने काही दिवस टाळले पण आता राधा लाही सावीची ही बडबड आवडू लागली. काही वेळ का होईना हिची ही अखंड बडबड आपल्याला आपले problems विसरायला भाग पाडते, अखंड दिवसात आपण फक्त एवढ्या अर्ध्या तासात च चेहऱ्यावर हसू आणतो नाहीतर पूर्ण दिवस फक्त काम,टेन्शन हे सुरूच असतं.

ह्याचा परिणाम असा झाला की राधाच आता सावीसाठी जागा राखून ठेवू लागली,तिची रोज वाट पाहू लागली. कटकटीची जागा आता सावीची वाट पाहण्यात बदलू लागली ,मैत्री रुजू लागली आणि हळूहळू त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की दोघीही एकमेकींची सुख दुःख वाटून घेऊ लागल्या. सावीला राधा च्या एकूणच घरातल्या परिस्थिती चा अंदाज आला.तिचं आणि सुजय चं दुरावत चाललेलं नातं ही लक्षात आलं. सावी राधा ला खूप समजवायची की अग तुम्ही प्रेमाने वागा,म्हणजे मग मिळून सगळे प्रॉब्लेम्स सोडवाल ,पण राधा ते फारसे मनावर घ्यायची नाही.

असेच दिवस सुरू होते.

राधा -सावी भेटत होत्या, दिवस चालले होते.

 पण अचानक एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं . राधा च्या मोबाईल वर एका unknown numbar वरून whatsapp msg आला, खूपच छान रोमँटिक msg होता, msg करणाऱ्याने मर्यादा ओलांडली नव्हती पण तरीही!! राधाच्या एकसुरी आयुष्यात काहीतरी खळबळजनक घडलं होतं आणि तिला ते सुजय ऐवजी सावीला सांगायची घाई झाली होती!! अखेर सावी भेटली आणि राधाने तिला सर्व सांगितले. 

सावीने तिची मस्त चेष्टा केली पण नंतर दोघी गंभीर झाल्या. दोघीनी ह्यावर काय करता येईल ह्याचा काथ्याकूट केला पण ठोस असं काही सुचेना अखेर हे सगळं सुजय च्या कानावर घालायला हवे असे दोघीनी ठरवले.

आणि राधा कधी नव्हे ते आज घराच्या आणि सुजयच्या ओढीने घराकडे धावली.

क्रमशः

बीना समीर बाचल

भाग दोन वाचण्यास निळ्या रंगावर क्लिक करा

👇

https://www.shabdchapha.com/2022/07/blog-post_51.html?m=1


वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post