उपवास

 उपवास....

अनघा लिखिते 

          रविवार... सकाळची वेळ... घरी ब्लॅक ॲन्ड व्हाईट टिव्ही असल्यापासून रंगोली पाहायचं. मग पेपर वाचन, सोबत सौंशी गप्पा. हे दर रविवारचे रूटीन. मुलं अजून शांत झोपलेली... प्रशांत हातात पेपर असुन शर्वरीची हालचाल टिपत होता. ती शांतपणे घरातील कामं आटपत होती आणि तेही तोंडातून एक चकार शब्द न काढता. अरे यार कसं शक्य आहे ?


          ही युद्धपूर्वीची शांतता तर नाही ना ... त्याचे विचारचक्र १०० च्या स्पीडने सुरू झाले. त्याचे पेपर वाचण्यात मनच नव्हते. म्हणून उगाचच पेपरची चाळवा-चाळव करत बसला होता.  विचार केला होता की आज रविवार आहे, मस्त एका हातात वाफाळलेल्या चहाचा कप आणि दुसऱ्या हातात पेपर, अगदी आरामखुर्चीत पाय ताणून रिलॅक्स वाचायचा.


          लग्न होईपर्यंत बरं होतं. आई हातात चहा-नाश्ता द्यायची. अगदी मागे लागायची - "अरे चहा गार होतोय, पोहे थंडावले तुझी वाट पाहून, वाळले बिचारे तुझ्या प्रतिक्षेत." आईच्या आठवणीने चेहऱ्यावर हसू आले.


          ओ गॉड ! माझी आई येणार असेल, म्हणून तर बाईसाहेब फुगल्या नसतील ना ? तिची आई येणार असेल तर -


          'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे.

          वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे..'


          बालकवींची ही कविता जणू काही या प्रसंगासाठी लिहीली असेल, असं उगाचच वाटून जातं. माझी आई येणार असली तर -


          'सुखभरे दिन बीतें रे, अब दुख आयो रे..'


          असं उलटं गाणं वाजू लागतं. आधी मागच्या वेळी आई आली होती तेव्हा तिने काय काय केले, याची उजळणी होते. मग मी पण बफरतो, घराची युद्ध भूमी होते की काय असं वाटतं मुलांना. असो...


          नाही.. नाही... पण कालच तर आपला आईशी फोन झाला. ती दादाच्या साळीच्या लग्नासाठी वहीनी सोबत जाणार आहे. मग ? हिला विचारले नसेल त्या दोघींनी, म्हणून तर नसेल ना ? काय सांगावं...


          मागील सर्व भांडणाची सुरवात हीच होती, अगदी अशीच. रात्रीत ऑलवेल असायचं पण सकाळी परिस्थिती वेगळी. स्त्री स्वभाव भगवान रामचंद्रांनाही समजला नाही, आपण तर पामर... आधीच्या काळात राजे-महाराजे कसं काय मॅनेज करायचे ? त्यांचे मॅनेजमेंट स्किल उत्तम असावं, म्हणून तर ते युद्ध भूमी वर लढायला जाऊ शकायचे.


          काय करावं ? विचारावं तर लगेच भडका उडेल... पण न विचारून चालणार तर नाहीच नाही ... मागे एकदा असंच झालं... मी भितीने काही विचारलंच नाही, तर त्यावरूनच वाजलं की तुम्हाला माझी काही फिकीरच नाही. मी का शांत आहे ? साधं विचारू पण नये का ?


          दोन तास शाब्दिक धुमश्चक्रीत गेले, ते पण वन साईडेड हं. मी फक्त एक्सप्लनेशन देत बसलो. दादा आलेला होता, मस्त एन्जॉय करत होता. त्यालाही कुठे चुकला होता, असा प्रसंग. आता मी समदुःखी झालो होतो त्याच्यासाठी.


          त्या दिवशी शेवटी मी मनाचा हिय्या करून विचारलेच आणि आता इतके वार सहन केले, चार फटके अजून...

         

          "काय गं शर्वरी ? झालं काय सांगशील तरी...", मी तिला प्रेमाने जवळ घेत म्हणालो. त्यावर तिचं उत्तर ऐकून चाट पडलो की..‌ "काहीच नाही झालं..‌ पण ताई म्हणाली की मधे मधे असं चेक करत राहायचे, तरच गाडी रुळावर रहाते."


          मी तिला जवळ घेतलेलं अक्षरशः ढकललं आणि डोक्यावर हात मारला. मग मी भडकलो, "अगं बाई, आपण गेले दोन तास भांडणात घालवले, त्या दोन तासांत तिकडे अंबानी, टाटा, बिर्ला यांनी अरबो-खरबो रूपये कमवले असतील. आपण दोन तासात आयुष्यातील मोलाचा वेळ व्यर्थ खर्च केला. माझी आई बघं, शिक तिच्या कडून काही. ती कधीच बाबांच्या डोक्याला ताप देत नसत आणि आता तर नाहीच नाही. गृहीणी असावी तर अशी, गृहकृत्यदक्ष !!!"


          "अगं बाई, हो का ? मग बसले का तुम्ही अंबानी, टाटा, बिर्लांच्या पंगतीत... आले मोठे...", ती फणकाऱ्याने म्हणाली.


          मी गप्प. बायकांना हे मस्त जमतं.. एका फटक्यात समोरच्याला गार करायचे. पण भांडणानंतर चांगलं - चुंगल खाऊ घालणारीही तिच असते. येते मजा कधी कधी. मलाही येतेच म्हणा कधी कधी खुमखुमी. फक्त तिच्या माहेरच्यांविरोधात एक शब्द फेकला, तरी बास्. मग वाजु लागतात भांडी.


          अरे पण आज काय झालंय ? विचारतोच. आज चहा सुद्धा नाही आला अजून.


          मी भीतभीतच आवाज दिला, "शरू डीयर, अगं चहा देतेस नं ?" असं डीयर वगैरे म्हणून प्रेम एक्स्प्रेस करावं लागतं, बरं का.. त्यावरूनही वाजलेले आहेच. तिच्या फास्ट फ्रेंडचा नवरा आपल्या बायकोला सर्वांदेखत असं डीयर, स्वीट हार्ट, जान, जानु म्हणतो म्हणून. तो भेटल्यावर मी जो झापला त्याला. त्यावर तो मला म्हणाला की 'आधी ती माझी गर्लफ्रेंड होती. असं म्हणत नव्हतो, त्यामुळे आमचं ब्रेक-अप झालं. मग तुझ्या बायकोने पुन्हा पॅच-अप करवले. तेव्हा पासून मी सवयच टाकून घेतली. जे बोलायचे आहे त्याआधी यांतील एक शब्द वापरायचा. म्हणून सर्वांदेखत असं सहज तोंडून निघतं - जान, जानु, डीयर... तु पण कर सवय...


          वरून फुकटचा सल्ला मिळाला... त्याचं काय जातं, त्यांचा राजा-राणीचा संसार.


          तेवढ्यात ती सुंदरसा ड्रेस घालून हातात ट्रे, त्यात चहा, एका प्लेटमध्ये बिस्किटे, खारी असं छान प्रेझेंट करून आली. मी आवाक झालो. पण मी लगेच तिला, "व्वा ! क्या बात है. तु तर खूप मस्त दिसतेय आणि चहाचा सुगंध तर.. व्वा !! अगदी आसाम मधुन थेट स्वयंपाक घरात चहापत्ती आलेली वाटतेय. मस्त प्रेझेंटेशन केलंय. संजीव कपूर सुद्धा फिका पडेल..." इतकी तारीफ मी आईची केली असती ना कधी, तर त्या माऊलीचं मन भरून आलं असतं.


          मग आम्ही दोघे चहा-टोस्ट खाऊ लागलो. मी आठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला की आज तिचा, माझा, मुलांचा किंवा तिच्या माहेरच्या मंडळींचा वाढदिवस वगैरे तर नसेल ना ? किंवा आमची ॲनिवर्सरी वगैरे ? छे !!! काहीच नाही लक्षात येत. मी विचारलेच भीत भीत...


          "काय गं... आज समथिंग स्पेशल ?"


          "अरे हो. आज माझा किनई उपवास आहे."


          "अगं मग उपवासात टोस्ट चालतात.", मी उगाच खट्याळपणे म्हणालो. कधी कधी असं करणं नडतं बरं...


          "अरे नाही. काल नं अवखळ महाराजांच्या प्रवचनात त्यांनी असं सांगितलं की..."


          मनात विचार आला की मी काही बोललो तर माझी अक्कल काढली जाते. अन् कोण कुठला तो महाराज, त्याचे मात्र नुसते ऐकत नाही तर अंमलबजावणी पण होते. भेटलेच पाहिजे त्याला.


          "अरे ऐकतोय नं ?"


          मी भानावर येत, "अं हो.. हो... ऐकतोय नं अवखळ महाराजांच्या गोष्टी. किती छान सांगितले आहे त्यांनी... व्वा !"


          "अरे पण मी अजून सांगितलेच नाही, त्यांनी काय सांगितले ते... काहीच लक्ष नसतं तुझं कधी माझ्या बोलण्याकडे...", ती फुरगुंटून म्हणाली.


          मी लगेच सावध पवित्रा घेतला आणि गाडी परत ट्रॅकवर आणली, "अगं, मला वाटलं की उपासाच्या दिवशी टोस्ट किती आरोग्यकारक आहे, असं काही सांगितले की काय..."


          "अरे, नाही रे... हा असा उपवास आहे की वाईट आचार-विचारांचा त्याग करणे. चुगल्या-चपाट्या, वाद-विवाद, तंटे यापासून दूर राहणे आणि दिवस आनंदाने व्यतीत करणे. काही चांगले कार्य करणे, आपण कुठे चुकीचे वागलो असेल, तसे पुढे न वागण्याचा संकल्प करणे, ईत्यादी ईत्यादी."


          मी मनात म्हणालो - हाशsss म्हणजे आज मोबाईलला शांती भेटणार. आज गॉसिपिंग बंद, म्हणजे कुठलीही बिसी किंवा किटी पार्टी आज होणार नाही. आयुष्यात पहिल्यांदाच असं सांगणाऱ्या अवखळ महाराजांच्या पाया पडायची ईच्छा झाली. मला वाटते की तो सुद्धा पिडीत असावा, ही शंका मनात अलगद आली. 

   ओम शांती...

समाप्त

अनघा लिखिते

वरील कथा अनघा लिखिते यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


पुढील कथा वाचायला ही तुम्हाला आवडेल

👇

या जगण्यावर

    

Post a Comment (0)
Previous Post Next Post